News Flash

जागरण ..मनाचं!

घटस्थापनेनंतरच्या नऊ दिवसांत काय करतात? जागरण, उपवास, सात्त्विक अन्नग्रहण, अखंड दीपप्रज्वलन.. असे बरेच काही. पण खरे पाहता रात्रभर जागं राहणं, निद्रेचा त्याग करणं यातून जागृतावस्था

| September 27, 2014 01:57 am

घटस्थापनेनंतरच्या नऊ दिवसांत काय करतात? जागरण, उपवास, सात्त्विक अन्नग्रहण, अखंड दीपप्रज्वलन.. असे बरेच काही. पण खरे पाहता रात्रभर जागं राहणं, निद्रेचा त्याग करणं यातून जागृतावस्था येते का? अशा किती रात्री आपण जागू शकतो? आणि अशा रीतीने जागं राहून खरंच काही परिवर्तन आपल्यात होईल का? निश्चितच नाही. मन-बुद्धीने जागृतावस्था येणं हेच खरं जागरण आहे, अज्ञानाच्या निद्रेतून स्वत:ला जागं करणे म्हणजेच जागरण आहे.
महाकवी कालिदासाचे वाक्य आहे- उत्सव प्रिय: खलु मनुष्य: अर्थात उत्सव सर्वानाच आवडतात. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात, या सणांच्या निमित्ताने आपण अल्प काळासाठी का असेना थोडा वेळ दूर जातो. थोडा मोकळा श्वास घेऊन मनाची खिन्नता बाजूला सारू शकतो. उत्सवामुळे मनात नवा उल्हास संचारतो व मन ताजेतवाने होते. असं म्हटलं जातं उत्सवामध्ये असलेला उल्हास जर त्याचा ‘प्रेय’ भाग असेल, तर उत्सवात असलेले जीवनदर्शन हा त्याच्यातील ‘श्रेय’ भाग आहे आणि कोणताही उत्सव साजरा करते वेळी ‘प्रेय’ व ‘श्रेय’ दोघांचाही समन्वय असलाच पाहिजे. उत्सवामुळे मानवी मनात प्रेम निर्माण होते, ऐक्य निर्माण होते; पण उत्सव जर का वैचारिक मंथनासहित साजरे केले गेले, त्यामागे असलेला भाव जाणून घेतला, तर निश्चितच ते अखिल मानवजातीसाठी कल्याणप्रद ठरतील. दरवर्षी संपूर्ण देशभरात अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र उत्सव मोठय़ा उत्साहाने व भक्तिभावनेने साजरा केला जातो. बहुतेक ठिकाणी नवरात्रीच्या प्रारंभी घटस्थापना करतात व त्यापुढे नऊ रात्री अखंड दीप तेवत ठेवतात. यावरून आपला अवाढव्य देश सांस्कृतिकदृष्टय़ा किती एकसंध आहे याची जाणीव होते. या नऊ दिवसांत कुमारिकापूजन, व्रत, उपवास, जागरण केले जाते; परंतु आजकाल मात्र नवरात्र उत्सवातील मूळ भाव, गर्भितार्थ बदलत चालला आहे. आता उरला आहे तो केवळ उत्सवातील उत्साह. नवरात्रीत रात्रभर देवीच्या पुढे रास व गरबा खेळण्यासाठी मोठय़ा संख्येने युवक-युवती, लहान मुले गोळा होतात व देवीच्या पुढे जोरजोरात ध्वनिक्षेपक यंत्र लावून तासन्तास दांडिया खेळण्यात आनंद मानतात; पण खरंच नवरात्रीचा केवळ हाच अर्थ असू शकेल का?
