|| मंजुला नायर

responsiblenetism@gmail.com

हॅकिंग, ऑनलाइन जुगार आणि फोटो मॉर्फ करणे यांसारख्या काही गुन्ह्य़ांबरोबरच ‘फेक अकाऊंट’ तयार करणं, इंटरनेटवरून माग काढणं  (सायबर स्टॉकिंग) आणि ऑनलाइन माध्यमाद्वारे  गोडीगुलाबीनं दुष्कृत्य करायला भाग पाडणं आदी गुन्ह्य़ांतही लहान मुलांचा बळी जात आहेत. काय आहेत हे सायबर गुन्हे?  हे सांगणारा हा दुसरा लेख.

या  लेखाच्या पूर्वार्धात (२५ जानेवारी) आपण सायबर गुन्ह्य़ांना बळी पडणाऱ्या मुलांविषयी जाणून घेतलं. त्यामध्ये हॅकिंग, ऑनलाइन जुगार आणि फोटो मॉर्फ करणे यांसारखे काही गुन्हे पाहिले. आजच्या लेखामध्ये आणखी काही सायबर गुन्ह्य़ांवर प्रकाश टाकलेला आहे, ज्यामध्ये लहान मुलं मोठय़ा प्रमाणात अडकत आहेत. त्यामुळे साहजिकच ही मोठीच चिंतेची बाब ठरत आहे. असे गुन्हे प्रौढ माणसांच्या बाबतीतही घडू शकत असले, तरी अशा गुन्ह्य़ांमध्ये मुलांचं बळी पडण्याचं प्रमाण तुलनेनं जास्त आहे.

इंटरनेटवर एखाद्याचं ‘फेक अकाऊंट’ तयार करण्यात सुमारे १० वर्ष किंवा त्याहून अधिक वयोगटांतील मुलांचं प्रमाण मोठय़ा प्रमाणावर दिसून येतं. इंटरनेट वापरणाऱ्या मुलांच्या जगामध्ये या गोष्टीला खूप मिरवलं जातं. असं करणाऱ्या मुलाकडे इतर मुलं काहीशा आदरानं बघतात. ‘फेक अकाऊंट’ म्हणजे नेमकं काय? हे त्यासाठी आधी पाहायला हवं. ‘फेक अकाऊंट’ म्हणजे कुणीतरी स्वत:ला अस्तित्वात असणारी दुसरी व्यक्ती असल्याचं भासवत असते किंवा मुळातच अशी व्यक्ती अस्तित्वात नसते. थोडक्यात, दुसऱ्या व्यक्तीची परवानगी न घेताच हे खातं वा अकाऊंट सुरू केलेलं असतं. यामध्ये पाळीव प्राणी, सेलिब्रिटी संस्था किंवा अगदी काल्पनिक नावांनीसुद्धा अकाऊंटस उघडलेली असतात. म्हणजेच हा दुसऱ्या व्यक्तीची बनावट ओळख तयार करण्याचा प्रकार असतो. यातूनच त्या व्यक्तीच्या नावाचा गैरवापर (आयडेंटिटी थेफ्ट) केला जाऊ  शकतो. थोडक्यात, एखाद्या माणसानं स्वत:ची अनेक आधारकार्ड किंवा पासपोर्ट तयार करण्यासारखा हा गंभीर गुन्हा आहे. मुलं अनेकदा अशी ‘फेक अकाऊंट’ किंवा प्रोफाइल तयार करतात. सहसा यामागचं मुख्य कारण म्हणजे आपण इंटरनेटवर काय काय करतो, हे त्यांना पालकांना समजू द्यायचं नसतं. अशा फेक आयडीमुळे इंटरनेटवर मुलं एखादी अनुचित गोष्ट बघत असतील, तर पालकांना किंवा अन्य कुणाला त्यांना पकडता येत नाही. खरंच, मुलं खूप स्मार्ट असतात.

