इंटरनॅशनल वुमेन्स मीडिया फाउंडेशनने अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘करेज इन जर्नलिझम’ या पुरस्काराने गेल्याच वर्षी तिला सन्मानित केले आहे, त्या कंबोडियातील पत्रकार बोफा फोर्न या लढवय्यीची ही कथा. सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्याला गोळ्या घालून ठार मारण्यात येतं अशा ठिकाणी बोफा सरकारच्या अन्याय, शोषणाविरोधात आवाज उठवत राहिली. अगदी जवळून मृत्यूचा खेळ पाहणाऱ्या बोफाच्या धडाडीची ही कहाणी.
जि थे सूर्यकिरणदेखील महत्प्रयासाने पोहोचू शकतात अशा उत्तर कंबोडियाच्या घनदाट जंगलात चुट वुट्टी नावाचा कंबोडियातील एक पर्यावरणवादी ‘कंबोडिया डेली’च्या पत्रकार बोफा फोर्न आणि ओलेशिया प्लोखी या दोघींना घेऊन निघाला होता. ‘प्रे लांग’ या जंगलामधल्या अवैध वृक्षतोडीचे चित्रीकरण तसेच ‘स्तुंग आते’ या धरणाच्या निर्मितीमुळे तेथील स्थानिकांवर होणारे अन्याय या विषयी एक वृत्तांकन करण्याचा बोफा व ओलेशिया यांचा इरादा होता! त्यासाठी लागणारी छायाचित्रे घेण्याचेही काम सुरू होते.
रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ते तिघे ‘कार्डमम माउंटेन्स’ या ‘को कॉंग’ परगण्यात पोहोचले.  तेवढय़ात, कंबोडिया सनिकांच्या वेषात असलेले पाच जण टोयोटा कॅम्री या लायसन्स प्लेट नसलेल्या गाडीतून उतरलेले त्यांना दिसले. सनिकांनी वुट्टी यांच्या गाडीला अडवले आणि त्यांच्या फोटो घेण्यावर आक्षेप घेत, ‘अशा तऱ्हेचे चित्रीकरण करणे बेकायदेशीर असून तुमच्याकडे असलेल्या कॅमेऱ्यातील मेमरी कार्ड आम्हाला द्या’ अशी या तिघांकडे मागणी केली. वुट्टी, बोफा आणि ओलेशिया यांनी अर्थातच नकार दिला! तेवढय़ात एका सनिकाने आपला मोबाइल फोन वुट्टी यांच्याजवळ दिला. पलीकडील व्यक्तीने आपण ‘टिंबर ग्रीन’ कंपनीचे सुरक्षा प्रमुख आहोत असे सांगून त्याने  वुट्टी यांच्याशी दरडावणीच्या सुरात वाद घालणे सुरू केले. पुढील धोका ओळखून वुट्टी यांनी आपली गाडी सुरू केली आणि या दोघींना घेऊन तेथून निसटण्याचा निकराने प्रयत्न केला. पण कंबोडिया सनिकांनी वुट्टी यांच्यावर गोळीबार केला आणि त्यांच्या देहाची क्षणार्धात रक्तलांच्छित चाळण झाली.
बोफा त्या दुर्दैवी प्रसंगाबद्दल सांगते, ‘‘मी आणि ओलेशियाने वुट्टी यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्यावे असा आकांत मांडला, पण एकालाही तसे करायची हिंमत झाली नाही. दहशतच तशी होती! काही वेळातच वुट्टीन्नी प्राण सोडले. शेवटी वुट्टी यांचा निश्र्च्ोष्ट देह तिथेच सोडून आम्ही स्वतचा जीव वाचवण्याच्या हेतूने ती गाडी घेऊन पोबारा केला! आम्ही जवळच्या खेडय़ात आश्रय घेतला. साधारण दोन अडीच तासाने सनिक आम्हाला शोधत आले आणि ‘त्या दोघींना मारून टाका’ असा जोरजोराने आरडाओरडा करू लागले. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. कारण तेवढय़ातच कंबोडियाचे पोलीस आम्हाला शोधत आले. ते म्हणाले की, ‘तुम्हाला बंदी बनवण्यात आले नसून तुम्ही मुक्त आहात.’ त्यांच्या आमच्याविषयीच्या त्या दयेला वेगळेच कंगोरे होते हे स्पष्ट होते. जेव्हा वुट्टीवर गोळ्या झाडल्या गेल्या, तेव्हा मी आणि ओलेशिया गाडीत मागच्या बाजूला बसलो होतो. मी त्या वेळी ‘कंबोडिया डेली’तल्या माझ्या एका सहकाऱ्याशी फोनवर बोलत होते. त्यामुळे वुट्टी यांच्या हत्येची बातमी ताबडतोब प्रसार माध्यमांनी झळकवली. आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही याची गंभीर दखल घेतली. सर्वत्र या घटनेची चर्चा सुरू झाली होती. अशा परिस्थितीत आणखी दोन पत्रकारांची हत्या करणे कंबोडियाच्या सरकारला परवडणारे नव्हते. आम्हाला सोडण्याविषयी त्यांच्यावरील दबाव वाढला होता.’’   
