21 October 2020

News Flash

एकतेसमवेत विविधता

‘‘लेखाच्या शीर्षकाप्रमाणे, आमचे सहजीवन म्हणजे- एकतेसमवेत विविधता. ते अशासाठी की, आमची दोघांची जात, धर्म, मातृभाषा, चालीरीती, शिक्षण, व्यवसाय, स्वभाव, आवडीनिवडी, सवयी हे सर्व वेगवेगळे...

| June 14, 2014 01:01 am

‘‘लेखाच्या शीर्षकाप्रमाणे, आमचे सहजीवन म्हणजे- एकतेसमवेत विविधता. ते अशासाठी की, आमची दोघांची जात, धर्म, मातृभाषा, चालीरीती, शिक्षण, व्यवसाय, स्वभाव, आवडीनिवडी, सवयी हे सर्व वेगवेगळे होते व आहे, पण एकता अशासाठी की, धर्म, जात, भाषा एकत्र येण्यात आड आल्या नाहीत. चालीरीती आत्मसात केल्या. आवडी, सवयी स्वीकारल्या, व्यवसायात पूरकता आणली, मदत केली. मला वाटते यामुळेच आमचे दीर्घ सहजीवन यशस्वी व आनंदी झाले.’’ सांगताहेत
डॉ. जयश्री फिरोदिया आपले पती, उद्योजक अरुण फिरोदिया यांच्याबरोबरच्या ५० वर्षांच्या समृद्ध सहजीवनाविषयी..

