News Flash

नाचे रोमा !

तिला नृत्याची लहानपणापासूनच आवड; मात्र अपघातात तिचा एक पाय कापावा लागला आणि परिस्थिती बदलली. आपण अपंग झालोत, यामुळे जवळचे आपल्यापासून दूर गेले आहेत, सगळ्यांचा नजरा

| September 27, 2014 01:51 am

तिला नृत्याची लहानपणापासूनच आवड; मात्र अपघातात तिचा एक पाय कापावा लागला आणि परिस्थिती बदलली. आपण अपंग झालोत, यामुळे जवळचे आपल्यापासून दूर गेले आहेत, सगळ्यांचा नजरा बदलल्या आहेत, हे तिच्यासारख्या मनस्वी व्यक्तीला सहन झाले नाही. मन रमवायला तिच्याकडे फक्त नृत्यच होतं. अखंड परिश्रमाने तिने त्यात इतकी कुशलता मिळवली, की पुढे तिच्याच नव्हे तर तिच्या कुटुंबीयांच्या चरितार्थाचंच ते साधन झालं. नेपाळमध्येच नव्हे तर जगभरात ती आपल्या नृत्याचे कार्यक्रम करत असते. अपंगत्व तुमच्या ध्येयाआड येत नाही, हे दाखवणारी रोमा आता अपंगांसाठी कार्यही करते आहे. डिसेबल्ड नव्हे, ‘डिफरंटली एबल्ड’ असणाऱ्या नेपाळच्या रोमा न्युपेन या दुर्गेविषयी..
नेपाळचे राजकीय हस्ती, विख्यात हास्यसम्राट मनोज गुजराल अनेक मान्यवरांसह व्यासपीठावर आहेत; तितक्यात ‘रोमा न्युपेन’ अशा नावाची घोषणा होते. टाळ्यांच्या प्रचंड गजरात तिचे आगमन होते. सगळ्यांना विनम्र अभिवादन करून ती व्यासपीठाच्या कोपऱ्याकडे जाऊन तिचा ‘आधार’ बाजूला ठेवते आणि तिचा नृत्याविष्कार चालू होतो. संगीताचा अचूक ठेका पकडत, हातांची लयबद्ध हालचाल, चेहऱ्यावरचे हावभाव..बघता बघता प्रेक्षकांना ती मोहून टाकते. सांस्कृतिक कलानृत्याची ही अनोखी मैफल रंगत जाते. तिच्या नृत्याविष्काराइतकाच तिचा आत्मविश्वास पाहणाऱ्याला खिळवून ठेवतो, कारण ही नर्तकी हा नृत्यप्रकार एका पायावर सादर करते आहे..
 होय. लाल साडी-लाल ओढणी ल्यालेली ही ललना, प्रसन्न स्मित करणारा तिचा चेहरा, झोकात गिरक्या घेणारी तिची छबी आणि कलात्मक हस्तमुद्रा यात इतकी अदब आहे की जणू दोन पायांवर हा नृत्याविष्कार सादर करत असल्याचा भास होईल, पण एका पायाने अधू असलेली रोमा हा कलाविष्कार सादर करते, तितक्याच सहजतेने.
 ‘पूर्वी माणसं मला कुबडय़ा घेऊन चालणारी एक अपंग व्यक्ती समजत आणि आता माझी ओळख नृत्यांगना अशी आहे, याहून मोठा आनंद कोणता असेल?’ तिच्या या वाक्यावर लोक भावुक होतात, हात उंचावतात, टाळ्या वाजवतात. वातावरणात एक कौतुकाची लाट पसरत जाते.
