13 August 2020

News Flash

कल्पक ब्लॉगर

वैचारिक आणि अभिव्यक्तीच्या गळचेपीविरुद्ध योआनी सँचेझनं जो लढा दिला, त्यासाठी तिनं संगणक आणि इंटरनेटचा मोठय़ा कल्पकतेनं वापर केला आणि देशातील नागरिकांचा आवाज जगभर पोहोचवला.

| February 1, 2014 08:29 am

वैचारिक आणि अभिव्यक्तीच्या गळचेपीविरुद्ध योआनी सँचेझनं जो लढा दिला, त्यासाठी तिनं संगणक आणि इंटरनेटचा मोठय़ा कल्पकतेनं वापर केला आणि देशातील नागरिकांचा आवाज जगभर पोहोचवला. अनेकदा वैचारिक युक्ती शारीरिक शक्तीपेक्षा वरचढ कशी ठरते, याचंच हे प्रेरणादायी उदाहरण म्हटलं पाहिजे!
अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य ही लोकशाही राज्यतंत्रानं माणसाला दिलेली बहुमोल श्रीमंती आहे. सर्वाशी संवाद साधण्याचं, अन्यायाला वाचा फोडण्याचं, जनमताचा कौल घेण्याचं ते एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. आपण ते इतकं गृहीत धरून चालतो, की त्याविना किती गळचेपी होत असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. परंतु अनेक साम्यवादी देशांतली ही वस्तुस्थिती आहे.
अशा देशातल्या लोकांना आपल्या देशातील परिस्थितीबद्दल जगाला काही सांगावंसं वाटलं, तर त्यांनी काय करावं? मुस्कटदाबी सहन करीत तडफडत राहावं? तुमच्या लिखित शब्दांनासुद्धा सरकार ‘सेन्सॉर’ची कात्री लावू लागलं, तर तुम्ही त्यातून मार्ग कसा काढणार? ऐकायचीय एका सृजनशील आणि धैर्यशाली स्त्रीनं लढवलेली युक्ती?
तिचं नाव आहे योआनी मारिया सँचेझ कॉर्डेरो. ४ सप्टेंबर १९७५ साली तिचा हवाना, क्यूबा इथं जन्म झाला. तिचे वडील राज्यातील रेल्वे यंत्रणेत इंजिनीअर म्हणून काम करीत होते. युरोपमधील कम्युनिझमचा अंत झाल्यावर सोव्हिएत युनियनची शकलं पडली आणि तेथून क्यूबाला मिळणारी भरघोस आर्थिक मदत थांबली. तिथवर क्यूबातील साम्यवादाला आर्थिक पाठबळ पुरवलं जात होतं. तो स्रोत थांबल्यानंतर तेथील सर्वसामान्यांची परिस्थिती खालावली. योआनीच्या हायस्कूल व कॉलेज शिक्षणावर या बदललेल्या परिस्थितीचा परिणाम झाला. सर्व गोष्टी सामायिकपणे वाटून घेणं आणि स्वत:चं खाजगी अवकाशच नाहीसं होणं तिला जाचक वाटू लागलं. तरीसुद्धा तिनं ‘समकालीन स्पॅनिश साहित्य’ या विषयात पदवी मिळवली. त्यासाठी तिनं लिहिलेल्या प्रबंधाचं शीर्षक होतं, Words  बालसाहित्य प्रकाशित करणाऱ्या संस्थेत आणि त्यानंतर जर्मन पर्यटकांना स्पॅनिश शिकवण्याचं काम केल्यानंतर ती स्वित्र्झलडला गेली. ते साल होतं २००२. तिथं तिचा पती आणि मुलगासुद्धा काही काळानंतर आले. तिथं तिला नवा व्यवसाय सापडला. कॉम्प्युटर सायन्सचा. २००४ साली ती पुन्हा क्यूबात परत आली. परत आल्यावर तिनं समानधर्मी देशवासीयांबरोबर ‘Consenso’ नावाचं मासिक सुरू केलं. विचार आणि साधकबाधक चर्चा या गोष्टींना वाहिलेलं! तिनं  Desde Cuba (क्यूबाहून) हे वेब-पोर्टल आणि ऑनलाइन मॅगझिन सुरू करायला मदत केली आणि त्यावर वेगवेगळे ब्लॉग्ज लिहायला प्रारंभ केला. २००८ साली ती निनावी ब्लॉग्ज न लिहिता, त्याखाली आपलं नाव लिहू लागली. तिच्या या हालचाली क्यूबातील गणसत्तेला आवडल्या नाहीत. तिला स्पेननं ‘Ortegay Gasset’ हे पत्रकारितेचं पारितोषिक दिलं होतं. ते घेण्यासाठी स्पेनला जाण्याची परवानगी सरकारनं नाकारली. आंतरराष्ट्रीय अनुबोधपटांच्या प्राग येथील प्रदर्शनासाठी परीक्षक म्हणून तिची नियुक्ती झाली होती. तिथं जाण्याची