अंध महिला विकास समितीची सचिव ते नॅबची राष्ट्रीय स्तरावरील सेक्रेटरी व महिला विभागप्रमुख या वाटचालीत स्वत: अंध असणाऱ्या परिमला यांनी नॅबच्या विविध उपक्रमांना चालना दिली. अनेक अंधांना आत्मनिर्भर बनवलं. त्यासाठी ‘स्नेहांकित हेल्पलाइन’ ही संस्था काढली. हिमालयात १७,५०० फुटांवरील शितिघर शिखरावर झेंडा लावून आलेली ती पहिली अंध महिला गिर्यारोहक आहे. ‘अप टू डेट’ मॅचिंग अ‍ॅक्सेसरीज वापरणाऱ्या, इडली-सांबारपासून माशाच्या कालवणापर्यंत काय हवं ते खाऊ घालणाऱ्या, अंधत्वावर मात करून डोळसपणे अंधांसाठी काम करणाऱ्या परिमला भट या दुर्गेविषयी..
तिला आपल्या अंधत्वाचं दु:ख नाही. दयेची भीक तर तिने कधीच मागितली नाही. उलट जिद्द असेल तर अपंग व्यक्तीदेखील कर्तृत्वाच्या उंच गुढय़ा उभारू शकते, हे तिने समाजाला दाखवून दिलंय. दुर्भाग्याच्या तडाख्याचे ईष्र्येच्या वीररसात रूपांतर करण्याचं अनोखं सामथ्र्य तिच्यात आहे. स्वत:च्या डोळ्यांतील ज्योती जन्मत:च विझलेल्या असल्या तरी इतर दृष्टिहीन बांधवांच्या मनातील नैराश्येचे अंधारलेले कोपरे प्रकाशमान करण्याचं तिचं व्रत ‘नॅब’ (नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड) व ‘स्नेहांकित हेल्पलाइन’ या संस्थांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सुरू आहे. उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते झालेला सन्मान, सह्य़ाद्री हिरकणी पुरस्कार, उद्योगिनी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या या सौदामिनीचं नाव परिमला विष्णू भट.
 समृद्ध जडणघडणीसाठी लागणारं वातावरण परिमलाच्या घरातच होतं. वडील विष्णू भट ‘इंडियन एक्स्प्रेस’चे वरिष्ठ पत्रकार. त्यामुळं तिचं बालपण वांद्रय़ाच्या पत्रकार कॉलनीत साहित्याच्या व साहित्यिकांच्या सहवासात गेलं. तिची आई नमाताई भट ही सोळा वर्षे कमला मेहता अंध विद्यालयात प्राचार्य पदावर काम केलेली, तसंच नासिओ व स्पॅस्टिक सोसायटी ऑफ इंडिया या अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्थांमध्ये संचालकपद भूषविलेली महनीय व्यक्ती.
साहजिकच ‘माझ्याआधी सुख दुसऱ्याचे’, ही वृत्ती परिमलाच्या रक्तातच होती,आहे. बी.ए. होईपर्यंत शाळा-कॉलेजात जाण्या-येण्यासाठी तिच्याबरोबर कोणी ना कोणी वाटाडय़ा असायचा; पण जेव्हा तिने एमएसडब्ल्यू या अभ्यासक्रमासाठी चर्चगेटच्या निर्मला निकेतनमध्ये प्रवेश घेतला तेव्हा मात्र तिच्या आईने मुलीच्या भवितव्यासाठी कडक पावित्रा घेतला आणि त्या दिवसापासून पांढरी काठी ही तिची सखी बनली. या सखीने तिला पुढे एवढा आत्मविश्वास दिला, की तिच्या नॅबच्या मीटिंग्जसाठी तिच्या सोबतीने परिमला केवळ देशातच नव्हे, तर जीनिव्हा, पाकिस्तान, मलेशिया अशा परदेशातही फिरून आली.
‘सोशल वर्कर’ हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर कमला मेहता अंधशाळेत तिची पहिली नोकरी सुरू झाली. करिअरच्या सुरुवातीलाच परिस्थितीने गांजलेल्या अंध मुलींच्या विविध प्रश्नांची ओळख तिला झाली. शाळेतील मानसशास्त्रतज्ज्ञांची मदत घेऊन तिने या मुलींच्या अनेक समस्या सोडवल्या. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनकडून मुलींच्या शरीररचनेसंबंधातील विविध मॉडेल्स आणून त्यांना शरीराच्या सर्व अवयवांच्या कार्याची नीट माहिती करून दिली. याच दरम्यान गुणवत्ता व विजय र्मचट यांची शिफारस यामुळे परिमलाचा ‘एअर इंडिया’त सोशल वर्कर म्हणून शिरकाव झाला. त्यानंतर आपली रोजीरोटी सांभाळत तिने स्वत:ला नॅबच्या कार्याशीही जोडून घेतलं.
