शंकरदेव यांनी भक्तीचं मोठं रसाळ विवेचन केलं आहे. त्यांच्या संकलित कीर्तनांमधून त्यांनी पुन:पुन्हा भक्तीचं मोठेपण सांगितलं आहे. भक्ती प्रत्यक्षात येते ती उपासनेतून, पूजेतून, व्रतवैकल्यांतून, तीर्थाटनातून. पण ही तर भक्ती प्रकट करण्याची माध्यमं आहेत. खरी भक्ती या सर्वापलीकडे आहे..

ता लेवार सरदारांचं घराणं, वाडवडील फार मातबर प्रशासक. साक्षात गंधर्वानं पृथ्वीवर जन्म घेतला असावा, अशी ख्याती मिरवणारे संगीतज्ञ असे प्रत्यक्ष वडील. शंकरदेवांचा वारसा खरोखर खूप समृद्ध होता. आसाममधल्या शिरोमणी भुइया कुळात पंधराव्या शतकात जन्मलेले शंकरदेव. घर फार वैभवशाली होतं, पण जेमतेम वर्षांचा झाल्यावर हा मुलगा आई-वडिलांनी परकीय आक्रमणाच्या भीतीनं जंगलात राहून वाढवला आणि त्याचे आई-वडील अकाली गेल्यानंतर त्याच्या आजीनं त्याचं पालनपोषण केलं. शिवशंकराच्या कृपेनं तो जन्माला आला म्हणून त्याचं नाव शंकर ठेवलं गेलं होतं.
महेंद्र कंदली यांच्या पाठशाळेत त्याचं शिक्षण झालं. अतिशय कुशाग्र बुद्धी आणि असाधारण प्रतिभा असलेल्या या मुलाचं भविष्य जणू त्याच्या गुरूनं आधीच जाणलं. नुसतं शंकर नाव होतं त्याचं. गुरूनंच त्याचा शंकरदेव असा नामविस्तार केला.
वयाच्या एकविसाच्या वर्षी शिक्षण पूर्ण करून त्यानं शिरोमणी भुइया हे आपल्या घराण्याचं पारंपरिक पद स्वीकारलं. पण तो त्या पदाचा अधिकार गाजवण्यात फारसा रमला नाही. संसारातही रमला नाही. पत्नीच्या अकाली मृत्यूनंतर तो घराबाहेर पडला आणि वाराणसी-वंृदावनापासून थेट रामेश्वपर्यंत त्यानं तीर्थयात्रा केली. या भ्रमंतीतच त्याला देशाच्या विशालतेची, विविधतेची आणि त्यातूनच ओवलेल्या ईश्वरभक्तीच्या अखंड एकात्म सूत्राची जाणीव झाली.
बारा र्वष हा काळ थोडा नव्हे. बारा वर्षांच्या देशाटनानं समृद्ध झालेला शंकरदेव घरी परतला आणि आजीच्या आग्रहासाठी पुन्हा विवाहित गृहस्थ झाला. पण आता संसार हा त्याच्यासाठी भौतिक कर्तव्याचा एक भाग झाला होता. त्याचं लक्ष केंद्रित झालं होतं ते अंतर्यामीच्या आध्यात्मिक अनुभवांवर. आपल्या जमातीची ब्रह्मपुत्रेच्या दक्षिणेकडे असलेली सत्ता त्यानं उदारपणे संपवली. कछारी जमातीशी असलेला पूर्वापारचा संघर्ष संपवला आणि तो ब्रह्मपुत्रेच्या उत्तरेकडे निघून गेला. हे वर सरकणं केवळ भौगोलिक नव्हतं. ते समकालीन परिस्थितीच्या विपरितातून वर उठणं होतं आणि ऐहिकाला खाली ठेवून वर खऱ्या उन्नत अशा पारमार्थिक जीवनाकडे जाणंही होतं.
