‘डाऊन सिंड्रोम’ग्रस्त असल्याने आपल्या भावभावनांना शब्दांतून व्यक्त करण्यास अडचण येणाऱ्या राधिका यांना अठराव्या वर्षी गवसली ती चित्रांची दुनिया. त्या एका साक्षात्कारी क्षणी राधिकाला स्वतमधला ‘राजहंस’ गवसला. आणि त्यांच्या या रंगभरल्या दुनियेने त्यांना स्वावलंबी केलं. ‘डाऊन सिंड्रोम’च्या मुलांना चित्रकला शिकवता शिकवता आज त्यांनी आपल्या चित्रांना विक्रीच्या प्रांगणातही आणून ठेवलंय. त्या विक्रीतून आलेले पैसे याच विशेष मुलांच्या संस्थांना त्या देतात. स्वखर्चातून स्वत:साठी कार घेणाऱ्या, ‘डाऊन सिंड्रोम’च्या मुलांना कलेच्या दुनियेची ओळख करून देणाऱ्या शिक्षिका राधिका चांद या दुर्गेविषयी..
प्रतिभेला कशाचेही बंधन नसते. मनातील कल्पनांना कॅनव्हासवर मूर्त रूप देणाऱ्या राधिका चांद यांचे आयुष्य जणू काही याचाच संदेश देते. ‘डाऊन सिंड्रोम’मुळे मनातील भावभावना राधिका यांना सहजपणे वागण्या-बोलण्यातून व्यक्त करता येत नाहीत. पण त्यांची प्रतिभाशक्ती अफाट आहे. शारीरिक मर्यादांवर मात करून स्वतला कार्यरत ठेवण्याचा त्यांचा उत्साह थक्क करणारा आहे. आपल्यासारख्या ‘डाऊन सिंड्रोम’सह जन्मलेल्या विद्यार्थ्यांच्या त्या लाडक्या शिक्षिका आहेत. देशातच नव्हे तर परदेशातही त्यांच्या चित्रांना प्रचंड मागणी आहे, त्याच जोरावर त्यांनी स्वत:साठी गाडीही विकत घेतलीय आणि ती स्वत: चालवण्याइतपत स्वत:ला तयारही केलंय. चित्रकार म्हणून स्वत:ची करिअर घडवत त्या ‘डाऊन सिंड्रोम’च्या मुलांसाठी सामाजिक कार्यही करीत आहेत. त्यांनी त्यांची अशी स्वत:ची दुनिया उभी केली आहे. कल्पनेतून मूर्त रूप साकारणारी.
विविध ठिपके, रेषा, वर्तुळं, विविध आकारांमधून राधिकांचे रंगीबेरंगी आयुष्य कॅनव्हासवर उलगडत गेलं आणि तेच त्यांना स्वावलंबी करून गेलं. सभोवतालच्या कुणावरही आपल्या ‘डाऊन सिंड्रोम’चा बोझा न टाकणाऱ्या राधिका यांना म्हणूनच निर्लेपपणे मनाचे रंग कॅनव्हासवर ओतता आले. आणि आज त्यात त्या पारंगत होत होत अनेकांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत.
