आंबा विक्रीपासून सुरू झालेला देसाई बंधू आंबेवाले यांचा हा व्यवसाय आता चौथ्या पिढीने आधुनिक केलाय. पावस आणि पुण्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या या आंब्यांनी आता परदेशातल्या डेझर्टमध्ये मानाचं स्थान मिळवलंय. हापूस आंब्याला आंब्यांचा राजा बनवणाऱ्या देसाई बंधू आंबेवाले यांच्या यशाची ही कहाणी.
सा ल असावं १९३२-३३. प्रभात रोड-डेक्कन जिमखान्यासारखा सधन आणि शांत परिसर. मॉर्निग वॉकहून आलेले साहेब लोक किंवा पूजा आटोपून न्याहारीची लगबग करणाऱ्या बाईसाहेब असं चित्र प्रत्येक बंगल्यात असायचं. अशा वेळी एक सडपातळ घारा- गोरा  डोक्यावर पाटी घेतलेला एक तरुण, अदबीनं बंगल्यात शिरायचा. मधुर दरवळ असणारं देखणं दमदार फळ हातात धरून वर्णन करायचा. आर्जवानं स्वच्छ धुतलेल्या फळाच्या फोडी करून चाखा म्हणायचा. खूश झालेले साहेब डझन-दोन डझन आंबे सहज ठेवून घ्यायचे. हा ‘कापायचा आंबा’ अनेक लोक प्रथमच चाखत होते. खूश होत होते.
अशाच फेरीत एकदा या तरुणाची स्वारी शिरली साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या बंगल्यात. त्यांना या तरुणाचं फार कौतुक वाटलं, तरीही ते आश्चर्यानं म्हणाले, ‘‘अरे रुपया-दोन रुपयांत शेकडय़ाची करंडी येते, तेवढय़ा किमतीत तुझे डझनभर आंबे घ्यायचे?’’ त्या तरुणानं उत्तर दिलं, ‘‘ते चोखायचे आंबे दहा खा आणि हा एक कापायचा आंबा खाऊन बघा. समाधान कशानं लाभतं?’’ या आर्जवी हजरजबाबी उत्तरानं केळकर प्रसन्न झाले आणि त्यांनी आंब्याची पेटी घेतली, त्या तरुणाकडून; भाऊ देसाई यांच्याकडून.
आज ऐंशी र्वष आंबा खाल्ल्याचं समाधान ग्राहकांना देणारं हे कुटुंब आहे-‘देसाई बंधू आंबेवाले’. यांनीच पुण्यात प्रथम हापूस आंबा आणला. लोकप्रिय केला. आंब्याची विविध उत्पादनं बाजारात आणली. उत्कृष्ट दर्जा आणि अप्रतिम चवीचा हापूस म्हणजे देसाई बंधू असं समीकरण बनलं. इतकं अचूक, की लखनौला झालेल्या आंबा प्रदर्शनात महाराष्ट्राला मिळालेल्या २७ विभागांत २५ बक्षिसं देसाई बंधूंनी पटकावली. आजही जागतिक ‘मँगो शो’वर देसाई बंधू वर्चस्व राखून आहेत.
रत्नागिरीजवळच्या निसर्गरम्य, शांत पावस गावी अण्णा देसाईंची आंब्याची बाग होती. ते सारा आंबा दोन हजार रुपयांत दलालाला देऊन टाकायचे. त्यांचा मुलगा रघुनाथ (भाऊ) एका वर्षी म्हणाला, ‘‘अण्णा मी स्वत: पुण्यात जाऊन आंबा विकतो, नक्की जास्त पैसे मिळतील.’’ अन् पहिल्याच वर्षी रघुनाथानं ४ हजार रुपये आणून अण्णांच्या हातात ठेवले. भाऊंना आंब्याच्या लागवडीची खूप जाण होती. ते म्हणत, ‘‘झाडं माझ्याशी बोलतात.’’ अन् ते खरंच होतं. झाडाची तब्येत, खतपाणी, भाऊंना नेमकं कळत असे. यातून त्यांनी केवळ स्वत:चा धंदा नाही वाढवला तर परिसरातल्या शेतक ऱ्यांना आंबा लागवडीला प्रवृत्त केलं. स्वत: कलमं करून, ती तीन र्वष वाढूवन लोकांना दिली. आंबा हे पैसा देणारं, समृद्धी आणणारं उत्पन्न आहे हे पटवून दिलं.
अण्णा देसाईंची लागवड आणि भाऊंचं विक्री कौशल्य यामुळे देसाई यांनी अल्पावधीतच पुण्याच्या मंडईजवळ शनिपाराच्या कोपऱ्यावर आपलं दुकान थाटलं. आंब्याची पेटी घ्यायला त्याकाळी मध्यमवर्ग बिचकत असे. कारण वरचा थर उत्तम आणि उतरत जाणारा दर्जा खालच्या थरात, असा अनुभव येई. देसाईंचा प्रामाणिकपणा, सचोटी, उत्तम चव चढती राहिली. १९६३ नंतर रघुनाथरावांची मुलं हळूहळू हाताशी आली. तिसऱ्या पिढीतल्या सहाही मुलांनी सुरुवातीपासून घरच्याच व्यवसायात लक्ष घातलं. वसंता आणि अनंता हे पुण्यात स्थायिक झाले, तर जयंत आणि विजय यांनी पावसला राहण्याचा निर्णय घेतला. धाकटय़ा श्रीकांतनं सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला.तर दिलीप मेडिकलला गेला.