अनेक वेळा मुलं आपल्या मित्रमैत्रिणींच्या नावानंही अशी ‘फेक’ खाती उघडतात. यामागं आपल्या मित्रांची थट्टा करण्याचा, आपण कॉम्प्युटर वापरात किती स्मार्ट आहोत किंवा इंटरनेटमधलं आपल्याला किती कळतं हे दाखवण्याचा प्रयत्न असतो. कधी कधी असं करून कुणाला तरी धमकावून किंवा त्रास देऊन त्यांना आपलं काम करून घ्यायचं असतं, तर कधी कधी हे केवळ गमतीखातर केलं जातं. मात्र अशा सहजी केलेल्या थट्टेची नोंद एक गुन्हा म्हणून होऊ  शकते आणि आपण चांगलेच अडचणीत येऊ  शकतो, याबद्दल मुलांना अजिबात कल्पना नसते. त्यामुळं आम्ही नेहमीच मुलांना आणि पालकांनादेखील समाजमाध्यमांवर स्वत:चं ‘फेक’ प्रोफाइल कुणी तयार केलेलं आहे का, हे तपासायला सांगतो. तशी प्रोफाइल अस्तित्वात असतील, तर योग्य त्या मंचाकडं त्याबद्दलची तक्रार करता येते व नुकसान टाळता येतं. आपण याचं एक खरंखुरं उदाहरणच पाहूया.

आठवीतल्या मीरानं आपल्या झिया या मैत्रिणीच्या नावानं ‘फेक अकाऊंट’ उघडलं (मुलींची नावं बदलली आहेत). तिनं या अकाऊंटवर इंटरनेटवरच्या अनोळखी लोकांशी मैत्री करायला सुरुवात केली. म्हणजे कुठल्याही अनोळखी व्यक्तींना तिनं ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवायला सुरुवात केली, शिवाय तिला आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट बिनधास्त स्वीकारायलाही सुरुवात केली. दरम्यान, या फेक अकाऊंटच्या माध्यमातून तिनं आपल्या खऱ्या वर्गमित्रमैत्रिणींनाही इंटरनेटवर ‘फ्रेंड’ बनवून टाकलंच होतं. या फेक अकाऊंटमधून ती अपशब्द आणि अश्लील चित्रंही पोस्ट करत असे. या दोघींच्या मित्रमैत्रिणींच्या लक्षात हा विचित्र प्रकार आला. त्यांनी लगेच झियाला ‘तिच्या’ अशा वागण्याबद्दल विचारलं. अर्थातच तिला याबद्दल कसलीच माहिती नव्हती. तिनं ही गोष्ट आपल्या आईवडिलांना सांगितली. आईवडिलांनी लगेच शाळेच्या मुख्याध्यापकांकडं आणि कौन्सिलरकडं धाव घेतली. अधिक माहिती मिळताच दोन्ही मुलींना आणि त्यांच्या पालकांना शाळेत बोलावून घेण्यात आलं. अखेर, झियाबद्दल आपल्याला मत्सर वाटत असल्यामुळं तिच्या नावानं फेक अकाऊंट उघडल्याची कबुली मीरानं दिली. तिला शाळेत झियाला बदनाम करायचं होतं. सुदैवानं शाळेनं आणि दोन्हीही मुलींच्या पालकांनी हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेनं आणि काळजीपूर्वक हाताळलं.  इंटरनेटवर केलेल्या अशा गोष्टींचे काय परिणाम होऊ  शकतात याबद्दल मुलांना ठाऊक नसतं, या गोष्टीची जाणीव होती. त्यांना याबद्दल जागरूक करणं, हे या पालकांना आपलं कर्तव्य वाटत होतं.