‘‘आपण वुट्टी यांची हत्या टाळू शकलो नाही, हे स्वीकारणे फार फार कठीण होते माझ्यासाठी!  मीही त्यांच्या हत्येला जबाबदार होते का? हा सल माझ्या मनातून अजूनही जात नाही!’’ ती सांगते. वुट्टी यांच्या हत्येची न्यायालयीन चौकशीसुद्धा करण्यास सरकारने नकार दिला. उत्तर कंबोडियातील प्रे लांग (आपले जंगल) हे आग्नेय आशियात सर्वाधिक मोठे (३६०० चौ कि. मी.) घनदाट, नसíगक साधनसंपत्तीने अत्यंत समृद्ध असे जंगल आहे. अवैध जंगलतोड, वनसंपत्तीची बेसुमार लूट आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना हाताशी धरून या जंगलात राहणाऱ्या माणसांचे, तेथील पशू-पक्षी, वृक्षांचे त्यांच्या इतर प्रजातींचे कंबोडियन सरकार त्यांच्या मिलिटरीच्या मदतीने करत असलेले आत्यंतिक शोषण यांच्याविरोधात कंबोडियातील पर्यावरणवादी आणि ‘नॅशनल रिसोर्स प्रोटेक्शन ग्रुप’ चे संस्थापक चुट वुट्टी यांनी सदैव आवाज उठवला होता.
चायना नॅशनल हेवी मशिनरीद्वारा येथील संरक्षित जंगलांमधून अवैध तऱ्हेने हे शोषण बऱ्याच काळापासून चालू होते. कंबोडियन सरकारने त्यांच्या हत्येच्या माध्यमातून अशा पर्यावरणवाद्यांना आणि या विषयीचे वार्ताकन करणाऱ्या पत्रकारांना धमकीवजा संदेशच दिला! वुट्टी यांच्या हत्येनंतर चारच महिन्यांनी ‘हांग सरेई आउदोम’ या पत्रकार स्त्रीचीदेखील अशाच क्रूर पद्धतीने कंबोडियन सनिकांद्वारे हत्या करण्यात आली. तिचे धड आणि शिर वेगळे कापून ठेवलेले सनिकांच्या गाडीत आढळले. तिचाही गुन्हा हाच की तिने कंबोडियन सरकारने चालवलेल्या लुटीबद्दल आणि गरीब जनतेच्या पिळवणुकीबद्दल आत्मीयतेने वार्ताकन केले होते!
  अशा वातावरणात एखाद्या तरुण स्त्रीने पत्रकारिता करणे किती धोक्याचे असेल याची कल्पना सहज येऊ शकते! मात्र, २९ वर्षीय बोफाच्या बालपणीच्या आठवणींतच तिच्या पत्रकार होण्याची बीजे रुजलेली दिसतात. ती सांगते, ‘‘साधारण ८० च्या दशकात मी माओरिज आणि कंबोडिया सनिकांमध्ये आपसात होणाऱ्या गोळीबारांचे आवाज ऐकतच मोठी झाले. आम्हाला तेव्हा कळत नसे हा गोळीबार कशासाठी होतो आहे ते! मी मोठी झाले तसतसे मला वाटू लागले की आपल्या देशात काय घडामोडी घडतात, कशात आपले भले आहे, आपल्यावर अन्याय का होतो आहे यांसारख्या गोष्टींचा विचार व्हायला हवा! पण हे कोण करणार आणि कसे? मग? इतरांना म्हणण्यापेक्षा हे आपणच का करू नये? ’’ त्यासाठीच बोफाने कायद्याची पदवी घेतली, पण पत्रकारितेचा मार्ग निवडला. ती ज्या प्रकारच्या बातम्या, वार्ताकनं करते तशा प्रकारची माहिती बहुतेक पत्रकारांना असते. पण त्यापकी काही जण बोफाकडे अधिक माहिती देत सांगतात की ‘तूच हे करू शकतेस’. कारण स्पष्टच आहे. एक तर स्वतच्या जिवावर उदार होऊन समाजाच्या उत्थानासाठी काही करणे हे येरागबाळ्याचे काम तर नाहीच नाही. कारण नोकरी घालवून बसण्याची टांगती तलवार सदैव डोक्यावर लटकत असते.
