30 October 2020

News Flash

आनंदाचा झरा

अनेकदा तरुणांसमोर जेव्हा मी माझ्या अनुभवांची शिदोरी उलगडत असतो तेव्हा झऱ्याचा उल्लेख आपसूकच येतो. रानातला झरा पाहा, मुक्तछंदात गात..

| June 20, 2015 12:01 pm

‘‘टेलिस्मेलने सुरू झालेला उद्योगाचा प्रवास नंतर गृहउद्योग, ‘डीएसके टोयोटा’, ‘डीएसके इंटरनॅशनल कॅम्पस’, ‘डीएसके मोबिलीज्’, ‘मिल्कोट्रॉनिक्स रोबो’, ‘डीएसके ड्रीम सिटी’ अशी अनेक वळणं घेत पुढे चालूच आहे.. आयुष्य आता पासष्टी ओलांडत आहे. आणखी पुढे किती वळणं आहेत..माहीत नाहीत..पण मीही त्याच झऱ्यासारखा आनंदात..शीळ घालत आजही पुढे निघालो आहे.’’

अनेकदा तरुणांसमोर जेव्हा मी माझ्या अनुभवांची शिदोरी उलगडत असतो तेव्हा झऱ्याचा उल्लेख आपसूकच येतो. रानातला झरा पाहा, मुक्तछंदात गात.. अनेक वळणं घेत वाहातच असतो. यातल्या कुठल्या वळणावर cr27काय असतं.. या झऱ्याला ते ठाऊक नसतं. एखाद्या वळणावर काटेकुटे आले तरी तो गुदगुल्या झाल्यासारखा हसत पुढे जातो. कुठे मध्ये भलामोठा दगड आला तर.. त्याला टकरा देण्यापेक्षा वळसा घालून झरा आपली पुढची वाट आनंदात पकडतो. आपलंही आयुष्य असंच वळणा-वळणाचं असतं.. असं मला कायमच वाटत आलंय.
माझ्या आयुष्याला वळण देणारी पहिली व्यक्ती म्हणजे माझी आई. माझ्या आईचे शालेय शिक्षण दुसरीपर्यंत झाले होते आणि ती एका बालवाडीत मदतनीसाचे काम करीत असे. एकदा कधीतरी कशावरून तरी तिचे तिथे बिनसले. त्यानंतर माझ्या आईने पुण्यातल्या सोमवार पेठेत स्वतची चौथीपर्यंतची शाळा सुरू केली आणि ती अनेक वष्रे यशस्वीपणे चालवूनही दाखवली. लहानपणापासून तिची ही धडाडी-जिद्द मी बघत आलो आहे. त्या वयात हे शब्द ठाऊक नव्हते. पण तिचे हे संस्कारच मला घडवत आले आहेत.
