अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिका विभागाचे उपसंचालक, हसीबा हाज सहरोई हे रझान झैटूनेहबद्दल म्हणतात, ‘मानवाधिकारांचं संरक्षण करण्याप्रति रझानची असलेली समर्पितता आणि शौर्य यांचं दर्शन सध्याच्या सीरियातील समरप्रसंगात स्पष्टपणे झालंय. या पारितोषिकामुळे सीरियात घडत असलेल्या पाशवी अत्याचारांकडे जगाचं लक्ष वेधलं जाईल, अशी आम्ही आशा करतो.’’ त्या रझानबद्दल..
‘अर्जुना, जेव्हा जेव्हा सदाचरण अधोगतीला लागतं आणि दुराचरण वाढू लागतं. तेव्हा मी देहरूप धारण करतो. सद्गुणी लोकांना सुरक्षित ठेवून, दुर्गणी लोकांचा विनाश घडवून, सदाचरणाला भक्कम पायावर पुन:स्थापित करण्यासाठी, मी प्रत्येक युगात जन्म घेत असतो.’
गीतेच्या चतुर्थ अध्यायातली ही भगवान श्रीकृष्णांची वचनं! परंतु सद्यकालात ती खरी ठरण्यासाठी भगवंतांना एकाच नव्हे, तर अनेक देहरूपांमध्ये जन्म घेणं भाग पडत असणार! आज ज्या चळवळीला ‘अरब स्प्रिंग’ (अरबस्तानातील वसंतऋतू) म्हटलं जातंय, तिचं तेजस्वी रूप पाहिलं आणि उदात्त ध्येयप्राप्तीसाठी प्राणांवर उदक सोडणाऱ्या अनेकांची कामगिरी पाहिली की याची खात्रीच पटते.
दिव्यत्वाचा स्पर्श झालेली अशीच एक तेजस्विनी आहे, रझान झैटूनेह. ती जन्मली २९ एप्रिल १९७७ रोजी, सीरिया देशात. १९९९ साली तिनं कायद्याची पदवी मिळवली आणि २००१ सालापासून तिनं राजकीय कैद्यांचे खटले लढवणाऱ्या वकिलांच्या गटात सामील होऊन राज कैद्यांच्या बचावाचं काम हाती घेतलं. त्याच वर्षी तिनं सीरियामधील मानवाधिकार कायद्यांच्या उल्लंघनांबाबत माहिती प्रसारण सुरू केलं. २००५ सालापासून रझान आणखी एका समितीची सक्रिय कार्यकर्ती आहे. सीरियातील राजकीय कैद्यांच्या कुटुंबीयांना मदत पुरवण्याचं कार्य ही समिती करत असते. सीरियात घडणाऱ्या राजकीय दंडेलशाही बद्दल आणि अत्याचारांबद्दल रझानला माहिती पुरवण्याचं काम तेथील राजकीय सुधारणावादी आणि मानवाधिकार रक्षणकर्ते यांच्या सुसंघटित जाळ्यामार्फत केलं जातं. या सत्यघटना रझान परदेशी प्रसारमध्यमांद्वारे जगभरात पोचवत असते. सीरियातील आसाद-सरकारनं अवघ्या तेरा वर्षांच्या अमझा अल् खातीबची हाल हाल करून हत्या केली होती. वडिलांसमवेत आसाद सरकारच्या निषेधासाठी आयोजित केलेल्या मोर्चामध्ये भाग घेणं, एवढाच त्या कोवळ्या जिवाचा अपराध होता. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांपुढे यासारख्या भीषण
अत्याचारी कृत्यांचा निषेध करताना रझाननं म्हटलं होतं, ‘सीरियाचे अध्यक्ष बशार-अल-आसाद यांना आंतरराष्ट्रीय- गुन्हेगार-न्यायालयापुढे खेचण्यात आलं पाहिजे, कारण देशभरातील निषेध सभांचा बीमोड करण्यासाठी त्यांच्या आज्ञेनुसार त्यांच्या लष्करानं देशभरातील तीन हजारांहून जास्त नागरिकांना ठार मारलं गेल्याची बातमी ऐकिवात आहे.
