मंजुला नायर

responsiblenetism@gmail.com

मुलांवर अनेकदा ऑनलाइन गेम्सचा मोठाच प्रभाव असतो. मुलांमध्ये इंटरनेटवरच्या सुरक्षिततेबाबत कोणतंच शिक्षण किंवा जागरूकता नसल्यानं अनेकदा ती मुद्दाम किंवा नकळतपणे सायबर गुन्हे करतात. आपण कधीच पकडले जाणार नाही असाही त्यांना प्रचंड आत्मविश्वास असतो. मुलांनी केलेल्या अशा गुन्ह्य़ांमुळे होणाऱ्या गंभीर परिणामांबद्दल त्यांना जागरूक करणं जरुरीचे आहे.

सायबर गुन्हे ही एक विस्तृत संज्ञा आहे. अशा गुन्ह्य़ांमध्ये कॉम्प्युटर (संगणक) किंवा कॉम्प्युटरच्या नेटवर्कचा एक साधन म्हणून वापर केलेला असतो. याखेरीज एखाद्या कॉम्प्युटरवर किंवा कॉम्प्युटर नेटवर्कवर हल्ला झाल्यास त्याचाही या सायबर गुन्ह्य़ात समावेश होतो. संगणकाचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी करणं म्हणजे सायबर गुन्हा! अशा गुन्ह्य़ांत एखाद्या ‘कोड’ला भेदणं असो, की एकाच वेळी अनेकांनी हल्ला करून एखादी वेबसाइट बंद पाडणं असो, अनेक प्रकारच्या बेकायदा गोष्टींचा त्यात समावेश होतो. याखेरीज यामध्ये पारंपरिक प्रकारच्या गुन्ह्य़ातही संगणकाचा, सेलफोनचा किंवा नेटवर्कचा बेकायदा कामांसाठी वापर केला गेला, तर तेही याच सदरात येतात. थोडक्यात सांगायचं झालं तर संगणक आणि इंटरनेटचा बेकायदा वापर म्हणजे सायबर गुन्हा. सायबर गुन्हेगार संगणक तंत्रज्ञानाचा वापर करून खासगी माहिती, व्यावसायिक गुपितं मिळवू शकतात. इंटरनेटचा वापर करून शोषण करणं किंवा वाईट उद्देशांसाठी वापरणं याकरिता केला जातो.

सायबर गुन्हे नेमके का घडतात?

इंटरनेटचा सोपा झालेला वापर आणि सहजी, स्वस्त उपलब्धता, तरुण आणि लहान मुलं यामध्ये उच्च तंत्रज्ञान वापरण्याचं असणारं कौशल्य यांबरोबरच सोप्या मार्गाने, झटपट पसा मिळवण्याची गरज आणि सायबर गुन्हे केल्यावर होणाऱ्या कायदेशीर परिणामांबद्दल असणारं अज्ञान – या साऱ्या गोष्टी एकत्रित आल्यामुळं जगभरात अशा गुन्ह्य़ांचं प्रमाण अत्यंत वेगानं वाढताना दिसत आहे. मुळातच मानवी स्वभावात निष्काळजी राहणं, हा दोष बऱ्यापैकी असतोच. त्यामुळं सायबर गुन्हेगारांना आपल्या संगणक यंत्रणा वापरण्याची संधी मिळते. नुसता वापरच काय, त्यावर त्यांना स्वत:चं नियंत्रणही मिळवता येतं. आपला मोबाइल फोन लॉक करायला विसरणं, पासवर्ड इतरांना देणं, सायबर कॅफेसारख्या सार्वजनिक ठिकाणी संगणक वापरल्यास अकाऊंटमधून लॉग आऊट करायला विसरणं यांसारख्या गोष्टींमुळे अशा गुन्हेगारांचं चांगलंच फावतं.

शिवाय सायबर गुन्ह्य़ांशी संबंधित असणारी माहिती डिलीट करून टाकणंही अगदीच सहज शक्य असतं. सायबर गुन्ह्य़ांचा तपास करणाऱ्या तपास यंत्रणांना नेहमीच सामोरं जावं लागणारी समस्या म्हणजे ‘पुराव्याचा अभाव’. आपल्याबद्दलचा बदनामीकारक मजकूर ‘इतर लोकांनी’ वाचणं आणि अन्य भीतीपोटी अनेकदा गुन्ह्य़ांना बळी पडलेल्या व्यक्तीच पुरावे डिलीट करून टाकतात. खरं तर अशा पुराव्यांचा उपयोग करून गुन्हेगाराला पकडणं शक्य असतं. असा पुरावा आपल्याकडे असेल तर आर्थिक नुकसान किंवा काही काही वेळेला तर एखाद्याचा जीवदेखील वाचवणं शक्य असतं.