माझ्यातल्या उद्योजकाला पहिलं वळण लागलं ते मुठा नदीच्या काठावर असणाऱ्या कसबा पेठेमुळेच! टिळकांच्या भाषेतली ही तेल्या-तांबोळ्याची वस्ती. या पेठेमुळेच कष्टाचे वळण अगदी लहान वयात लागले. ज्याचा फायदा या वयातही मला होत आहे. मी कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकायचो. दुपारी शाळा सुटली की इतर मुलांसारखंच मलाही खेळावंसं वाटत असे, पण माझे सगळे सवंगडी कष्टकरी घरातले.             रतन परदेशीच्या वडिलांची अहिल्यादेवीसमोर चन्यामन्याची गाडी होती. भरत राठोडच्या घरात त्या काळी मिळणाऱ्या त्रिकोणी आकाराच्या कागदी पुडीत सुगंधी सुपारी भरायचे काम चालायचे. आमच्या बबन गोळेचा टांगा होता. गणेश नावाचा मित्र ‘अमृततुल्य’मध्ये काम करायचा तर अरुण कुलकर्णीची दुधाची व पेपरची लाइन होती. या मित्रांना दुपारी खेळासाठी बोलवायचे म्हणजे आधी त्यांचे काम संपणे गरजेचे असायचे. मग मी त्यांना कामात मदत करत असे. मला आजही आठवतंय, मी घोडय़ाला खरारा केलाय, गणेशबरोबर हॉटेलात कपबशा विसळल्या, वातीचा स्टोव्ह, पातेली स्वच्छ केली. भरतच्या घरात सुगंधी सुपारीच्या पुडय़ा भरल्या. या कामांची मलाही जशी लाज वाटली नाही तशीच माझ्या घरच्यांनीही मला कधी अडवले नाही. आमचं घर मध्यमवर्गीयाचं होतं, पण श्रमाला महत्त्व देणारी मनाची श्रीमंती माझ्या आईवडिलांमध्ये होती. ही कामे मी करायचो ते केवळ मित्रांनी माझ्यासोबत खेळायला यावं म्हणून. पण मी काम करतोय हे पाहून मित्रांचे वडीलदेखील, कुणी चार-आठ आणे तर कुणी १-२ रुपये मला देत. त्यामुळेच वयाच्या आठव्या-नवव्या वर्षीच माझी ‘खरी कमाई’ सुरू झाली असे म्हणता येईल.
रतन परदेशीच्या चन्यामन्याच्या गाडीनं तर मला त्या वयात मार्केटिंगचं कौशल्य शिकवलं असंच मी म्हणेन. अहिल्यादेवी शाळेसमोर रतनची एक आणि दुसऱ्याची एक अशा दोन चन्यामन्याच्या गाडय़ा उभ्या असायच्या. दुसऱ्या गाडीवरचा चन्यामन्यावाला म्हणजे कळकट पायजमा, शर्टाच्या दुमडलेल्या आणि घामाचे डाग पडलेल्या बाह्य़ा, वाढलेले दाढीचे खुंट आणि कानात अर्धवट विझवलेली बिडी अशा अवतारात उभा असायचा. याउलट मी. आईने तेल लावून नीट भांग पाडायची लावलेली सवय (जी आजही आहे), इस्त्रीचे नसले तरी स्वच्छ धुतलेले कपडे, पायात स्लीपर असा व्यवस्थितपणे चन्यामन्या विकायला उभा असायचो. चन्यामन्याला छान गोडेतेलाचा हात लावून पाणी मारायचो. त्यामुळे ते चमकायचे. मधोमध गुलाबाचं फूलही ठेवायचो आणि मग मधली सुट्टी व्हायची, तेव्हा माझ्याच गाडीवरचे चन्यामन्या सर्वात जास्त विकले जायचे. प्रेझेंटेशनचा हा धडा त्या काळी मी शिकलो तो आजही उपयोगी पडत आहे. अशा रीतीने काम करून तेव्हा वर्षांला २५-३० रुपये कमवीत असे. आम्हा चारही भावंडांना वडिलांनी दिवाळीत आणलेले ५ रुपयांचे फटाके पुरत असत असा तो काळ.
अरुणच्या मदतीनं मीही मग सकाळी वर्तमानपत्रे टाकायला सुरुवात केली. पहाटे साडेपाच वाजता जावं लागायचं. एकदा मला चांगलाच उशीर झाला. पोहचल्यावर पेपर एजन्सीच्या मालकानं रागावून माझ्या थोबाडीत मारली. त्याच दिवशी मी ठरवलं, ‘बस्स्! यापुढे नोकरी करायची नाही.’ नंतर मला वेळेच्या शिस्तीचंही चांगलंच भान आलं. पण या घटनेनं आयुष्याला खऱ्या अर्थाने वळण दिलं. ही माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची नोकरी ठरली. काही दिवसातच माझी स्वतची वर्तमानपत्राची लाइन मी सुरू केली होती. नंतर पुढे भाजी, पुस्तके, लॉटरीची तिकिटे, अत्तरे, फटाके अशा वेगळ्यावेगळ्या गोष्टी विकतच माझं बालपण वळणं घेत गेलं.
