तुम्ही नोकरी करत असाल वा छोटा-मोठा उद्योग, आर्थिक व्यवस्थापन हा त्यातला सर्वात कळीचा भाग. पैशांचे नियोजन, खर्च करणे, गुंतवणूक करणे आणि त्याचबरोबरीने काही वेळा कर्ज घेणे हेही ओघाने आलेच. स्त्रियांच्या कर्ज व्यवस्थापनाचा आढावा घेत, सनदी लेखापाल आणि गुंतवणूक सल्लागार तृप्ती राणे यांनी कर्जदार स्त्रियांसाठी दिलेला हा सल्ला..

गेल्या काही वर्षांमध्ये व्यवसाय आणि नोकरी या दोन्ही ठिकाणी स्त्रियांची टक्केवारी वाढलेली आहे. शिक्षण, नोकरीची संधी, घरातील मोकळे वातावरण, नोकरी/व्यवसाय करणाऱ्या स्त्रीकडे बघण्याचा बदलत चाललेला पारंपरिक दृष्टिकोन, मुळात स्त्रीचा स्वत:कडे बघण्याचा बदलत चाललेला दृष्टिकोन आणि त्यामुळे वेगवेगळी आव्हाने स्वीकारण्याचं धाडस तिच्यात येत असल्याने आजच्या स्त्रीकडे स्वत:ची आर्थिक मालमत्ता तयार होऊ लागली आहे. कमावणे, खर्च करणे, गुंतवणूक करणे आणि त्याच बरोबरीने कर्ज घेणे या सगळ्या गोष्टींमुळे आजची स्त्री ‘पैशांत खेळू लागली’ आहे.

A 16 year old girl was raped by five people Nagpur
नागपूर: १६ वर्षीय मुलीवर पाच जणांचा बलात्कार
india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा
contract farming
शेतमजूर ते शेतकरी!
Navi Mumbai parking problem
नवी मुंबई : वाढत्या वाहनसंख्येमुळे पार्किंग समस्या अधिक जटील

तीस-चाळीस वर्षांपूर्वी बहुसंख्य तरुणी वा स्त्रिया फक्त पैशांची गरज म्हणून नोकरी करायच्या, परंतु आज स्वत:चे वेगळे अस्तित्व सिद्ध करण्यासाठीसुद्धा अनेक जणी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले पाय रोवत आहेत. त्यासाठी परदेशी जाणे असो किंवा काही काळ कुटुंबापासून लांब एकटय़ाने राहाणेसुद्धा पत्करतात. काही जणी तर त्याही पुढे जाऊन लग्न आणि मूलसुद्धा नाकारतात. आज सर्वच क्षेत्रांत अनेक जणी आपल्या पायांवर खणखणीतपणे उभ्या राहिलेल्या दिसत आहेत. त्यात सरकारी धोरणांमुळे स्त्रीला नोकरी/व्यवसाय करणे आणि त्यातून संपत्ती निर्माण करणे शक्य होते आहे. उदाहरण म्हणजे नोकरदार स्त्रीला दिली जाणारी सहा महिन्यांची प्रसूती रजा, लहान मुलांसाठी कार्यालयांमध्ये पाळणाघराची सोय, व्यवसायासाठी किंवा घर घेण्यासाठी स्वस्त कर्ज आणि महाराष्ट्रामध्ये घर घेण्यासाठी मुद्रांक शुल्कात सवलत! याशिवाय वर्क फ्रॉम होमचा पर्याय मिळाल्याने कुटुंब सांभाळत नोकरी करणाऱ्याही अनेक स्त्रिया आपल्याला माहीत असतील. एकंदर स्त्रियांच्या आर्थिक सुबत्तेसाठी सध्या तरी आपल्या देशात चांगलं वातावरण तयार झालेलं आहे. अर्थात आर्थिक व्यवहार आला, की अनेकदा कर्जाचाही त्यात समावेश होतो. काही दिवसांपूर्वीच ‘लोकसत्ता’मधलीच एक बातमी वाचनात आली, ती म्हणजे, स्त्री कर्जदारांची टक्के वारी गेली सहा वर्षे २१ टक्के  दराने वाढत आहे. अगदी ‘करोना’काळातदेखील स्त्रियांकडून साडेचार कोटी नवीन कर्ज-खाती उघडली असल्याची माहिती त्यात सांगितली गेली. नवीन कर्जामध्ये बहुतेक कर्जे गृहोपयोगी खरेदी आणि वैयक्तिक स्वरूपातील आहेत. ‘सिबिल ट्रान्सयुनिअन’ या संस्थेने नुकत्याच जाहीर केलेल्या माहितीनुसार आर्थिक प्रगती आणि सरकारी धोरणांमध्ये मिळालेल्या सवलतींमुळे आज स्त्रियांना कर्ज घेणे शक्य होत आहे. याशिवाय कार्यालयांमध्ये पुरुषांच्या व स्त्रियांच्या प्रमाणात समतोल राखण्यासाठी आणि अनेक ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण वाढवण्यासाठी अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात तर स्त्रिया त्यांची आर्थिक बाजू आणखीनच सक्षम करू शकतील आणि म्हणूनच संपूर्ण आर्थिक नियोजन आणि त्यातील एक भाग म्हणजे कर्ज व्यवस्थापन याबाबत स्त्रियांनी सजग राहायलाच हवे.