 जन्मजात ‘डाऊन सिंड्रोम’सह जन्मलेल्या राधिका चांद गेल्या एकवीस वर्षांपासून दिल्लीच्या वसंत व्हॅली या विशेष मुलांसाठी असलेल्या शाळेत सहशिक्षिका आहेत. राधिका ही रमेश यांची धाकटी लेक. राधिका यांच्या दोन्ही बहिणी धडधाकट. दोन्ही परदेशात स्थायिक. राधिका अवघ्या काही महिन्यांची होती तेव्हा तिला ‘डाऊन सिंड्रोम’ असल्याचे निदान झाले. पित्याचे हृदय द्रवले. राधिकाची आईदेखील काहीशी अस्वस्थ झाली. राधिकाकडे आता जास्त लक्ष द्यावे लागणार होते. मात्र आपली लेक इतरांसारखी धावू शकणार नाही, बोलू शकणार नाही, खेळू शकणार नाही, शिकू शकणार नाही.शिवाय चारचौघांत सामाजिक प्रतिष्ठा..असले कसलेही प्रश्न रमेश चांद यांना कधीही पडले नाहीत. कारण माणुसकीवर त्यांची नितांत श्रद्धा आहे. राधिका ‘डाऊन सिंड्रोम’ चाइल्ड असल्याचे लक्षात आल्यावर रमेश यांनी डॉक्टरांना गाठले. राधिकापेक्षा तुम्हाला आता सर्वात जास्त काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला प्रशिक्षित व्हावे लागेल, या डॉक्टराच्या सल्ल्यानुसार ते कामाला लागले. राधिकासाठी त्यांना शिक्षकाची भूमिका वठवावी लागणार होती. एक चांगला शिक्षक आधी स्वत: अभ्यास करतो. लहानपणी राधिकाशी कसे बोलावे, कसे वागावे, तिच्या स्वभावाची बहुविध रूपे कशी सांभाळावी.. या प्रशिक्षणाने राधिकाचे बालपण व रमेश यांचे पालकत्व व्यापले. डॉक्टरांनी राधिका ४० वष्रे जगेल, असे सांगितले होते. पण आज राधिका यांचे वय ४२ वष्रे आहे. शिवाय त्या सामान्य व्यक्तीसारखे जीवन व्यतीत करीत आहेत.
 राधिका साधारण अठरा वर्षांची असेल तेव्हा रमेश चांद राधिकासह ऑस्ट्रेलियात गेले होते. राधिकाला व्यक्त होण्यासाठी शब्दांची मर्यादा होती. शब्दांना अर्थ असतो. प्रत्येक शब्दांचा अर्थ स्वत उलगडण्याची क्षमता राधिकामध्ये अद्याप विकसित व्हायची होती. पण तिच्यातल्या चित्रकाराने तिथे आपला कॅनव्हास शोधला. सिडनीत बहिणीकडे असताना राधिका रंगात हरखून गेली. तिला स्वतशी संवाद करण्याचे; स्वतशी बोलताना व्यक्त होण्याचे माध्यम गवसले होते. कॅनव्हासवरची चित्रे पाहून राधिकाच्या कुटुंबियांना आनंद झाला. पण राधिका ‘डाऊन सिंड्रोम’ग्रस्त असल्याने सहानुभूतीतून तिच्या चित्रांना त्यांना प्रसिद्धी नको होती. म्हणून कलात्म जाण असणाऱ्यांना राधिकाची चित्रे दाखवण्यात आली. रसिकांनी राधिकाच्या चित्रांवर ‘एका कलाकाराने काढलेली असाधारण कलाकृती,’ अशी प्रतिक्रिया  दिली. तो क्षण राधिकाला स्वतमधला ‘राजहंस’ गवसल्याचा होता.