पुढे दहावीत मी ५६ टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झालो. आईची इच्छा होती की मी डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हावं. डॉक्टर होणं शक्यच नव्हतं. तिच्या आग्रहाखातर आणि तिच्या जिद्दीमुळेच..मला वाडिया कॉलेजात प्री-डिग्री सायन्सला प्रवेश मिळाला. मला इंग्रजीचा गंध नसल्यामुळे आणि उनाडक्या केल्यामुळे पहिल्याच वर्षी मराठी सोडून सर्व विषयांत २-३ मार्क मिळाले. मराठीतही सावरकरांवर निबंध लिहिल्याने आमच्या सावरकरप्रेमी सोमणसरांनी मला चक्क ८० गुण दिले होते. पण एकूणातच माझ्या ‘इंजिनीअर’ होण्यावर लाल फुली पडली होती. मी आईला सांगितलं की, तू मला कॉमर्सला घाल आणि एमईएस म्हणजे गरवारे कॉलेजमध्ये मी दाखल झालो. या वळणावर आयुष्याचा खरा प्रवास सुरू झाला. प्री ्रएफ.वाय.मध्ये असताना मी कॉलेजलाइफ छान अनुभवत होतो. याच काळात एक मुलगी माझ्या आयुष्यात आली, जिच्याशी मी आळंदीला जाऊन गुपचूप लग्नही केलं. त्यावेळी एप्रिल-मेच्या सुट्टीत कॉलेजतर्फे मुलांना अनुभवासाठी कंपन्यांमध्ये पाठवलं जायचं. मीही ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन’मध्ये काम करण्यासाठी गेलो. तिथे मी त्यांचा त्या काळातला टेलिफोन एक्स्चेंज पाहिला. तो मोठा ईपीबीएक्सचा बोर्ड. फोन आला की ऑपरेटर्स बोर्डावरील वायरींची अदलाबदल करत. या ऑपरेटर्सच्या कानावर विमानातल्या पायलटसारखा हेडफोन असायचा. ते पाहून मलाही खूप आकर्षण वाटायचं. कुठलीही नवीन गोष्ट शिकणं हा माझा स्वभावच होता. तिथल्या सोनपाटकीसाहेबांना मी विचारलं आणि दुपारच्या वेळेत ‘शिक’ म्हणून त्यांनी सांगितलं. मी तिथे बसलो. हेडफोन कानाला लावला आणि तो माईक तोंडासमोर आला तसा मी तो हाताने लांब भिरकावला. कारण त्यात ठेवलेल्या डेटॉलच्या बोळ्याचा उग्र वास मला सहन झाला नाही. तेव्हाही ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन’ ही मोठी कंपनी होती. तिथे दर अध्र्या तासाला ऑपरेटर बदलत असत. तेव्हा तो फोन र्निजतुक करण्यासाठी त्या माईकमध्ये डेटॉलचा बोळा ठेवत असत.
त्याच वेळी माझ्या मनात कल्पना आली की, याऐवजी सुगंधी अत्तर का असू नये? आणि या एका कल्पनेतून ‘टेलिस्मेल’ हा माझा खऱ्या अर्थाने पहिला मोठा व्यवसाय सुरू झाला. फोन स्वच्छ करून सुगंधित ठेवण्याचे तंत्र माझ्या बायकोनेच शोधून काढलं. त्यासाठी स्वतच्या कानातले डूल आणि ट्रान्झिस्टर विकून तिने मला ७० रुपये भांडवल दिलं. या भांडवलातूनच सुरू झालेल्या या व्यवसायाने पुढे ‘डीएसके’ उद्योगसमूहाचा पाया रचला.
