अमेरिकेतील प्रसिद्ध योगा नृत्यांगना म्हणून ज्यांना ओळखले जाते, त्या आहेत तब्बल ९६ वर्षांच्या एक आजी, ताओ पोर्चान-लंच. भारतात जन्म झालेल्या या आजी तरुणपणातच ‘योगा’कडे आकर्षति झाल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांनी अमेरिकेत मॉडेल आणि नृत्यांगना म्हणून काम करायला सुरुवात केली.
१९६७ च्या सुमाराच त्या अभिनेत्री आणि योगा प्रशिक्षक म्हणून काम करू लागल्या. या आजींनी त्यांच्या नवऱ्याच्या मदतीने ‘अमेरिकन वाइन सोसायटी’ची स्थापना केली. या सोसायटीमार्फत त्या मासिक प्रसिद्ध करतात. वयाच्या ९३ व्या वर्षी म्हणजेच २०१२ साली गिनीज बुक ऑफ वर्ल्डने त्यांना जगातील सर्वात वयोवृद्ध योगा प्रशिक्षक हा किताब बहाल केला.
अगदी नुकतेच म्हणजे २०१३ मध्ये आजींनी योगा प्रशिक्षणाची ‘योगा विथ ताओ पोर्चान -लंच’ ही डीव्हीडी आणि ‘रिफ्लेक्शन्स : द योगिक जर्नी ऑफ लाइफ’ हे ध्यानधारणेवरचे पुस्तक प्रसिद्ध केले. गंमत म्हणजे योगा या प्रकारावर इतकी मक्तेदारी मिळविणाऱ्या या आजींना त्यांच्या काकूने योगा प्रशिक्षक म्हणून काम करू नये यासाठी विरोध केला होता. या विरोधाला न जुमानता आजींनी आजतागायत आपले काम सुरूच ठेवले आहे. या आजी तरुणपणी मार्टिन ल्यूथर किंग यांच्यासोबतही काम करीत होत्या. गांधीजींच्या विचारांचा त्यांचावर तीव्र पगडा आहे.
‘बेस्ट लेग्ज इन युरोप’ हा किताबही आजींना प्राप्त झालेला आहे. ह्याक बलसानयन हा २३ वर्षांचा युवक आजींचा नृत्यामधील जोडीदार आहे. आणि या आजी या तरुणासोबत अत्यंत लीलया आपली कला सादर करतात. मदतनीसाशिवाय गाडी चालवणाऱ्या या आजींची हिप रिप्लेसमेंट सर्जरी होऊनही उंच टाचांच्या चपलांच्या आवडीखातर या वयातही त्या अशाच चपला वापरतात. या आजींना सगळे कौतुकाने म्हणतात, ‘डार्क लंडन ब्रायटर’  
चलाख नातू
एकदा आजोबा त्यांच्या लहान नातवाला घेऊन देवळात जातात. योगायोगाने त्या मुलाचे बाबाही देवळात येतात. ते मुलाला  देवाला हात जोडून प्रार्थना करावयास सांगतात. मुलगा वडिलांच्या आग्रहाखातर प्रार्थना करतो, ‘ देवा माझ्या आई-बाबांना, मला सुखात ठेव.’
मात्र लगेच तो जरा मोठय़ा आवाजात म्हणतो, ‘..आणि देवा माझ्या आजोबांना माझ्यासाठी एक नवी कोरी सायकल आणायलाही न विसरता सांग हं.’
त्याचे वडील त्याचा कान धरतात, व म्हणतात, ‘ देवाने तुझी ही प्रार्थना अजिबात ऐकलेली नाही.’
मुलगा हसतो आणि म्हणतो, पण आजोबांनी तर ऐकलीय..