इंटरनेटवरून माग काढणे ( सायबर स्टॉकिंग)

समाजमाध्यमं सगळीकडे मोठय़ा प्रमाणात वापरली जाऊ  लागल्यानंतर एखाद्याला इंटरनेटवर ‘फॉलो करणं’ ही अगदी सोपी गोष्ट झाली आहे. शिवाय त्या व्यक्तीबद्दल बरीचशी माहिती काढणं आणि तिच्या वर्तनाबद्दल जाणून घेणं यासाठीचं एक सोपं साधन समाजमाध्यमाच्या रूपानं गुन्हेगारांच्या हाती आलं आहे. सायबर मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर, सायबर स्टॉकिंगमध्ये इंटरनेटसारख्या इलेक्ट्रॉनिक जगतातल्या सुविधांचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा पाठलाग करणं, तो काय करतो यावर लक्ष ठेवणं, त्याला छळणं या गोष्टी येतात. त्या व्यक्तीची बदनामी करणं, त्रास देणं, तिला चिडायला लावणं किंवा त्या व्यक्तीला आपल्या फायद्यासाठी काही तरी करायला भाग पाडणं या साऱ्या गोष्टींचा समावेश या गुन्ह्य़ात होतो. असा पिच्छा पुरवणं एखाद्या व्यक्तीबाबत नव्हे तर लोकांच्या एखाद्या गटाबाबतही घडू शकतं.

तुम्हाला कदाचित अदनान पात्रावाला या १६ वर्षांच्या मुलाबद्दल काही वर्षांपूर्वी वाचलेलं आठवत असेल. अदनान एका सधन कुटुंबातला तरुण मुलगा. २००७ मध्ये ऑनलाइन गेमिंग दरम्यान त्याची पाच लोकांशी मैत्री झाली. या पाच जणांनी त्याच्याशी चॅट किंवा ‘ऑर्कुट’च्या माध्यमातून सतत संपर्क ठेवला. पुढं एकदा त्यांनी त्याला एका मॉलमध्ये प्रत्यक्ष भेटीसाठी बोलावलं. या भेटीदरम्यान त्याच्या पेयामध्ये या लोकांनी गुंगीचं औषध मिसळून त्याला पाजलं. त्याचं अपहरण करून त्या गुंडांनी अदनानच्या पालकांकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितली. या अपहरणाची बातमी वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून झळकू लागली. ती पाहून घाबरून अपहरणकर्त्यांनी अदनानचा गळा दाबून खून केला आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. पुढे न्यायालयात या पाचही जणांना शिक्षा झाली, मात्र एका १६ वर्षांच्या तरुणाला आपलं आयुष्य गमवावं लागलं. त्याचं कुटुंब आणि मित्र यांचं न भरून येणारं नुकसान झालं.

आजही मुलं इंटरनेटवर अनोळखी व्यक्तींशी चॅट करतात किंवा असे लोक मुलांना प्रत्यक्ष भेटायला बोलावतात – याबद्दलच्या गुन्ह्य़ांच्या केसेस आमच्याकडं येत असतात. यामुळंच पूर्वीच्या म्हणजे ‘ऑफलाइन’ जगापेक्षा आज मुलांना ‘ऑनलाइन’ जगाचा धोका अधिक मोठा आहे. त्यामुळं आम्ही सगळ्या मुलांना अगदी बजावून सांगतो की, कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत चॅट करू नका, कुठलीही वैयक्तिक माहिती त्यांना देऊ  नका आणि त्यांना कधीही प्रत्यक्ष भेटू नका. कॉम्प्युटरच्या किंवा मोबाइलच्या पडद्याआडून त्यांच्याशी खरोखरच कोण संपर्क करतं आहे, हे आपल्याला कधीच समजू शकत नाही. अशा व्यक्तींचे उद्देश कोणते हेही आपल्याला नक्की ठाऊक नसतं.