 ही गोष्ट आहे एका नृत्यांगनेची, तिच्या ध्येयनिष्ठेची. एका अपंग मुलीचा सक्षम होण्यापर्यंतचा हा प्रवास. ही नेपाळची रोमा न्युपेन. वयाच्या आठव्या वर्षी एका दुर्दैवी अपघाताची शिकार झाली. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र सहा महिने उपचार घेऊनही तिचा गुडघ्याखालचा पाय कापावा लागला. ‘शाळेत जाऊ लागले, लोकांमध्ये मिसळू लागले तेव्हा माझ्या नसलेल्या पायाचा शोध घेणाऱ्या नजरा हळूहळू जाणवू लागल्या, पाय नाही म्हणजे काहीतरी मोठंच आपल्या आयुष्यातून निघून गेलं आहे, हे कळायलाही बरीच वर्षे लागली मला. पण एकदा स्वीकारल्यावर त्याचा त्रास झाला नाही. आधीच मुलगी त्यात भर म्हणजे लंगडी झालेली, यामुळे लोकांकडून तिरस्कार, अपमान वाटय़ाला येऊ लागला.’ रोमा सांगते.
रोमाचे शालेय शिक्षण इठहारीमध्ये झाले. घरची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. त्यामुळे कुबडय़ा घेऊन चालण्याशिवाय पर्याय नव्हता. पण रोजच्या जगण्यातही अनंत अडचणी येत होत्या. ‘मी एका पायावर उडय़ा मारत अनेक कामे करत होते. धडधाकट माणसाला एखाद्या दुकानापर्यंत पोहोचायला १० मिनिटं लागतील तर मला १५ लागायची. माझ्या शाळेचे, कामाचे नियोजन लक्षात घेऊन मला कामं करावी लागत.’
 रोमाला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. रेडिओवर एखादे गाणे लागले की पायांनी ताल धरलाच म्हणून समजा. पण अपघातानंतर स्थिती बदलली. नाचण्याचा ध्यास सुटत नव्हता. ती सांगते, ‘माझा एका पायावरचा उडय़ा मारणारा नाच पाहून लोक हसतील या भीतीने मी दारं खिडक्या बंद करून नाचायचे. लहान असेपर्यंत भीती स्वरूपात असलेले हे विचार हळूहळू वास्तवात दिसू लागले. माझ्या कुबडय़ांकडे, माझ्याकडे बघण्याच्या लोकांच्या नजरा पाहून माझे सगळे अवसान निघून जायचे. नंतर नंतर तर जवळचे मित्र-मैत्रिणीही माझ्याशी अंतर ठेवून वागू लागल्या. माझ्यातलं अपंगत्व त्यांच्या नजरेत दिसू लागलं.’
‘अशा अनेक कटू अनुभवांनी एक चीड मनात साचत गेली आणि त्यातूनच आयुष्यात काहीतरी करण्याची, स्वतला सिद्ध करण्याची जिद्द जन्माला आली.’ रोमा सांगते. २००२ साली माझे कुटुंब काठमांडूला आले. इथे येऊन त्यांचा संघर्ष अधिक वाढला, पण रोमाच्या आयुष्याला नवे वळण मिळाले. नेपाळची ‘राष्ट्रीय पॅराप्लेजिक कमिटी’ अपंग खेळाडूंना प्रोत्साहनपर मदत करते. त्याचसाठी २००३ मध्ये आयोजित केलेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात रोमला नृत्य सादर करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचे तिने अक्षरश सोने केले.
रोमाला आजही तो दिवस लख्ख आठवतो. ‘त्या दिवशी मला मिळालेली शाबासकी आणि टाळ्यांचा कडकडाट मी कधीच विसरू शकत नाही. एका पायावर नृत्य सादर करतानाचे माझे फोटो दुसऱ्या दिवशी जवळपास सर्व प्रमुख वृत्तपत्रांत झळकले. स्थानिक वृत्तवाहिन्यांनीही मला घरोघरी पोहोचवले. त्या दिवशी मला बक्षीस म्हणून मिळालेले ८०० रुपये माझं आयुष्य बदलवणारे ठरले. नृत्य हेच माझं करियर म्हणून निवडण्याची ते प्रेरणा ठरले.’   