 दिल्ली, लाहौर, बंगळुरू, चेन्नई, सिडनी, ऑक्सफर्डसह आतापर्यंत दहा ठिकाणी राधिका यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. देशविदेशातून त्यांच्या कलात्म साधनेला कलासक्त रसिकांनी मनापासून दाद दिली. स्वच्छ मनाच्या राधिका यांना पांढरा रंग सर्वाधिक आवडतो. शिवाय गुलाबी, हिरवा, काळा हे त्यांचे आवडते रंग. कधी कॅनव्हासवर, कधी टाइल्सवर तर कधी डिश वा बशीवर..राधिका यांच्या कलेची अदाकारी अवतरते. ‘चित्र काढणं ही साधना आहे,’ असं गुळगुळीत विधान राधिका यांच्याबाबत करता येत नाही. त्यांच्यासाठी चित्र काढणं ही एक मैफल असते. या मैफलीत त्या एकटय़ाच असतात. रात्री जेवण झाल्यावर खोलीभर पसरलेल्या प्रकाशात त्यांची ही मैफल रंगत जाते. रंग-रेषा-अमूर्त आकार-ठिपक्यांची साथसंगत. सलग दोनतीन दिवस मूड नि रंगांची एकतानता जमली की तयार होते छानसे चित्र. कलेची भाषा ज्याला कळते त्यालाच राधिकाच्या चित्रांचा ‘अर्थ’ही कळतो. या चित्रांनी राधिकाचे जगणे केवळ समृद्ध केले नाही; तर स्वावलंबीदेखील केले. चित्रांच्या विक्रीतून आलेल्या- स्वकमाईतून राधिका यांनी ‘रेवा’ कार घेतली आहे. ही चारचाकी त्या स्वत चालवतात. रस्ता जणू काही स्वत:च्या मालकीचा असल्यासारखे वाहन चालवणाऱ्यांसारख्या राधिका नाहीत. वाहतुकीचे नियम-सिग्नल पाळण्याइतपत सुशिक्षितपणा राधिका यांच्याजवळ आहे.
‘‘रस्त्यावर थुंकणारे, नियम न पाळणारे, प्रदूषण वाढवणारे यांचा मला राग येतो.’’ राधिका सांगतात. त्यांच्या बोलण्यात आता कुठेही ‘‘डाऊन सिंड्रोम’ असल्याचं फारसं जाणवत नाही. उत्तम इंग्रजी येत असल्याने बोलताना अडथळा नाही. आपल्या चित्रांची सुरुवात-त्यांचा प्रवास सच्चेपणाने मांडणाऱ्या राधिका यांना ग्लॅमर नको असते. सोमवार ते शुक्रवार कुणाही नोकरदाराप्रमाणे त्यांचा दिवस असतो. त्या सांगतात ‘‘सकाळी आठच्या सुमारास माझा दिवस सुरू होतो. नऊपर्यंत शाळेत. तिथे ३ वर्गातील ७५ विद्यार्थ्यांना शिकवण्याची माझी जबाबदारी असते. दुपारी एकपर्यंत शाळेत. शाळेत मुले खूप त्रास देतात. मुली मात्र प्रेमळ असतात. लवकर शिकतात. पण आता मला फारच कंटाळा आलाय. त्यामुळे मी नोकरी सोडण्याच्या विचारात आहे. स्वतची ‘रेवा’ घेवून फिरायला जाणे मला जाम आवडते.’’ बोलता बोलता घराच्या भिंतीवर पसरलेल्या चित्रांची सफर राधिका घडवून आणतात. स्वत:मधल्या जगाला कॅनव्हासवर चितारणारे राधिका यांचे जीवनकौशल्य थक्क करणारे आहे.
१९९७ मध्ये राधिका यामागेटा फेलोशिप मिळवून वॉिशग्टन डीसीमध्ये झालेल्या एका कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या. आतापर्यंतच्या शेकडो चित्रकृतींच्या विक्रीतून मिळालेली रक्कम राधिका यांनी त्यांच्यासारख्या ‘विशेष’ असलेल्या मुला-मुलींसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला दिली. मुंबईत झालेल्या एका प्रदर्शनात राधिका यांच्या चित्रासाठी कलासक्त रसिकाने १ लाख ३० हजार रुपये दिले. ही रक्कम राधिका यांनी विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या शाळेला दिली. राधिका यांना एनसीपीईडीपी-शेल हेलन केलर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मुस्कान, लिव्हग स्किल, ऑक्शन फॉर ऑटीझम, नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एंप्लॉयमेंट फॉर डिसेबल्ड पीपलसारख्या संस्थांशी राधिका संलग्न आहेत.