कर्ज केव्हा, कशासाठी आणि किती या सगळ्या गोष्टींचा विचार योग्यरीत्या आणि योग्य वेळी झाला तर त्यातून आर्थिक सुबत्ता नक्कीच येईल. आजच्या लेखातून आपण स्त्रियांच्या कर्ज व्यवस्थापनाचा आढावा घेणार आहोत. कर्ज दोन गोष्टींकरिता घ्यावे- गरजेसाठी आणि गुंतवणुकीसाठी.

पहिल्यांदा आपण गरजेचा विचार करू. अडीनडीला लागणारे कर्ज हे कमी काळासाठीच असावे. शक्यतो, एक-दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी हे कर्ज नसावे. कारण याचा व्याजदर जास्त असतो. त्यामुळे वेळीच, किंबहुना वेळेआधी परत केलेले उत्तम. कधी कधी घर घेण्यासाठीही कर्ज घ्यावे लागते. जर घर ही गरज असेल, तर हे कर्ज स्त्रियांना थोडय़ा कमी व्याजदरावर दिले जाते; परंतु इथे स्त्री ही त्या घराची मालक असावी लागते. दुसरा मुद्दा गुंतवणुकीचा. त्यासाठीसुद्धा कर्ज घेता येते. यात घर घेताना किंवा एखादे दुकान विकत घेताना त्यातून पुढे मासिक मिळकत आणि स्थावर मालमत्तेची वाढ हे दोन्हीही होऊ शकते. स्त्रिया कर्ज घेऊ शकतात; परंतु इथे गुंतवणूक दीर्घ काळाची असते. त्यामुळे त्यातून मिळणाऱ्या फायद्याचे गणित आधीच मांडणे गरजेचे, नाही तर कर्जाचे व्याज फेडल्यानंतर काहीच हातात आले नाही अशी अवस्था होईल.

व्यवसायासाठीसुद्धा स्त्री कर्ज घेऊ शकते. आपल्याकडे छोटे, लघु व मध्यम उद्योग आणि त्यातही स्त्रियांनी चालवलेले उद्योग यांना सरकार अनेक सवलती देते. त्या आर्थिक सवलतींमध्ये कमी व्याजाचे कर्ज येते. अशी कर्जे व्यवसाय चालू करताना आणि पुढे वाढवतानाही मिळू शकतात. त्यामुळे जर एखाद्या स्त्रीकडे नवीन व्यवसाय सुरू करून आयुष्यात पुढे जायची जिद्द असेल तर तिने नक्कीच सरकारी योजनांचा फायदा घ्यावा (निती आयोग- वुमन आंत्रप्रेन्युअरशिप प्रोग्राम).