त्यानंतर नृत्याकडे ती एक छंद, आवड म्हणून न पाहता अधिक गंभीरतेने पाहू लागली. २००६ मध्ये तिच्या आयुष्यात आणखी एक सुखद प्रसंग आला. एका कार्यक्रमात तिने नृत्य सादर केले. त्यावेळी प्रेक्षकांमध्ये असलेल्या एका नृत्यप्रशिक्षकाला या १९ वर्षांच्या मुलीने कुबडय़ा बाजूला ठेवून सादर केलेल्या नृत्याने अचंबित केले. ज्या सहजतेने तिने नृत्य सादर केले ते पाहता तिच्यातल्या गुणांना त्यांनी हेरले व रोमाला शास्त्रोक्त नृत्यांगना करण्याचा संकल्प सोडला. रोमासाठी हा अत्यानंदाचा क्षण होता. आतापर्यंत ती कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय नृत्य करत होती. त्याला आता शास्त्रीय बैठक मिळाली. या तिच्या गुरूंचे नाव केशव सपकोटा.
‘रोमाचा नृत्याविष्कार पहिल्यांदा पाहिला तेव्हाच मी नि:शब्द झालो होतो. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे तिचे कसब, नृत्यातली जाण यामुळे ही मुलगी नक्कीच कुणीतरी मोठी होणार’ हे मी जाणले होते,’ तिचे गुरू सांगतात.
सपकोटा यांनी तिचे प्रशिक्षण गांभीर्याने घेतले आणि एका हिऱ्याला पैलू पाडायला सुरुवात केली. ‘कठोर मेहनतीला पर्याय नाही आणि कलेच्या साधकाला अपयश नाही’, या अनुभवावर त्यांचा इतका दृढ विश्वास होता की त्यांनी तिला त्यांचं शिकवणं नेमकं कळावं म्हणून तिच्यासारखंच अक्षरश एका पायावर तासन्तास नृत्य करायला सुरुवात केली. तीही त्यांच्याइतकीच कठोर मेहनती आहे हे तिनेही दाखवून दिले. नृत्याचे हे धडे गिरवणे तिच्यासाठी सोपे नव्हतेच. अनेकदा ती तोल जाऊन खाली पडायची, पुन्हा उठणे कठीण व्हायचे. त्याने दुखापत व्हायची. पण तिने सराव सोडला नाही. दरवेळी उठण्याचा नवा मार्ग सापडतो, असे म्हणत ती सराव करत राहिली. आता रोमा सलग दोन-अडीच तासांचे नृत्याचे कार्यक्रम करते. त्यामागे आहे ती सलग १०-१२ तासांची कठोर तपश्चर्या.
प्रयत्न करणाऱ्याला मदतीचे हात आपोआप येऊन मिळतात, तसे रोमाच्या बाबतीतही झाले. एका सांस्कृतिक कार्यक्रमात तिने सादर केलेल्या नृत्याला इस्रायलचे नेपाळमधील राजदूतही हजर होते. त्यांच्या मदतीने रोमाने इस्रायलला जाऊन कृत्रिम पाय लावून घेण्याची शस्त्रक्रिया पार पडली.
   आज रोमाच्या कलेने जगभरात वाहवा मिळवली आहे. संपूर्ण नेपाळ जवळपास तिने पालथा घातला आहे. याशिवाय इस्रायल, मलेशिया, कुवेत, दक्षिण कोरिया, कतार, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया या देशांतही तिच्या नृत्याच्या कार्यक्रमांना अमाप प्रसिद्धी मिळाली आहे. आपल्या राजधानी दिल्लीसह, चेन्नई, पुणे येथेही तिने नृत्य सादर केले आहे. १०० हून अनेक पुरस्कारांची ती मानकरी आहे तर अनेक प्रशस्तिपत्रके तिच्या धडाडीला सलाम करतायत. तिच्या एका स्टेज शोचे मानधन लाखांच्या घरात आहे.
 तिशीच्या उंबरठय़ावर असलेल्या रोमासाठी हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता, पण आनंददायी ठरला तो तिला समजून घेणाऱ्या चिरंजीवी पोखरेल या जोडीदारामुळे. त्यांनी रोमाला खऱ्या अर्थाने सक्षम केले. तिच्यात काही उणीव नाहीच याची तिला जाणीव करून दिली. सुरुवातीला तिचे सासरकडचे तिचा स्वीकार करण्यास तयार नव्हते. पण यथावकाश सारे मळभ दूर झाले. आज रोमा व चिरंजीवी यांना चार वर्षांचा मुलगा आहे.
