नीरजा

आज परिस्थिती अशी आहे, की आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाह होत असले तरीही ते कोणत्या जाती-धर्मात होताहेत याचाही विचार करायला हवा. भारतात असलेल्या प्रत्येक धर्मातील लोक (काही सन्माननीय अपवाद वगळता) आंतरधर्मीय विवाह करण्याच्या विरोधातच असतात. विवाहविषयक जाहिरातींवर एक नजर टाकली तर लक्षात येतं, की मॅट्रिमोनिअल साइट्सही जातीप्रमाणे विभागल्या गेल्या आहेत. आंतरजातीय विवाह करण्याची तयारी असलेल्या मुलांनी वा मुलींनी दिलेल्या जाहिरातीत ‘कोणत्याही जातीचा मुलगा किंवा मुलगी चालेल.’ असं म्हणताना शेवटी ‘एससी, एसटी क्षमस्व’ अशी टीप टाकलेली असते.

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
arvind kejriwal
अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड

चाळीस वर्षांपूर्वी माझ्या मोठय़ा बहिणीनं तिचं एका मुलावर प्रेम असल्याचं घरी सांगितलं. माझ्या आई-बाबांनी लगेचच होकार देऊन तिचं लग्न ठरल्याचं नातेवाईकांना सांगितलं. त्यावेळी माझ्या मोठय़ा मामानं काढलेले उद्गार मी आयुष्यात विसरणार नाही. ‘‘तुला काय आपल्या जातीतली मुलं मिळाली नाहीत का?’’ असं त्यानं आईवर चिडून रागारागात विचारलं होतं. तिच्यावर तो ज्या पद्धतीनं चिडला होता ते पाहून त्यावेळी मीही भयंकर अस्वस्थ झाल्याचं मला चांगलंच आठवतंय. एखाद्या मुलीवर अथवा मुलावर प्रेम करताना तिची किंवा त्याची जात विचारून कोणी प्रेम करत नाही हे माहीत असूनही अशी बातमी कळल्यावर अनेक पालकांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा ‘मुलगा किंवा मुलगी कोणत्या जातीचे आहेत?’ हा पहिला प्रश्न असतो आणि तो किंवा ती आपल्या जातीचा किंवा जातीची नसेल तर आपल्या साऱ्या अस्तित्वालाच अपमानित केल्याची आणि आव्हान दिल्याची भावना त्यांच्या मनात जागी होते.

आज या गोष्टीची आठवण येण्याचं कारण म्हणजे सुप्रसिद्ध भाषातज्ज्ञ आणि ‘दक्षिणायन’ चळवळीचे सर्वेसर्वा डॉ. गणेश देवी यांनी तरुण मुलांना केलेलं आवाहन. लग्नाचा निर्णय घेताना जे जात-धर्माचा बिलकूल विचार करणार नाहीत त्या तरुण-तरुणींनी त्यांच्याशी संपर्क साधावा, असं सांगून दोन ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर या नऊ दिवसांत रोज कमीत कमी शंभर तरुणांनी आपल्या नावाची नोंदणी करावी, असं आवाहन डॉ. गणेश देवी यांनी केलं. दिवसभरात हा आकडा शंभरच्या वर गेला तरच रात्रीचं जेवण घ्यायचं अन्यथा संपूर्ण दिवस केवळ पाणी पिऊन उपोषण करण्याचा संकल्पही डॉ. देवी यांनी केला. काहींना हा वेडेपणा वाटण्याची शक्यता आहे. ‘आज कोण कुठं जात-धर्म पाळतंय?’ असं म्हणत आपण या माणसाला वेडय़ात काढण्याची शक्यता आहे. महात्मा गांधींनीदेखील सुरुवातीला वेडेपणाचे वाटणारे काही संकल्प केले होते. पण पुढील काळात त्याच संकल्पांची एक मोठी चळवळ तयार झाली होती. कदाचित म्हणूनच डॉ. देवींनी दोन ऑक्टोबर हा दिवस या कामाची सुरुवात करण्यासाठी निवडला असावा.

खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळात प्रेम विवाहांची आणि काही मिश्र विवाहांची सुरुवात झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळात तर अशा विवाहांचं प्रमाण वाढलंही होतं. आज मुंबईसारख्या शहरात तर अनेक प्रेमलग्नं किंवा ठरवून केलेली लग्नंही जातीपातीचा विचार न करता होताना दिसताहेत. तरीही देवींना हा संकल्प करावासा वाटला याचं कारण शोधायला गेलं तर लक्षात येतं, की हे प्रमाण म्हणावं तसं वाढलेलं नाही. सत्तर वर्षांच्या काळात जातीचे दोर सलावले, की अधिकाधिक पक्के झाले याचा विचार केला तर थोडं मागं जावं लागेल आणि आपल्या समाजाच्या मानसिकतेच्या तळाशीही पोचावं लागेल.

सत्तर-ऐंशीच्या दशकात काही लोकांनी जाती-धर्माच्या भिंती तोडाव्यात म्हणून ठरवून असे विवाह केले होते. साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या उक्तीचा वारसा सांगणाऱ्या ‘राष्ट्र सेवा दला’त तर आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांचं प्रमाण खूपच होतं. त्या काळात अनेक ‘उच्चवर्णीय’ मुला-मुलींनी दलित मुला-मुलींशी विवाह केले होते आणि एखाद्दुसरा अपवाद वगळता ही लग्नं यशस्वीही झाली होती. पण तरीही लोकांच्या मनात अशा लग्नांविषयी अनेक प्रश्न होते. ‘जातींचेही काही संस्कार असतात, वंशपरंपरागत ते चालत आलेले असतात, एवढंच नाही तर आपल्या डीएनएमध्येही ते रुतून बसलेले असतात. त्यामुळे अशी लग्नं यशस्वी होत नाहीत.’ असं अनेकांना वाटत होतं आणि आजही वाटतं. अलीकडेच माझ्या एका मत्रिणीनं विजय तेंडुलकरांच्या ‘कन्यादान’ या नाटकाचं उदाहरण देऊन हे किती खरं आहे याचा पुरावा देण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्यासारख्या तेंडुलकरांच्या नाटकांच्या प्रेमात असलेल्या चाहत्याची पंचाईत झाली होती.

खरं तर तेंडुलकरांच्या जवळजवळ सगळ्याच नाटकांतून त्यांनी मानवी नातेसंबंधांतील कौर्यावर तसंच स्त्री-पुरुष नात्यातील हिंसेवरही प्रकाश टाकला होता. ‘शांतता कोर्ट चालू आहे’मधल्या बेणारे बाईंवर तुटून पडणाऱ्या आणि हिंसेत आनंद शोधणाऱ्या पात्रांची जात तेंडुलकरांनी दाखवली नव्हती. कारण ते नाटक बोलत होतं ते माणसातल्या प्रवृत्तीविषयी. त्यांच्या अनेक नाटकांत नातेसंबंधांतलं हे सत्ताकारण अतिशय प्रभावीपणे आलं आहे. पण ‘कन्यादान’सारख्या त्यांच्या नाटकानं या नातेसंबंधांतील हिंसेला ‘जेनेटिक’ करून टाकलं आणि गोंधळ निर्माण झाला. पुरुषाच्या मनात स्त्रीचं असलेलं स्थान, स्वत:बद्दल असलेली वर्चस्ववादाची भावना, ही कोणा एका जातीतल्या अथवा धर्मातल्या पुरुषात असते असं नसतं तर ती सर्वसाधारणपणे जगभरातील जवळजवळ साऱ्याच पुरुषांत असते. मग तो श्वेतवर्णीय असो की कृष्णवर्णीय असो, तो शिया असो की सुन्नी, तो कॅथलिक असो की प्रोटेस्टंट, तो ब्राह्मण असो की क्षत्रिय अथवा दलित. ‘कन्यादान’मधला नायक हा या पुरुषी व्यवस्थेचा बळी होता. पण त्याचं पुरुषी असण्यापेक्षा त्याचं दलित असणं अधोरेखित झालं आणि त्याचं वागणं हा ब्राह्मणी व्यवस्थेवरचा सूड असल्याचं मांडलं गेलं. त्यामुळे आजही आपल्यापेक्षा खालच्या जातीतला मुलगा किंवा मुलगी घरात आली आणि काही चुकीचं वागली तर ‘शेवटी जातीवरच जाणार’ असं लोक म्हणू लागले. आधुनिकतेचा मुखवटा कितीही धारण केला आणि जात धर्मापलीकडे गेलो आहोत असं दाखवलं गेलं तरी लोकांच्या मनातली जात जातेच असं नाही. अशा लोकांना या नाटकानं आपला गैरसमज बळकट करण्याचं कारण दिलं.