या व्यवसायाला सुरुवात केल्यावर किर्लोस्कर ऑईल इंजिनमधले, महाराष्ट्र बँकेतले अनेक ग्राहक मला मिळाले. सकाळी ७ ते संध्याकाळी ७ अशा १२ तासात.. पुण्यापासून चिंचवडपर्यंत मी दिवसभर सायकलवर फिरून सुमारे १५० फोन पुसायचो. सकाळी ऑफिसेस्, गर्दी नसलेल्या वेळेत दुकानात आणि दुपारी घराघरात मी जायचो. ही वेळेची शिस्त मला वर्तमानपत्रातल्या त्या अनुभवानं शिकवली.  रोजचे १५० फोन पुसून माझा रोजचा टर्नओव्हर सरासरी ८० रुपये व्हायचा. महिन्याकाठी २४०० रुपये हातात पडायचे. त्यातला माझा निव्वळ नफा १५०० रुपये होता. आताच्या तरुणांना या नफ्याचे गणित मुद्दाम समजावून सांगायला हवे. १९७० सालातली ही गोष्ट आहे. तेव्हा मी कॉमर्सच्या दुसऱ्या वर्षांला होतो. कॉमर्सची पदवी मिळवून बँकेत कारकून म्हणून लागलो असतो तर तेव्हा मला महिन्याला २१० रुपये एवढाच पगार मिळाला असता. साहेबांचा पगार साडेचारशे..अगदी जास्तीत जास्त ८०० रुपये. अशा काळात कुठलीही पदवी नसताना..कॉलेज करून मी १५००-१६०० कमावीत होतो. तेही केवळ कष्टाच्या भांडवलावर! हे करत असताना कॉलेजमध्ये मात्र तासाला बसू शकत नव्हतो. घरी हा उद्योग आणि मी केलेला लग्नाचा उद्योग..दोन्ही माहीत नव्हतं. आईने एक्सटर्नल बसू दिलं नसतं. करावं तरी काय? मग शेवटी ‘नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स’चे प्रिन्सिपल व्ही. के. नूलकरसरांना जाऊन भेटलो. सगळी सत्य परिस्थिती त्यांना सांगून म्हटलं, ‘सर, तुमच्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन द्या. पण मी एकाही तासाला बसणार नाही.’ नूलकर सरही म्हणाले, ‘एका अटीवर. फोन पुसण्याचं काम संध्याकाळी ७ ला संपलं की रात्री आठला माझ्या घरी अभ्यासाला यायचं’..असे गुरू मला त्या काळात लाभले, ज्यांच्यामुळे आयुष्याला योग्य ते वळण देता आलं.
या सरांनी मला व्यवसायाचेही धडे द्यायला सुरुवात केली. एकदा मला ५०० रुपयांचे भांडवल हवे होते. तेव्हा नूलकरसर स्वत मला घेऊन ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या नवी पेठ शाखेत घेऊन गेले. तिथे त्यांनी मला आयुष्यातलं पहिलं ५०० रुपयांचं भांडवल मिळवून दिलं. तेव्हा सरांनी मला बजावलं, ‘डी.एस. या बँकेचे हे ५०० रुपये व्याजासकट वेळेवर परत दे. कॉलेजच्या आणि माझ्या नावाची अब्रू राख. तू हे पसे वेळेत परत कर आणि बँकेचा विश्वास संपादन कर. मग बघ, हीच बँक तुला पाच लाखाचंही कर्ज देईल.’ सरांचे ते शब्द अक्षरश खरे ठरले! मी बँकेचा विश्वास मिळवू शकलो. आजही मी मागेल तेवढे पसे द्यायला भारतातल्याच नव्हे, तर परदेशातल्या बँकाही हव्या त्या वेळी तयार आहेत. या विश्वासाच्या खात्यानंही माझ्या आयुष्यातल्या अनेक वळणांवर मला मोलाची मदत केलेली आहे आणि करत आहे.