 तिच्या नृत्याच्या कार्यक्रमातून मिळालेले उत्पन्न हा घराचा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत आहे. लग्नापूर्वी तिचा नवरा जेथे काम करायचा, ते रेस्टॉरंट आज तिने विकत घेतले आहे तर काठमांडूतले आणखी एक रेस्टॉरंट घेण्याच्या विचारात आहे. रोमा व चिरंजीवी मिळून दोन गेस्ट हाऊस चालवतात.
आज रोमा स्वावलंबी आहे. ती म्हणते, ‘अपंगांना समाजाकडून सहानुभूती नको आहे, दया नको आहे. फक्त एक सामान्य माणूस म्हणून त्यांचा स्वीकार हवा आहे. डिसेबल्ड न म्हणता आम्हाला डिफरंटली एबल्ड म्हणा. जगात प्रत्येकाला आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली पाहिजे तरच इतरांप्रमाणे आम्हाला ताठ मानेने जगता येईल.’
 रोमाने तिच्या यशाचे श्रेय तिचे गुरू व पती यांना दिले आहे. मात्र सगळ्यांनाच योग्य वेळी अशी मदत मिळतेच असे नाही म्हणून तिच्यासारख्या अपंगांना मदतीचा हात म्हणून रोमाने Volunteers’ Association for Disabled, Nepal (VAD Nepal) नावाची एनजीओ सुरू केली आहे. अपंगांसाठी काही कार्यक्रम ती विनामूल्य करते. अनेकांना तिच्या रेस्टॉरंटमध्ये तिने नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत.
कलेच्या माध्यमातून रोमाने अपंग लोकांसाठी प्रगतीची नवी कवाडं खुली केली आहेत. कलेच्या वरदानाने तिच्यासारख्या विशेष मुलांकडे बघण्याच्या सामाजिक दृष्टिकोनाला तिने आव्हान दिले आहे. सातत्यपूर्ण मेहनत व निष्ठेच्या जोरावर कुणीही व्यक्ती, मग ती अपंग का असेना, यशस्वी होऊ शकते, हेच तिने जगाला दाखवून दिले आहे. आज रोमा अनेक अपंग मुला-मुलींची रोल मॉडेल आहे. ती म्हणते ‘एखादा अवयव तुम्हाला नाही, तुम्ही इतर सामान्य लोकांसारखे नाही म्हणून सगळं तिथेच थांबतं असं नाही. तुम्ही स्वप्न पाहा, ती सत्यात उतरवण्यासाठी झटा. सामान्य लोकांपेक्षा अनेक गोष्टी आपण चांगल्या प्रकारे करू शकतो हे जगाला दाखवून द्या. शेवटी आयुष्य म्हणजे साधनाच तर आहे.’
एक प्रेरणादायी कलाकार म्हणून रोमा नावारूपाला आली आहे. पण, भूतकाळ व वर्तमानकाळ यात काय फरक आहे असे रोमाला विचारल्यावर ती म्हणते, ‘पूर्वी पाय नसल्याने खूप दुख व्हायचे आणि आता मी त्याचा विचारही करत नाही. एका पायाच्या जोरावर मी इतक्या छान गोष्टी करू शकते तर जे नाही त्याचा विचार करून वेळ का घालवा? अजून खूप मोठी झेप घ्यायची आहे. सगळ्यांना सन्मानाने जगता येईल, अशी पहाट अजून यायची आहे, तोपर्यंत थांबणे नाही.’     
संपर्क -Email : romaneupane@gmail.com
Website : www.romaneupane.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 1:51 am

Web Title: creative inspiring powerful stories of women empowerment article 9 2
Next Stories
1 हसतमुख सावली
2 ‘राजहंस’
3 तिचा वारसाहक्क
Just Now!
X