शंकरदेव शिवप्रसादानं जन्मलेले संतकवी. पण ते आयुष्यभर रमले मात्र कृष्णभक्तीत. आसाममधलं राजकीय आणि सामाजिक जीवन त्या काळी देशातल्या इतर अनेक लहान-मोठय़ा प्रदेशांप्रमाणेच अस्थिर होतं. चार-चार राजवंश आसामच्या वेगवेगळ्या भूप्रदेशांवर वर्चस्व ठेवून होते. विलास आणि भोगवाद वाढीला लागला होता. सत्ता आणि संपत्ती यांच्यासाठी सतत लहान-मोठे संघर्ष करण्यातच प्रजेची सारी शक्ती लागलेली होती. नाना पंथ, नाना उपासना आणि विशेषत: शाक्त पंथीयांच्या उपासना धर्मक्षेत्रात गाजत होत्या आणि त्यांच्यातील विकृतीही मोठय़ा प्रमाणावर वाढली होती.
अशा वेळी शंकरदेवांनी आपला सरळ, साधा एकशरणिया संप्रदाय प्रवर्तित केला. राहत्या घराबाहेर एक छोटासा मंडप त्यांनी बांधला होता. तिथं कीर्तनं होत, धर्मचर्चा होत, आख्यानं-प्रवचनं होत आणि सांप्रदायिक मेळावेही होत. शूद्रातिशूद्रांपर्यंत गीतेचं तत्त्वज्ञान पोहोचवण्यासाठी भावार्थ दीपिकेचा वाग्यज्ञ मांडणाऱ्या ज्ञानदेवांची आठवण देणारं काम सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात शंकरदेवांनी आसाममध्ये केलं. ‘चांडालांपर्यंत सगळेच हरिभक्तीचे अधिकारी आहेत,’ असं त्यांनी गर्जून सांगितलं. सांप्रदायिक विद्वेष आणि राजकीय रोष यांना तोंड देत शंकरदेवांनी आपल्या भक्तिसंप्रदायाचा विस्तार केला. देशाच्या पूर्वेकडे धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मतेला पुष्टी देणारं त्यांचं कार्य ऐतिहासिक महत्त्वाचं मानलं जातं.
शंकरदेवांना प्रदीर्घ असं आयुष्य लाभलं. वयाच्या एकशे एकोणिसाव्या वर्षी त्यांचं निधन झालं. म्हणजे पूर्ण कार्यरत असं जवळजवळ शंभर वर्षांचं आयुष्य ते जगले. त्यांनी आसेतुहिमाचल भ्रमंती केली. जनजीवन न्याहाळलं. समाजाची दुरवस्था पाहिली. त्या अवनत, शतखंडित समाजाला एकत्र आणणारं एक सूत्र त्यांना भगवद्भक्तीतून सापडलं आणि त्यांनी कृष्णाच्या-मदनमोहनाच्या रूपात लोकांना आत्मोद्धाराचं आश्वासन दिलं. एक आधार दिला, एक दिलासा दिला.
शंकरदेवांनी केलेल्या सर्व रचना, अगदी त्यांची संकलित कीर्तनंसुद्धा आज सुदैवानं उपलब्ध आहेत. त्यांचं कृष्णचरित्रावर-श्रीमद्भागवतावर नितांत प्रेम होतं. त्यावर आधारलेली त्यांची काव्यं जशी प्रसिद्ध आहेत, तशी नाटकंही प्रसिद्ध आहेत. विष्णूचं कृष्णरूप त्यांना अतीव प्रिय असलं तरी त्यांनी त्याच्या रामरूपाचाही आदर केला आहे आणि तोही विशेष प्रकारे. माधव कंदली हा शंकरदेवांपूर्वीच्या शतकात होऊन गेलेला प्रसिद्ध कवी. त्यानं रचलेली रामकथा आसामच्या भूमीवर सुविख्यात होती. पण ती फक्त रावणवधानंतर रामाच्या अयोध्येतल्या पुनरागमनापर्यंतचीच होती. शंकरदेवांनी रामायणाच्या उत्तरकांडावर विस्तारानं रचना केली.