दिवसेंदिवस इंटरनेटचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे जग अधिकाधिक जवळ येत आहे. याचाच अर्थ जगात कोणीही कुठूनही म्हणजे जमीनच नव्हे तर अगदी आकाशातून किंवा पाण्याखालूनदेखील तुमच्या खासगी माहितीपर्यंत पोचू शकतो. तंत्रज्ञानात वेगाने होणाऱ्या वाढीमुळे आणि नवनव्या शोधांमुळे सर्वाना नव्या संधी आणि अत्यंत कार्यक्षम संसाधनं मिळू लागलेली आहे. डिजिटल माहिती ही आता राष्ट्रीय संपत्ती बनलेली आहे. शिवाय देशाची सुरक्षितता ही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातल्या माहितीवर अवलंबून असल्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. माहितीचं हे महत्त्व कायमच राहणार असल्यानं त्याबद्दल अधिक जाणून घेणं, हा एकच पर्याय आता आपल्यासमोर उरलेला आहे.

२०१७ मध्ये भारतातल्या सायबर गुन्ह्य़ांची संख्या जवळजवळ दुप्पट झाली. ही माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागानं (एनसीएआरबीनं) २२ ऑक्टोबर रोजी दिलेली आहे. २०१७ मध्ये आसाममध्ये खासगीपणाचा भंग केल्याबद्दलच्या सायबर गुन्ह्य़ांची सर्वाधिक संख्या साठ अशी नोंदवण्यात आली. त्याउलट उत्तर प्रदेशात अशा ४७ गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे, कर्नाटकात ३८, केरळमध्ये ३५ आणि महाराष्ट्रामध्ये असे २२ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

आता सायबर गुन्हा या गुन्ह्य़ांच्या प्रकारांमध्ये नेमकं काय काय समाविष्ट होतं याबाबतच्या ‘संज्ञा’ आपण जाणून घ्यायला हव्या.

हॅकिंग – सायबर जगतात सर्वाधिक संख्येनं घडणारा गुन्हा

हॅकिंग म्हणजे एखादी संगणक यंत्रणा किंवा खासगी नेटवर्कमध्ये परवानगीशिवाय घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न. कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये हा मिळवलेला अनधिकृत प्रवेश आणि तिच्यावर मिळवलेले नियंत्रण हे कुठले तरी बेकायदा कृत्य करण्यासाठी केलेला असतो. हॅकिंगचे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला हॅकर असं म्हणतात. अनेकदा अगदी लहान मुलंदेखील वायफाय, ऑनलाइन गेम्स, दुसऱ्यांची समाजमाध्यमांवरची खाती यांचं हॅकिंग करतात. जर तुमच्याकडे अधिकृत परवाना नसेल, तर असं हॅकिंग करणं बेकायदा आहे. मात्र हॅकिंग करणं लहान मुलांमध्ये अत्यंत ‘कूल’ समजलं जातं. मुलं अभिमानानं हे मिरवत असतात. भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार हॅकिंग हा दंडनीय अपराध आहे. असं असलं तरी, इंटरनेट सुरक्षिततेबाबत आणि गुन्ह्य़ांविरोधातल्या कायदेशीर उपाययोजनांबद्दल मुळातच जागरूकता कमी असल्यामुळे अनेकदा अशा गुन्ह्य़ांना फारसं गंभीरपणे घेतलं जात नाही.