१९८१ मध्ये मलेशियात आयोजिलेल्या अंध महिलांसाठीच्या लीडरशिप प्रोग्रॅममध्ये ‘भारतीय अंध महिलांची परिस्थिती’ या विषयावरील ‘पेपर’ वाचण्याची परिमलाला संधी मिळाली. यानिमित्ताने ही पुन्हा एकदा या प्रश्नाशी भिडली. त्यानंतर लगेचच नॅबतर्फे ‘अंध महिला विकास समिती’ची स्थापना झाली आणि या समितीच्या सचिवपदाची जबाबदारी परिमलाकडे आली. या संस्थेचं कार्यालय फाऊंटनला होतं आणि एअर इंडियाचं ऑफिस सांताक्रूझला. या दोन्ही दगडांवर पाय ठेवत तिचं आयुष्य पळायला लागलं.
तीस वर्षांपूर्वी तेव्हा नॅबने प्रथमच महाराष्ट्रातील दृष्टिहीन महिलांसाठी दोन दिवसांचं एक अधिवेशन भरवलं, तेव्हा त्यात दीडशे महिला सहभागी झाल्या. या वेळी व्यासपीठावरून परिमलाने, अंध महिला केवळ लाभार्थी नव्हे, तर समाजाला सुविधा पुरविणारी उद्योजकही होऊ शकते, हा वेगळा विचार मांडला. ते ऐकून उपस्थित महिलांमध्ये एक नवा हुरूप संचारला. याचा परिणाम म्हणजे सेमिनारनंतर काही स्त्रियांनी पिठाची चक्की, सहलींचं आयोजन करून देणं, मेणबत्त्या बनवणं अशा उद्योगांना सुरुवात केली. आज अनेक अंध महिला विविध व्यवसाय समर्थपणे सांभाळताना दिसतात. त्यांच्यातील ऊर्जा जागृत करण्याचं श्रेय परिमलाच्या त्या भाषणाकडे जातं जे तिनं २७व्या वर्षी केलं होतं.
अंध महिला विकास समितीची सचिव ते नॅबची राष्ट्रीय स्तरावरील सेक्रेटरी व महिला विभागप्रमुख या वाटचालीत परिमलाने नॅबच्या विविध उपक्रमांना चालना दिली. मुंबईत रे रोडला नॅबतर्फे अंध महिलांसाठी एक ट्रेनिंग सेंटर चालविण्यात येतं. इथं त्यांना कागदी पिशव्या, मोबाइल पाऊच, पणत्या, राख्या इ. बनवायला शिकवलं जातं. त्यामुळे रोजगारनिर्मिती होते. या कामाचा परीघ वाढविण्यासाठी ठिकठिकाणांहून ऑर्डर्स मिळविण्याचे तिचे अथक प्रयत्न असतात.
अंध महिलांना नॅबने मिळवून दिलेला आणखी एक रोजगार म्हणजे त्यांच्याच कार्यालयाच्या कँटीनचे व्यवस्थापन. परिमला म्हणाली की, इथे येणाऱ्या-जाणाऱ्या २०० लोकांचा रोजचा नाश्ता व जेवणाची जबाबदारी सात जणींवर आहे. (त्यातली एकच डोळस.) कच्चा माल विकत घेण्यापासून कॅश काऊंटर सांभाळण्यापर्यंत सर्व कामं त्या उत्तमरीत्या निभावतात. एवढंच नव्हे, तर आसपासच्या जेवणाच्या ते चक्क दिवाळी फराळापर्यंतच्या ऑर्डर्सही घेतात.
नॅबच्या वसतिगृहात मुंबईबाहेरून येणाऱ्या फक्त १४ अंध महिलांसाठी राहण्याची सोय आहे. ही व्यवस्था अत्यंत अपुरी असल्यामुळे तिला वाटतं की, ज्या महिलांना सोबतीची गरज आहे त्यांनी या मैत्रिणींना स्वीकारल्यास दोघींचाही फायदा होईल. एकदा तर सगळं जुळून आलं असताना केवळ त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी हरकत घेतल्यामुळे दोन अंध मुलींना मिळणारं छत्र हिरावून घेतल्याचा सुन्न करणारा अनुभव परिमलाला आला. ती म्हणाली, ‘‘एक तर सर्वसाधारण मुलींसाठी असणाऱ्या वसतिगृहात अंध मुलींना प्रवेश दिला जात नाही. मग आमच्या मुलींनी राहायचं तरी कुठं?’’अशा अनंत अडचणींना तोंड देत तिचं मार्गक्रमण सुरू आहे.