 ‘नवरात्री’ अर्थात नऊ+रात्री. अशी एखादी रात्र जी मानवी जीवनात नावीन्य होऊन येते, सुप्रभात घेऊन येते. रात्री सर्वत्र अंधकाराचं साम्राज्य असतं, तमोगुणांचं आच्छादन असतं. आपण ज्ञानाला प्रकाश व अज्ञानाला अंधकार म्हणूनदेखील संबोधतो. त्याच अर्थाने समाजात जेव्हा-जेव्हा नकारात्मकता वाढते; मनुष्य सत्यापासून, सभ्यतेपासून, चारित्र्यसंवर्धनापासून दूर जाऊ लागतो; दुराचार, पापाचार, स्वैराचार सर्वत्र बोकाळू लागतो तेव्हा तीसुद्धा अज्ञानाची रात्रच समजली पाहिजे. अगदी अशाच वेळी माणसातील वाईट वृत्ती, स्मृती, दृष्टी, कृती, कर्म, संकल्प, स्वभाव, संस्कार यांमध्ये असलेली दानवता संपवून त्यांच्यात दैवी गुणांची स्थापना करण्याचं महानतम कार्य देवीकडून होतं. देवी अर्थात दिव्यता! साहजिकच असा प्रश्न पडतो, अशी कुठली शक्ती या देवीकडे असते ज्यामुळे त्यांचे आजतागायत नवरात्रीत पूजन केले जावे?
नवरात्रीसंबंधी काही कथा प्रचलित आहेत. त्यातील सर्वाधिक प्रचलित कथा आहे महिषासुर दैत्याच्या वधाची! हा राक्षस अतिशय बलशाली झाला होता, माजला होता. त्याने शक्तीच्या बळावर सर्व मनुष्य व देवतांना त्राहि माम् करून सोडले होते. दैवी विचारांची प्रभा अस्पष्ट बनली होती. दैवी वृत्ती असलेले लोक भयभीत झाले होते. अशा रीतीने धैर्य गमावलेले देव परमात्म्याला शरण गेले. त्यांची असहाय व नि:शस्त्र अवस्था पाहून त्रिदेवांच्या शक्तीने एक कन्या आदिशक्तीच्या रूपात प्रकट झाली. ती दिव्य अस्त्र-शस्त्रांनी सुसज्ज होती. त्रिनेत्री व अष्टभुजाधारी होती. महिषासुराबरोबर नऊ दिवस, नऊ रात्र अखंडपणे घनघोर युद्ध करून तिने महिषासुराचा संहार केला. म्हणजेच आसुरी वृत्तीचा अंत करून दैवी शक्तीची प्रतिष्ठापना करून देवतांना अभय दिले.
या कथेतील महिषासुर हा शब्द महिष+असुर या दोन शब्दांचा संधी आहे. महिष या शब्दाचा अर्थ रेडा. या दृष्टीने रेडय़ाची वृत्ती बाळगणारा तो महिषासुर. रेडा हे मंदबुद्धीचे प्रतीक आहे. रेडा केवळ स्वत:चे तेवढेच सुख पाहतो. समाजातदेखील रेडय़ाची ही वृत्ती पसरलेली दिसते. परिणामत: समाजाची स्वार्थी, प्रेमविरहित, भावनाशून्य होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसते. आज सगळीकडे व्यक्तिवाद व स्वार्थी वृत्ती बोकाळली असून महिषासुराच्या रूपाने नाचते आहे. आपली अशी धारणा आहे की, राक्षस किंवा असुर म्हणजे मोठय़ा नखांचे, लांब केसांचे, अजस्र, महाकाय, मोठय़ा डोळय़ांचे, मोठे दात बीभत्स, भयानक, अक्राळविक्राळ रूप असलेले; पण खरे पाहता, असुर म्हणजे असुषु रमन्ते इति असुर:। अर्थात भोगातच रममाण होणारे ते ‘असुर’. अशा प्रकारे या अनियंत्रित आसुरी वृत्तीवर अंकुश ठेवण्यास यशस्वी होणारी ही देवी. म्हणूनच कदाचित देवीला सिंहावर विराजमान झालेली दाखवतात. सिंहाच्या जवळ जाण्यास कोणीही उत्सुक नसते. त्यातही सिंह हा हिंस्र श्वापद आहे. त्यावर देवी आसनस्थ होणे याचा अर्थ अशा हिंस्रतेलाही काबूत करण्याची शक्ती या देवीकडे असते. अधीन न होता परिस्थितीवर अधिकार गाजवण्याचे कार्य फक्त देवीच करू शकते.
