ch11ग्रामीण भारतात प्रचंड क्षमता दडली आहे. गरज आहे ती ही क्षमता ओळखून येथील तरुणाईच्या स्वप्नांना पंख देण्याची. सलोनी मल्होत्रा या तरुणीनं ही क्षमता ओळखली आणि ‘देसी क्रू’ या ग्रामीण भागातील बीपीओ कंपनीच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या तरुणाईला रोजगार उपलब्ध करून दिला. सलोनीनं अनेकांच्या आयुष्यात घडवलेल्या या सकारात्मक बदलाबद्दल..

एखाद्याचं भाषण आपण ऐकतो. त्या भाषणातून समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणाही मिळते. वक्त्याच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या पडतात. बदल घडवायचाच या निर्धाराने श्रोतेही बाहेर येतात. काही दिवसांनंतर मात्र ती ऊर्मी, तो उत्साह हवेतच विरून जातो. पण काहींच्या मनावर वक्त्याच्या बोलण्याचा इतका खोलवर परिणाम होतो की बदल घडवण्याच्या दिशेने त्यांची पावले पडू लागतात. सलोनी मल्होत्रा हे असंच एक नाव. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (मद्रास)चे प्राध्यापक अशोक झुनझुनवाला यांचं व्याख्यान सलोनीनं मनावर घेतलं आणि त्यातूनच निर्मिती झाली ती ‘देसी क्रू’ या अनोख्या संकल्पनेची..
सलोनी मल्होत्रा म्हणजे ‘देसी क्रू सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ची प्रणेती. देसी क्रूच्या माध्यमातून सलोनीने ग्रामीण भारतातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. व्यवसायानं इंजिनीअर असलेल्या २६ वर्षांच्या सलोनीला देशाच्या ग्रामीण भागासाठी काहीतरी करायचं होतं. झुनझुनवाला यांच्या भाषणाने प्रेरित झालेल्या सलोनीने त्यांनाच पत्र लिहून त्यांच्यासोबत काम करण्याविषयीची इच्छा प्रगट केली. ग्रामीण भागाच्या विकासासाठी काम करण्याचं भलं मोठं आव्हान सुखवस्तू घरातली सलोनी कसं पेलणार, अशी शंका झुनझुनवाला यांना आली. पण सलोनी प्रचंड जिद्दीची. ती अजिबात मागे हटली नाही. इंजिनीअर असल्याने दिल्लीला ती उत्तम पगाराची नोकरी करत होती. ग्रामीण भागासाठी काहीतरी करण्याच्या इच्छेपुढे सलोनीला ही नोकरी कवडीमोलाची वाटली. नोकरी सोडून सलोनी थेट चेन्नईला पोहोचली.
दिल्लीसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरातून चेन्नईसारख्या पूर्णत: विरोधी वातावरणात जाणं तसं कठीणच. या प्रांतातली भाषा, संस्कृती, खाणंपिणं पूर्णपणे वेगळं. या वातावरणाशी स्वतला जुळवून घेणं सलोनीला काहीसं अवघड गेलं. सलोनीचा निर्धार आणि ग्रामीण भागासाठी काहीतरी करण्याच्या जिद्दीपुढे आयआयटी मद्रासही नमलं. सलोनीला त्यांनी गांभीर्यानं घ्यायला सुरुवात केली. २००७ मध्ये तिने देसी क्रूची स्थापना केली. तिच्या कामाने प्रभावित झाल्याने आयआयटी मद्रासने सलोनीप्रमाणेच ‘देसी क्रू’लाही सामावून घेतलं. मद्रास आयआयटीमध्येच ‘देसी क्रू’चं कार्यालय आहे. या स्टार्टअपची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तिची निवड करण्यात आली. साधारण १५ ते २० कर्मचारी काम करू शकतील एवढे लहान बीपीओ ग्रामीण भागात असावेत, अशी प्रा. झुनुझुनवाला यांची अपेक्षा होती. ‘देसी क्रू’नं ही अपेक्षा पूर्ण केली आहे, असंच म्हणावं लागेल.
अभियांत्रिकीचं शिक्षण सलोनीनं पुण्यातल्या भारती विद्यापीठातून घेतलं होतं. देशाच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी काहीतरी करण्याची गरज असल्याचं तिला याच काळात जाणवलं होतं. याला कारणही तसंच होतं. पुण्यात शिकताना सलोनीसोबत राहणाऱ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील मुलींनी तिला अभियांत्रिकीच्या विषयाबद्दल विचारलं. ‘इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स’ असं सलोनीने सांगताच आपण क म्प्युटर सायन्स शिकत असल्याचं त्या मुलीने मोठय़ा अभिमानाने सांगितलं. या मुलीने आयुष्यात संगणक बघितलाही नव्हता. पण क ॉम्प्युटर सायन्स या विषयात पदवी घेतल्यानंतर नोकरीची कवाडं खुली होतील, या एकाच आशेवर ती ते शिकत होती. या विषयात तिला रस होता की नव्हता ते माहीत नसलं तरीही सलोनीला मात्र ग्रामीण भागातल्या बिकट परिस्थितीबद्दल फार वाईट वाटलं आणि त्यांच्याबद्दल काहीतरी करण्याची जिद्द तिच्या अंगात संचारली.