अर्थात, हा परिणाम तेंडुलकरांच्या नाटकामुळे झाला असं मी म्हणणार नाही. नाटक न वाचणारे आणि न पाहाणारे अनेक लोक होते आणि आहेत. ते जात, कूळ, गोत्र वगरेवर विश्वास ठेवणारे होतेच आणि आहेतही. त्यांची मानसिकता आजही बदललेली नाही. ही सगळीच माणसं वर्ण, वंश, धर्म अथवा जात यावर आधारित कोणत्याही प्रकारचा संकर अमान्य असलेली आणि या पुरुषसत्ताक संस्कृतीत वाढलेली होती. त्यांना कोणत्याही प्रकारचा संकर अमान्य असल्याने अशा विवाहांना ते परवानगी देणं शक्य नव्हतं. त्यामुळे पुढे मंडल आयोग आल्यानंतर आणि बाबरी मशीद पाडल्यानंतर जाती-धर्माच्या बाबतीत लोक अधिकाधिक कडवे होत गेले आणि त्याचा परिणाम या लोकशाही देशातील राजकारणावर आणि समाजकारणावरही झाला.

आज परिस्थिती अशी आहे की, आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाह होत असले तरीही ते कोणत्या जाती-धर्मात होताहेत याचाही विचार करायला हवा. भारतात असलेल्या प्रत्येक धर्मातील लोक (काही सन्माननीय अपवाद वगळता) आंतरधर्मीय विवाह करण्याच्या विरोधातच असतात. अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील असे विवाह धर्माचा विचार न करता होतात. अनेक पालक, अगदी उदारमतवादी पालकही, ‘जाती-धर्मानं आम्हाला काहीच फरक पडत नाही.’ असं म्हणत असले तरी शक्यतो मुसलमान नको आणि दलितही टाळावा, असं अप्रत्यक्षरीत्या सूचित करून जातात. विवाहविषयक जाहिरातींवर एक नजर टाकली तर लक्षात येतं, की मॅट्रिमोनिअल साइट्सही जातीप्रमाणे विभागल्या गेल्या आहेत. आंतरजातीय विवाह करण्याची तयारी असलेल्या मुलांनी वा मुलींनी दिलेल्या जाहिरातीत ‘कोणत्याही जातीचा मुलगा किंवा मुलगी चालेल.’ असं म्हणताना शेवटी ‘एससी, एसटी क्षमस्व’ अशी टीप टाकलेली असते.

