ज्यांनी आतापर्यंत हातात फक्त विळा आणि कोयता धरला होता त्यांनीच तिसऱ्या डोळ्याच्या अर्थात कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्या समाजाचं चित्रीकरण करायला सुरुवात केली आणि ते देशातच नव्हे तर परदेशापर्यंतही पोहोचवलं. आतापर्यंत ७५ फिल्म तयार करणाऱ्या या तरुणींविषयी..
‘माझ्या गावातील प्रश्न गावाबाहेरच्या लोकांनाही समजावेत अशी माझी इच्छा आहे,’ इप्पापल्ली मल्लमा पोटतिडकीने सांगत होती. ‘सरकारचे मोठे-मोठे साहेब आमच्या गावात येतात. ते जे काही बोलतात ते रेकॉर्ड करून ठेवायला आम्हाला आवडेल. त्यांच्या म्हणण्याची नीट नोंद आमच्याकडे राहावी म्हणून..’ मंजुळा आपले मत सांगत होती. दहा-बारा स्त्रिया एका छोटय़ा खोलीत गोलाकार बसल्या होत्या आणि आपले म्हणणे मांडत होत्या. सगळ्या तरुण २५-३० वयोगटातील आणि दलित समाजातील. त्या बसल्या होत्या त्या गोलाच्या जरा पलीकडे एक नवीन, वेगळीच वस्तू ठेवलेली होती. विळा-कोयता रोजच शेतात हाताळणाऱ्या या स्त्रियांनी आजवर न बघितलेली. पण तिच्या विषयी प्रत्येकीच्या मनात अमाप कुतूहल मात्र होतं. कारण त्यांच्या गावात, शेतात, मुलांच्या बालवाडीत जे काही घडतं ते सारं तस्संच्या तस्सं टिपण्याची किमया ही वस्तू करू शकत होती म्हणे! आणि ते बघण्यासाठी, शिकण्यासाठी तर त्या सगळ्या एकत्र जमल्या होत्या. पुनय्यम्मा, नागवार कविता, शकुंतला, मील्लम्मा, लक्ष्मम्मा, मंजुळा, संगम्मा, लक्ष्मी, नागम्मा आणि चिन्ना नरसम्मा.
ही अनोखी आणि काहीशी चित्तथरारक म्हणता येईल अशी कहाणी आहे. आंध्र प्रदेशातील मेडक जिल्ह्य़ातील वास्तापूर नावाच्या दुर्गम गावातील दलित स्त्रियांची. सगळ्या जणी शेतमजूर. विपन्नतेचे चटके रोजच सोसणाऱ्या. शिक्षण नावाच्या व्यवस्थेचा चेहेरा दुरूनसुद्धा बघू न शकलेल्या. पण ज्या एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्या शेतीमधील नवे प्रयोग, लागवडीच्या पद्धती, रोजगाराच्या संधीचा शोध घ्यायला शिकत होत्या, त्याच संस्थेने त्यांच्यापुढे एक नवी संधी ठेवली आणि जगण्याचा रोजचा संघर्ष अधिक सुकर करण्यासाठी धडपडत असलेल्या या स्त्रियांनी त्या संधीचे कसे लखलखीत सोने केले त्याचीच ही गोष्ट.