 दृष्टिहीन मुलं ही सर्वसाधारणपणे अल्प उत्पन्न गटातील असल्यामुळे त्यांच्या पोटापाण्यासाठी, शिक्षणासाठी, वैद्यकीय उपचारांसाठी प्रायोजक मिळवत राहणं हे तिचं एक न संपणारं काम. असाच एक प्रायोजकांच्या मदतीने चालणारा उपक्रम म्हणजे दरवर्षी सीमेवरील जवानांसाठी पाठवल्या जाणाऱ्या एक लाख राख्या. मुख्य म्हणजे तीन-चार अंध महिला स्वत: जाऊन जवानांना राख्या बांधतात.
अंध स्त्रियांचे सर्व प्रश्न अंतर्भूत करणाऱ्या ‘दीपा शिखा’ या हिंदी त्रमासिकाच्या संपादनाचं कामही ती पद्माताई रेपोझ यांच्यासह करतेय. त्याबरोबर दरवर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तीन अंध महिलांना गौरविण्याची परंपराही नॅबने सुरू केलीय. त्यांच्या जीवनावर एक पुस्तकही प्रकाशित करण्यात आलंय. अंध मुला-मुलींना कॉम्प्युटर शिकण्याची व त्याच्या सरावासाठी नॅबने अलीकडेच एक ट्रेनिंग सेंटरही सुरू केलंय.
ब्रेल लिपीत सगळ्याच विषयांवरील पुस्तकं उपलब्ध नसतात. ती गरजेनुसार रेकॉर्डिगद्वारा उपलब्ध करून दिली जातात. अंध मुलांचे पेपर लिहिण्यासाठी लेखनिक (रायटर्स) व त्यांना वाचून दाखविण्यासाठी ‘रीडर्स’ ही संकल्पनाही अलीकडची. हे मदतनीस प्रयत्नपूर्वक मिळवावे लागतात. महाविद्यालयीन अंध मुलांना भेडसावणाऱ्या अशा समस्यांतून किमान मुंबई शहरापुरता मार्ग काढण्यासाठी परिमलाने १३ वर्षांपूर्वी म्हणजे २००१ मध्ये ‘स्नेहांकित हेल्पलाइन’ ही स्वत:ची संस्था काढली. स्नेहांकिततर्फे सर्व विद्यापीठांच्या पुस्तकांबरोबरच शाळेची पाठय़पुस्तकंदेखील रेकॉर्ड केली जातात. परिमला म्हणाली, ‘‘हे काम न संपणारं आहे. यामध्ये कोणीही योगदान देऊ शकतं.  घरच्या घरीही रेकॉर्डिग करता येतं. त्यासाठी स्नेहांकिततर्फे मार्गदर्शन मिळतं.’’ तिला मनापासून वाटतं की, समाजातील पूर्ण व्यक्तींनी आपल्या अपूर्ण बांधवांसाठी मदतीचा थोडासा हात जरी पुढे केला तर हा गोवर्धन सहज उचलता येईल.
परिमलाच्या बरोबरीने स्नेहांकितसाठी काम करणारी तिची टीम म्हणजे शुभांगी घाग, सुभ्रता सामंत, सूर्यकांत जाधव व अजित बारटक्के. या सेवाव्रतींबरोबर तिने विशेष उल्लेख केला तो भवन्स कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या उत्कर्षां मल्या लाड व ठाण्याच्या एनकेटी कॉलेजच्या व्याख्याता अरुंधती पत्की यांचा. त्यांच्या प्रोत्साहनामुळे या महाविद्यालयातील भरपूर मुलं आता रीडर- रायटर म्हणून काम करू लागली आहेत; परंतु दहावीच्या अंध विद्यार्थ्यांचे पेपर लिहिण्यासाठी आठवी, नववीच्या मुलांची गरज भासते. यासाठी पालकांनी पुढाकार घेऊन या जाणिवा आपल्या मुलांच्या मनात रुजवाव्यात, असं तिला वाटतं.
मुलांना अल्प दृष्टी असेल तर विशिष्ट साधनांनी ती वाढू शकते हे पालकांना व शिक्षकांना समजावं म्हणून ‘स्नेहांकित’तर्फे दोन महिन्यांतून एकदा ‘व्हिजन कॅम्प’ आयोजित करण्यात  येतात. यासाठी संस्थेने लोटस हॉस्पिटलशी करार केलाय. आतापर्यंत दीडशे ते दोनशे मुलांना या शिबिरांद्वारे दिलासा मिळालाय. अर्थात उपकरणांसाठी प्रायोजक मिळवणं हे काम ओघाने आलंच.