मुलांवर अनेकदा ऑनलाइन गेम्सचा मोठाच प्रभाव असतो. इंटरनेटवर वेगवेगळ्या ठिकाणी अनेक मुलं (आणि प्रौढ व्यक्तीही) अनाठायी खर्च करताना दिसतात. अनेकदा ती ऑनलाइन आमिषांनाही बळी पडत असतात. सहजगत्या जास्तीचा पसा मिळवणं, लॉटरी जिंकणं किंवा इंटरनेटवरून वस्तू मिळवणं यांचं आमिष वापरकर्त्यांना दाखवलेलं असतं. सहसा हे इंटरनेटवरच्या कॅसिनोमध्ये किंवा कुठल्या तरी खेळांच्या निकालावर पज लावणं अशा स्वरूपातलं ‘बेटिंग’च असतं. यालाच ‘ऑनलाइन गॅम्बिलग’ असं म्हटलं जातं. कुठल्याही प्रकारची खात्री नसताना पसा किंवा अन्य गोष्टी अशा ठिकाणी पणाला लावल्या जातात. अनेकदा अशा ऑनलाइन जुगारामध्ये मुलं खोलवर गुंततात. या साइटवरच्या इतर प्रौढवयीन खेळाडूंसोबत त्यांची देवाणघेवाण सुरू होते. अनेकदा यामुळं त्यांचा जीवही धोक्यात येतो. आपल्या देशामध्ये ‘बेटिंग’ हा गुन्हा समजला जातो. त्यामुळं अर्थातच ऑनलाइन जुगार हादेखील सायबर गुन्ह्य़ांच्या कक्षेत येतो आणि तो दंडनीय अपराध आहे.

मुलं इंटरनेटचा वापर सहजी करत असली, तरी बहुतांश प्रौढ व्यक्ती मात्र अजूनही डिजिटल जगतात चाचपडतच आहेत. (अनेकांनी तर या जगतात अजून प्रवेशही केलेला नाही.) मात्र हल्लीच्या काळात इंटरनेटचं नाव प्रत्येकानं ऐकलेलं असतं. आपल्याला हवी असलेली प्रत्येकच गोष्ट इंटरनेटवर आता उपलब्ध झाल्यानं लोक इंटरनेटचा वापर अधिकाधिक प्रमाणात करू लागलेले आहेत खरे, पण त्यावर असं अवलंबून राहताना स्वत:च्या वैयक्तिक माहितीची सुरक्षितता कशी बाळगायची याबद्दल मात्र ते फारसं जाणून घेताना दिसत नाही. अर्थातच इंटरनेटवर ज्याला बेकायदा कृत्य करायचं आहे, तो गुन्हेगार तुमच्या उपकरणातल्या अशा सुरक्षिततेच्या सुविधा काढून टाकून किंवा त्या बंद करून मौल्यवान माहिती काढून घेऊ शकतो. आपलं दैनंदिन जीवन आता इंटरनेटवर अवलंबून असेल, तर आपण त्याचा सुरक्षितपणे वापर करणंही शिकून आपण घ्यायला हवं. खरंय ना?

फोटोशॉप, फोटो एडिटिंग, सेल्फी आणि सतत इंटरनेटवर स्वत:ची छायाचित्रं पोस्ट करण्याच्या या काळात या छायाचित्रांचं पुढं काय होऊ शकतं याबद्दलही मुलांमध्ये अनभिज्ञता आढळते. या छायाचित्रांचा गैरवापर कसा केला जाऊ शकतो, याचं एक उदाहरण पाहू या. आपण ९वी इयत्तेतल्या दोन मत्रिणींचंच उदाहरण पाहू. उदाहरणासाठी त्यांना आपण अंजू आणि मंजू असं म्हणू. या दोघींमधली अंजू ही जास्त आक्रमक स्वभावाची आहे आणि अनेकदा ती मंजूला आपली कामं करायला लावते. मंजू साधीभोळी आहे आणि ती मुकाटय़ानं अंजूच्या सूचना पाळत असते. मात्र एकदा अंजूनं सांगितलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत असं वाटल्यानं मंजूनं ते काम करायला नकार दिला. याचा अंजूला खूप राग आला. तिनं मंजूला धडा शिकवायचं ठरवलं. मग अंजूनं मंजूचं व्हॉट्सअपच्या डीपीला असणारं छायाचित्र डाऊनलोड केलं आणि त्या चेहऱ्याखाली एका नग्न मुलीचं चित्रं चिकटवलं. तिने तयार केलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर हे नवं छायाचित्र टाकून तिची बदनामी करायला सुरुवात केली. मंजूचं नग्न छायाचित्र पाहून व्हॉट्सअप ग्रुपवर एकच हलकल्लोळ उडाला. त्यानंतर लगेचच त्याखाली अनेक अश्लील टिप्पण्या, नवी छायाचित्रं, मिम्स आणि नंतर व्हिडीओसुद्धा पोस्ट होऊ लागले.