ऑनलाइन माध्यमाद्वारे मुलांना गोडीगुलाबीने दुष्कृत्य करायला भाग पाडणे (online Child grooming) –

सायबर जगतात मुलांसोबत घडणाऱ्या गुन्ह्य़ांमधला हा एक अत्यंत घाणेरडा प्रकार आहे. ऑनलाइन ग्रुमिंगमध्ये एखादी व्यक्ती इंटरनेटचा वापर करून अल्पवयीन मुला-मुलींना कोणती तरी लैंगिक कृती करण्यास भाग पाडते. उदाहरणार्थ, त्यांचा नग्नावस्थेतील फोटो किंवा व्हिडीओ पाठवायला सांगणे. अर्थातच त्यांना अशा प्रकारच्या लैंगिक कृती करायला सांगण्याअगोदर इंटरनेटवरील गुन्हेगारानं त्यांचा विश्वास पूर्णत: संपादित केलेला असतो. नुकतीच आमच्याकडे अशा दोन मुलांची केस आली होती. हे बहीण-भाऊ  अनुक्रमे सहा आणि आठ वर्षांचे होते. पालक घरात नसताना ही मुलं इंटरनेटवर कुठली तरी वेबसाइट बघत होते. त्या वेळी चुकून त्यांनी एक ‘पॉपअप विन्डो’ उघडली. मग तिथून ते वेगळ्याच वेबपेजला गेले. तिथं लोक एकमेकांशी व्हॉइस चॅट (ध्वनी) आणि वेबकॅम वापरून एकमेकांशी बोलत होते. तिथं या लहान मुलांची एका माणसाशी ओळख झाली. सुरुवातीला त्या माणसानं मुलांबरोबर व्हॉइस चॅट करायला सुरुवात केली. हे व्हॉइस चॅट प्रकरण मुलांनी गुप्त ठेवावं यासाठी त्याने मुलांना पटवलं. नंतरच्या काही दिवसांत या ऑनलाइन गप्पांचा कालावधी वाढायला लागला. त्यानं या मुलांना ज्या गोष्टींबद्दल उत्सुकता होती त्याबाबत शिकवायला किंवा काही फोटो पाठवायला सुरुवात केली. लवकरच या चित्रांमध्ये थोडय़ा प्रमाणात लैंगिक आशय असणारे फोटोही येऊ  लागले. मात्र तोवर या मुलांचा त्या माणसावर पूर्णपणे विश्वास बसलेला होता. तो जे जे सांगत होता त्याबरहुकूम ही मुलं वागत होती. आता व्हॉइस चॅट ऐवजी ते एकमेकांशी वेबकॅम वापरून व्हिडीओ चॅट करू लागले. एके दिवशी अचानक या मुलांच्या आईला त्या टॅबवर काही अश्लील व्हिडीओ आढळले. त्यांपैकी काही व्हिडीओंमध्ये ही दोन मुलंदेखील सामील होती. हा प्रकार पाहून त्यांच्या पालकांना जबरदस्त धक्का बसला. लगेच त्यांनी याची कल्पना पोलिसांना दिली. पोलिसांनी शर्थीनं प्रयत्न करून त्या गुन्हेगाराला पकडलं. अशाप्रकारे मुलांना फूस लावून त्यांच्याकडून अश्लील कृत्य करून घेणं, अशी पोर्नोग्राफी यांना आता मुलांचं लैंगिक शोषण असणारी सामग्री (उरअट) समजलं जातं. दुर्दैवाने अशा प्रकारच्या पोर्नोग्राफीला जगभरात मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. सायबर जगतातल्या वाईट प्रकारच्या गुन्ह्य़ांपैकी समजला जातो.

सध्या जागतिक पातळीवर याबाबत चिंता व्यक्त करण्यात येते आहे. याचे अनेक गंभीर कायदेशीर परिणामही होत आहेत. जगभरातले लोक या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी एकत्र येत आहेत. तुम्हीही यात आपला वाटा उचलू शकता. तुमच्यापैकी कुणाला अशाप्रकारे मुलांचं लैंगिक शोषण होत असलेले फोटो वा व्हिडीओ इंटरनेटवर आढळले, तर कृपया ते फॉरवर्ड करू नका. त्यांबद्दलची कल्पना www.cibercrime.gov.in आणि www.aarambhindia.org या पोर्टलवर कल्पना द्या. अशा प्रकारचा आशय इंटरनेटवरून ताबडतोब हटवला जावा यासाठी ही पोर्टल सदैव कार्यरत असतात.

– सुश्रुत कुलकर्णी