मा झ्या व अरुणच्या सहजीवनाविषयी लिहायचे म्हटल्यावर मनात आठवणींनी गर्दी केली. माझे सर्व जीवन मी जसे जगले, प्रांजल व सत्याच्या साहाय्याने, तसेच हेही सर्व. एक गोष्ट मात्र आधीच सांगायला हवी. या दीर्घ सहजीवनाबद्दल आम्ही दोघेही सुदैवी आहोत तसेच मी सर्वार्थाने अरुणची अर्धागिनी झाली आहे.
मी माहेरची जया पाठक. आम्ही मुंबईच्या उपनगरात राहात होतो व माझे वडील हरिभाऊ पाठक सचिवालयात गृहखात्यात सचिव होते. अकरावीच्या परीक्षेत मी माझ्या सेंटरला प्रथम आले. नंतर रोज लोकलचा दगदगीचा प्रवास नको म्हणून वडिलांनी मला पुण्यात फर्गसन कॉलेजमध्ये सायन्स शाखेत प्रवेश घेऊन दिला व वसतिगृहात मी राहावयास गेले. तेथे नवा अभ्यास, नवीन मैत्रिणी यात मी गुंग झाले. माझ्याच ‘फ’ या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांच्या तुकडीत अरुणही होता. मॉडर्न हायस्कूलचा, बोर्डामध्ये आलेला स्कॉलर. काही नजरभेटीतच आम्ही एकमेकांकडे आकृष्ट झालो. एकदा वर्गात मुलांनी कागदी बाण मारल्यावर उठून प्राध्यापकांकडे मी तक्रार केली की, ‘सर, आम्ही काय येथे बाण खायला येतो? या मुलांना रागवा..!’ माझा हा बाणेदारपणा त्याला आवडला. कॉलेजच्या जिमखाना व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत निवडून आल्यावर त्याने दिलेल्या कॅन्टीनमधील पार्टीत मला त्याने आमंत्रण दिले. नंतर चुटपुटत्या भेटी, नोट्सची अदलाबदल, संक्रांतीस भेटकार्ड, तिळगूळ व गोड कविता यातून आमची मैत्री वृद्धिंगत होत गेली. खंडाळ्याच्या ट्रिपमध्ये अरुणने अनेक पत्त्याच्या जादू दाखवताना माझ्यावरही जादूचे मोहजाल टाकले, पण मला चोरटे प्रेम प्रकरण नको होते. मी सरळ मनोगत व्यक्त केले. मैत्री हवी ठेवायला तर पुढे अंतर देऊ नकोस. जन्माची साथच हवी! अरुणही राजी झाला. पुढील वर्षी तो आय.आय.टी. पवई येथे प्रवेश मिळवून बी.टेक.साठी निघून गेला. माझ्यासमोर ध्येय होते वैद्यकीय शिक्षणाचे. माझे मामा डॉ. किरपेकर सोलापूरला निष्णात सर्जन होते. लहानपणापासून त्यांचे काम पाहून मलाही डॉक्टर व्हायची कामना होती. तेव्हा पुढील वर्षी मी बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले. आपापले अभ्यासक्रम आम्ही उत्तम तऱ्हेने पूर्ण केले. त्या काळात फोन, वरचेवर पत्रे, कधी तरी भेटगाठ मात्र न चुकता होत होती. ओढ वाढतच होती. खरं तर आम्हा दोघांच्याही घरी पत्ता नव्हता. अरुण तर मजा करत असे. माझी पत्रे मित्राच्या नावावर मागवी, वर त्याला सर्वासमोर चिडवीत असे, ‘काय रे कोणाची पत्रे येतात तुला?’ तो गोरामोरा व्हायचा.
अशी पाच वर्षे सरली. १९५९ ते १९६४. अरुणचे बी.टेक. पुरे झाले व त्याच्या हातात पुढील शिक्षणासाठी एमआयटी, बोस्टन येथील प्रवेश मिळाल्याचे पत्र आले. साहजिकच त्याला तेथे जाण्याचे वेध लागले. मला एम.बी.बी.एस.ची शेवटच्या वर्षांची परीक्षा देऊन इंटर्नशिप करून पदवी संपादन करण्यास दीड वर्षांचा अवकाश होता. आता आम्ही आपापल्या घरी मानस कळवला. अर्थातच त्यांना सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला. माझ्या बाबांनी चौकशी केली तेव्हा अरुणचे आजोबा स्वातंत्र्यानंतर विधानसभेचे पहिले अध्यक्ष होते हे समजले. तसेच त्यांचे नगरचे एक स्नेही बार्शीकर त्यांना म्हणाले की, फिरोदिया कुटुंब इतकी सुसंस्कृत, सुविद्य आहे की, एकच काय, मला दोन मुली असत्या तर दोघींना मी त्या कुटुंबात आनंदाने दिले असते. हे सर्व कळल्यावर माझे आई-वडील राजी झाले. अरुणचे आई, वडील, काका, मामा, आजोबा सर्वच सुधारक विचारांचे होते. अरुणच्या आई-वडिलांचाही विवाह त्यांच्या काळात दस्ता-बिस्सा असा वेगवेगळ्या पोटजातीत होऊन सुधारक ठरला होता. मला वाटते, त्या सर्वाना भेटल्यावर मी त्यांना आवडले व १२ मे १९६५ रोजी पुण्यात आमचा विवाह सर्वधर्म पद्धतीने या अभिनव पद्धतीने पार पडला. अर्थात ‘इंटरकास्ट’ व ‘इंटररीलिजन’ असल्याने प्रथम सकाळी आम्ही रजिस्टर्ड मॅरेजही केले. ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, शंतनूराव किलरेस्कर व अनेक नामवंत मंडळी स्वागत समारंभास आली होती. सर्वात मला काय आवडले तर रात्री गृहप्रवेश झाल्यावर सकाळी सात वाजताच आम्ही मधुचंद्रासाठी सिमला- कुलू- मनालीला रवाना झालो. ते रम्य दिवस- अरुणचा मनसोक्त सहवास, बर्फाच्छादित हिमशिखरे- ज्यांची शोभा मी प्रथमच पाहात होते. थंड आल्हाददायक हवा. म्हणजे आयुष्यातील एक अनमोल ठेवा आहे. नंतर पुढील ट्रिप्सना जाताना आम्ही हा आपला कितवा मधुचंद्र आहे हे गमतीने म्हणतो! सिमल्याहून परतल्यावर तीन महिन्यांनी अरुण अमेरिकेला पुढील शिक्षणासाठी रवाना झाले. माजी एम.बी.बी.एस.ची शेवटची परीक्षा असल्याने व मला होस्टेल जीवनाची सवय असल्याने मी परत तेथेच राहायचे ठरवले. नव्या घरात रुळायलाही थोडा काळ जावा लागतोच. एवढय़ा मोठय़ा बंगल्यात मी, पू. बाई व काकाजी यांचे आईवडील- तीनच लोक. सुरुवातीस मला करमायचे नाही. चालीरीती जरा वेगळ्या होत्या. वडीलधारे आल्यावर डोक्यावर पदर घेणे, पाया पडणे, जेवणात थोडा फरक, भाषा वेगळी, पण तसे पाहिल्यास सर्व जण मराठी उत्तम बोलत. सर्व नातेवाईक प्रेमळ व हौशी. तेव्हा त्या एका वर्षांतच मी सर्वाची व सर्व जण माझे झाले. त्यातच जानेवारी-१९६६ ला किमयाचा जन्म झाला. बाई-काकांनी तिचे खूप कोडकौतुक केले. अरुणशी मात्र परत पत्रभेटी व फोन व्हायचा. अखेर हा विरहकाल संपला व जानेवारी-१९६७ ला मी व किमया बोस्टनला गेलो. वडील व मुलीची भेट झाली! सहा महिने खूप मजेत गेले. नंतर तेथे माझे हॉस्पिटलमधील काम सुरू झाले. तेव्हा दिवस-रात्र डय़ुटी असायची. घरी येईतो मी थकून जात असे, पण बाईंनाही अमेरिकेत राहायची इच्छा असल्याने त्या सुदैवाने एक वर्ष येऊन राहिल्या होत्या. त्यामुळे किमयाची आबाळ झाली नाही. त्या परत जाताना त्यांच्याबरोबर आम्ही किमयालाही भारतात पाठवले. त्यामुळे पुढे दोन-अडीच वर्षे मी एकाग्रतेने काम व अभ्यास करू शकले. अरुणचे डबल एम.एस. झाले व एक वर्ष त्यानेही कामाचा अनुभव घेतला. आम्हाला देशसेवेची आवड व भारताची ओढ असल्याने आम्ही परत येणे पसंत केले. १९७० ऑगस्टला आम्ही पुण्यात आलो. तोपर्यंत काकाजींच्या- श्रीहस्तीमलजी फिरोदिया यांच्या बजाज ऑटो व टेम्पो या कंपन्या नावारूपास आल्या होत्या. भारतात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच त्यांनी टू-व्हीलर (स्कूटर्स), थ्री-व्हीलर- रिक्षा, टेम्पो व फोर-व्हीलर ट्रॅक्स, ट्रॅव्हलरची निर्मिती सुरू केली होती. त्यांनी अरुणला संपूर्ण स्वदेशी बनावटीची व सर्वसामान्य लोकांना परवडेल अशी ल्यूना मोपेड बनविण्याचे प्रोजेक्ट दिले व त्यांनी कायनेटिक इंडिया लि. कंपनी काढून त्यात हे प्रोजेक्ट खूप यशस्वी केले. पुढे गीअरलेस स्कूटर्स- कायनेटिक होंडा बनवल्या ज्या सर्वाना व खास करून स्त्रियांना फारच आवडल्या. अरुण असे स्वत:च्या कामामध्ये खूप गुंगून गेले. मी एकीककडे संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत राहिले. स्वत:ची बालरोगतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस तसेच मतिविकलांग मुलांच्या कामायनी संस्थेत हडपसर येथील डॉ. दादा गुजर या साने गुरुजींच्या शिष्याने सेवाभावाने चालविलेल्या ग्रामीण भागात हॉस्पिटल, शाळा, पाणी संधारण अशा क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांतही मी नियमित जाऊन योगदान देत असे. पुढे एच.के. फिरोदिया ट्रस्टमधून आशातारा बाल व महिला आरोग्य योजना मी चालवली व अनेक वर्षे पुणे-नगर रस्त्यावरील पाच-सहा खेडय़ांत जाऊन काम केले. पिंपळे निलख येथे बारा वर्षे मोफत दवाखाना चालवला. अमेरिकेत राहण्यापेक्षा आपल्या ज्ञानाचा आपल्या देशवासीयांना उपयोग व्हावा असे मला वाटे व ही दृष्टी अरुण, पू. काकाजी, बाईंचे माहेर कोटेचा कुटुंब यांची देशसेवेची वृत्ती पाहून मला मिळाली. हा माझ्या आयुष्यातील मोठा ठेवा आहे. माझ्या क्षेत्रात मला काम करायला, कॉन्फरन्सेसला जायला, सेवाभावी संस्था काढायला यांनी मला नेहमीच मनापासून पाठिंबा दिला. मी १९७७ मध्ये दिल्लीला एक आठवडा नॅशनल कॉन्फरन्सला गेले तेव्हा यांनी आनंदाने घराची, मुलांची जबाबदारी घेतली. असे अनेकदा घडले. त्यामुळे माझी कधीच घुसमट झाली नाही.