या स्त्रिया ज्या जाहिराबाद भागात राहतात तेथील जमीन आणि त्यातील माती स्वभावाने अतिशय कठोर. शेतकऱ्यांनी कितीही मायेने सिंचन केले, निगुतीने तणाची साफसफाई केली आणि वेळोवेळी पिकांना पोषक खतपाणी दिले, तरी जेवढय़ास तेवढं फळ देणारी. ते लक्षात घेऊन सुमारे दोन दशकांपूर्वी डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी (डीडीएस) या संस्थेने मेडक जिल्ह्य़ात स्वयंस्फूर्तीने विकासाच्या छोटय़ा छोटय़ा गोष्टी मांडायला सुरुवात केली. या प्रयत्नांना पहिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तो अर्थातच गावातील स्त्रियांचा. या छोटय़ा गोष्टींमुळे बदलणाऱ्या परिस्थितीची पहिली झुळूक ही त्यांच्या आयुष्याला थोडा सुकून देणार होती. त्यामुळे या प्रक्रियेत त्यांचा सहभाग अधिक होता. या विकासाच्या योजनेतील कळीचा मुद्दा होता तो स्वायत्ततेचा. गावातील नैसर्गिक संसाधने, धान्याचे उत्पादन, त्यासाठी लागणाऱ्या बियाण्यांची निर्मिती, धान्य विक्रीसाठी उपलब्ध बाजारपेठ. या प्रत्येक गोष्टीवर स्थानिक जनतेचे नियंत्रण किती गरजेचे आहे याचे धडे या संस्थेच्या मदतीने गावातील स्त्रियांना मिळत होते. शेतीतील तंत्रज्ञान, पाणीवापर, जमिनीची मशागत, बियाण्यांचा पुढील हंगामासाठी सांभाळ अशा विविध बाबींमध्ये स्थानिक ज्ञान, माहिती व कौशल्य हे टिकून राहावे व त्याच बळावर लोकांना आपले जीवनमान सुधारता यावे यासाठी विविध प्रयोग मेडक जिल्ह्य़ातील छोटय़ा गावांमधून सुरू झाले आणि बघता-बघता पाच हजार दलित स्त्रिया या प्रयत्नात दाखल झाल्या. वेगवेगळ्या पातळ्यांवर.
पण या सगळ्या प्रवासात अनेक स्त्रियांना खंत होती ती त्यांना लिहिता-वाचता येत नाही याची! त्यांचे प्रश्न जगापुढे मांडण्यासाठी, त्यांच्या छोटय़ा-छोटय़ा प्रयत्नांतील यशाचा आनंद इतरांना सांगण्यासाठी, बाहेरच्या जगातील नवे प्रवाह जाणून घेण्यासाठी त्यांना एका अशा भाषेची ओळख हवी होती, जी त्यांना आणि जगाला दोघांना समजू शकेल. अशावेळी त्यांच्यासमोर आली ती व्हिडीओ प्रशिक्षणाची संधी. समोरची बंद खिडकी उघडून प्रकाशाचा एक सुंदर झोत जणू आपल्या आयुष्यात आलाय, असं त्यांना वाटू लागलं. आजवर फक्त विळा-कोयता हातात धरलेल्या या मैत्रिणींच्या हातात असे साधन येणार होते जे त्यांच्या मनातील प्रश्न, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा जगापुढे मांडण्यासाठी मदत करणार होते.
१९९६ साली एका सकाळी पास्तापूरमधील या अकरा दलित स्त्रियांनी आयुष्यात प्रथमच कॅमेऱ्याला स्पर्श केला. हातात व्हिडीओ कॅसेट धरून त्या मनातल्या मनात दहावेळा ते नाव उच्चारत होत्या, कॅसेट.. कॅसेट.. तेलुगु भाषेचे वळण पडलेल्या त्यांच्या जिभेला या प्रशिक्षणातील कित्येक शब्द पुन्हा-पुन्हा म्हणावे लागत होते. लाँग शॉट, लो अँगल शॉट, हाय अँगल शॉट आणि बरेच काही. पण शब्द लक्षात राहात नाही म्हणून हातातील संधी सोडणे मात्र त्यांना मंजूर नव्हते. त्यामुळे या चतुर स्त्रियांनी समजून-उमजून त्या प्रत्येक संकल्पनेला स्वत:च्या भाषेचा एक वळसा दिला. ‘क्लोज अप’ त्यांच्यासाठी झाला ‘देगारा शॉट’, तर लाँग शॉट म्हणजे ‘दूरम शॉट’ आणि या प्रयत्नांना थोडी मिस्कील, खोडकर छटाही आहेच. ज्या लो अँगल शॉटच्या फ्रेममध्ये विषय फार महत्त्वाचा, अधिकार गाजवणारा आहे त्याला नाव दिले गेले ‘पटेल शॉट’, कारण गावाच्या समुदायात या पटेलचे वर्चस्व फार ना.. या सगळ्यात अतिशय समर्पक, सुंदर नाव आहे ते आय लेव्हल शॉटचे. या स्त्रिया त्याला ‘संघम शॉट’ म्हणतात. या स्त्रियांचे जे संघम आहेत त्यात ‘आम्ही सगळ्या स्त्रिया समान असतो, नेहमी जमिनीवर बसतो आणि समान पातळीवर काम करतो’ चिन्ना नरसम्मा सांगते..