जयंतरावांनी त्या काळात आंब्याच्या बागांत पाण्याचं व्यवस्थापन आणलं. ठिबक सिंचन सुरू केलं. तलाव बांधले. कोणत्याही प्रकारचं विशेष शिक्षण न घेता भाऊसाहेबांच्या मार्गदर्शनानं बागा लावल्या. सांभाळल्या. तर विजयरावांनी आंब्याच्या कॅनिंगला प्रारंभ करून हापूस आंबा वर्षभर उपलब्ध करून दिला. सुरुवातीच्या काळात आंब्याचा रस आटवणे, आंब्याचे गोळे (मावा) बनवणे ही कामं घरातल्या स्त्रियांनीच सांभाळली. माधुरी विजय आणि शुभांगी जयंत या दोघींनी आंब्याच्या मोसमास परिसरातल्या स्त्रियांना हाताशी धरून कामं करवून घेतली. शेकडो स्त्रियांचं जीवनमान सुधारलं. त्यांना आत्मप्रतिष्ठा मिळवून दिली.
देसाई म्हणजे गावचे खोत. त्यांच्या घरचं काम करायला स्त्रिया आल्या म्हणजे त्यांचं चहा, नाश्ता, भोजन, संध्याकाळचा चहा सारं कामावरच व्हायचं. घरच्या लोकांसारखंच जेवण त्यांना मिळायचं. साऱ्यांची दुखणी-खुपणी, अडीअडचणी वाडय़ावर सोडवल्या जायच्या. याचा पुरावा म्हणजे पावस परिसरात त्या काळात अण्णा देसाईंनी पक्के रस्ते बनवून घेतले. अण्णा सांगतात ते गावच्या भल्याचं अन् भाऊ (रघुनाथराव) सांगतात ते आपल्या फायद्याचं, हे गावकरी मनोमन जाणून होते. म्हणून रस्त्यांसाठी गावकऱ्यांनी जमिनी तर दिल्याच, पण रस्त्याचा खर्चही सरकारी मदतीशिवाय उभा केला.
फक्त आंब्याच्या व्यवसायावर पाचही मुलांचे वाढते संसार अवलंबून ठेवणं योग्य होणार नाही हे ओळखून भाऊंनी मुलांना ७० सालानंतर वेगळे व्यवसाय काढून दिले. शनिपाराचं दुकान वसंतराव सांभाळतात, तर पुण्यातलं पहिलं तीन मजली प्रशस्त ‘आनंद मंगल कार्यालय’ अनंतरावांना काढून दिलं. जयंतराव पावसला बागा बघतात, तर विजयराव कॅनिंग फॅक्टरी. सर्वात धाकटे श्रीकांत यांना अण्णांचा आणि भाऊंचा सहवास लाभला. त्यातून त्यांना आंब्याची जाणही उत्तम. ते प्रारंभी आंब्याच्या सीझनमध्ये मदत करायचे. पण भाऊंनी त्यांना प्रभात रोडसारख्या शांत परिसरात उत्तम हॉटेल काढायला उत्तेजन दिलं. ‘स्वरूप’ हॉटेल आणि ‘आनंद’ डायनिंग हॉल हे चोखंदळ मराठी माणसांचं विसाव्याचं स्थान बनलं. पुण्याला जाणारे अनेक मोठे कलाकार, साहित्यिक यांचं ‘स्वरूप’ हॉटेल हे पुण्यातलं घर बनलं आहे. स्वच्छ, सुरक्षित आणि आपुलकीनं भारलेलं! कुशल मनुष्यबळाच्या कमतरतेनं आता ‘आनंद डायनिंग’ बंद झालं, तरी पुणेकरांच्या जिभेवर अजून ती चव रेंगाळते आहे.
याच स्वरूप हॉटेलचं उद्घाटन मोठं थाटात झालं आणि त्यात एका नव्या पदार्थाचा जन्म झाला. ती कहाणी मोठी लज्जतदार आहे. उद्घाटनाच्या जेवणापूर्वी भाऊसाहेब देसाईंनी जेवणाच्या पदार्थावर नजर टाकली तर श्रीखंड पांढरंशुभ्र दिसलं, केशर गायब; ऐनवेळी काय करणार? यजमान श्रीकांतरावांनी समयसूचकतेनं आंब्याच्या रसाचे डबे फोडले आणि भराभर श्रीखंडात ओतले आणि ‘आम्रखंडाचा’ जन्म झाला. पुढे वारणानगरहून तात्यासाहेब कोरे मुद्दाम ‘स्वरूप’वर येऊन राहिले आम्रखंड शिकायला. त्यांनी आणि चितळे बंधूंनी हे आम्रखंड जगभर लोकप्रिय केलं.