आपण ग्रामीण भागासाठी काम करायचं हे तिनं पुण्यातच ठरवून टाकलं होतं. इंजिनीअर झाल्यानंतर तिचा हा निर्धार अधिकच पक्का झाला.
ग्रामीण भागासाठी काहीतरी करायचं, म्हणजे नेमकं काय, असा विचार करत असताना आपल्याला कोणताही दानधर्म करायचा नसल्याचं तिनं ठरवूनच टाकलं होतं. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी तिला स्वतचा व्यवसाय उभा करायचा होता.
‘वेबचटनी’ या कंपनीत काम करत असताना तिने झुनझुनवाला यांचं व्याख्यान ऐकलं आणि तिच्या सगळ्या शंका दूर झाल्या. झुनझुनवाला यांना भेटल्यानंतर त्यांनी तिला संशोधनासाठी दीड वर्षांचा कालावधी दिला. मधल्या काळात तिने बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. झुनझुनवाला यांच्या ‘एन-लाउंज’ या कंपनीची कार्यपद्धती तिने अनुभवली. ग्रामीण भागातल्या तरुणांबद्दल, ग्राहकांच्या गरजांबद्दलही तिने बराच अभ्यास केला. ग्रामीण भागातले तरुण कामाच्या बाबतीत शहरी भागातल्या तरुणांइतकेच सक्षम असतात. पण ग्रामीण भागात फारशा सोयीसुविधा न मिळाल्याने त्यांना शहरातल्या तरुणांपेक्षा जास्त काळ प्रशिक्षण द्यावं लागतं. शहरी आणि ग्रामीण मनुष्यबळात एवढाच काय तो फरक असल्याचा निष्कर्ष वर्षभराच्या संशोधनानंतर तिने काढला. या सगळ्या २००५ सालातल्या घडामोडी. त्यानंतर साधारण दोन वर्षांनी ‘देसी क्रू’चं रोपटं रुजलं. सलोनीच्या एका मित्रानेच ‘देसी क्रू’ हे नाव सुचवलं. तिच्या व्यवसायाच्या संकल्पनेला हे नाव अगदी चपखल बसलं.
तामिळनाडूतल्या भवानी या गावात ‘देसी क्रू’चा पहिला बीपीओ सुरू झाला. हळूहळू बीपीओंची संख्या वाढत गेली. ग्रामीण भागातल्या तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या. यामुळे आता ग्रामीण भागातल्या तरुणांना आपलं गाव सोडून नोकरीच्या शोधार्थ शहरात जावं लागत नाही. ग्रामीण भागातल्या बीपीओची ही संकल्पना तामिळनाडूपुरती मर्यादित न राहता राष्ट्रीय पातळीवर पोहोचावी यासाठी ‘इन्फ्रास्ट्रक्चर आणि फायनान्शिअल सíव्हसेस लिमिटेड’च्या ‘कॉमन सíव्हस सेंटर’ कार्यक्रमासोबत सलोनीच्या ‘देसी क्रू’नं भागीदारी केली. यामुळे ‘देसी क्रू’ या संकल्पनेचा देशभरात विस्तार झाला.
‘देसी क्रू’च्या बीपीओसाठी कर्मचाऱ्यांची निवड करणं मोठं आव्हानात्मक काम होतं. पण कर्मचाऱ्यांच्या निवडीचीही ‘देसी क्रू’ची ठरावीक पद्धत आहे. ‘देसी क्रू’ ग्रामीण भागातल्या उद्योजकांसोबत काम करते. या उद्योजकांना स्थानिक तरुणांची चांगली माहिती असल्याने कर्मचाऱ्यांची निवड करणं सोपं जातं. कर्मचारी निवडीची ही प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये पार पडते. उद्योजकाने गुणवान तरुणांची निवड केल्यानंतर त्यांची माहिती चेन्नईला पाठवली जाते. मग या विद्यार्थ्यांची ऑनलाइन चाचणी घेतली जाते. यशस्वी मुलांची मुलाखत घेऊन त्यांची भरती करण्यात येते. कर्मचारी निवडीची ही प्रक्रिया अत्यंत साधी आणि सोपी अशीच आहे.