खरं तर मुळात अ‍ॅनिमेशन करत असताना अशा प्रकारे एका छायाचित्राचं दुसऱ्यात रूपांतर करण्याचं तंत्र वापरलं जातं. आधुनिक सॉफ्टवेअरच्या साहाय्यानं एका प्रतिमेचं दुसऱ्या प्रतिमेत बेमालूमपणे रूपांतर करता येतं. यालाच ‘मॉìफग’ असं म्हणतात. मात्र अंजू-मंजूच्या उदाहरणात पाहिल्याप्रमाणे एखाद्याची मुद्दाम बदनामी करायची असेल किंवा त्याला त्रास द्यायचा असेल, त्याचा छळ करायचा असेल किंवा त्याचा सगळीकडे अपमान होईल अशी परिस्थिती निर्माण करायची असेल तर असा गैरवापरही केला जाताना दिसतो. असं बदनामीकारक मॉìफग करणे हा सायबर गुन्हा समजला जातो. अशा गुन्ह्य़ाचे भयंकर परिणाम होतात व ते कायमस्वरूपीही राहू शकतात. दुर्दैवानं अशा प्रकारात बळी पडलेल्या व्यक्तीला आजूबाजूच्यांची सहानुभूती मिळत नाही. ऑनलाइन जगतात तर अशा प्रकारचे गुन्हे ‘हलकेफुलके’ समजले जातात, कारण मुलांना अशा गुन्ह्य़ांमुळे होणारा मानसिक परिणाम आणि त्यासंबंधीच्या कायदेशीर बाबी यांची मुळात जाणीवच नसते.

मुलांमध्ये इंटरनेटवरच्या सुरक्षिततेबाबत कोणतंच शिक्षण किंवा जागरूकता नसल्याने अनेकदा ती मुद्दाम किंवा नकळतपणे सायबर गुन्हे करतात. आपण कधीच पकडले जाणार नाही असाही त्यांना प्रचंड आत्मविश्वास असतो. आपलं स्वत:चं मूल सायबर गुन्हा करू शकतं याबद्दल पालकांच्या मनात अविश्वास असतो. पालक अशी गोष्ट ती क्वचितच मान्य करतात. (फार तर आपलं मूल सायबर गुन्ह्य़ाला बळी पडू शकेल, एवढंच त्यांना

मान्य असतं.) मुलांनी केलेल्या अशा गुन्ह्य़ांमुळे होणाऱ्या गंभीर परिणामांबद्दल त्यांना जागरूक करणं जरुरीचं आहे, जेणेकरून त्या कुटुंबात इंटरनेटचा वापर अधिक जबाबदारीने केला जाईल.

सायबर गुन्ह्य़ांत अडकलेल्या मुलांबद्दलच्या अशा आणखी बाबींबद्दल आणखी जाणून घेऊ या ८ फेब्रुवारीला याच लेखाच्या दुसऱ्या भागात!

इंटरनेट वापराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. फक्त मुंबई शहरातच इंटरनेटचे १.६४ कोटी वापरकत्रे आहेत. मात्र समाजमाध्यमं, अ‍ॅप्स, ऑनलाइन गेम्स आणि आर्थिक व्यवहार यातून सायबर गुन्ह्य़ांचं प्रमाण वाढू लागलेलं आहे. जगात सरासरी १० सेकंदांना एक सायबर गुन्हा घडत असतो. सायबरजगतातल्या गुन्ह्य़ांमध्ये लहान मुलं आणि स्त्रिया यांना सर्वाधिक धोका असतो, असं  अभ्यासांत दिसून आलं आहे. गेल्या दोन वर्षांत अल्पवयीन मुलांनी केलेले सायबर गुन्हे आणि ज्यांत मुलं भरडली गेलेली आहेत असे सायबर गुन्हे, या दोन्हींचं प्रमाणही तब्बल तिपटीनं वाढलेलं आहे. आपल्या मुलांना आणि स्वत:लाही या ऑनलाइन जगतात सुरक्षित ठेवण्यासाठी आपली तयारी झालेली आहे का? याचा विचार करणारं ‘महामोहजाल’ हे सदर दर पंधरवडय़ाने..

अनुवाद – सुश्रुत कुलकर्णी