शंकरदेव संस्कृतज्ञ होते. त्यांचे दार्शनिक चिंतन त्यांनी ग्रंथबद्ध केलं आहे. जीव, जगत्, मोक्ष, ब्रह्म यांच्याविषयीचं त्यांचं चिंतन त्यात आहे –
प्रत्येकच देहात प्रकटते एक सनातन ब्रह्म
एक गगन घटाघटांत, एकच तेज स्वरूपे भिन्न
कंकण, कुंडल, परोपरीचे अलंकार, मणिहार
सुवर्ण एकच, त्याचे दिसती नानाविध आकार

अशा दृष्टान्तांनी त्यांनी परब्रह्म आणि जीवात्मा यांचं नातं समजावलं आहे. मात्र शंकरदेवांनी त्या ब्रह्मस्वरूपात मिळून जाण्यासाठी सर्वसामान्यांना मार्ग सांगितला आहे, तो अगदी साधा, सोपा असा भक्तिमार्ग. भक्ती हीच परमात्म्याजवळ जाण्याची सर्वश्रेष्ठ वाट आहे अशी त्यांची श्रद्धा होती.
भक्तीचं मोठं रसाळ विवेचन शंकरदेवांनी केलं आहे. त्यांच्या संकलित कीर्तनांमधून त्यांनी पुन:पुन्हा भक्तीचं मोठेपण सांगितलं आहे. भक्ती प्रत्यक्षात येते ती उपासनेतून, पूजेतून, व्रतवैकल्यांतून, तीर्थाटनातून. पण ही तर भक्ती प्रकट करण्याची माध्यमं आहेत. खरी भक्ती या सर्वापलीकडे आहे. ईश्वराविषयी आत्यंतिक प्रेम जेव्हा मनात निर्माण होतं तेव्हा मन हळूहळू लौकिक गोष्टींपासून आपोआप दूर होऊ लागतं. भक्तिमार्गात पसरलेले काटे म्हणजे मोह, हिंसा, संताप, लोभ, अहंकार, संशय- आणखीही अनेक मनोभाव. हे सारे ईश्वराविषयीच्या अनन्य निष्ठेनं दूर होत जातात.
खऱ्या भक्ताला दुसरी जात नाही. दुसरा धर्म नाही. भक्ती एवढीच त्याची जात. श्रद्धा एवढाच त्याचा धर्म. अधम, पापी, पतित, स्त्री, शूद्र, यवन- सर्वाना भक्तिमार्ग खुला आहे. फक्त शुद्ध चित्त आणि शुद्ध चारित्र्य ही या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येकासाठी पूर्वअट आहे.
शंकरदेव स्वत: एक श्रेष्ठ भक्त होतेच. त्यामुळे त्यांच्या जवळच्या शिष्यांमध्ये जसे हिंदू तसे मुसलमान शिष्यही होते. कृष्णभक्तीचा प्रसार त्यांनी साऱ्या आसामभर केला. आसामचा एक राजा नरनारायण याच्या राजसभेत शास्त्रार्थ करण्यासाठी त्यांना पाचारण केलं गेलं होतं. अनेक दिवस चाललेल्या त्या महाचर्चेत अखेर शंकरदेवांनीच विजय मिळवला. त्या काळात त्यांची नरनारायणाशी गाढ मैत्री झाली. कामाख्या मंदिर उभारणारा शक्तिपूजक राजा नरनारायण वैष्णव मताचा आदर करू लागला तो शंकरदेवांमुळे. राजाचा धाकटा भाऊ चिलाराय हा तर त्यांच्या पाठीशी होताच.
शंकरदेवांनी आपल्या संप्रदायाची एक आचारसंहिता तयार केली. वृंदावनातल्या कृष्णलीलांना चितारणारा एक कापडी पट्ट सिद्ध केला. वृंदावनी वस्त्र म्हणून तो प्रसिद्ध आहे. त्या पट्टावरची रेखाटनं शंकरदेवांच्या लाडक्या श्रीकृष्णाच्या चरित्रातली आहेत. ते चरित्र त्यांच्या ध्यानीमनी सदैव होतं आणि ते आपल्या अनुयायांना सांगत राहिले होते,

गीताच श्रेष्ठ आहे सर्व शास्त्रांमधून
सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे भागवताचं प्रतिपादन
सर्व देवांत श्रेष्ठ आहे देवकीनंदन
त्याच्याच पवित्र चरणांना तुमचं असो वंदन! –