fggदंत सौंदर्यशास्त्र अशी एक शाखाच उदयाला आली आहे, कारण सुंदर आकर्षक दात  आत्मविश्वास निर्माण करतात. शिवाय दातावर उपचारही आता वेदनाविरहित होऊ लागले आहेत. खूप काही या क्षेत्रात घडते आहे.

पां ढरेशुभ्र चमकदार, हसणारे दात चेहऱ्याला उजळून टाकतात, पण त्यांची निगा राखणाऱ्या दंतवैद्याकडे जायची मात्र प्रचंड भीती वाटते. एरवी आपली ‘खुर्ची’ कधीच सोडाविशी वाटत नसली तरी ‘त्या’ खुर्चीचा मोह कोणालाही होत नाही. भयंकर आवाज करीत दात खरवडणारं ते ड्रिलिंग मशीन, धडकी भरवणारे ते दात उपटायचे चिमटे, दातदुखी परवडेल पण ही नको असं वाटायला लावणारी ती जाडजूड बधिरीकरणाची सुई; मुळात दातदुखीनं हैराण झालेला माणूस या सर्व भीतींवर मात करून डॉक्टरकडे पोहोचतो तेव्हा परिस्थिती खरंच असह्य़ झालेली असते. दात ठणठण दुखत असतो, हिरडी सुजलेली असते आणि दात उपटून फेकून द्या, असं सांगावसं वाटतं.
गेल्या १५-२० वर्षांत हे चित्र साफ बदललं आहे बरं का! आजचं डेंटल क्लिनिक पाहताच प्रसन्न व्हावं असं ते सजवलेलं असतं. चकाचक स्वच्छता, मोजकी शोभिवंत कुंडय़ांमधली प्लांट्स, भिंतीतून झिरपणारं मंद संगीत, जिकडे तिकडे मोहक कुन्दकळ्या दाखवणाऱ्या चेहऱ्यांचे फोटो! आरामशीर खुर्चीवर तुम्ही चक्क आडवे होता, शुभ्र अ‍ॅप्रन, ग्लोव्ह्ज आणि मास्क परिधान केलेला तुमचा डेंटिस्ट तुमच्या डोक्याशी स्टुलावर बसलेला आहे. अगदी सोयीस्कर अंतरावर लावलेल्या ट्रेजमध्ये र्निजतुक नाजूक उपकरणं, तिथल्या तिथे एक्सरे काढून तो पडद्यावर बघायची सोय, एक मदतनीस हातात सक्शन मशीनची नळी धरून उभा, दुसरा डॉक्टरला काय हवं ते द्यायला सज्ज. म्हणजे तुमच्या एका दातासाठी सहा हात काम करताहेत, ते काम कमीत कमी वेळात, पद्धतशीर आणि बिनचूक व्हावं म्हणून.
२५-३० वर्षांपूर्वी दंतवैद्यक म्हणजे काय होतं? दात किडला तर भरणं, अति खराब झाला तर काढून टाकणं आणि बहुतेक दातांचा निकाल लागला तर कवळी  करणं. आजचं दंतवैद्यक आमूलाग्र बदललं आहे. त्याची मुख्य तत्त्वं अशी आहेत- नैसर्गिक दात वाचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलाच पाहिजे, कितीही वय झालं तरी अन्न चावून खाणं जमलं पाहिजे, वेडेवाकडे, तुटलेले, डाग पडलेले कुरूप दात सुंदर आणि सरळ करता येतात, आणि हे सारं रुग्णाला त्रास, वेदना न होता जमवता येतं.
ही किमया साधलीय नवीन तंत्रज्ञानामुळे. आपण टप्प्या-टप्प्याने पाहू या हे दावे कितपत खरे आहेत. दाताला कीड लागणं हा अगदी सर्वसामान्य आजार. दुधाच्या दातांपासून म्हातारपणापर्यंत हा किडीचा उपद्रव चालू असतो. ड्रिलिंग मशीनने कीड खरवडून काढायची आणि तो खड्डा पारा-चांदीच्या मिश्रणाने भरायचा ही पारंपरिक पद्धत. आजची ड्रिलिंग मशीन्स पूर्वीच्या कित्येक पटींनी जास्त चांगली आहेत. ती प्रचंड वेगवान असतात, त्यांचा आवाज जास्त येत नाही, ड्रिलिंगमुळे निर्माण होणारी उष्णता तिथल्या तिथे थंड करण्यासाठी सतत पाण्याच्या सूक्ष्मबिंदूंचा फवारा मारला जातो, त्यामुळे वेदना खूपच कमी होते.
हे पाणी शोषून घ्यायला मऊ  प्लास्टिक नलिका लावलेली सक्शन मशीन्स तयार असतात. त्यामुळे तोंडात पाणी  साचून राहत नाही. आजकाल दात भरण्यासाठी घातक पारा-चांदी मिश्रण वापरत नाहीत तर कॉम्पोझिट रेझिन वापरतात. हा पदार्थ दातात निर्माण झालेल्या वेडय़ा-वाकडय़ा खड्डय़ांत चपखल जाऊन बसतो, त्याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. रेझिन वाळून ताबडतोब कठीण बनावं म्हणून त्याला लाइट क्युअर मशीनचा वापर करून निळा प्रकाश दिला जातो. आता दात भरण्याची प्रक्रिया बरीचशी वेदनारहित झाल्याने बहुतेक रुग्णांना इंजेक्शनची गरज भासत नाही. पण जरूर पडल्यास आता अगदी सूक्ष्म सुया वापरून बधिर करणारं  इंजेक्शन गालात दिलं जातं. ही औषधं पूर्वीपेक्षा जास्त प्रभावी आहेत आणि त्यांचा परिणामही २-४ तास टिकून राहतो. आता तर सुईविरहित जेट इंजेक्शन्ससुद्धा आली आहेत.
