आईची ती डायरी. आता खिळखिळी झालेली. पण इतक्या वर्षांतली ती एकच एक डायरी! आयुष्याचा पट उलगडणारी! आईचा सहवास देणारी..
आई म्हणाली, ‘मला ही डायरी तुला द्यायची आहे.’
मला माहिती होतं कोणती डायरी ते! निळ्या रंगाची. १९७८ सालची, बाजूला पेन ठेवण्यासाठी जागा. वरती छान चित्र, सोनेरी. एक मुलगा पृथ्वीवर उभं राहून हातात मशाल घेऊन आकाशातल्या चांदणीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणारा.
कोणा मणी नावाच्या गृहस्थाने बाबांना ती दिलेली. लग्नाच्या आधीपासूनच ही डायरी बघत आले आहे. त्यात नक्की काय असेल याचं कुतूहल नेहमीच होतं पण आज त्याचे अर्थ कळायला लागलेत. खिळखिळी झाली तरी ती लोभस वाटत होती. तिच्यात लिहिलेल्या विविध माहितीमुळे आईचं व्यक्तिमत्त्व अधिकच स्पष्ट होत गेलं. २५ वर्षे झाली, माझे लग्न होऊन. आईचा सहवास हळूहळू कमी होऊ लागला. सुट्टी पडली की, दहा-बारा दिवस तिच्या सोबत राहायला मिळायचे तेवढंच, आज ही डायरी वाचताना मी अस्वस्थ होऊ लागले. या वयात आपण तिच्याजवळ राहायलाच हवे. समाजनियम म्हणे मुलाकडे राहायचं. खरं तर तिच्या उतरत्या काळात तिला जपलं पाहिजे, पण तसं होत नाही. ही बोच आहेच.
डायरीचं पहिलं पान- डायरीवर माझं लग्नापूर्वीचं नाव तिने लिहून ठेवलं होतं. त्यावरच डोळ्यातले दोन थेंब टचकन पडले. त्या खाली तिने लिहिलं होतं, विषगर्भ तेल- सूज उतरण्यासाठी वापरावं.
फेब्रुवारीच्या १६ तारखेवर ‘टेकचंद’ असा शब्द लिहिलेला दिसला. तिनेच शिकवला हा शब्द. ‘अगं काय सापडत नाही, भिंतीवर तीन वेळा टिचकी मार आणि टेकचंद, टेकचंद, टेकचंद असं म्हण, पण अगदी मनापासून म्हण म्हणजे झालं, असं म्हणल्याने वस्तू मिळालीच पाहिजे.’
मध्यंतरी तिने ‘चैत्रांगण’चे स्टीकर तयार करू असा धोशा लावला. हजार स्टीकर केलेही, पण त्या मूळ आकृत्या, प्रतीके या डायरीत मला दिसल्या. तिने तो गरुड, ती पालखी बॉलपेनने किती रेखीव काढली होती. आईचं हे वेगळंच कौशल्य आज जाणवत होतं.
आता मधली पानं संपूर्ण रिकामी आहेत. जूनच्या २६ तारखेला तिने ‘नाचणी माल्ट’ असं लिहून त्याची कृतीही टिप्स लिहिलेली दिसली. नाचणी, मूग, हरभरा, गहू, सोयाबीन सर्व समप्रमाणात घेऊन ती भिजवून मोड आणून वाळवून दळून घ्यावेत. त्यात १०० ग्रॅम शतावरी मिसळावी. हवे तेव्हा दुधाबरोबर घ्यावे. अगदी त्रोटक लिहिलं असलं तरी मला हवी ती माहिती मिळाली,
आपलं व्यक्तिमत्त्व जसं असतं तसं आपल्या दैनंदिनीत म्हणा किंवा जमवलेल्या माहितीतून  कळत जातं. हळूहळू मल ते कळत होतं.