इथे क्रेडिट कार्ड कर्जाचा आवर्जून उल्लेख करायला हवा. क्रेडिट कार्ड आणि ऑनलाइन शॉपिंग म्हणजे अजगराचा विळखाच असतो, याचे भान प्रत्येकाने ठेवायला हवे. अनेकदा गरज नसताना आपल्यातील अनेक जणी ऑनलाइन शॉपिंग करतात आणि मग क्रेडिट कार्डने ‘ईएमआय’ पद्धतीने त्या ते पैसे परत करतात आणि मग पगारातून प्रत्येक महिना भागवताना कसरत होते. परंतु इथे एक लक्षात घेण्याजोगी महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे सतत क्रेडिट कार्डमार्फत ईएमआय भरल्याने तुमचा क्रेडिट स्कोर’ खालावतो. शिवाय ‘क्रेडिट कार्डावरील व्याज दरही खूप महाग असतो. त्यातून जर तुम्ही गरजेची गोष्ट विकत घेत असाल तर ठीक. नाही तर उगीच काही तरी गोळा होत राहते, पैसे वाया जातात, गुंतवणूक होत नाही आणि ऐन गरजेला कर्ज घ्यायची वेळ आली तर व्याज दर द्यावा लागू शकतो.

कधी कधी तर असेसुद्धा लक्षात येते की, स्त्रियांसाठी व्याज दर कमी असल्याने त्यांच्या नावाखाली कर्ज घेतले जाते; पण मिळालेल्या पैशांचा उपयोग मात्र तिचा नवरा करत असतो, तर अशा वेळी थोडे खबरदार राहाण्याची गरज आहे. जर नवऱ्याने कर्ज फेडले नाही तर कायद्यातील तरतुदींप्रमाणे स्त्रियांनादेखील कोर्ट-कचेऱ्यांच्या खेटा घालाव्या लागतील. कर्जवसुलीसाठी त्यांची इतर मालमत्तासुद्धा विकली जाऊ शकते. त्यातच आपल्याकडे घटस्फोटांचेही प्रमाण वाढत चालले आहे. तेव्हा संसाराची घडी फिस्कटल्यानंतर जर नवऱ्याने कर्ज फेडले नाही किंवा पुरेशी पोटगी दिली नाही तर मात्र त्याचे भयंकर परिणाम त्या बाईला भोगायला लागू शकतात.

कर्ज घ्यायच्या आधी प्रत्येक स्त्रीने काही प्रश्न स्वत:ला विचारायला हवेत –

मला कर्जाची खरेच गरज आहे का?

घेतलेले कर्ज मी वेळेवर फेडू शकेन का?

या कर्जातून मला नक्की काय आणि किती

फायदा होतोय?

जर काही कारणास्तव मला पुढे नोकरी सोडावी लागली किंवा व्यवसाय बंद करावा लागला तर मी कर्ज कसे फेडणार आहे?

लग्नाआधी घेतलेल्या कर्जाचे लग्नानंतर काय होईल?

कर्जाचा हप्ता माझ्या नियमित मिळकतीच्या ३० ते ४० टक्कय़ांपेक्षा जास्त आहे का?

कर्ज जर वेळेवर परत करता आले नाही तर काय होऊ शकते?

मी कुणाच्या कर्जाच्या परतफेडीची हमी तर दिली नाही ना? कारण जर मूळ कर्जदाराने परतफेड केली नाही, तर ते कर्ज मला परत करावे लागेल. याचा माझ्या आर्थिक परिस्थितीवर कोणता दुष्परिणाम होईल?

