27 September 2020

News Flash

भाषिक रुजवणं!

‘‘कम्युनिकेशन इज द की. बाकी, हीच भाषा वापरा, शब्द असाच लिहा, असाच उच्चारा, हा हट्ट कशाला हवा?, असं म्हणतोयस ना? त्यावरून विचारतो.

| October 12, 2013 01:01 am

‘‘कम्युनिकेशन इज द की. बाकी, हीच भाषा वापरा, शब्द असाच लिहा, असाच उच्चारा, हा हट्ट कशाला हवा?, असं म्हणतोयस ना? त्यावरून विचारतो. कंदमुळं खाऊनही जगता येतं. तरीही आपण नाना पदार्थानी जिभेचे चोचले का पुरवतो? पोट भरणं ‘इज द की’ असं तिथे का नाही म्हणत?..  खुणांची भाषाही पुरू शकेलच की. तरीही आपण सुंदर-नादमय शब्द वापरतो, शब्दांची लय- गती-लडिवाळपणा घ्या. सगळ्याची मजा घेतो. घेतो ना? मग पोरांना तिची चव का नाही द्यायची?’’
‘‘स्त्री ही अबला नसून सबला आहे, असे महर्षीचे मत होते म्हणून त्यांनी आपल्या घरच्या स्त्रिया-मुलींची नेहमी मदत केली.’’
आतल्या खोलीत नातवाचं वाचन मोठमोठय़ांदा चालू होतं आणि ते कानावर पडल्याने बाहेरच्या खोलीत आजोबा अस्वस्थ होत होते. अब्ला-सब्ला हे दोन-तीनदा झेलल्यावर त्यांना आपल्या कानात तबला वाजत असल्यासारखं वाटू लागलं. उशिराने का होईना, पण नातू मराठी वाचतोय याचा आनंद मानावा की तो फारच चुकीचं वाचतोय याची खंत करावी हे ठरवता न आल्याने त्यांच्या तोंडून पडून गेलं,
‘‘अरण्याऽ लेकाऽ अब्ला नव्हे रे, अ ब ला असं सुटं सुटं म्हणावं आणि मुलींची मदत करत नाहीत, मुलींना मदत करतात.’’
‘‘टीचरनी तसंच लिहून दिलेलं आजोबा,’’ अर्णव ऊर्फ अरण्या आतून ओरडला आणि पुनश्च तबला वाजवायला निघाला.
‘‘लिहून दिलेलं नव्हे रे, दिलं होतं असं म्हणावं.’’
‘‘टीचर बोलल्या, हे आन्सर लर्न बाय हार्ट करा.’’
‘‘करा हो मिस्टर. जरूर करा. पण आपल्या मायबोलीला हर्ट कशाला करता? नाही का? टीचर ‘बोलल्या’ नाही, म्हणाल्या. त्यांच्ये नाही. त्यांचे.’’
‘‘त्यासाठी आमचे मार्कस् कट नाही करत आजोबा.’’
‘‘असेल. पण सगळं मार्कासाठी थोडंच ना असतं?’’
‘‘फिफ्टी मार्कस्चं मराठी आहे यंदा आम्हाला, पण पोर्शन केवढा? माय गॉड. एकेका सब्जेक्टवर एवढी एनर्जी कशी काय पुट करता येणार आम्हाला?’’
‘‘अरण्याऽ सोन्याऽ मातृभाषा हा सब्जेक्ट नसतो बरं का. त्याला पोर्शन वगैरेही नसतो. सीऽ आपल्याला सगळ्यांना जगायला ऑक्सिजन लागतो. राईट? त्याला सब्जेक्ट, पोर्शन वगैरेत विभागू शकू का आपण? हुशार मुलगा ना तू.. देन थिंक ओव्हर धिस.’’ आजोबा त्यांच्या परीने नातवाला सोपं करून सांगायला गेले. त्याच्याऐवजी अवचितपणे त्याचा बाप म्हणजे आजोबांचा मुलगा कॉम्प्युटरमधून डोकं वर काढून संवादात घुसला.
‘‘डोण्ट कन्फ्यूज हिम बाबा.’’
‘‘मी काय केलं?’’
‘‘ते ‘मराठी हा सब्जेक्ट नाही’ वगैरे म्हणणं म्हणजे दुसरं काय आहे? इट इज व्हेरी मच ए सब्जेक्ट फॉर हिम इन विच ही हॅज टू पास, ओ.के.? मार्क- प्रश्न- पेपर- परीक्षा नसते तर कशाला मराठी शिकायला गेला असता तो? उसे क्या पागल कुत्तेने काटा है?’’