कीड दाताच्या मुळापर्यंत पोहोचली तर पूर्वी असा दात उपटून टाकत. आजच्या जमान्यात नैसर्गिक दाताचं जतन मोठय़ा कसोशीने केलं जातं. दाताच्या मुळाचा आतला भाग पोखरून कीड काढून टाकतात, रिकाम्या जागेत कंपोझिट रेझिन भरून टाकतात. असा दात रक्तपुरवठा खंडित झाल्यानं ठिसूळ बनतो. त्याचे तुकडे पडू नयेत म्हणून त्याला एक संरक्षक टोपी (क्राऊन) घातली जाते. पूर्वी क्राऊन धातूचा म्हणजे कोबाल्ट- क्रोमियम मिश्रणाचा बनवायचे. तोंडातल्या लाळेमुळे, अन्नपदार्थामुळे त्यावर रासायनिक प्रक्रिया होण्याची भीती असे. आता क्राऊन सिरामिक किंवा झिरकोनिया या पदार्थाचा बनवतात. तो जास्त टिकाऊ  असतो. दिसायला नैसर्गिक दातांसारखाच दिसतो. आणि शरीरावर कोणताही दुष्परिणाम नाही. अलीकडे तर  cad-cam तंत्राने क्राऊन डिझाइन करतात त्यामुळे त्यात अचूकता आली आहे. हीच ती सर्वश्रुत रूटकनाल ट्रीटमेंट आहे, ज्यामुळे अगदी खराब दातालासुद्धा नवजीवन मिळालं आहे.
वीस वर्षांपूर्वी दात एकदा पडला की पडला, कायमचा गेला. अशा बऱ्याच मोकळ्या जागा झाल्या की कवळी करायचे. कधी अर्ध-कवळी तर कधी सगळे दात काढून पूर्ण कवळी. आता ही वेळ फारशी येऊ  न देण्याचा चंग दंतवैद्यांनी बांधला आहे. एखादा दात इतर उपचारांना न जुमानता काढावाच लागला किंवा आपोआप पडला तर त्या जागी नव्या कृत्रिम दाताचं आरोपण करता येतं. जबडय़ाच्या हाडामध्ये टाइटेनियम धातूचा (होय, सांधा रोपणासाठी हाच धातू वापरतात) एक रॉड बसवतात. या रॉडच्या भक्कम आधारावर सिरॅमिक क्राऊन म्हणजे आपला नवा दात बसवला जातो. त्याचा रंगही बाजूच्या नैसर्गिक दातांशी मिळताजुळता करतात. असा दात म्हणजे जणू त्या व्यक्तीचा तिसरा दात असतो. (पहिला दुधाचा आणि तो पडल्यावर येतो तो दुसरा) या उपचारालाच डेंटल इम्प्लांट असं म्हणतात. अर्थात हे काम चांगलं करण्यासाठी जशी उच्च दर्जाची मटेरियल्स पाहिजेत तसा उच्च दर्जाचं प्रशिक्षण घेतलेला दंत तंत्रज्ञसुद्धा.
एकमेकांवर चढलेले वेडे वाकडे दात, नैसर्गिकरीत्याच पुढे आलेले दात माणसाला विद्रूप बनवतात, त्याचबरोबर अन्न चावण्याच्या कामातही बाधा आणतात. अशा दातांवर पूर्वी काहीच इलाज नव्हता. आता दंत सौंदर्यशास्त्र अशी एक शाखाच उदयाला येऊन धातूच्या, सिरॅमिकच्या किंवा दिसून न येणाऱ्या पदार्थाच्या ब्रेसेस वापरून असे दात सरळ रेषेत आणता येतात. मोत्याच्या सरासारखे दात त्या व्यक्तीला बहाल करता येतात. याच बरोबर अर्धवट तुटलेले, मोठय़ा फटी पडलेले, दर्शनी भागातच किडलेले, डाग पडलेले दात किडीचा उपचार करून झाल्यावर कॉम्पोझिटच्या मदतीने त्यांच्यातले हे दोष काढून अगदी सुरेख बनवता येतात. अपघात, मारामारी, गंभीर आजार, विषारी पदार्थ किंवा किरणोत्सर्गामुळे खराब झालेले दात पुन्हा सुंदर दिसू शकतात. फर्निचरच्या दर्शनी पृष्ठभागावर जसा शोभिवंत पातळ व्हिनिअरचा थर असतो तसा हा प्रकार असल्याने त्याला डेंटल व्हिनिअर असंच म्हणतात. कुरूप दातांमुळे अत्यंत निराश झालेले रुग्ण अशा डॉक्टरला दुवा देतात यात नवल नाही.
अखेर सांगायचं एवढंच, आपल्या दातांची काळजी घ्या, दर ६ महिन्यांनी दंतवैद्यांना भेटा, दातातले दोष अगदी आरंभीच्या टप्प्यातच काढून टाका म्हणजे ते दात आयुष्यभर साथ देतील.
या लेखासाठी विशेष साहाय्य : डॉ गौरी मुळे-आरबट्टी; क्राऊन, ब्रिज आणि इम्प्लांटतज्ज्ञ .

Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
documentry article lokrang marathi news, lokrang article marathi
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प