डायरीच्या पुढच्याच पानावर तिने ‘घोरण्यावर उपाय’ असं लिहिलं होतं. आमचे बाबा खूप घोरायचे, सध्या कमी झालंय. तिने लिहिलं होतं, घशात, श्वासनलिकेत ओलावा राहण्यासाठी सकाळीच गुळण्या कराव्यात, पण कोमट पाण्यात ३ ते ४ थेंब गोडेतेल घालण्यास विसरू नये.’ डायरी वाचत होते. म्हटलं, असा उपाय आता कोण करणार आहे का?
चार जुलैच्या पानावर तिची आवडती रेसिपी, च्यवनप्राशची. माझं लग्न झाल्यावर आलेल्या रिकामपणामुळे तिने हा उद्योग सुरू केला. तेव्हा ती डोंबिवलीत होती. बाबाही पोस्टातून निवृत्त झाले होते. त्या दोघांनी मिळून १०० किलो च्यवनप्राश घरी तयार केला होता. डायरीतल्या या पानाचे तिचे उपयोजन वाखाणण्यासारखे होते.
आज मी सुरळीच्या वडय़ा करण्यात वाक्बगार आहे, पण त्याचे गुपित मला डायरीत सापडले. फोनवरून तिने त्यात मैदा घालायचा असतो हे सांगितले होते, ‘पण अगं, मी आता गॅस न वापरता मायक्रोवेव्हवरच पीठ तयार करते. कधी कधी पालकाचा रसही घालते बरं का! मुख्य म्हणजे ताटांवर थापत नाही, चक्क ओटय़ावरच थापते..’
..डायरी वाचताना मनात येणारे हे विचार तिच्यापर्यंत पोहोचवावेत असं वाटायचं. पटकन फोन करून खूप बोलावं, पण नकोच त्यापेक्षा डायरीतलं पुढचं पान वाचावं..
जुलैच्या १२, १३ तारखेपासून गमतीदार पदार्थ ते टिकवावेत कसे याची माहिती आलेली होती. मी नववीत होते तेव्हा आमच्या मागे असलेल्या रोटरी क्लबच्या हॉलमध्ये खाद्यपदार्थाचे वर्ग घेतले होते. चर्चगेटच्या फूड आणि न्यूट्रिशियन बोर्डाकडून दोघीजणी आल्या होत्या. उन्हाळ्याचे दिवस. दोन शेपटय़ा नाचवत, ब्लॉक्स प्लेटींचा फ्रॉक मिरवीत मी सारखी फेऱ्या मारीत होते. हे राहिलंय आण ना गं,’ मग घरी जा. लागतील ती भांडी आणा. ते दोन दिवस खूप मजा केली. फळांचे जॅम, ब्रेड रोल, लिंबांचे सरबत, टोमॅटो कॅचप, पालक कटलेट, पेरूची टॉफीएवढे पदार्थ खाल्ले. तिने या पदार्थाच्या कृती लिहिल्या, पण ‘पेकटीन’बद्दलची सविस्तर माहिती मला वाचायला मिळाली. ‘अगं पण आता एक क्लिक केलं की संपूर्ण रेसिपीसमोर हजर होते.’.. सांगायला हवं.
ऑगस्टच्या पानावर माझ्या हस्ताक्षरात नमक पारे, राजस्थानी डाकोर, मठिया या सर्वाच्या कृती मला दिसल्या. त्या वेळचं माझं अक्षर इतकं घाणेरडं होतं ना, पण आज मला आश्चर्य वाटतं, आपलं अक्षर आपोआप वळणदार कसं झालं?..
डायरीतील टोमॅटो लोणच्याची कृती वाचून डोळे चमकलेच. खजूर, आले, दालचिनी, काजू घालून लोणचे करता येते. आता मात्र हा पदार्थ करायला हवा. आणखी एक, ‘‘मी तुझ्यासारखे उपवास करीत नाही, पण या पानावर तू लिहिलेली उपवासाचे मोदक मला खूप आवडले. साबुदाणा आणि वरईच्या पिठापासून मोदक होतात हे मला आत्ता कळलं.’’