तिचे बाबा रमेश चांद सांगतात, ‘‘‘डाऊन सिंड्रोम’ असलेल्या अपत्याला सांभाळणे अवघड नसते. फक्त पालकांनी वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. विशेष अपत्याला वाढवणाऱ्या पालकांवर आधी संस्कार झाले पाहिजेत. ‘डाऊन सिंड्रोम’ग्रस्त असलेल्या राधिकाला लहानपणी पायऱ्यांवर चढउतार करणेही अवघड होते. तिला हळू हळू आम्ही सांगितले. तिला आधार दिला; पण आधाराची सवय लावली नाही. आमचे तिच्यावर लक्ष होते; पण तिने स्वतवर लक्ष केंद्रित करावे यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करीत होतो. सिडनीमध्ये असताना राधिकाला स्वत:मधला चित्रकार गवसला. पण त्याबरोबर आम्ही तिला पोहण्याची आवड लावली. राधिकाला कुणाच्याही आधाराशिवाय पोहता येते. याशिवाय बॅडिमटन, स्क्व्ॉश, टेनिस, नेटबॉलसारख्या खेळांचे तिला विशेष आकर्षण आहे. आवश्यक वैद्यकीय थेरपी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन व लहानपणापासून विशेष लक्ष दिल्याने आज वयाच्या ४२ व्या वर्षी राधिका कुणाच्याही आधाराशिवाय सामान्य जीवन व्यतीत करीत आहे. ती स्वतची कामे स्वत करते,’’ असे सांगताना अभिमानी पित्याचा ऊर भरून येतो.
 दिल्लीच्या वसंत व्हॅली स्कूलमध्ये दोन दशकांपासून अध्यापनाचे कार्य करणाऱ्या राधिका त्यांच्यासारख्यांनाच नव्हे तर सर्वासाठी आदर्श आहेत. मानवतेची उपासना करणाऱ्या बौद्ध धर्माचे प्रवर्तक दलाई लामा येथे आले होते. राधिकाचे चित्र त्यांना शाळेच्या वतीने सप्रेम भेट देण्यात आले. दलाई लामा व राधिका यांच्या भेटीचा क्षण कुठल्याही भावनेने ओथंबलेला नव्हता. त्यात होती फक्त प्रेमाची भाषा. जगाने जगाला सांगावी अशी. सामान्य मुलांमध्ये विशेष मुलांचा विकास होणे तसे अवघड असते. त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षित मायाळू व्यक्तीची गरज असते. विशेष मुलांना शिकवणे अवघड असले तरी अशक्य नाही. त्यांच्यावर मायेची पखरण करीत राहावे लागते. इतरांपेक्षा अशी मुलं जास्त हळवी असतात. या हळवेपणाला मायेने समजून घेऊन संस्कार करावे लागतात. ‘डाऊन सिंड्रोम’चे तीन प्रकार मानले जातात. कमी, मध्यम व तीव्र. त्यापकी राधिका मध्यम व तीव्रच्या मधोमध म्हणाव्या अशा गटातल्या. इतरांसारखी शिकण्याची त्यांची गती कमी होती. पण ते ज्या शिकल्या त्या उत्तम शिकल्या. कारण, त्यांच्या शिकण्यात जगण्याची स्पर्धा नव्हती. आपल्या वाटय़ाला आलेले आयुष्य सुंदर आहे; राधिका यांच्यातील चित्रकाराने ते अजूनच सुंदर व रंगीबेरंगी बनवले आहेत. ‘डाऊन सिंड्रोम’चे भागधेय नाकारण्यासाठी लागणारी जिद्द राधिका यांच्यात अजूनही जागृत आहे. कुणाही सामान्य माणसाला असणाऱ्या ‘स्ट्रेस’चा लवलेश राधिका यांना शिवला नाही. त्यातून राधिका व त्यांच्या कुटुंबियांना मिळणारे अतिव समाधान हेच मानवी जीवनाचे संचित आहे.