आजही माझ्या क्लासच्या सर्व डॉक्टर मित्रांमध्ये अरुण नेहमी मिसळतात व गप्पांत रंगतात. तसेच माझ्या माहेरच्या सर्व प्रिय नातेवाईकांच्या घरी व कार्यक्रमांना आवर्जून येतात. मध्ये मला वाटते त्यांच्या मोठय़ा इंडस्ट्रीत आपण हातभार लावावा म्हणून मी दोन वर्षे यांच्याबरोबर रोज जात असे. त्यासाठी अकौंट्स फायनान्स हे तेव्हा आमच्या क्षेत्रात न शिकवले जाणारे विषयही मी शिकले, पण तेथे व घरी वैद्यकीय काम दोन्हीचा मेळ जमेना तेव्हा मी माझ्याच आवडत्या क्षेत्रात राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कुटुंबीयांच्या स्वास्थ्याची काळजीपण घेऊ शकले व माझ्या मुलांच्या सर्वतोपरी विकासाकडे लक्ष देऊ शकले. आमच्या तीन मुली व मुलगा सर्व उच्चविद्याविभूषित आहेत. वेळोवेळी त्यांनी शिष्यवृत्ती मिळवल्या. मेरिटमध्ये नंबर पटकावले व सर्व जण अमेरिकेतील आयव्ही लिग कॉलेजमधून शिक्षण घेऊन कार्यरत आहेत. सोबत संगीत, लेखन, वक्तृत्व, क्रीडा यात त्यांना गती आहे.
अरुण आजही पूर्ण वेळ कामात आहेत; परंतु अर्धा वेळ इंडस्ट्रीस देऊन उरलेल्या वेळेत ते मराठा चेंबर ऑफ कॉमर्समधील जनवाणी प्रोजेक्टमधून पुणे शहराच्या विकासाची अनेक कामे करीत आहेत आणि हो आता ते माझ्यासाठी जरा जास्त वेळ काढतात. आम्ही खूपच गप्पा मारतो- अगदी सकाळी चहा करण्यापासून! आम्हा दोघांनाही संगीताची आवड आहे. मी गेले दहा वर्षे सुगम व उपशास्त्रीय संगीत शिकत आहे. क्वचित चांगले नाटक, सिनेमाही आम्ही पाहतो.
अरुणची भाषणे सुसूत्रता व विषय सोपा करून सांगण्याची हातोटी यामुळे श्रवणीय असतात. त्यांनी भुवन ‘मनोमोहिनी’ हे देशभक्तीपर आधारित गीतांचे सुंदर पुस्तक लिहिले आहे व अनेक शाळांत ते मोफत वाटले. मीपण ‘बालसंगोपन’ हे पुस्तक सर्व माता-पित्यांना आपली बाळे कशी वाढवावी याचे मार्गदर्शन करणारे पुस्तक लिहिले आहे. २००० साली पुणे महानगरपालिकेतर्फे आम्हा दोघांना आपापल्या क्षेत्रातील उत्तम कामगिरीनिमित्त मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. गंमत म्हणजे त्याच वर्षी सहजीवन ट्रस्ट मुंबईतर्फे आम्हाला Couple of the Millennium म्हणून गौरविण्यात आले. आनंदाचा व समाधानाचा उच्चबिंदू म्हणजे २०१२ मध्ये माझ्या २६ जानेवारी या वाढदिवशीच यांना ‘पद्म’ पुरस्कार मिळाल्याचे कळले व चक्क २३ मार्च या अरुणच्या जन्मदिनी तो दिल्लीत राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते प्राप्त झाला. आपल्या सेवेचा देशाने दखल घेऊन सन्मान केल्यामुळे आम्हा कुटुंबीयांचे ऊर अभिमानाने भरून आले.
त्यांच्या सगळ्या सामाजिक कार्यात माझा सहभाग असतोच. आमचा विवाह १९६५ साली झाला हे मी आधी सांगितलेच आहे, पण विवाहास ५० वर्षे पूर्ण होण्यासाठी न थांबता २०१० सालीच आम्ही भेटलो त्याची ‘जब वी मेट’ पार्टी सुहृदांसाठी केली. यात अजिंक्य व अपर्णाने- या आमच्या मुलाने व सुनेने आमचे रोल करून एक फिल्म बनविली व आम्ही कसे भेटलो याची संगीतमय झलक दाखवली. नंतर आम्ही दोघांनी ‘हम आपकी आखोंमें, इस दिल को बसा दे तो?’ या गाण्यावर नृत्य केले. अशी धमाल पार्टी झाली.
या लेखाला मी म्हटले आहे, एकतेसमवेत विविधता. ते अशासाठी की, आमची दोघांची जात, धर्म, मातृभाषा, चालीरीती, शिक्षण, व्यवसाय, स्वभाव, आवडीनिवडी, सवयी हे सर्व वेगवेगळे होते व आहे, पण एकता अशासाठी की धर्म, जात, भाषा एकत्र येण्यात आड आल्या नाहीत. चालीरीती आत्मसात केल्या. आवडी, सवयी स्वीकारल्या, व्यवसायात पूरकता आणली, मदत केली. मला वाटते यामुळेच आमचे दीर्घ सहजीवन यशस्वी व आनंदी झाले.
जीवनात ही घडी अशीच राहू दे, अशी दयाघन प्रभूकडे प्रार्थना करते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 1:01 am

Web Title: couple of the millennium arun firodia and doctor jayashree firodia
टॅग Husband,Lifestyle
Next Stories
1 फरक पडतो?
2 मदतीचा हात : (आजी–आजोबांसाठी) ज्येष्ठांचे लिव्ह इन रिलेशनशिप
3 एका वडिलांवेगळय़ा मुलीची कविता
Just Now!
X