केवळ ३२ दिवसांमध्ये या सगळ्या जणी शॉट्सचे प्रकार, कॅमेरा अँगल, त्याची हालचाल, लाइटिंग आणि थोडे ध्वनी व संपादनाची तंत्रे शिकल्याच पण त्यातील सर्वात हृदयस्पर्शी बाब म्हणजे प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी सर्व मैत्रिणींनी शपथ घेतली, जे साधन त्यांच्या हातात मिळाले त्याचा वापर व्यापारी कारणासाठी न करण्याची..! रोज बारा बारा तास मजुरी केल्यावर मीठ-तेल खरेदी करून चूल पेटवणाऱ्या या स्त्रियांना हे कौशल्य फक्त त्यांच्या समाजाच्या भल्यासाठी वापरण्याची इच्छा होती..!
प्रशिक्षण संपले त्याच वर्षी त्या प्रदेशात ढगफुटी व्हावी तसा पाऊस कोसळला आणि उभी पिके बघता-बघता पाण्यात आडवी झाली, सडून गेली. पुढील वर्षभराची अन्नाची बेगमी अशी मातीमोल होताना या बायका खांद्यावर कॅमेरा अडकवून शेतात शिरल्या. घोटाभर पाण्यात, चिखलात उभ्या राहून त्या काळी पडलेली ज्वारीची कणसं, पावसामुळे होलपटलेले बाजरीचे पीक टिपत होत्या. आपल्या परिसरातील विध्वंसाची त्यांनी टिपलेली ही थेट कहाणी मग दूरदर्शनवरून आणि ईटीव्ही या वाहिनीवरून सगळ्या आंध्र  प्रदेशपर्यंत गेली. या बायकांच्या आत्मविश्वासाला या घटनेमुळे जोरदार धुमारे फुटले. शिवाय दूरदर्शन आणि ईटीव्ही या दोन्ही वाहिन्यांनी त्यांना आपल्या कार्यक्रमात काही मिनिटांचा वेळ देण्याचे मान्य केले होतेच.
२००० साली या मैत्रिणींनी एका कम्युनिटी मीडिया ट्रस्टची स्थापना केली. दलित महिलांनी पुढाकार घेऊन सुरू केलेला, त्यांचे व्यवस्थापन असलेला हा देशातील पहिला मीडिया ट्रस्ट. आपली पहिली महत्त्वाची फिल्म या स्त्रियांनी केली ती ‘आमची बालवाडी’. त्याचे चित्रीकरण करणारी चिन्ना नरसम्मा ही देशातील पहिली दलित फिल्ममेकर ठरली. मुलाला बालवाडीत पाठवणाऱ्या आणि न पाठवणाऱ्या अशा दोन कुटुंबांची कहाणी सांगणाऱ्या या फिल्ममधील सगळी पात्रं खऱ्याखुऱ्या आयुष्यात वावरणारी होती! त्या कथेतील कुटुंबाची मोडकळीस आलेली झोपडी, चुलीच्या धुरामुळे कोंदटलेले स्वयंपाकघर, मातीत फतकल मारून बसलेली नागडी मुलं आणि त्यांची भांडणं, किरकिर हे सगळे क्षण प्रत्यक्ष जगण्यातून चिमटीत पकडून उचललेले होते. गुडघ्यांचा ट्रायपॉड करीत चित्रीकरण करता-करता त्या कुटुंबाशी अखंड संवाद साधणाऱ्या नरसम्माला, तिच्या मैत्रिणींना जीवनाकडे नव्या दृष्टीने बघू शकेल असा तिसरा डोळा लाभला होता..
