अर्चना जगदीश

पत्रकार आणि नागालॅण्डमधलीच निसर्ग-पर्यावरणप्रेमी बानू हरालूने निसर्गप्रेमी आणि संशोधक यांच्या मदतीने २०१३ च्या सुरुवातीला ‘नागालॅण्ड वाइल्ड लाइफ अ‍ॅण्ड बायोडायव्हर्सटिी कॉन्झव्‍‌र्हेशन सोसायटी’ची स्थापना केली. २०१२ ऑक्टोबपर्यंत रोज सुमारे १२ हजार ते १४ हजार आमूर ससाण्यांची कत्तल व्हायची. ही कत्तल थांबवायचीच असा चंग बांधलेल्या बानूने या ससाण्यांबद्दल स्थानिकांच्या मनात प्रेम निर्माण केलं. नियम केले, दंड निश्चित केले, संरक्षण फळी निर्माण केली. आज तिथे एकही ससाणा मारला जात नाही. नागालॅण्डमधल्या या नेत्रदीपक यशामुळे वोखाचे आमूर फाल्कन ही पक्षी संरक्षणाची यशोगाथा म्हणून सर्व जगभरातल्या पक्षीप्रेमींकडून ओळखली जाऊ लागली..

दूरवरच्या ईशान्य भारतातल्या नागालॅण्डमध्ये दर वर्षी ऑक्टोबरमध्ये एक अप्रतिम नजारा निसर्ग आपल्या समोर उलगडतो. नागालॅण्डच्या वोखा जिल्ह्य़ातल्या दोयांग तलावावर हजारोंच्या संख्येने सबेरिया मंगोलिया या उत्तरगोलार्धातल्या थंड प्रदेशातून, सुप्रसिद्ध आमूर नदीच्या खोऱ्यातून हजारो मलांचा प्रवास करून आलेले आमूर फाल्कन म्हणजे आमूर ससाणे विश्रांतीसाठी विसावतात.

सगळं आकाशच या ससाण्यांच्या डौलदार भराऱ्यांनी व्यापून जातं. नागालॅण्डमधल्या आराकानयोमा पर्वतराजीमधल्या उंच डोंगरांनी वेढलेला हा दोयांग तलाव आणि डोंगरउतारावरचं घनदाट जंगल नाही तर झूम शेती या निळाई-हिरवाईवर विहरणारे हे पक्षी म्हणजे खरं तर जगातलं एक आश्चर्यच. कारण हजारोंच्या संख्येने हे पक्षी असं स्थलांतर का करतात हे अजूनही माणसाला नीटसं न उलगडलेलं कोडंच आहे. आता जगभरातले पर्यटक हे बघण्यासाठी आवर्जून वोखाला भेट द्यायला लागलेत. हे आमूर नदीच्या प्रदेशातून आलेले ससाणे नागालॅण्डमधल्या साधारण महिन्याभराच्या विश्रांतीनंतर पश्चिम-दक्षिणेकडे हजारो मल उडत दक्षिण आफ्रिकेत जातात आणि पुन्हा उत्तरेकडे जात मध्य पूर्वेतून सबेरिया-मंगोलियाला परततात. परतीच्या प्रवासात ते नागालॅण्ड, म्यानमार असा आग्नेय आशियातून जाणारा मार्ग घेत नाहीत. या ससाण्यांच्या स्थलांतराचा वर्तुळाकार मार्ग एकूण २२ हजार किलोमीटर आहे. पक्ष्यांच्या स्थलांतराबद्दल अनेक अनाकलनीय गोष्टींचा मागोवा संशोधक आजही घेतात आणि असा अभ्यास करताना अजूनही नवनव्या गोष्टी समोर येतात.