या नऊ दिवसांत काय करतात? जागरण, उपवास, सात्त्विक अन्नग्रहण, अखंड दीपप्रज्वलन.. असे बरेच काही; पण खरे पाहता, रात्रभर जागे राहणं, निद्रेचा त्याग करणं यातून जागृतावस्था येते का? अशा किती रात्री आपण जागू शकतो? आणि अशा रीतीने जागे राहून खरंच काही परिवर्तन आपल्यात होईल का? निश्चितच नाही. मन-बुद्धीने जागृतावस्था येणं हेच खरं तर जागरण आहे, अज्ञानाच्या निद्रेतून स्वत:ला जागे करणे म्हणजे जागरण आहे. मग ही जागृतता, हे जागरण फक्त नऊ दिवसच अवलंबावं का? उपवास करणं म्हणजे भोजनाचा त्याग करणं. शरीराला कष्ट दिल्याने आत्म्यात खरी शक्ती भरू शकेल का? उपवास याचा अर्थ उप+वास म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहणे असा होतो. मग हा उपवासदेखील नऊ दिवस करणंच योग्य असेल का? या नऊ दिवसांत सात्त्विक अन्न ग्रहण केलं जातं, कारण आपल्याला माहित आहे ‘जैसा खाये अन्न वैसा होवे मन’. या दिवसांत म्हणूनच आपण मनसा, वाचा, कर्मणा पवित्र राहतो. मग ही पवित्रतादेखील फक्त नऊ दिवसच असावी का? दररोज का नसावी? अखंड दीपप्रज्वलनाचा अर्थ असा आहे- माझी बुद्धीरूपी ज्योत सदैव जागृत असावी. ज्ञानाचा प्रकाश सदैव आपल्या जीवनात राहावा, कारण जर का ही बुद्धीरूपी ज्योत विझली तर पुन्हा आपण विकारवश झालेले असू. याचे प्रतीक म्हणून हे दीपप्रज्वलन. मग हेदेखील नऊ दिवसच असावे का?
देवीच्या हातात अस्त्रं-शस्त्रं, आयुधं दाखवली जातात. देवी म्हटली की, आपल्या डोळय़ासमोर एक चित्र उभं राहतं. शंख, चक्र, गदा, पदम्, वीणाधारिणी. देवी ही खरे तर ज्ञानखड्गांनी संपन्न आहे. ती ज्ञानाचा शंखध्वनी करते, स्वदर्शनचक्र धारण करून स्वचिंतन व परमात्म चिंतनात मग्न असते. ज्ञानरूपी गदेनं मायेला चीत करणारी, विकारांचे हनन करणारी असते, देवी-देवतांच्या अवयवांनादेखील कमळाची, पद्माची उपमा दिली जाते- जसे करकमल, चरणकमल, नयनकमल, मुखकमल वगैरे वगैरे. कमळ हा अनासक्तीचा आदर्श आहे. मांगल्याचा महिमा दर्शवणारा आहे. प्रकाशाचे पूजन (सूर्यप्रकाशाच्या दिशेने उध्र्व दृष्टी राखणारे) जीवनाचे दर्शन घडवणारे कमळ आहे. म्हणूनच देवी-देवतांनी कमळाचा स्वीकार केला असावा. देवीच्या प्रत्येक आयुधात काही ना काही संदेश दडलेला आहे. सम्यक दिशा दाखवतात ते संदेश.