परवानगीसुद्धा तिला दिली गेली नाही. २००९ साली तिला कोलंबिया युनिव्हर्सिटीनं अत्यंत मानाचं असं Maria Moors Cabot Prizel दिलं होतं आणि त्याचा स्वीकार करण्यासाठी न्यूयॉर्कला येण्याचं आमंत्रण दिलं होतं. क्यूबातील सरकारनं तिला त्या प्रवासासाठी सुद्धा परवानगी दिली नाही. क्यूबातील सरकारच्या या निर्णयावर टीका करताना, कोलंबिया युनिव्हर्सिटीतील पत्रकारिता विभागाचे प्रमुख निकोलस लेमन यांनी म्हटलं, ‘‘क्यूबाचे तरुण नागरिक क्यूबाला उज्ज्वल भविष्यकाळाकडे आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याकडे घेऊन जातील याचं दृश्यचिन्ह म्हणून क्यूबाच्या सरकारनं मिस् सँचेझच्या कामाचं महत्त्व जाणलं पाहिजे.’’
भीषण र्निबध असलेल्या क्यूबातील परिस्थितीत सँचेझनं पत्रकारितेत कशी वाटचाल केली, ते मोठं उद्बोधक आहे. २००४ साली स्वित्र्झलडहून मायदेशी परतल्यावर तिनं ‘Convivenial’ हे डिजिटल-मासिकही सुरू केलं. जानेवारी २००७ मध्ये ‘debate of the intellectuals’ (विचारवंतांमधलं चर्चासत्र) या लेखकांच्या आणि विचारवंतांच्या चर्चासत्रात तिनं भाग घेतला होता. त्यात क्यूबातील सांस्कृतिक गोष्टींवरील र्निबधाबद्दल चर्चा होणार होती; परंतु तिला आणि तिच्यासारख्या इतर अनेकांना तेथे प्रवेशच करू दिला गेला नाही. तेथे नेमकी कशावर चर्चा घडली, याबद्दल तिथं उपस्थित असलेल्यांनी अनुपस्थितांना शेकडो पानी ई-मेल्स पाठवून बातमी पोहोचवली. शंभर लोकांमध्ये या ई-मेल्सची जी देवघेव झाली, ती सँचेझनं Contodos या डिजिटल-मॅगेझिनमध्ये साठवून ठेवली आहे आणि शीर्षक दिलंय kPolemica Intellectual 2007.
या घटनेनंतर सँचेझला इतका संताप आला, की तिनं ब्लॉग लिहून जगापर्यंत सर्व बातमी पोहोचवण्याचा निर्धार केला. ‘Generation  ’ हा तिचा ब्लॉग तिनं ९ एप्रिल २००७ साली सुरू केला. पहिल्या ब्लॉगच्या वेळेस क्यूबात बेसबॉलचे राष्ट्रीय सामने सुरू होते. त्यात आरडाओरड करून ‘Santiago Go!’ अशा आरोळय़ा फोडायला क्यूबातील जनतेला परवानगी होती, परंतु ‘इंटरनेट फॉर ऑल!’ असं बोलायची त्यांना परवानगी नव्हती, असं तिनं तिच्या पहिल्याच ब्लॉगमध्ये लिहिलं. हा ब्लॉग जर्मनीत,  Cronon A G या जर्मन डोमेनवर टाकण्यात आला. त्यानंतर तो वर्ड प्रेस येथे पाठवण्यात आला आणि काही दिवसांतच त्यात वाचकांना आपले अभिप्राय नोंदवता येऊ लागले.
सहा महिने हा ब्लॉग सुरू ठेवल्यानंतर, सँचेझनं त्यामागचं तिचं कारण सांगितलं : क्यूबातील र्निबधांमुळे आणि एकूण परिस्थितीमुळे तिचा इतका प्रक्षोभ झाला होता आणि इतकं विफल वाटत होतं, की भावनांचा निचरा करण्यासाठी तिनं ब्लॉगचं माध्यम निवडलं.
तिनं हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली, तेव्हा क्यूबातील नागरिकांना प्रवासी हॉटेल्समध्ये प्रवेश करता येत नसे. परंतु सँचेझ ‘युरोपीय’ म्हणून खपून जात असे आणि ती जर्मन भाषेतही बोलू शकत असे. त्यामुळे तिला हॉटेलात प्रवेश करून इंटरनेट वापरता येत असे. त्यातही अनंत अडचणींमधून मार्ग काढावे लागत. तरी ती नेटानं ते करीत असे.