‘बॅट विंग्ड गॉडविट’ हे पक्षी अलास्कातून निघून ११ हजार किमी प्रवास करून कुठेही न थांबता ११-१२ दिवसांत न्यूझीलॅण्डला पोहोचतात. म्हणूनच पक्ष्यांचं स्थलांतर, त्यांचं हवा आणि वाऱ्याबाबत तसेच उड्डाणाबद्दलचं जनुकीय ज्ञान याबद्दल अथक संशोधन सुरू आहे. त्यासाठीच आपल्याला नागालॅण्डमध्ये दर वर्षी हजारोंच्या संख्येने येणाऱ्या आमूर फाल्कनबद्दलचं कुतूहल आणि त्यांना वाचवण्याचे प्रयत्न याबद्दल समजून घ्यायला हवं. हजारोंच्या संख्येने येणारे हे आमूर ससाणे कीटकभक्षी आहेत आणि इतर शिकारी पक्ष्यांपेक्षा थोडे वेगळे आहेत. ते अनेक उपद्रवी कीटक खातात आणि एक प्रकारे शेतकऱ्याला मदत करतात. दक्षिण आफ्रिकेत तर आमूर फाल्कन अब्जावधी वाळवी आणि त्यांच्या अळ्या यांचा फडशा पाडतात. म्हणून तिथले शेतकरी यांची वाटच बघत असतात.

ओखा जिल्ह्य़ातल्या दोयांग सरोवराजवळच्या पांगती गावातल्या लोथा आदिवासींना आमूर फाल्कनचे थवे ऑक्टोबरमध्ये हजारोंच्या संख्येने येतात हे माहीत होतं आणि दहा-बारा वर्षांपासून त्यांची मोठय़ा प्रमाणात शिकार व्हायला लागली होती. ईशान्य भारतातले आदिवासी; जे जे हलतं-चालतं ते सगळं काही खायला तयार असतात, असं म्हटलं जातं आणि ते बऱ्याच अंशी खरंही आहे. वीस वर्षांपूर्वी मी जेव्हा पाच-सहा वर्ष नागालॅण्डमध्ये काम करत होते, तेव्हा तिथले अनेक प्राणी आणि पक्षी मी जंगलात पाहण्याऐवजी बाजारात विकायला ठेवलेलेच बघितले आहेत. म्हणूनच हजारोंच्या संख्येने येणारे हे आमूर ससाणे लोथा लोकांच्या खाद्यजीवनाचा एक भाग बनले आणि मग त्यांची अनिर्बंध कत्तल व्हायला लागली. नागा जमाती गलोलीने पक्षी मारण्यात तरबेज असतात आणि काही तर स्वत: बंदुकादेखील तयार करतात. शिवाय हे ससाणे सर्वत्र मोठय़ा संख्येने उडत असल्याने त्यांची शिकार सोपी होती. तसेच साधी मासेमारीची जाळी दोन झाडांच्या फांद्यांना बांधून केलेल्या जाळ्यातदेखील त्यांना सहज पकडता यायचं.

आकडेवारी असं सांगते, की ऑक्टोबर २०१२ पर्यंत दररोज सुमारे १२ हजार ते १४ हजापर्यंत आमूर ससाण्यांची कत्तल व्हायची. यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. एक ससाणा साधारण २५ ते ३५ रुपयांना विकला जायचा. पांगती गावातले अनेक लोथा शिकारी आणि खेडूत दर वर्षी या आमूर फाल्कन मोसमात तीस-चाळीस हजार  रुपये सहज कमवायचे. २०१२ च्या ऑक्टोबरमध्ये पत्रकार आणि नागालॅण्डमधलीच निसर्ग-पर्यावरणप्रेमी बानू हरालू, तिचा सहकारी रोखेबी कोत्सु, बंगलोरच्या ‘सेंटर फॉर वाइल्ड लाइफ स्टडीज’चा शशांक दळवी आणि ‘कंझव्‍‌र्हेशन इंडिया’चा रामकु श्रीनिवासन हे सगळे पांगती गावाजवळ विस्तीर्ण दोयांग तलावावर पोहोचले. बानूला आणि तिच्या बरोबरच्या संशोधकांना अमूर फाल्कनची कत्तल होते, तेही इतक्या मोठय़ा प्रमाणावर, हे ऐकलेलं खरंच आहे का हे बघायचं होतं. बानू त्यावेळी आपली पर्यावरण आणि पत्रकारिता सोडून नागालॅण्डच्या वन विभागाबरोबर एका प्रकल्पावर काम करायला लागली होती.