‘‘राहिलं.’’
‘‘आणि सारखं चुका काढत बसू नका त्याच्या मराठीत.’’
‘‘याच्ना- रच्ना- असं त्याच्या तोंडात बसायला नकोय रे.’’
‘‘काय फरक पडतो. दोन-चार शब्दांचे उच्चार इकडे-तिकडे झाल्याने?’’
‘‘नाही पडत?’’
‘‘नो वे. त्याला कुठे मराठीत भाषणं द्यायचीत पुढे जाऊन? एवढी चार-पाच र्वष कंपल्सरी मराठी असणार त्याला, तेवढय़ातून थ्रू झाला की बस्स.. अर्णव.. गो, रिसाइट इट वन्स अगेन,’’ नातवाच्या बापाने फतवा काढून विषय संपवत म्हटलं, उद्या कंपनीत मोठं प्रेझेंटेशन द्यायचं होतं त्याला. त्यावर लक्ष देणं भाग होतं. या मराठी-फिऱ्हाटीच्या नादी लागायला त्याला वेळ कुठून असणार? आजोबा त्यांच्या काळात भाषा शिक्षक होते. आधी शिक्षक, मग प्राध्यापक, मग विभागप्रमुख असे चढत गेलेले होते. तरी मूळ विषय मराठीच होता त्यांचा. म्हणजे सर्वार्थाने मर्यादितच जग त्यांचं. तसल्या मर्यादित जगाची छाया आपल्या पोरावर पडायला नको होती बापाला. तो स्वत: लवकरच कॉर्पोरेट हेड हाँको बनण्याचं स्वप्न पाहत होता आणि पोराचं भवितव्य तर त्याच्या दृष्टीनं भारताबाहेरचं होतं. पोरांनं फ्रेंच, जर्मन ‘परस्यू’ करणं त्याला पटणारं, आवडणारं होतं. अगदीच नाइलाज झाला म्हणून जाता जाता नावापुरतं मराठी.. थोडा वेळ सगळेच शांत राहिले. मग आजोबा कळवळून म्हणाले, ‘‘एकेकाळी किती आवड होती रे तुला मराठीची! किती हौसेनं जुनी, पल्लेदार स्वगतं वाचायचास, किती मन लावून कविता पाठ करायचास.. चार-चौघांसमोर धिटाईने म्हणून कौतुक करून घ्यायचास..’’
‘‘ती तेव्हाची गरज असेल बाबा. आता कॉम्प्युटरच्या लँग्वेजेसमध्ये मराठीचा पदर कुठवर धरून बसणार आपण? भाषेपेक्षा आज आम्हाला व्हॅल्यूज जास्त महत्त्वाच्या वाटतात बाबा.’’
‘‘वाटतात ना? अरे मग आपली भाषा हे तर आपलं सर्वात मोठं मूल्य असतं! ‘व्हॅल्यूऽ’ तुझ्या भाषेत?’’
‘‘मग बसा तुम्ही ते धरून.’’
‘‘आम्ही धरलंच आहे. पण तुमच्या मुलांपर्यंत ते कसं पोचणार हा प्रश्न आहे. तुम्हा लोकांना सांगून सांगून दमलो, घरात पोरांशी चार मराठी वाक्यं बोलत नाही तुम्ही. मराठी वर्तमानपत्रं, पुस्तकं त्यांच्यासमोर ठेवत नाही. त्यांना मराठी लिहा-वाचायला लावत नाही.’’
‘‘तेवढय़ाने काय होईल?’’
‘‘रुजवण रे रुजवण! आपली भाषा आपल्या माणसात, परिसरात, परिघात रुजवते रे आपल्याला.’’
‘‘काय करायचंय इथे रुजून? आमच्या पोरांना अद्ययावत कॉस्मॉपॉलिटन जगात जगायचंय पुढे! म्हणून आम्ही त्यांना त्याची ओळख करून द्यायला धडपडतोय. इंग्रजीत शिकवतोय, परकीय भाषांची ओळख करून देतोय. पुढे जगात कधीही, कुठेही गेली तरी त्यांचं अडायला नकोय आम्हाला.’’
‘‘तुमचं अडलं? आम्ही मर्यादित भाषिक अवकाश देऊ केला म्हणून?’’
‘‘हो. काही प्रमाणात अडलं. पुढे काढली आमची आम्ही वाट.’’
‘‘मग तुमची मुलंही तशीच वाट काढू शकतील की. थोडा विश्वास त्यांच्यावरही ठेवून बघा मिस्टर!’’
‘‘आणि पुढे जन्मभर पस्तावत राहू?’’
