प्रज्ञा शिदोरे – pradnya.shidore@gmail.com

हेरगिरीच्या पुरुषप्रधान क्षेत्रात काही स्त्रियांनी धाडसानं मोठी कामगिरी फत्ते के ली आहे. त्यातल्या काहींना ठार मारण्याची शिक्षा मिळाली, तर काहींना नंतरच्या काळात पुरस्कारही मिळाले. इतिहासात अशा स्त्रियांचे उल्लेख अभावानंच आढळतात. अशाच काही धडाडीच्या स्त्रियांविषयी ..

गुप्तहेरांवर आधारित कथा, कादंबऱ्या आणि चित्रपटांनी आपल्याला कायमच भुरळ घातली आहे आणि जर एखादी स्त्री गुप्तहेर असेल तर?  शत्रूच्या मुलखात जाऊन आपल्या दिसण्यानं, चतुर बोलण्या-वागण्यानं शत्रूकडची गुप्त माहिती मिळवणारी ही स्त्री काल्पनिक विश्वात कायमच आकर्षणाचं केंद्र ठरली आहे; पण वास्तव हे कल्पनेपेक्षा खूपच वेगळं असतं. वास्तवातल्या गुप्तहेर स्त्रियांची आयुष्यं पडद्यावर दिसतात तितकी रंजक  नक्कीच नाहीत. उलट अनेकदा तर ती जीवघेणीच ठरली आहेत.

आपल्या नजीकच्या इतिहासातली सर्वात प्रसिद्ध स्त्री गुप्तहेर म्हणजे माता हारी, म्हणजेच मार्गारिटा झेल्ले. ही मूळची डच. लहान असल्यापासूनच ती पुढे जाऊन काही तरी विशेष करेल हे सर्वाच्या लक्षात येत होतं. शाळेतही ती सगळ्यांत उठून दिसायची, कारण इतर डच मुलांच्या तुलनेत ती दिसायला थोडीशी सावळी,   सुंदर आणि मोहक होती, अनेक भाषांमध्ये निष्णात होती आणि धाडसीही होती.  १८७६ मध्ये जन्मलेल्या मार्गारिटाला पुरुषांच्या जगात आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी कसं बोलायचं, कसं वागायचं, हे पक्कं माहीत होतं. वडिलांच्या निधनानंतर वयाच्या १४ व्या वर्षीच तिला शिक्षिके चं शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या शहरात पाठवण्यात आलं; पण १६ व्या वर्षी मुख्याध्यापकांबरोबर अनैतिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून तिला काढून टाकण्यात आलं. तिथून ती हेग शहरात आली. १८९२ मध्ये हेगमध्ये ‘डच ईस्ट इंडीज’ किंवा आजच्या मलेशिया या तेव्हाच्या डच वसाहतींमधले अनेक अधिकारी असायचे. एकटय़ा पडलेल्या १८ वर्षांच्या मार्गारिटाला त्या दरम्यान वृत्तपत्रातल्या एका जाहिरातीला प्रतिसाद द्यावासा वाटला. ती जाहिरात होती, ‘विवाहासाठी एक आनंदी स्वभावाची तरुणी पाहिजे’ अशी. तिला होकार मिळाला आणि मार्गारिटा आणि कॅप्टन रुडॉल्फ मॅक्लॉईड यांचं लग्न झालं. अशी जाहिरात देणाऱ्या व्यक्तीबरोबर आयुष्य किती सुखात जाईल, अशी स्वप्नं पाहणाऱ्या मार्गारिटाला लवकरच सत्य परिस्थितीची जाणीव झाली. रुडॉल्फकडे लग्नानंतर तिला देण्याजोगं फारसं काही उरलंच नव्हतं. त्यानं तिला दिलं, ते कर्जबाजारी आयुष्य आणि आजार! लग्नाच्या तीनच वर्षांनंतर तिच्या लक्षात आलं, की तिला नवऱ्यापासून ‘सिफिलिस’ झाला आहे. तिची दोन्ही मुलं लहानपणी आजारी पडली आणि त्यातल्या एका मुलाचा मृत्यू झाला. १९०२ मध्ये ते नेदरलँडला परतले आणि दांपत्यानं घटस्फोट घेतला. हा प्रसंग वा या सगळ्या घटनांमुळे मार्गारिटाचं आयुष्य पूर्णत: बदलून गेलं. ती आता नर्तिका म्हणून पॅरिस शहरात आशियाई पद्धतीचा नृत्य प्रकार सादर करू लागली. ते वर्ष होतं १९०५.  या नृत्यांसाठी तिनं एक ‘मलय’ टोपणनाव स्वीकारलं, ‘माता हारी’. म्हणजेच सूर्य.  या वेळी ती करीत असलेली वेशभूषा पाहाता अश्लीलतेच्या आरोपावरून तिला अटक झाली असती तर नवल वाटलं नसतं; परंतु तिच्या प्रत्येक सादरीकरणाच्या आधी हे नृत्य मंदिरांमध्ये सादर होणाऱ्या कलांपैकी आहे, हे ती आवर्जून सांगायची. तिच्या एकू ण ‘प्रभावा’मुळे ती थोडय़ाच काळात पॅरिसमधली एक लक्षवेधी व्यक्ती ठरली. अनेक नेते, लष्करी अधिकारी, बडे व्यावसायिक, धनाढय़ व्यक्ती यांच्यात तिची ऊठबस होऊ लागली. १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धाच्या सुरूवातीला तिचं नर्तिका म्हणून असलेलं काम कमी होत गेलं; पण तिच्या या ‘गुणा’मुळेच फ्रान्समधील काही अधिकाऱ्यांना तेव्हाच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत असलेलं तिचं महत्त्व लक्षात आलं.  तिला फ्रान्सच्या ‘दक्सीएम ब्युरो’नं (ऊी४७ड्र्ढेी इ४१ीं४) दुसऱ्या कैसर विल्यमकडून जर्मन लष्कराबद्दलची माहिती गोळा करण्यासाठी तयार के लं. यासाठी तिला आमिष दाखवण्यात आलं ते तिच्या रशियन मित्राला भेटण्याचं. त्यानंतर तिनं जर्मनीलाही फ्रान्सबद्दलची काही माहिती पुरवली. हे तिनं जर्मनांचा विश्वास संपादन करण्यासाठी