‘टेलिस्मेल’चा हा व्यवसाय पुण्यासोबतच मुंबई शहरातही जोरात सुरू झाला. ‘बँक ऑफ इंडिया’ सोडून सर्व बँका माझ्या ग्राहक होत्या, टेल्को सोडून जवळपास सर्व फॅक्टऱ्यांमधले फोन मी पुसायचो. आता कामाला मुलं ठेवली होती. व्याप वाढत चालला होता. घरगुती फोन पुसता पुसता मी घरातल्या इतर कामांनाही सुरुवात केली होती. कुणाचा नळ बिघडलाय. बदलून दे. कुणाची दारं-खिडक्या दुरुस्त करून दे, फरशी बदल, रंगकाम कर, फíनचर कर..असा घराचा कानाकोपरा बदलत गेलो आणि एक मनात आलं की, आता घराची एवढी कामं आपण करत आहोत तर मग ‘आपणच घर का बांधू नये?’
याच विचारानं आयुष्याला एक नवं वळण मिळालं आणि ‘घराला घरपण देणारी माणसं’ हे ब्रीदवाक्य घेऊन १९८०च्या दशकात मी गृहनिर्मिती सुरू केली. एकीकडे घरं बांधत असतानाच इतर दुसरे व्यवसायही खुणावत होते. मला पुण्यात अमेरिकन वडापाव म्हणजेच मॅक्डोनाल्ड्स सुरू करायचे होते. त्यासाठी कंपनीच्या लोकांना भेटण्यासाठी मी बेंगळुरूला गेलो. तिथं त्यांनी ‘टेरेटरी’ची समस्या सांगत मला दक्षिण भारतासाठी परवानगी देऊ केली. पण मला काही ते पटलं नाही. तिथे माझा बेंगळुरूमधला एक मित्रही होता. त्याने मला ‘टोयोटा’च्या डीलरशिपसाठी सुचवलं. मी त्याही लोकांना भेटलो आणि पुण्याला येताना ‘डीएसके टोयोटा’ ही नवी कंपनी घेऊनच परतलो. आता या वळणावर खऱ्या अर्थाने माझा प्रवास सुरू झाला होता.
काही काळातच महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्य़ांमध्ये ‘डीएसके टोयोटा’ची आंतरराष्ट्रीय दर्जाची शोरूम्स व सíव्हस स्टेशन्स सुरू झाली. या कंपनीनं पहिल्या दिवसापासून उदंड यश मिळवलं ते आजतागायत वाढतच आहे.
माझं सगळं आयुष्य कष्टातच गेलं असल्यामुळे व्यवसाय करत असताना सामाजिक जाणदेखील मनात असते. कॉमर्सची पदवी मिळूनही तरुण किती कमावू शकतो..याची मला कल्पना होती आणि लॉर्ड मॅकेन्ले नावाच्या इंग्रजाने आपल्यावर लादलेल्या शिक्षण पद्धतीचा तिटकाराही मनात होता. नोकरशाही घडविणारी ही शिक्षण पद्धती आपल्याला बदलता येईल का? हा विचार मनात सतत सुरू होता. यातूनच फ्रान्समधला अ‍ॅनिमेशन, गेिमग व डिझायिनगचा अभ्यासक्रम मी घेऊन आलो आणि पुण्यात ‘डीएसके इंटरनॅशनल कॅम्पस’ सुरू केलं. हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी तिकडची गोरी मंडळी पुण्यात आणली. इथं पुस्तकी अभ्यास नाही तर तरुणांच्या कल्पकशक्तीला, सृजनशीलतेला वाव दिला जातो. इथं शिकलेला तरुण नोकरीच्या मागे धावत नाही तर जग त्याच्या पाठीमागे येतं. परदेशी मुलंही इथं शिकायला येतात..असं हे जगाला गवसणी घालणारं मोठ्ठं वळण ठरलं.