बोफा म्हणते, ‘तिचे हे सर्व पत्रकार मित्र-मत्रिणी जेव्हा आपापल्या बातम्या बिनधास्तपणे लिहू किंवा रिपोर्ट करू शकतील, असा कंबोडिया तिला बघायचा आहे. कंबोडियामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा भ्रष्टाचार हा आहे. यासह कंबोडियात शिक्षणाचा प्रसार होणे खूप आवश्यक आहे. देशाच्या अर्थसंकल्पात कमीत कमी ९ टक्के पसा हा शिक्षणावर खर्च व्हावा! बलात्कार हा तर इथला सर्वात मुख्य मुद्दा आहे, कारण त्यांची नोंदणीच होत नाही. मुली आणि महिला इतक्या भयग्रस्त आणि न्यूनगंडाने पीडित आहेत की बहुतेक वेळा न्यायालयाबाहेरच समेट केला जातो. थोडेसे पसे तोंडावर फेकले की या महिला गप्प बसतात हे बलात्काऱ्यांना माहीत आहे. गरिबीमुळे कित्येक महिला वकीलसुद्धा करू शकत नाहीत!’’  कंबोडियात बहुतेक बलात्कार हे वडील, काका, मामा, भावंडे आणि कधी कधी शेजारी यांच्याकडूनच होतात हे बोफाचे निरीक्षण आहे. या महिला जोवर साक्षर होत नाहीत, तोवर त्यांचा आíथक स्तर उंचावणार नाही आणि त्या सततच अशा अन्यायाला बळी पडत राहतील असे बोफाला वाटते.  
कंबोडियातील ह्य़ुमन राईट्स चळवळीच्या तीन संघटनांना हाताशी घेऊन वुट्टी यांच्या हत्येच्या न्यायालयीन चौकशीची तिने धसास लावून धरलेली मागणी अखेर मान्य झाली आणि त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू झाली हे तिचे आणखी एक यश होते! एका बलात्कारपीडित महिलेच्या गायब होण्यासंबंधीच्या बातमीचा बोफाने केलेला पाठपुरावा, चीनच्या संगनमताने सरकारने चालवलेले अवैध उत्खनन, अवैध जंगलतोड, शोषित गरीब जनतेच्या विरोधातील सरकारच्या नीती, मानवाधिकार, पर्यावरण अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांच्या विरोधात तिने सातत्याने केलेले रिपोìटग, त्यामागची तिची असलेली स्पष्ट आणि सुजाण भूमिका आणि सतत जिवे मारण्याच्या धमक्यांना बळी न पडता तिने अंगीकारलेले पत्रकारितेचे व्रत या सर्व गोष्टींची दखल घेऊन इंटरनॅशनल वुमेन्स मीडिया फाउंडेशनने तिला अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘करेज इन जर्नलिझम’ या पुरस्काराने (२०१३) सन्मानित केले आहे. न्यूयॉर्क येथे गेल्या ऑक्टोबरमध्ये एका शानदार समारंभात हा पुरस्कार बोफा फोर्नला प्रदान करण्यात आला! बोफा फोर्नसारख्या निडर पत्रकार महिलेचा संघर्ष आणि संकल्प आपल्या सर्वानाच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही!
(संदर्भ- इंटरनेट आणि प्रत्यक्ष बोफा फोर्नशी बोलून मिळवलेली माहिती)