News Flash

मानसिक अपंगत्वावर मात

कानाने ऐकू येत नसतानाही पारंपरिक नृत्यप्रकार आणि वीणा वाजवायला शिकलेल्या जयश्री यांनी अपंगत्वावर मात करत इंग्रजी विषयात उच्च शिक्षण घेतलं. जाहिरात क्षेत्रात लेखनाचं काम करत

| September 27, 2014 01:53 am

कानाने ऐकू येत नसतानाही पारंपरिक नृत्यप्रकार आणि वीणा वाजवायला शिकलेल्या जयश्री यांनी अपंगत्वावर मात करत इंग्रजी विषयात उच्च शिक्षण घेतलं. जाहिरात क्षेत्रात लेखनाचं काम करत पुढे उच्चपदस्थ अधिकाऱ्याची भूमिकाही बजावली. अपंगत्व म्हणजे ‘दी एंड’ नाही, हेच सर्वाच्या मनावर ठसवण्यासाठी त्यांनी  ‘अ‍ॅबिलिटी फाऊंडेशन’ नावाची संस्था सुरू केली असून त्यातर्फे अपंगांसाठी ‘जॉब फेअर’ घेतले जाऊ लागले आहेत. अपंगत्व हे मानसिकच असतं, हे समाजमनावर आपल्या कृतीद्वारा ठसवू पाहणाऱ्या जयश्री रवींद्रन या दुर्गेविषयी..
जयश्री रवींद्रन म्हणतात, ‘‘अपंगत्व तुमच्या मनात असतं; जोपर्यंत आपण आपल्या मनाच्या अपंगत्वाचा सामना करत नाही, तोपर्यंत प्रत्येक व्यक्ती ही अपंगच असते. त्यांच्या ‘अ‍ॅबिलिटी फाऊंडेशन’ नावाच्या संस्थेत येणाऱ्या प्रत्येकाला त्या हेच सांगतात. अपंगाविषयी लोकांच्या मनात असणाऱ्या उदासीनतेवर प्रहार करणाऱ्या जयश्री यांना श्रवणदोष आहे. पण काही करण्याच्या आड ते येत नाही, येऊ नये, असा त्यांचा ठाम आग्रह आहे. त्याच दृष्टीने, अपंगांसाठी काम करण्याच्या दृष्टीने त्यांनी आपल्या आयुष्याला एक निश्चित मार्ग दिला आहे.
कायमच हसतमुख असणाऱ्या जयश्री रवींद्रन या कदाचित एकाच गोष्टीने चिडत असतील. ती गोष्ट म्हणजे लोकांचा एखाद्या अपंग व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि या दृष्टिकोनातून त्यांना दिली जाणारी ‘वेगळे’पणाची भावना. पण त्यांना वाटणारा राग त्यांनी असाच मनात राहू दिला नाही. त्यांनी याबद्दल काहीतरी भरीव काम करायचं ठरवलं आणि त्यातूनच निर्माण झालं हे ‘अ‍ॅबिलिटी फाऊंडेशन’. गेली २० र्वष हे फाऊंडेशन अपंग व्यक्तींना विविध प्रकारची मदत करून आपल्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करत आहे. पण, जयश्री रवींद्रन यांच्या मते खरी मदतीची गरज ही त्या अपंग माणसाला नाहीच. गरज आहे ती समाजाला. अपंगांकडे बघण्याच्या त्यांच्या मानसिकतेला बदलायची गरज आहे.
 २०११च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार भारतात दोन कोटींच्या वर विविध कारणाने अपंग असणाऱ्या व्यक्ती आहेत. हा आकडा एकूण लोकसंख्येच्या २.१ टक्के आहे. भारतात खूप कडक नाहीत, पण काही प्रमाणात कायदे अस्तित्वात आहेत. याच वर्षी, म्हणजे २०१४ मध्ये आणखी एक कायदा लोकसभेमध्ये विचाराधीन आहे. पण फक्त कायदे करून, लोकांची मानसिकता बदलत असती तर आणखी काय हवं होतं? कायद्याबरोबरच खरी गरज आहे ती लोकशिक्षणाची. जयश्री रवींद्रन यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेलं ‘अ‍ॅबिलिटी फाऊंडेशन’ समाजाची ही गरज ओळखून नेमकं हेच काम करतं.
रवींद्रन यांची स्वत:ची ऐकू येण्याची क्षमता कमी आहे, पण हा ऐकण्यातला दोष त्यांना जन्मापासून नव्हता. अगदी लहानपणी झालेल्या एका अपघाताने त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला. त्यांच्याशी बोलताना, लहानपणी नक्की काय झालं, कशामुळे हा दोष निर्माण झाला या प्रश्नांना उत्तरं द्यायची त्या आवर्जून टाळतात. त्यांच्या मते, या जुन्या गोष्टी उगाळून आपण भूतकाळात रमत बसतो, आपल्या स्वत:मधल्या कमीपणाच बाऊ  करून घेतो. पण यामुळे आज आणि भविष्यकाळामध्ये आयुष्यातल्या साध्या