रझान निर्भयपणे ठासून म्हणते, ‘इथं काय घडतंय, ते जगभरातील लोकांना कळलं पाहिजे. आम्हा सर्वाना सत्य ठाऊक आहे. आम्ही सर्व जण जाणून आहोत की या देशातला एकमेव अतिरेकी-गट आहे सध्याची राजवट! ही राजवट, चार महिन्यांहून जास्त काळ, स्वत:च्याच नागरिकांना ठार मारते आहे. या राजवटीत हजारो लोकांना कैद केलं आहे; त्यांचा गुन्हा एवढाच होता की त्यांनी स्वातंत्र्याची मागणी केली!’
रझानला २०११ सालचं ‘अ‍ॅना पोलिट्कोवस्काया’ पारितोषिक देण्यात आलं होतं. संघर्ष चालू असलेल्या भागात, मानवाधिकारांचं संरक्षण करण्यासाठी लढा देणाऱ्या स्त्रीला, या पुरस्कारानं गौरवलं जातं. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिका विभागाचे उपसंचालक, हसीबा हाज सहरोई म्हणतात, ‘‘मानवाधिकारांचं संरक्षण करण्याप्रति रझानची असलेली समर्पितता आणि शौर्य यांचं दर्शन सध्याच्या सीरियातील समरप्रसंगात स्पष्टपणे झालंय. या पारितोषिकामुळे सीरियात घडत असलेल्या पाशवी अत्याचारांकडे जगाचं लक्ष वेधलं जाईल, अशी आम्ही आशा करतो. त्यांच्या देशात घडणारी अमानुष कृत्यं जगभरात वाढू नयेत. या हेतूनं सीरियातील अधिकाऱ्यांनी प्रसार-माध्यमांवर लढलेल्या र्निबधांना रझाननं अजिबात धूप घातलेली नाही.’’
शांतिपूर्ण निषेधांचं नियोजन आणि कार्यवाही करणाऱ्या गटासाठी, तिनं देशात घडणाऱ्या मानवाधिकार-उल्लंघनांच्या घटनांवर बारकाईनं लक्ष ठेवलं आहे आणि त्याचे लेखी पुरावे तयार केले आहेत.
या कार्यासाठी वैयक्तिकदृष्टय़ा तिला भरपूर किंमत मोजावी लागली आहे. एप्रिल २०११मध्ये रझानला आणि तिचा पती, वाएल हम्मदा, यांना भूमिगत व्हावं लागलं. वाएल हम्मदाला वायुदलाच्या हेर खात्यानं ३० एप्रिल २०११ रोजी कैद करून १२ जुलैपर्यंत अज्ञातवासात टाकलं होतं. त्यानंतर त्यांनी त्याला दामास्कमधील मध्यवर्ती तुरुंगात टाकलं. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने मिळवलेल्या माहितीनुसार, त्याला त्यांनी एकांतवासाची सजा देऊन त्याची यातनामय छळवणूक केली. १ ऑगस्ट रोजी त्याची जामिनावर सुटका केली. त्याच्यावर केलेल्या अनेक खोटय़ानाटय़ा, अतिरंजित आरोपांची सुनावणी होण्याची तो सध्या प्रतीक्षा करत आहे.
रझान अजूनही भूमिगतच आहे. तिला पारितोषिक मिळाल्यावर, तिनं अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, ‘‘पुढे आणखी काय घडेल, या आशंकेत वावरणं सोपं नाही, परंतु इतरांच्या तुलनेने मी मोजत असलेली किंमत क्षुल्लकच म्हटली पाहिजे. काहींनी आपली आयुष्यं गमावली. इतर अनेक कैद, यातनामय छळ आणि दुष्टपणाची वागणूक, यांना सामोरे गेले.’’ ती म्हणते, ‘‘सीरियातील लोकांचं उच्च मनोधैर्य हा या क्रांतीचा सुंदर भाग आहे. गोळीबार, कैद आणि रणगाडे यांचा मारा होत असताना, या मंडळींनी या निषेधाला, नृत्य-गायन आणि स्वातंत्र्याचा उद्घोष असं एखाद्या जल्लोषाचं रूप दिलं. त्यांच्या दृढनिश्चयी आशावादामुळेच हा स्वातंत्र्यलढा चालू ठेवण्याची प्रेरणा आम्हाला मिळते आहे.’’