देसाईंच्या चौथ्या पिढीनं पुण्यात ‘देसाई शॉपींग गॅलरी’, ‘स्वामीकृपा कार्यालय’ असा व्यवसायाचा विस्तार केला आहे. आंब्याच्या स्वादानं येणारी जाणकार मंडळी या विस्तारावर खूश आहेत. कोथरूड परिसरात वाढलेल्या वस्तीत योगेश आणि सीमाचं कार्यालय उत्तम चालू आहे. नरेंद्र-नम्रता, मैत्रेयी-मंदार हे दुकान आणि शॉपींग गॅलरी वाढवत आहेत.  
पावसच्या चौथ्या पिढीनं ‘अमर’ ब्रँड सुरू करून कॅनिंगचा व्यवसाय पूर्ण अत्याधुनिक बनवला आहे. इथे ‘आंबे सोलणे’ यापुरताच मानवी हस्तस्पर्श शिल्लक आहे. काही वर्षांपूर्वी ‘प्रगतिशील शेतकरी’ या सन्मानानं गौरवल्या गेलेल्या जयंतरावांच्या आनंदनं हॉर्टिकल्चरची पदवी घेऊन ऐन पस्तिशीतच ‘उद्यान पंडित’ आणि ‘प्रगतिशील शेतकरी’ हे गौरव प्राप्त केले, तर त्यांचे बंधू अमर, परदेशातून फूड टेकमध्ये उच्च पदवी घेऊन आल्याबरोबर त्यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा गौरव मिळवला आहे.
विजयरावांचा आमरस जपानमध्ये लोकप्रियता मिळवत आहे, तर ‘अमर’ ब्रँडनं पाच देश पादाक्रांत केले आहेत. त्यांच्याकडे सीझनला ७ लाख डबे भरले जातात. आंबा आता मराठी माणसापुरता मर्यादित नाही राहिला, तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, इंग्लंड, अमेरिकेत वेगवेगळ्या डेझर्टसाठी त्याची मागणी वाढतेय.
चौथ्या पिढीचं योगदान काय? व्यवसाय वाढत असतोच. वेगळं काय? यावर लक्षात आलं, अमर देसाईंनी परिसरातल्या कॅनिंग फॅक्टरीजना एकत्र केलंय. केंद्र सरकारच्या ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ योजनेचे फायदे साऱ्यांपर्यंत पोहोचावेत म्हणून साडेपंधरा कोटींचा प्रकल्प आखला आहे. सहकाराचं वावडं असलेल्या कोकणातली तरुण, तंत्रज्ञानी पिढी विकासासाठी एकत्र आली आहे.
कृषितज्ज्ञ आनंद देसाई ‘रत्नागिरी हापूस’चं पेटंट घेण्याच्या प्रक्रियेत आहेत. हे पेटंट कोकणातल्या चार जिल्ह्य़ांना लाभदायक ठरणार आहे.
संगीतात विशेष प्रगती करणारी पूजा विजय देसाई आता पदवीधर होईल. नंतर घरच्या व्यवसायात उतरण्याचं तिनं ठरवलं आहे.
ऐंशी वर्षांपूर्वी ‘शेकडय़ात’ होणारा व्यवसाय आता ‘लाखो’ आंबे आणि डब्यांच्या घरात पोचला. या यशाचं गुपित विचारलं तर तीनही पिढय़ांच्या तोंडी एकच उत्तर येतं ‘स्वामींची कृपा’ देसाईंच्या पावसच्या घरात, अनंत निवासात स्वामी स्वरूपानंदांचं वास्तव्य होतं. ती मठी आज भाविकांचं श्रद्धास्थान आहे. सुना प्रियंका व आदिती येणाऱ्या भाविकांचे जातीने आगतस्वागत करतात. रघुनाथराव ऊर्फ भाऊ देसाईंनी बांधलेलं प्रशस्त मंदिरही पर्यटकांना आकर्षित करत आहे. भौतिक प्रगतीला अध्यात्मिक अधिष्ठान आहे, त्यामुळे ‘समाधान देणारी प्रगती’ हेच या कुटुंबाचं ध्येय आहे. अमर देसाईंच्या म्हणण्याप्रमाणे आंबा आणि आंब्याचे पदार्थ यांना जगभर पोचवून बारमाही व्यवसाय मिळाला तर या परिसराचा कायापालटच होईल. स्वामी स्वरूपानंदांच्याच शब्दात सांगायचं तर
भाव अंतरी यथार्थ। देव देणार समर्थ।।१।।
करू धंदा व्यवहार। स्मरू सदा सर्वाधार।।२।।
कर्ता करविता तोचि। ऐसी प्रचीती आमुची।।३।।
स्वामी म्हणे साक्षीभूत। सुखे राहू संसारात।।४।।
या शिकवणुकीचा संस्कार असलेलं हे घराणं म्हणजे देसाई बंधू आंबेवाले!    
vasantivartak@gmail.com