साध्या प्रश्नांना सामोरं जाण्याची टाळाटाळ करतो, स्वत:चं दुखणं कुरवाळत बसतो आणि मुख्य म्हणजे आपला आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. स्वत:वरचा विश्वास कमी झाला की आपण खऱ्या अर्थाने अपंग होतो. त्यांच्या लहानपणी त्यांच्या आई-वडिलांनी आणि इतर कुटुंबीयांनी त्यांना खूप सहकार्य केलं. त्या त्यांच्या कुटुंबाबद्दल सांगताना म्हणतात की, त्यांच्या कुटुंबाने त्यांना भरपूर प्रेम दिलं. कोणतीही गोष्ट करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं. योग्य वेळ ओळखून अनेक संधी आणि शक्यता त्यांच्यासमोर मांडून ठेवल्या आणि कायमच सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. कोणतंही चांगलं कुटुंब आपल्या रूढार्थाने अपंग नसलेल्या मुलांसाठी जे करेल ते सर्व त्यांनी केलं. मला जर कोणत्या प्रकारचा दोष नसता तरीही त्यांनी हेच केलं असतं. लहान मुलांना हाच सकारात्मक दृष्टिकोन आयुष्यभर पुरतो. त्यांचं अपंगत्व त्यांना कोणतीच गोष्ट करण्यापासून थांबवू शकलं नाही. त्या पारंपरिक नृत्यप्रकार आणि वीणा वाजवायलाही शिकल्या. पुढे त्यांनी इंग्रजी विषयात उच्चशिक्षण घेतलं, जाहिरात क्षेत्रात लेखनाचं काम केलं, पुढे त्यांनी याच क्षेत्रात उच्चपदस्थ कार्यकारी अधिकाऱ्याची भूमिकाही बजावली.
चांगलं कुटुंब, चांगली संवेदनशील माणसं त्यांना कायमच भेटली, असं त्या आवर्जून सांगतात. पण, कदाचित सगळेच त्यांच्यासारखे भाग्यवान नसतात. काहींना साध्या-साध्या गोष्टींसाठी जिवाचा आटापिटा करावा लागतो, आजूबाजूच्या लोकांनी त्यांना समजून घ्यावं म्हणून कष्ट घ्यावे लागतात हे त्या ओळखून होत्या. अशाच लोकांसाठी त्यांनी १९९५ मध्ये ‘अ‍ॅबिलिटी फाऊंडेशन’ ही संस्था सुरू केली. त्यांचा पाहिला प्रकल्प होता तो अपंगांसाठी नियतकालिके तयार करण्याचा. या प्रकल्पाबद्दल सांगताना त्या म्हणतात, ‘आपल्याकडे अनेक विषयांवरची, अनेक प्रकारची नियतकालिके प्रसिद्ध होतात, पण त्यामध्ये ‘अपंगत्व’ या विषयावरचं लिखाण क्वचितच आढळतं. असलंच तर त्यांच्याबद्दल दयेच्या भावनेने लिहिल्या गेलेल्या गोष्टी नाहीतर त्यांना ‘हिरो’ बनविणारी उदाहरणे! एकतर ‘डिफरंटली एबल्ड’ हा शब्द मला अजिबात आवडत नाही. ही लोकं सर्वसामान्य माणसांपेक्षा काही वेगळी नसतात, मी स्वत: अपंग असल्याने मला स्वत:ला हा अनुभव आहे की समाज सर्व अपंग माणसांना ‘ते काही करू शकत नाहीत’ अशी भावना देत असतो. हे सर्व सुरू करताना अपंगत्व म्हणजे ‘दी एंड’ नाही, हे मला ठासून सांगायचं होतं. आम्हाला पण ‘सामान्य’ माणसांप्रमाणे इच्छा, आकांक्षा या असतातच. मला ‘सामान्य माणूस’ या शब्दाची मनापासून चीड आहे.’’
हे नियतकालिक सुरू करणं हे काही सोप्पं काम नव्हतं. अनेक माणसांनी मला वेडय़ात काढलं होतं असंही त्या सांगतात. पण यामुळेच अनेक अपंगत्व असलेल्या व्यक्ती आणि या विषयावर काम करणारी लोकं त्यांच्या संपर्कात आली. या सगळ्याची सुरुवात झाली तेव्हा अभिनेत्री रेवती आणि आणखी दोन जण त्यांच्यावर पूर्व विश्वास ठेवून त्यांच्याबरोबर राहिले. बघता बघता संस्थेचं पाहिलं वर्ष पूर्ण झालं. पहिल्या वर्षांच्या कार्यक्रमासाठी त्यांनी एक नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये अंध आणि इतर नर्तक एकत्र नृत्यप्रकार सादर करणार होते. रेवती आणि जयश्री यांनी मिळून नृत्य बसवले होते. ‘‘दृष्टी असलेल्यांनाही काही स्टेप्स अवघड वाटत होत्या.. पण त्या मुलींनी अवघड स्टेप्स, पोशाख याची तमा बाळगली नाही. त्या स्टेजवर अगदी मनसोक्त नाचल्या,’’ अशी आठवण त्या सांगतात. हा अनुभव पाठीशी असल्यामुळे या संस्थेने त्याच्या पुढच्याच वर्षी लगेच अशाच प्रकारचा फॅशन शोदेखील सादर केला. प्रत्येक वर्षी संस्थेच्या कामाचा व्याप वाढत होता. या संस्थेने दरवर्षी अपंगांसाठी ‘जॉब फेअर’ आयोजित करायला सुरुवात केली. ‘‘सुरुवातीला मी माझ्या कॉर्पोरेटमधल्या परिचितांशी एकेका व्यक्तीबद्दल बोलायचे, पण मग अशा प्रकारची मदत लागणारे लोक वाढत गेले आणि ‘जॉब फेअर’ची सुरुवात झाली.’’