रझानला २०१३ मध्ये ‘इंटरनॅशनल विमेन ऑफ करेज’ हे पारितोषिक देण्यात आलं. डिसेंबर २०१३ मध्ये (रूढ सत्तेच्या) विरोधकांच्या बाजूच्या वेबसाइट्सनी बातमी नमूद केली की, रझानचं, तिचा पती आणि अन्य दोन सहकाऱ्यांसमवेत, दमास्कसच्या उत्तरेला, विरोधकांच्या ताब्यात असलेल्या दौमा या गावातून अपहरण करण्यात आलं आहे. अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही आणि त्यांच्या अपहरणकर्त्यांची नावंही समजलेली नाहीत. तिच्या अपहरणाचं गूढ अजून कायम असलं, तरी तिच्यासारख्याच अन्य अनेक स्त्रिया सर्वप्रकारचे धोके स्वीकारून अध्यक्ष आसाद यांच्या निषेधात लढा देतच आहेत.
ज्याला ‘अरबस्तानातील वसंतऋतू’ -‘अरब स्प्रिंग’ म्हणतात, ती क्रांतीची लाट, सत्तारूढांच्या जुलमांच्या निषेधार्थ, १८ डिसेंबर २०१०पासून उसळली. उठाव, निषेध सभा, शांतीच्या मार्गानं आणि सशस्त्र असे संप, यादवी युद्धं अशा मार्गानी ती विविध अरब देशांमध्ये पसरली. २०१३ सालपर्यंत या क्रांतीद्वारे तेरा वेगवेगळे सत्ताधारी पदच्युत झाले. त्यात टय़ुनिशिया, इजिप्त( दोन वेळा), लिबिया आणि येमेन यांचा समावेश आहे. नागरिकांनी बहारीन, सीरिया, येथे उठाव केले. अल्जिरिया, इराक, जॉर्डन, कुवेत, मोरॉवको आणि सुदान येथे मोठय़ा प्रमाणात निषेध झाले, मॉरिटानिया, ओमान, सौदी अरेबिया, जिबूटी, पश्चिम सहारा, पॅलेस्टाइन- विभाग येथे लहान प्रमाणावर संघर्ष झाले. निषेधांसाठी सविनय कायदेभंग, आणि दीर्घकालीन लढय़ासाठी संप, उठाव, मोर्चे, मेळावे यांच्या समवेत प्रसारमाध्यमांचा वापर करून जुलमी राजवटींचे अहवाल जगभरात पोचवण्यात आले होते.
या संघर्षांत भाग घेणाऱ्या, जिवावर उदार होऊन जुलमी राजवटी उलथून पाडू पाहणाऱ्या अनेकांमधली एक होती रझान. तिच्या अपहरणानंतर अजून तिच्याबद्दल काहीही बातमी कळली नसली, तरी तिनं चेतवलेल्या वन्हीची आज धगधगती ज्वाला बनली आहे. हीन ते सारं जाळून टाकून लखलखतं शिव-सुंदर तावून सुलाखून काढण्याचं काम ही क्रांतीची ज्वाला करते आहे.
गीतेतील वचनात, श्रीकृष्णांनी एकच देहरूप धारण केलं होतं. आजच्या काळात, त्याच कार्यासाठी त्यांना देवत्वाचा अंश असलेली अनेक देहरूपं धारण करावी लागत आहेत.
दिव्यत्वाचा स्पर्श झालेल्या त्या सर्वाना शतश: प्रणाम!