बालवाडीवरील ही फिल्म ७५ गावांमधून फिरली आणि मुलांच्या शिक्षणाबद्दल एक नवी चर्चा, जागृती त्यातून घडली. मग ही फिल्म डीडीएम संस्थेच्या बालवाडी प्रकल्पाला निधी देणाऱ्या नेदरलँडच्या बर्नाड फौंडेशनपर्यंतसुद्धा गेली.
आतापर्यंत या स्त्रियांनी ज्या फिल्म्स तयार केल्या आहेत, त्याची निव्वळ शीर्षके बघितली तरी त्यांनी विकसित केलेल्या त्यांच्या सामाजिक जाणिवेचा आवाका समजू शकतो. ‘शेतीचे भवितव्य’, ‘भारताच्या निम-दुष्काळी परिसरातील शेतकऱ्यांचे माती व्यवस्थापन’, ‘पाणी, आयुष्य आणि उपजीविका’, ‘वरंगळमधील शेतकरी बीटी कॉटनवर एवढे नाराज का?’, ‘दहा स्त्रिया आणि एक कॅमेरा’ वगैरे. बीटी कॉटनवर त्यांनी केलेल्या ‘ए डिझास्टर इन सर्च ऑफ सक्सेस : बीटी कॉटन इन ग्लोबल साऊथ’ या फिल्मने पर्यावरणवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत अक्षरश: हलकल्लोळ माजवला. इतकं त्यातील सत्य संबंधितांना झोंबलं!
या दहा जणींपैकी अनेक मैत्रिणी सर्व आशियाई देशांमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांना हजेरी लावून आल्या आहेत आणि कॅनडात झालेल्या ‘वर्ल्ड ऑरगॅनिक काँग्रेस’ला जगभरातून १०० पुरुष छायाचित्रकार हजेरी लावत असताना तिथे उपस्थित असलेली एकमेव स्त्री फिल्ममेकर होती चिन्ना नरसम्मा..! शेती, स्थानिक आरोग्य, स्त्रियांचे प्रश्न असे अनेक स्थानिक प्रश्न घेऊन आजवर या मैत्रिणींनी तब्बल ७५ फिल्म्स बनवल्या आहेत. आणि अनेक प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले आहेत.
आता या महिलांनी कम्युनिटी रेडिओ सुरू केला आहे. स्थानिक बातम्या, गावातील वनौषधी, लोकगीत, मुलाखती अशा कार्यक्रमांचा अंतर्भाव असलेला हा रेडिओ म्हणजे या मैत्रिणींच्या आत्मविश्वासाने टाकलेले पुढचे पाऊल आहे.
‘जे माझे हात आजवर झाडू मारत होते, ते आज चेकवर सह्य़ा करतात. ज्या हातांना फक्त विळा हाताळायची सवय होती तेच आज सहजतेने कॅमेरा हाताळतात..’ असं जेव्हा चिन्ना नरसम्मा मुंबईतील चित्रपट महोत्सवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाली, तेव्हा भुकेल्या माध्यमांना चमचमीत ब्रेकिंग न्यूज मिळाली. खरं म्हणजे, चिन्ना, मंजुळा, लक्ष्मीसारख्या दलित स्त्रियांची ही कहाणी भारतासाठी निव्वळ ‘ब्रेकिंग न्यूज’पुरती नाही, ती त्यापलीकडे खूप काही सांगते..    
vratre@gmail.com

in Gadchiroli s sironcha taluka telangana border Rice Smuggling Racket Resurfaces
तेलंगणा सीमेवरील तांदूळ तस्कर पुन्हा सक्रिय! राजकीय नेत्यांचा सहभाग?
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी
chipko movement, chipko movement lokrang article
चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत…
Sudhir Singh murder case
सुधीर सिंग हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला अटक, उत्तर प्रदेशच्या जंगलात पेल्हार पोलिसांचा थरारक पाठलाग