क्यूबातील सरकारनं क्यूबातील लोकांना सँचेझचे आणि Desde Cuba  वेबसाइटवरच्या इतर ब्लॉगर्सचे ब्लॉग दिसू नयेत अशी व्यवस्था केली. या सेन्सॉरच्या साखळीतून मार्ग काढण्यासाठी स्थानिक लोकांना क्यूबातील सरकारात काम करणाऱ्यांच्या कॉम्प्युटरवरून ‘मागच्या दारानं’ या ब्लॉगपर्यंत पोहोचावं लागतं किंवा परदेशी राहणाऱ्या लोकांच्या मदतीनं हे ब्लॉग अन्यत्र टाकावे लागतात. परंतु क्यूबातील लोकांना हे ब्लॉग्ज वाचायला कठीण पडतं. यातून हुशारीनं आणखी एक मार्ग काढण्यात आला आहे. या ब्लॉग्जच्या, कॉम्प्युटरवर सीडीज बनवल्या आणि वाटल्या जाऊ लागल्या आहेत. या प्रकारे क्यूबातील लोकांनी हरप्रयत्नांनी स्वतंत्र अभिव्यक्तीची रीत शोधून काढलीय. सँचझेनं Voices Cubanas हा क्यूबावासीयांसाठीचा पत्रकारिता प्रकल्प सुरू केला आहे आणि क्यूबातील ब्लॉगर्सना दैनंदिन आयुष्यातलं वास्तव आणि खडतरता यांचे वर्णन करण्यासाठी बहुमाध्यमीय व्यासपीठ मिळवून दिलंय. २९ मार्च २००९ साली एका समारंभात, व्यासपीठावर बोलू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ध्वनिक्षेपकापुढं एक मिनिट बोलायची संधी दिली गेली होती. त्या वेळेस सँचेझनं क्यूबामधील सेन्सॉरशिपचा जाहीरपणे निषेध केला आणि ‘नियंत्रणाची भिंत चढून जा’ असं  आवाहन केलं.
२००९ साली सँचेझनं अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांना सात प्रश्न विचारणारी ई-मेल पाठवली होती. १८ नोव्हेंबर २००९ मध्ये अध्यक्ष ओबामांनी या प्रश्नांची उत्तरं देऊन पुढे म्हटलं, ‘‘तुमच्या ब्लॉगमुळे जगभरातील लोकांना इंटरनेटनं तुम्हाला आणि तुमच्यासारख्या अन्य धाडसी क्यूबन ब्लॉगर्सना मुक्त अभिव्यक्तीचं माध्यम मिळवून दिलंय आणि या माध्यमाचा वापर करून अभिव्यक्ती करण्यासाठी तुम्ही अन्य देशवासीयांना ज्या प्रकारे सक्षम आणि संप्रेरित करीत आहात, त्याबद्दल मी तुमचा गौरव करतो. अमेरिकेतील जनता आणि सरकार तुमच्याबरोबरच त्या सुदिनाची वाट पाहत आहे, जेव्हा सर्व क्यूबावासी निर्भयपणे आणि सूडाची भीती न बाळगता, जाहीरपणे आपली मतं व्यक्त करू शकतील!’’
ही कौतुकाची थाप हा सँचेझला मिळालेला सवरेत्कृष्ट पुरस्कार म्हटला पाहिजे. त्याखेरीज २००८ ते २०१२ या कालखंडात तिला एकूण अकरा आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. पत्रकार टेड् हेन्केल यानं ‘पॉडर ३६०’ मध्ये सँचेझची जी मुलाखत प्रसिद्ध केली, त्यातील सँचेझचं पुढील भाष्य तिच्या पत्रकारितेच्या भूमिकेवर प्रकाश पाडतंय.
‘‘मी प्रक्षोभक भाषा वापरणं, निंदा करणं आणि तावातावानं बोलणं कटाक्षानं टाळते. कारण त्यामुळे वैचारिक चर्चेला बाधक अशी असहिष्णुताच वाढते. क्यूबा हा नानाविध लोकांचा देश आहे. रस्त्यातून चालताना तुम्हाला केवळ विभिन्न
वंशाचे लोकच दिसत नाहीत, तर विभिन्न मतांचे सुद्धा लोक दिसतात. सरकारी प्रसारमाध्यमं आपल्याला पटवू पाहत असतात की, हा एकसंध देश आहे आणि त्यातील सर्वाचे
विचार एकसारखे आहेत. हा प्रचार ज्या जुलमी पद्धतीनं
आणि ज्या आक्रमक विचारसरणीनं केला जातो, तो
जनतेला गोठवून टाकतो.. क्यूबातील पत्रकारितेवरचे हे अनन्वित हल्ले थांबवण्याचा मार्ग आपण शोधून काढायलाच हवा!’’
वैचारिक आणि अभिव्यक्तीच्या गळचेपीविरुद्ध सँचेझनं जो लढा दिला, त्यासाठी तिनं संगणक आणि इंटरनेटचा मोठय़ा कल्पकतेनं वापर केला आणि देशातील नागरिकांचा आवाज जगभर पोहोचवला. अनेकदा वैचारिक युक्ती शारीरिक शक्तीपेक्षा वरचढ कशी ठरते, याचंच हे प्रेरणादायी उदाहरण म्हटलं पाहिजे!    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2014 8:29 am

Web Title: creative blogger
टॅग Chatu Rang
Next Stories
1 अंधारात राहून साथ
2 अनपेक्षित वळण
3 शहाणे करून सोडावे सकळ जन
Just Now!
X