कर्ज घ्यायचेच असेल तर त्या स्त्रीला तिच्या मासिक उत्पन्नाची माहिती, तिचे मागील दोन ते तीन वर्षांचे आयकर विवरण आणि सहा महिन्यांतील बँक व्यवहारांची माहिती वित्तीय संस्थेला द्यावी लागते. जर गृह कर्ज असेल तर घराच्या खरेदी संदर्भातील सगळी कागदपत्रेही द्यावी  लागतात. जर कर्ज व्यवसायासाठी असेल तर त्याची माहिती, कर्जाची गरज आणि भविष्यातील मिळकत व फायद्याचा तपशील द्यावा लागतो. शिवाय काही वेळा कर्जासाठी इतर मालमत्तासुद्धा तारण ठेवावी लागते. कर्ज घेताना अनेकदा मूळ प्रती द्याव्या लागतात. तेव्हा सर्व कागदांच्या छायाप्रती (फोटो कॉपीज्) प्रत्येक स्त्रीने स्वत:कडे किंवा एखाद्या विश्वासू व्यक्तीकडे व्यवस्थित सांभाळून ठेवाव्यात.

कर्ज घ्यायच्या आधी विमा पुरेसा आहे का हेसुद्धा तपासावे, कारण जर कर्ज घेणाऱ्या स्त्रीला जर काही झाले (मृत्यू, अपंगत्व किंवा दीर्घ आजार), तर कर्जाच्या परतफेडीची जबाबदारी तिच्या कुटुंबावर पडेल. विम्यामध्ये मुदत विमा, आरोग्य विमा आणि अपघात विमा यांचा त्रिवेणी संगम असल्यास जोखीम कमी करता येऊ शकते.

कर्ज घेतल्यानंतर ते वेळेवर किंवा वेळेच्या आधी परत करणे हे फायद्याचे आहे. शिवाय कर्जाची परतफेड झाल्यानंतर वित्तीय संस्थेकडून सगळे कागद वेळेवर मिळवण्याकडेसुद्धा लक्ष ठेवावं. ‘नो डय़ुज सर्टिफिकेट’ हक्काने मागून घेऊन ते नीट जपून ठेवावे.

कर्जाच्या व्याजाचा आयकर वाचवण्यासाठी फायदा होतो. त्याबाबतीतल्या तरतुदी नीट समजून घ्याव्यात. त्यासाठी कोणती कागदपत्रे, कधीपर्यंत सांभाळावी लागतील किंवा कशा प्रकारे हिशोब ठेवावे लागतील हे जाणून घेतल्याने कर्जाचा बोजा थोडा कमी होऊ शकतो.

मुळात प्रत्येक स्त्रीने, मग ती नोकरी करत असो की व्यवसाय किंवा पूर्णवेळ गृहिणी असो, तिने आर्थिक व्यवस्थापन हे केलेच पाहिजे. आजची स्त्री आर्थिकरीत्या पुढारलेली आहे; परंतु व्यवहारज्ञान सगळ्यांनाच असते असे नाही. आर्थिक बाबतीत नुसता दुसऱ्यावर विश्वास ठेवण्याचे दिवस आता राहिले नाहीत. तेव्हा स्वत:च्या पैशांची जबाबदारी आणि त्याबाबतचे निर्णय घेण्यासाठीसुद्धा स्त्रियांना सज्ज व्हायला हवे. वरील सगळ्या गोष्टींबाबत जर प्रत्येक स्त्री जागरूक झाली तर ती तिची स्वत:ची आणि बरोबर कुटुंबाची आणि समाजाचीसुद्धा आर्थिक प्रगती होईल.

सरतेशेवटी एवढेच म्हणेन, ‘जिच्या हाती आर्थिक जबाबदारी, तिने घ्यावी खबरदारी. गुंतवणूक, कर आणि कर्ज व्यवस्थापन करून आर्थिक आयुष्यात घ्यावी उंच भरारी.’

trupti_vrane@yahoo.com