देवीला अष्टभुजाधारी दाखवले जाते. या अष्टभुजा आदिशक्तीमधले सामथ्र्य अधोरेखित करणारी प्रतीकंच आहेत. मात्र आदिशक्तीकडे असलेल्या या अष्ट शक्ती कोणत्या ज्यामुळे त्यांच्या जीवनात महानता येऊ शकली?
* विस्ताराला आवरून घेण्याची शक्ती
* समेटण्याची शक्ती
* सहनशक्ती
* सामावण्याची शक्ती
* पारखण्याची शक्ती
* निर्णयशक्ती
* सामना करण्याची शक्ती
* सहयोगाची शक्ती
देवीच्या या अष्ट शक्ती अष्टभुजेच्या रूपाने दाखवल्या जातात. म्हणून दुर्गेच्या रूपानं दुर्गुणांचा, आसुरी वृत्तीचा संहार करणारी, जगदंबा बनून सर्वाची मनोकामना पूर्ण करणारी, श्रीलक्ष्मीच्या रूपाने स्थूल नव्हे, तर सूक्ष्म रीतीने ज्ञान-धन प्रदान करणारी, शीतलामातेच्या रूपाने सर्वाना शीतलतेचा स्पर्श करणारी, गायत्रीच्या रूपाने पवित्रतेचे दान देणारी, पार्वतीच्या रूपाने सदैव, निरंतर ‘शिवस्मृतीत रममाण होणारी, अन्नपूर्णा मातेच्या रूपाने सर्वाचे यथायोग्य पालन करणारी, संतोषीमातेच्या रूपाने सर्वाना संतुष्ट करणारी, कालीच्या रूपाने काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार या विकाररूपी असुरांना समाप्त करणारी, जिच्या विक्राळतेपुढे राक्षसही नतमस्तक होतात अशी सर्वाना कलंकमुक्त करणारी ती काली. ही सर्व शिवशक्तीची रूपं.
नवरात्रीत देवीच्या भोवती रास किंवा गरबा खेळत फेर धरायचा असतो. आपल्या एका हाताने दुसऱ्या हातावर टाळी वाजवून हा गरबा खेळत असतो. खरं तर प्रत्येकाला आपलं मानून आपला सहयोगाचा हात प्रत्येकाच्या हातात दिला गेला पाहिजे आणि तेच खऱ्या अर्थाने स्वभाव-संस्कारांचं रास मीलन असेल. दसऱ्याचा दिवस म्हणजे समाजात असलेल्या हीन, दीन, लाचार व मोहवृत्तींचा संहार करण्यासाठी कटिबद्ध होण्याचा दिवस. बाह्य़ जगातील शत्रूंबरोबरच अंतर्गत वास करणाऱ्या विकाररूपी असुरांवर विजय मिळवण्याचा दिवस. म्हणून नवरात्रीत देवीला आवाहन तर करायचेच; पण आपणातही ते गुण व शक्ती यावी यासाठी प्रतिज्ञाबद्ध व्हायचे. सर्व चांगल्या गुणांचे, दैवी विचारांचे सर्जन करून आसुरी वृत्तीचे विसर्जन करण्याची शपथ घ्यायची. तेव्हाच ही नवरात्री खऱ्या अर्थाने साजरी झाली असे म्हणता येईल.
(प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ‘ओम शांती मीडिया’ या वृत्तपत्र विभागाद्वारा प्रसारित आध्यात्मिक प्रवचनांचा हा मराठी अनुवाद)        
आजचा अंक नवरात्री विशेषांक असल्याने नियमित प्रसिद्ध होणारी सदरे अंकात प्रसिद्ध होऊ शकली नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 1:57 am

Web Title: creative inspiring powerful stories of women empowerment article 5
Next Stories
1 काटय़ांचा गुलाब
2 दूरदृष्टीचं वकीलत्व
3 मानसिक अपंगत्वावर मात
Just Now!
X