अपंगत्वाबद्दल सांगताना त्या म्हणतात, ‘‘मला स्वत:ला ऐकू येत नसताना मी वीणा वाजवायला शिकले. पण अडचणी येणं हा आयुष्याचा एक भाग आहे. अनेक लोकांना जशा अडचणी येतात तशाच मला काही अडचणी आल्या. त्या अडचणींवर मात करायला शिकले. एखाद्या अडचणीवर, अपंगत्वावर विजय मिळवणं, जे कधीच जमणार नाही असं वाटतं ते करून दाखवणं यातच खरी मजा आहे. उदाहरणार्थ मला लोकांशी फोनवर बोलता येत नाही, पण मला गाडी चालवता येते.. तुम्हाला येते का? ती येत नसेल तर तुम्ही अपंगच की!’’
आपण सगळी माणसं सारखीच आहोत. तुम्हाला जसं एक हृदय, दोन कान, दोन डोळे आहेत तसेच सर्वाना आहे. आधीच आपला समाज इतक्या वेगवेगळ्या प्रकाराने विभागला गेला आहे की त्यात आता परत माणसाच्या क्षमतांमुळे अजून वर्गीकरण व्हायला नको, हेच त्या अधोरेखित करतात. नव्या तंत्रज्ञानामुळे क्षमतांमध्ये असलेला हा वेगळेपणा कमी करण्यासाठी खूपच मदत झाली आहे. आता वेगळेपणा आहे तो केवळ आपल्या मनांमध्ये.
जयश्री रवींद्रन यांच्या म्हणण्याप्रमाणे कोणीही माणूस एका बेटावर राहात नसतो. जगण्यासाठी त्याला इतर माणसांची गरज असतेच. इतरांना मदत करत, एकत्र गोष्टी घडवत आपल्याला जगायचं असतं. दुसरी व्यक्ती अधू आहे, ती ‘बिचारी, एकटी’ आहे या भावनेने कधीच कोणाला मदत करू नका. मदत करा पण माणूस म्हणून, समाजाचा एक भाग म्हणून तुम्ही तेच करणं अपेक्षित आहे. अशानेच आपला समाज मोठा होतो, अधिक सहिष्णू होतो. सर्व माणसांमध्ये वेगवेगळ्या क्षमता असतात. काही कमी काही जास्त असतात. आपण साच्यात तर बनवले गेलो नाहीयेत ना.. मग फरक असणारच. या फरकांचा स्वीकार करा. सर्वाची तुलना समान मापामध्ये करू नका. साध्या साध्या गोष्टी करताना विचार करा की, आपल्या कृतींमधून कोणी नकळत दुखावलं तर जाणार नाहीये ना? कोणाला आपण विसरत तर नाहीये ना? कारण एकत्र जाण्यामध्येच सर्वाचं भलं आहे!
अजूनही अंध व्यक्तीला रस्ता पार करण्यासाठी कोणीतरी आपल्याला मदत करेल म्हणून थांबून राहावं लागतं, त्यांना ब्रेलमध्ये वाचता येतील, अभ्यास करता येईल अशी पुस्तकं उपलब्ध नाहीत. पायाने अधू असलेल्या व्यक्तीला मनमोकळेपणाने शहरात फिरता येत नाही. आपल्या शहरांची तशी रचनाच नाही. छोटय़ा छोटय़ा पण अतिशय महत्त्वाच्या कृतींमधून ‘सामान्य’ माणसं अपंगत्वाकडे कसं पाहतात हे लक्षात येतं.
जयश्री यांना हेच बदलायचं आहे आणि म्हणूनच त्यांनी त्याचं कृतीतून उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. अपंगत्व ही फक्त मानसिकता आहे, मनात आणलं तर अपंग सामान्यांपेक्षाही खूप मोठं काम करू शकतो, हेच सर्वाच्या मनावर बिंबवणाऱ्या जयश्री यांची ही वाट खडतर आहे.. पण अशक्य नक्कीच नाही. त्यांच्या कृतीतून ते सिद्ध होतच आहे..   
संपर्क- ईमेल   j.raveendran@abilityfoundation.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 1:53 am

Web Title: creative inspiring powerful stories of women empowerment article 8
Next Stories
1 प्रतिकूलतेशी खंबीर लढा
2 नाचे रोमा !
3 हसतमुख सावली
Just Now!
X