‘‘तसं मी कसं म्हणेन?’’
‘‘तेच म्हणतो. तुम्ही काही म्हणूच नका. आमच्या पुढे केवढं विशाल जग आहे आणि किती बिकट काळ आहे हे कळणारच नाही तुम्हाला. त्यात उतरण्याची आमच्या मुलांची तयारी करून घेण्याची धडपड चाललीये सगळी.’’
‘‘म्हणून तर म्हणतो. दिवस असे आल्येत की पुढच्या पिढय़ांची मुळं जास्त पक्की रुजवायला हवी आहेत. रुट्स! जी झाडं वरती एवढी फोफावलेली दिसतात, त्यांची मुळं जमिनीच्या पोटातून कुठून कुठून काय घेतात, हे कळतं का आपल्याला? तसंच मातृभाषा आणि मातृभूमीचं..’’
‘‘तुम्ही मराठीचा तासबीस घेताय की काय माझा? घेऊ नका. उपयोग नाही. आम्ही लोक प्रॅक्टिकल आहोत. कम्युनिकेशन इज द की. बाकी, हीच भाषा वापरा, शब्द असाच लिहा, असाच उच्चारा हा हट्ट कशाला हवा?’’
‘‘हट्ट करत नाही. आठवण देतो. आपल्या संचिताची. आम्ही तुमच्या पिढीला बाकी फार काही दिलं नसेल एक वेळ, पण हे संचित चोख दिलं.’’
‘‘थँक्स. आता मी माझं काम करू?’’
‘‘कर की. पण जाता जाता एक सांग. कम्युनिकेशन इज द की असं म्हणतोयस ना? त्यावरून विचारतो. कंदमुळं खाऊनही जगता येतं. तरीही आपण नाना पदार्थानी जिभेचे चोचले का पुरवतो? पोट भरणं ‘इज द की’ असं तिथे का नाही म्हणत?’’
‘‘त्याचा इथे काय संबंध?’’
‘‘आहे तर! खुणांची भाषाही पुरू शकेलच की. तरीही आपण सुंदर-नादमय शब्द वापरतो, शब्दांची लय- गती-लडिवाळपणा घ्या. सगळ्याची मजा घेतो. घेतो ना? मग पोरांना तिची चव का नाही द्यायची? निदान सहजपणे, येता-जाता जमेल तेवढी तरी? का तिची काही गरजच वाटत नाही तुम्हाला?’’ आजोबा पोटतिडकीने म्हणाले. नातवाच्या बापापर्यंत ते पोचलं नाही. त्याने मध्येच मोबाइलवरचा रिमाइंडर पाहिला, घडय़ाळ पाहिलं आणि घाईने खुर्चीतून उठून मुलाकडे जात पुकारा केला, ‘‘अर्णव, अरे आजपासून तुझा ‘फोनेटिक्स’चा क्लास सुरू होणार आहे हे विसरलास का? एवढी फी भरून एवढा भारी क्लास लावलाय आपण.. यू विल हॅव टू स्टार्ट इमिजिएटली.’’
‘‘मी नाही विसरलो होतो पपा.. पटकन् टिफिन ईट करतो आणि जातो.. नाही तर ममाचा राग पडेल माझ्यावर..’’ पोरगं धावत बाहेर येत म्हणालं. आजोबा त्याचं मराठी सुधारण्याच्या फंदात न पडता एकटक त्याच्याकडे बघत बसले. इतक्या लहान वयात ‘फोनेटिक्सचा’ क्लास का लावतात हे त्यांना समजत नव्हतं, पण एक पक्कं जाणवत होतं. जे आपलं, आपल्या हक्काचं, जवळचं, आश्वासक आहे, त्याच्याकडे उपेक्षेनं बघायचं आणि दूरस्थ- दुष्प्राप्य गोष्टींच्या मागे लागायचं असं काही तरी या काळाचं, पिढय़ांचं वळण आहे. वळण म्हणावं का ‘द की’ म्हणणं जास्त प्रभावी ठरेल हे मात्र त्यांना ठरवता येईना.    
 mangalagodbole@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2013 1:01 am

Web Title: debate on marathi between two generation
टॅग Chaturang
Next Stories
1 सिल्डेनाफिल? नको गाफील!
2 कधी संपलं हे सारं?
3 एक लढा ‘चेटकिणी’विरु द्धचा..
Just Now!
X