वागण्या-बोलण्यात कमालीची मृदू वाटणारी परिमला काम करण्याच्या व करवून घेण्याच्या बाबतीत अत्यंत गंभीर व कडक शिस्तीची आहे. मग ते काम एअर इंडियातलं असो वा नॅब किंवा स्नेहांकित’चं असो. प्रत्येक कृती चोख व्हायला हवी, असा तिचा अट्टहास असतो. तिच्या काटेकोर व्यवस्थापनामुळे स्नेहांकिततर्फे निबंध व वक्तृत्व स्पर्धा, निवेदन- सूत्रसंचालन यासाठी कार्यशाळा, स्वयंसेवकांसाठी मार्गदर्शन शिबिर, आधुनिक तंत्रज्ञान शिकण्यासाठी वर्कशॉप्स असे विविध उपक्रम वर्षभर नेटकेपणे सुरू असतात.
परिमला ही नवी नवी आव्हानं पेलणारी, खंबीर वृत्तीची स्त्री आहे. म्हणूनच गिर्यारोहण हा धाडसी छंद ती जोपासू शकते. हिमालयात १७,५०० फुटांवरील शितिघर शिखरावर झेंडा लावून आलेली ती पहिली अंध महिला गिर्यारोहक आहे. या अचाट साहसाबद्दल विचारताच ती, ‘पेला अर्धा भरला आहे म्हणायचं का अर्धा सरला आहे म्हणायचं’ या धर्तीवर तिचा प्रश्न असतो.. काही तरी विपरीत घडेल या धास्तीने आयुष्यात येऊ शकणाऱ्या काही सुखद क्षणांना कायमचं विन्मुख व्हायचं, की आव्हान स्वीकारून प्रतिकूल परिस्थितीवर मात करायची? या ट्रेकच्या वेळी ती एकदा बर्फातून घसरत २०० फूट खाली कोसळली होती, हे ऐकताना आपल्या अंगावर काटा येतो; पण ती मात्र खळखळून हसत असते. तिच्या लोभस चेहऱ्यात व मनमोकळ्या बोलण्यात समोरच्याला तिचं अपूर्णत्व विसरायला लावण्याचं सामथ्र्य आहे.
परिमलाचं ‘अप टू डेट’ मॅचिंग बघताना आपण अवाक्  होतो. एवढंच नव्हे, तर विशेषप्रसंगी ती मेकअपही करते. ती म्हणाली, व्यवस्थित तयार व्हायचं आणि मनाच्या आरशातून स्वत:कडे बघायचं. खूप छान वाटतं. तिच्या मॅचिंगपाठचं गुपित म्हणजे प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे ठेवण्याची तिची पद्धत. किचनमध्येही याच सवयीच्या आधारे ती येणाऱ्या पाहुण्याला इडली-सांबारपासून माशाच्या कालवणापर्यंत काय हवं ते खाऊ घालते. आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून घेतल्यामुळे गुगलद्वारा ती संपूर्ण जगाच्या संपर्कात राहते. तिच्या वाचनाचा  झपाटा तर तुम्ही- आम्ही थक्क होण्यासारखा आहे.
दुर्दैवाने तिचं लग्न अयशस्वी ठरलं; पण वैयक्तिक दु:खाचा एवढासादेखील परिणाम तिने आपल्या कामावर पडू दिला नाही. सतत कामात राहणं हेच तिचं दु:खाच्या जखमेवरचं मलम. मात्र, विनया व विभा या तिच्या दोन मुली म्हणजे तिचे डोळे आहेत. आता दोघीही स्वत:च्या पायावर उभ्या असल्याने अंध मुलांना आत्मनिर्भर बनवणं, हे एकच ध्येय तिच्यासमोर आहे.
एअर इंडियात ‘मॅनेजर मेडिकल वेल्फेअर’ या पदावर काम करणारी परिमला पुढच्या वर्षी नोकरीतून निवृत्त होईल. त्यानंतर काय करायचं याचे आराखडे तिच्या मेंदूत आताच तयार आहेत. सध्या ‘स्नेहांकित’चं कार्यालय खारच्या अनुयोग विद्यालयाने दिलेल्या छोटय़ाशा जागेत सुरू आहे; पण विद्यार्थ्यांना सोईचं पडावं म्हणून मुंबईच्या मध्य व पश्चिम मार्गावर स्वतंत्र सेंटर्स स्थापन करायची आहेत, जिथे त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा असतील, जिथून या मुलामुलींना आत्मसन्मानाने जगण्यासाठी मार्ग मिळेल. यासाठी तिला हवीय सोयीस्कर अशी जागा. या हिरकणीची ही हाक समाजाच्या संवेदनशील मनापर्यंत पोहोचेल?  
संपर्क- parimala2108@gmail.com
मोबाइल क्रमांक -९९८७११४६८०