सलोनी मल्होत्राच्या प्रयत्नांमुळे अनेकांची आयुष्यं आनंदाने उजळून गेली आहेत. सलोनीमुळे बदल कसा घडला याचं बोलकं उदाहरण म्हणजे तामिळनाडूतल्याच मिन्नूर गावचा विष्णू. मिन्नूर गावात ‘देसी क्रू’चं छोटंसं कार्यालय आहे. या कार्यालयात सुरुवातीला चार महिला काम करायच्या. कार्यालयातल्या कर्मचाऱ्र्याची संख्या हळूहळू वाढत गेली. विष्णू नावाचा तरुण हे कार्यालय चालवतो. विष्णूची फ्रँचायझी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पाच हजार लोकसंख्येच्या या गावातला ‘देसी क्रू’चा हा पहिलाच बीपीओ. एन-लाउंजमुळे विष्णू ‘देसी क्रू’च्या संपर्कात आला. स्वतचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या विष्णूला ‘देसी क्रू’नं मोठी संधी उपलब्ध करून दिली. बीपीओ म्हणजे नेमकं काय, हे ज्यांना माहीत नव्हतं त्यांना बीपीओमध्ये काम करण्याची संधी सलोनी मल्होत्राच्या प्रयत्नांमुळे मिळाली.
या कामात सलोनीला तिच्या डॉक्टर आई-वडिलांचा पूर्ण पािठबा मिळाला. त्यामुळेच सलोनी हा बदल घडवू शकली. फक्त महिन्याभरात ‘देसी क्रू’नं तामिळनाडूतल्या ६० तरुणांना रोजगार उपलब्ध करू दिला. तामिळनाडूसोबतच इतर राज्यांमध्ये ‘देसी क्रू’च्या शाखा आहेत. यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना करिअरच्या मोठय़ा संधी उपलब्ध झाल्या आहेत.
कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्ये ‘देसी क्रू’नं आपलं अस्तित्व दाखवून दिलंय. सलोनीनं घडवलेल्या बदलाची दखल अनेकांनी घेतली. ‘बिझनेस वीक डॉट कॉम’च्या वाचकांनी तयार केलेल्या आशियातल्या २५ तरुण उद्योजकांच्या यादीत सलोनीनं स्थान पटकावलं. तिच्या कामाचं अनेकांनी कौतुकही केलं.
ग्रामीण भागातल्या तरुणांच्या उत्पादनक्षमतेविषयी ग्राहकांना पटवून देणं हे ‘देसी क्रू’पुढचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं सलोनी सांगते. ग्रामीण भागात शहराच्या तोडीच्या सोयीसुविधा उभ्या करणं आमच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. प्रत्येक दिवस नवी आव्हाने घेऊन येत असल्याने या आव्हानांचा सामना करण्यातही वेगळी गंमत असल्याचं ती नमूद करते.
‘देसी क्रू’नं ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना कृषी क्षेत्राबाहेरच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. नोकरीधंद्याच्या शोधात शहरांमध्ये जाण्याऐवजी गावातच रोजगार मिळाल्याने त्यांचा ९० टक्के पगार वाचतो. या पगारातून ग्रामीण कुटुंबांच्या गरजा भागत असल्याचं ती सांगते. सलोनीची ‘देसी क्रू’ परवडणाऱ्या दरात आउटसोर्सिगच्या उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देते. मोठमोठय़ा बँका, इन्शुरन्स कंपन्या, प्रकाशन संस्था, मोबाइल कंपन्या देसी क्रूच्या ग्राहक आहेत.
इंग्रजीसोबतच तमिळ, गुजराती आणि िहदी या भारतीय भाषांमध्येही ही सेवा पुरवली जाते. ‘क्लिक 2.0’ आणि ‘पिगॅसस’ अशी दोन अ‍ॅप्लिकेशन्सही देसी क्रूनं तयार केली आहेत. या अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर व्हच्र्युअल कार्यालयाप्रमाणे केला जातो. यामुळे दुर्गम भागातल्या तरुणांनाही बीपीओमध्ये काम करण्याचा अनुभव मिळतो.
‘गावाकडे चला’ असा मंत्र महात्मा गांधींनी दिला होता. ग्रामीण भारताची ताकद त्यांनी तेव्हाच ओळखली होती. गांधीजींचा संदेश अमलात आणत सलोनीनं ग्रामीण भागातल्या तरुणांच्या क्षमतांना संधींचे पंख दिले आहेत. ग्रामीण तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सलोनीनं खूप प्रयत्न केले आहेत. अधिकाधिक तरुणांना देसी क्रूशी जोडून घेण्याचे तिचे प्रयत्न आजही सुरू आहेत. ग्रामीण भारतातल्या तरुणाईचं आयुष्य बदलणारी सलोनी मल्होत्रा खऱ्या अर्थाने चेंजमेकर ठरली आहे.
श्रिशा वागळे जादोन