‘लहान मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करता येईल का?’ आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना पडलेला हा प्रश्न. जो सोडविण्यासाठी मी व माझ्या पत्नीने पुढाकार घेतला.  डॉ. माशेलकरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सौर ऊर्जेवर चालणारं ‘डीएसके मोबिलीज्’ हे जगातलं पहिलं डिव्हाईस संशोधन करून विकसित केलं. वजनाला हलकं, वापरायला सोपं आणि चक्क ३६ भाषेत बोलणारं हे डिव्हाईस आज बहुउपयोगी ठरलं आहे. मुलं, शेतकरी, बचत गटाच्या बायका, गावातले तरुण यांना त्याचा फायदा होतच आहे. पण या मोबिलीजने आज खेडोपाडी (अगदी चंबळच्या खोऱ्यातही) जाऊन गोरगरिबांची बँक खाती उघडून अक्षरश क्रांती घडविली आहे. पंतप्रधानांच्या ‘जन-धन’ योजनेचं काम गेल्या ४-५ वर्षांपासून या डिव्हाईसवर सुरू आहे.
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा देखील माझ्यासाठी चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. या शेतकऱ्यांसाठी मी काय करू शकतो? या प्रश्नातून मी ‘मिल्कोट्रॉनिक्स’ नावाचा ‘रोबो’ तयार केला. शेतकऱ्यांकडे दूधदुभत्याची जनावरं असतातच. पण दूध डेअरीतदेखील त्याची फसवणूक केली जाते. तिथे आता हा रोबो वरदान ठरला आहे. हा रोबो गावोगावी, घरोघरी जातो. दूध तपासून त्यात पाणी किती, युरिया किती अशी त्याची प्रतवारी करून दुधाची किंमतही सांगतो. आणि शेतकऱ्यांची जर आधीची काही देणी असतील तर ती रक्कम कापून उरलेली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लगेच जमा करतो आणि शेतकऱ्यांच्या हातात लगेच पसे पडत आहेत.
ग्रामीण भागासोबतच शहरी माणसाचं आयुष्यही फार सुखावह नाही..याचीही मला जाणीव झाली. आज या माणसांकडे पसा आहे, पण सुख नाही. प्रदूषण, चिंता, एकटेपण, तणाव अशा अनेक गोष्टींनी त्याला घेरलं आहे. शहरातील मुलं मदानात खेळण्याऐवजी कॉम्प्युटर आणि मोबाइल घेऊन बसली आहेत. यांना आनंदात कसं जगता येईल यावर विचार करत असताना मला माझं बालपण आणि बालपणीचं सुंदर पुणं आठवलं. जिथं नदी होती, झाडे होती, पक्ष्यांची किलबिल होती आणि माणसांमध्ये संवाद घडत होता. आणि तेव्हाच ठरवलं, जगात कुठेही नसेल असं एक सुंदर शहर आपण पुण्यात साकारायचं. जिथं प्रत्येकाला त्याला हवं तसं आयुष्य आनंदात जगता येईल. याच सुंदर स्वप्नातून मी पुण्यात ‘डीएसके ड्रीम सिटी’ साकारत आहे.
असा हा माझा वळणदार प्रवास निरंतर सुरू आहे. या प्रत्येक वळणावर समाजाबद्दलची बांधीलकी मला जाणवते आणि ती मी जपतदेखील आहे. ‘देणे समाजाचे, देतो आनंदाने’ असे म्हणत समाजासाठी जे जे करणं शक्य आहे ते सारं मी करत आहे. अशी अनेक वळणं घेत आयुष्य आता पासष्टी ओलांडत आहे. आणखी पुढे
किती वळणं आहेत..माहीत नाहीत..पण मीही त्याच झऱ्यासारखा आनंदात..शीळ घालत आजही पुढे निघालो आहे.
 डी. एस. कुलकर्णी – dsk@dskdl.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2015 12:01 pm

Web Title: d s kulkarni unveils his success
Next Stories
1 स्वीकार स्त्रीच्या रात्रपाळीचा !
2 रात्रपाळी आव्हान की अपरिहार्यता ?
3 कायदा स्त्री कामगारांसाठीचा
Just Now!
X