आपल्या समाजात जात आणि धर्म यांविषयी जे समज-गैरसमज आहेत ते त्या त्या जाती व धर्माच्या रोजच्या जगण्याविषयीच्या काही धारणांतून आलेले आहेत. या जगण्यात तथाकथित संस्कारांना तर फारच महत्त्व आहे. अनेक लोकांच्या ज्या संस्कारांच्या कल्पना आहेत त्यात उच्चवर्णीयांच्या घरात झालेले संस्कार हे अत्यंत उच्च दर्जाचे असतात असाही एक गैरसमज आहे. अशा लोकांचा शेजार असावा आणि अशा घरात आपली मुलगी किंवा मुलगा पडावा असं पालकांना वाटत असतं. मध्यंतरी आमचे एक गुजराती मित्र सांगत होते ‘आमच्या चाळीत सगळेच ब्राह्मण असल्यानं संध्याकाळच्या वेळी प्रत्येकाच्या घरून ‘‘शुभंकरोती कल्याणम.’’ ऐकायला यायचं. माझ्या वडिलांनी म्हणूनच ही चाळ सोडली नाही. आम्ही शिकलो सवरलोच पण आमच्यावर खूप चांगले संस्कार झाले होते.’ तेव्हा मला माझी चाळ आठवली. माझ्या चाळीत तर एखाद्दुसरं कुटुंब ब्राह्मणाचं होतं. बाकी पारशी, शीख, बौद्ध, मुस्लीम, ख्रिश्चन, मराठा, भंडारीच नाही तर अगदी भटके विमुक्तही राहात होते. यांतील अनेकांच्या घरात संध्याकाळच्या वेळी मी ‘शुभंकरोती कल्याणम.’चे स्वर ऐकलेले आहेत. त्यानंतर म्हटलेले पाढे आणि त्यानंतर अभ्यासाला बसलेली मुलं असं चित्र तेव्हा घराघरांतून दिसायचं. अभ्यासाच्या पुस्तकांबरोबरच सुटीमध्ये साने गुरुजींपासून ते पु.ल. देशपांडेंपर्यंतचे सारे लेखक वाचणारी मुलं चाळीच्या गच्चीवर बसलेली अनेकदा दिसायची. एकमेकांकडून अनेक चांगल्या गोष्टी शिकण्याची आस असलेली ही माणसं शिक्षणाचं महत्त्व जाणत होतीच, पण त्याबरोबरच पुस्तकांतून होणाऱ्या संस्कारांचंही महत्त्व जाणत होती. आमच्या चाळीत राहाणाऱ्या दोन-तीन दलित कुटुंबांप्रमाणेच इतर उच्चवर्णीय कुटुंबांच्या घरात गांधी-नेहरूंबरोबरच साने गुरुजी आणि बुद्ध-आंबेडकर यांचेही फोटो होते. त्यातून उमटलेला करुणेचा स्वर आम्हा सगळ्यांपर्यंत नेमकेपणानं पोचत होता. ‘शुभंकरोती’बरोबरच ‘अत्त दीप भव’ हे शब्द आमच्यावर संस्कार करत होते.

सांगायचं तात्पर्य हेच, की माणूस कोणत्या जातीत वा धर्मात जन्माला येतो यावरून त्याचं चारित्र्य ठरत नाही. तर तो कसा विचार करतो यावरून चारित्र्य ठरत असतं. वंश, कूळ, गोत्र पाहून केलेल्या किती विवाहांत आलबेल आहे आणि जात-धर्मापलीकडे जाऊन केलेल्या प्रेमलग्नात नेमकं काय बिनसलं आहे याचा हिशेब मांडला तर लक्षात येतं, की शेवटी जोडीदार कोणत्या जातीचा अथवा धर्माचा आहे किंवा कोणत्या कुळातला किंवा गोत्राचा आहे यापेक्षा तो किती विवेकी आहे, किती समंजस आहे यावर नातं अवलंबून असतं. ‘कन्यादान’ मधल्या नायिकेचा जोडीदार विवेकी नव्हता. तसा असता तर त्याच्या जातीनं काहीच फरक पडला नसता.

डॉ. गणेश देवी यांनाही कदाचित हेच अधोरेखित करायचं असावं. विशेषत: आज या अशा प्रकारच्या जाती-धर्मातील तेढींवर पोसल्या गेलेल्या पिढीला बाहेर काढायचं असेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला जात-धर्मविरहित समाज घडवायचा असेल तर अशा आवाहनांची गरज आहे. बाबासाहेबांनीही हे आवाहन केलेलं होतंच. अतिशय साध्या सोप्या वाटणाऱ्या या आवाहनामागे कोणता इतिहास लपलेला आहे याचा आपण विचार करायला हवा. कारण तुमच्या मनात, शरीरात, इतिहास-भूगोलात, समाजकारणात, राजकारणात, साऱ्या जगण्यातच दबा धरून बसलेले हे जात आणि धर्म तुमच्या पायाखालची जमीन केव्हाही काढून घेऊ शकतात हे आपल्या आजही लक्षात येत नाही. थोडा विचार केला तर डॉ. देवींच्या आवाहनाला आजची तरुण पिढी नक्कीच सकारात्मक प्रतिसाद देईल आणि स्वत:ला या जातींनी दिलेल्या अहंगंडाच्या तसेच न्यूनगंडाच्या दलदलीतून बाहेर काढेल.

neerajan90@yahoo.co.in

chaturang@expressindia.com