त्याच कामाचा भाग म्हणून ती या संशोधकांबरोबर पांगतीला आली होती. मात्र त्या विस्तीर्ण सरोवरावर, त्यांनी जे बघितलं त्याने ते मुळापासून हादरून गेले. हजारो जिवंत फाल्कन आकाशात घिरटय़ा घालत होते आणि शेकडो जाळ्यात अडकून मृत्युमुखी पडले होते. तर काही गोळ्या आणि गलोलींना बळी पडत होते. लोक त्यांना सोडवून टोपल्यांमध्ये ठेवत होते आणि स्थानिक बाजार तसेच संपूर्ण नागालॅण्डमधल्या इतर बाजारांमध्ये पाठवण्याची तयारी सुरू होती. प्रत्यक्ष विकण्यापूर्वी त्यांची पिसं उपटली जायची आणि थोडंसं भाजून-धुरावून ते विक्रीसाठी पाठवले जायचे; संख्या तर खरंच वर दिल्याप्रमाणे हजारांमध्ये. नंतर अभ्यासामध्ये असं लक्षात आलं, की २०१२ पर्यंत दर वर्षी या स्थलांतरित आमूर फाल्कनच्या एकूण संख्येपैकी १० ते १२ टक्क्यांची इथे कत्तल व्हायची. बानूला जाणवलं, की बातमी आणि त्यावरील लेख लोक वाचतील आणि विसरून जातील किंवा कदाचित ही कत्तल बघायला येण्याचं पर्यटन सुरू होईल. आता तातडीने काही तरी केलं पाहिजे.

बानूने तिच्यासारखे निसर्गप्रेमी आणि संशोधक यांच्या मदतीने ‘नागालॅण्ड वाइल्ड लाइफ अ‍ॅण्ड बायोडायव्हर्सटिी कॉन्झव्‍‌र्हेशन सोसायटी’ची स्थापना २०१३ च्या सुरुवातीला केली आणि २०१३च्या मोसमात अमूर फाल्कनची कत्तल थांबवायचीच असा चंग बांधला. सगळ्यात प्रथम त्यांनी काढलेले अमूर फाल्कनच्या शिकारकांडाची छायाचित्रं सगळीकडे प्रसृत केली आणि जगाला इथल्या कत्तलीबद्दल माहिती मिळाली. हा प्राथमिक अहवाल आणि छायाचित्रं ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’, ‘बर्ड लाइफ इंटरनॅशनल’ अशा अनेक संस्थांपर्यंत पोहोचली. यावर उपाय करण्याची निकड त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी सुरुवातीची तातडीची आर्थिक मदत दिली. अर्थात, नुसत्या आर्थिक मदतीने उपयोग होणार नव्हता. बानूने स्थानिक लोक, प्रशासन आणि निसर्गप्रेमी यांच्याशी बोलायला सुरुवात केली. पांगतीमध्ये ‘इको क्लब’ सुरू करून लहान मुलांना या पक्ष्यांबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली. आमूर फाल्कन आणि त्यांचं अचंबित करणारं स्थलांतर याबद्दल पोस्टर्स तयार करून जागोजागी लावली. लवकरात लवकर या शिकारीवर निर्बंध आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

नागालॅण्डमध्ये आपल्या ग्रामपंचायतीच्या धर्तीवर गाव सभा असतात. गावातले सगळे निर्णय सहमतीने होतात आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवरचा अधिकार सर्वाना असतो हे तत्त्वही सर्वमान्य आहे म्हणूनच बानूच्या प्रयत्नांना यश आले आणि पांगती, आशा, सुंगरो या दोयांग तलावाच्या परिसरातल्या तीन गावांनी आमूर फाल्कनच्या शिकारीवर संपूर्ण बंदीचा प्रस्ताव मान्य केला. जर कुणी शिकार केलीच तर ती बेकायदेशीर ठरेल आणि त्याला दंड होईल हेसुद्धा या गावांनी ठरवलं. अर्थात, हजारो रुपये कमावणाऱ्या शिकाऱ्यांना आमूर ससाण्यांच्या संवर्धनात सहभागी करून घेणं हे मोठं आव्हान होतं.

या सुरुवातीच्या यशामुळे बानूने ‘फ्रेंड्स ऑफ आमूर फाल्कन’ ही मोहीम सुरू केली आणि त्याला नागालॅण्ड प्रशासन आणि लोकांची भरपूर साथ मिळाली. या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट होतं, लोकांना या संरक्षणाच्या प्रक्रियेशी जोडून घेणं आणि त्यांच्या परिसरात घडणाऱ्या एका अद्वितीय नैसर्गिक घटनेबद्दल त्यांच्या मनात अभिमानाची भावना तयार करणं. बानूने या कामात झोकून दिलं होतं आणि सतत लोकांना सांगणं आणि त्यांचं मन वळवणं यासाठी तिने अपार कष्ट घेतले. नागालॅण्डमध्ये लोक ख्रिश्चन आहेत आणि चर्चच्या माध्यमातून एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवणं शक्य होतं, बानूने चर्चच्या अधिकाऱ्यांशी बोलायला सुरुवात केली. गावागावात चच्रेसमध्ये जाऊन ही गोष्ट तिथे शेकडोंच्या संख्येने जमणाऱ्या नागा आदिवासींना सांगायला सुरुवात केली. चर्चनेसुद्धा लोकांना ही शिकार थांबवण्याचे आदेश दिले.