डायरीतील सप्टेंबर महिना सुरू झाला. पहिल्याच तारखेला ‘लक्ष्मी ग अंबिका लक्ष्मीबाई ग चंडिका’ असं स्तोत्र वाचायला मिळालं. मी मनात चाल लावून पाहिली. तिच्या आईने तिला शिकवलं होतं. माझा हट्ट म्हणून तू एकदा भोंडल्याच्या दिवशी म्हणून दाखवलं होतंस मला.
‘तुझा नातू काय म्हणाला तुला? आठवतंय? ‘आजी तू माझी दृष्ट काढतेस ना, तशी मला या टी. व्ही.ची काढायची आहे.’ आम्ही नुकताच मोठ्ठा टी. व्ही. घेतला होता. येणारे-जाणारे ‘एवढा मोठ्ठा!’ म्हणायचे. तुझ्या नातवाला दृष्ट काढताना काय म्हणायचे ते हवे होते. खरंच डायरीत तेही पान निघालं. ‘दृष्ट मिष्ट आल्या गेल्याची, भुता-खेचाची, काळ्या माणसाची, गोऱ्या माणसाची..’
सप्टेंबरच्या १२ तारखेवर बाबांच्या अक्षरातील ‘सर्प भय निवारक मंत्र’ आढळला. म्हणजे बाबांचं वय आज ८२ वर्षे. आज जसं अक्षर आहे तसंच अक्षर तेव्हाही. आजही बाबांचा हात थरथरत नाही. अक्षरातील सुटसुटीतपणा, गोलाई सारखीच. त्यांच्याशी फोनवरून बोलायला दोन विषय या डायरीमुळे मला मिळाले. एक तो मंत्र, दुसरं अक्षर.
सप्टेंबर १६ – जीवनात यशस्वी होण्यासाठी १२ स-सा लिहून ठेवले होते. उशिरा का होईना आज हाती आले. सहजीवन, समाधान, सातत्य, साधना, साहस- किती छान!
एका श्रावणात मीच तिला नऊ नागांची रांगोळी काढून दिली होती. आज त्याचे दर्शन झाले. ‘अरे, या घरातही काढली पाहिजे..’
डायरीच्या शेवटच्या पानाकडे लक्ष गेलं. कधी लिहिलं ठाऊक नाही. कोणत्या पुस्तकातला उतारा की, कोणाचे भाषण? आमच्या घरातील बहुजनवादी समाजाचे वातावरण तिच्यामुळेच वाढले होते. कोणताच भेद आमच्याकडे नव्हता. तिचं मन विशाल आहे, तेवढंच देवभोळं. तिच्या समाजसेवेचा पट मला उलगडत गेला. ज्ञातीचं काम करता करता ती एका वरच्या टप्प्यावर जाऊन पोहोचली आणि आमच्यासमोर वेगळा आदर्श उभा केला.
डायरीत तिच्याच अक्षरात लिहिलं होतं- अशा संघटना जातीय आहेत, या टीकेत मुळीच तथ्य नाही. उलट राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने त्या आवश्यकच आहेत. अशा संघटनांनी आपल्या सदस्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्याबरोबरच त्यांच्यातील कूपमंडूक वृत्ती नष्ट होईल ते पाहिले पाहिजे. विशाल दृष्टिकोन बाणवायला हवा.’
आज ती ऐंशीच्या घरात आहे. फक्त माणूस व्हा, मानवतावादी राहा, हे तोंडाने तिने न सांगता आमच्यासमोर कृती केली.
डायरीने काय दिलं मला आज? आत्मचिंतनाला सुरुवात करून दिली. आपण जी वाट चालतोय त्यामागे असा आशीर्वाद आहेच, याची खात्री पटवून दिली.
डायरी खिळखिळी झाली म्हणून काय झालं- तिचा सहवास तर मिळतो आहे. आईला प्रत्यक्ष भेटता येत नाही, पण तिने दिलेल्या डायरीतून रोज भेटते तर आहे.