तेव्हापासून म्हणजे २०१४ नंतर अशी परिस्थिती आहे, की लोक चुकूनही आमूर ससाणा मारत नाहीत, हवं तर त्याच्या शेजारी बसलेला दुसरा एखादा पक्षी मारतील. बानू आणि तिच्या टीमने अनेक शिकाऱ्यांना ससाण्यांच्या चोरटय़ा शिकारीवर लक्ष ठेवण्यासाठी, बाहेरच्या गावातल्या लोकांनी येऊन लावलेली जाळी शोधून काढण्यासाठी जंगल संरक्षक म्हणून नेमलं. त्यांना प्रशिक्षण दिलं आणि हजारो आमूर फाल्कन आणि त्यांच्या पुढच्या पिढय़ांना अभय मिळालं. नागालॅण्डमधल्या या नेत्रदीपक यशामुळे वोखाचे आमूर फाल्कन ही, पक्षीसंरक्षणाची यशोगाथा म्हणून सर्व जगभरातल्या पक्षीप्रेमींकडून ओळखली जाऊ लागली. हे काम बघण्यासाठी जगातले अनेक मोठे पक्षीसंशोधक आणि निसर्गप्रेमी पांगतीला येऊन गेले.

वर्षभरातच जागतिक संस्था आणि नागालॅण्डचा वन विभाग आणि अर्थातच बानू हरालू आणि तिच्या टीमने तीन आमूर फाल्कन पक्ष्यांना रेडिओ चिप्स अडकवल्या आणि २०१४ मध्ये त्यातले दोन पक्षी परत हजारो मलांचा प्रवास करून पांगती भागात पोहोचलेले बघितले, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. बानूला या कामासाठी ‘रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड’मार्फत ‘अर्थ हिरोज २०१४’ हा सन्मान मिळाला तर आसामच्या ‘बालीपरा ट्रस्ट’मार्फतही पुरस्कार मिळाला. बानू आपल्या यशाबद्दल खूश असली तरी तिचं काम इथेच थांबलं नाही आणि नागा लोकांमध्ये वन्यजीव संरक्षण आणि जैवविविधता याबद्दल समज तयार व्हावी म्हणून ती आजही काम करते.

बानूमुळे शेजारच्या मणिपूरच्या टामेंगलोंग, आसामच्या उम्रानसो आणि मेघालयच्या री भोई गावांमध्येही अधूनमधून येणाऱ्या आमूर फाल्कन आणि इतरही पक्ष्यांच्या शिकारी बंद होऊ लागल्या आहेत. लोक अशा प्रकल्पांचं स्वागत करू लागले आहेत. मात्र यामुळे वाढत जाणारे पर्यटन आणि प्रत्येक हौशी पर्यटकाला हे अद्भुत आपल्या ‘बकेट लिस्ट’मध्ये टाकून पूर्ण करायची घाई, यामुळे इथल्या आधीच नाजूक असलेल्या सामाजिक आणि नैसर्गिक परिस्थितीवर दबाव येऊ नये यासाठी काय करता येईल यावर बानू आणि तिचे सहकारी काम करतात. नागालॅण्डमध्ये पक्षीसंरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली तर गेली पण आणखी खूप काम करण्याची गरज आहे. बानूसारखी संवेदनशील स्त्री या कामाचं नेतृत्व करत असेल तर नागालॅण्डमध्ये तसेच एकूण ईशान्य भारतात वन्य जीव संरक्षणासाठी चांगला बदल नक्कीच होईल. सोबतच आमूर नदीच्या सुंदर प्रदेशातून थोडय़ा दिवसांसाठी येणारे पाहुणे ससाणे तिला नक्कीच दुवा देत राहतील.

godboleaj@gmail.com

chaturang@expressindia.com