के लं, की आणखी कशासाठी, याबद्दल संदिग्धता आहे; पण तिचं काम झाल्यावर जेव्हा ती फ्रान्सला परतली तेव्हा जर्मन गुप्तहेर असल्याच्या संशयावरून तिच्यावर खटला भरण्यात आला. १९१७ च्या ऑक्टोबर महिन्यात वयाच्या ४१ व्या वर्षी तिला शिक्षा म्हणून बंदुकीच्या गोळ्या घालून ठार करण्याची शिक्षा सुनावली गेली. या वेळी तिनं डोळ्यांवर पट्टी बांधण्यास नकार दिला आणि बंदूकधाऱ्यांना एक ‘फ्लाइंग किस’ देऊन ती दिमाखात मृत्यूला सामोरी गेली, अशी त्याबद्दलची कथा प्रसिद्ध आहे.

पहिल्या महायुद्धातलं माता हारीचं मुख्य काम हे काही हेरगिरीचं नव्हतं; पण दुसऱ्या महायुद्धात काही स्त्रियांनी हे काम समजून उमजून निवडलं आणि आपली निरीक्षण क्षमता, हुशारी आणि चिकाटी यांच्या आधारे ते तडीस नेलं. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान नाझी अधिकारी सतत गुप्तहेरांच्या शोधात असायचे. तपासतंत्राचा आणि स्वत:च्या गुप्तहेरांचा वापर करून त्यांनी अनेकांना पकडलंदेखील. मात्र एक व्यक्ती अशी होती, जिनं जर्मनीकडून बरीच गुप्त माहिती गोळा केली; पण ती कधीही पकडली गेली नाही. हे नाव म्हणजे व्हर्जिनिया हॉल. व्हर्जिनिया ही नाझीव्याप्त फ्रान्समधली अमेरिकन गुप्तहेर होती; पण जर्मनांना ती ‘लिंपिंग लेडी’ म्हणूनच माहीत होती. मेरीलँडमध्ये एका धनाढय़ आणि बहुश्रुत कुटुंबात वाढलेली व्हर्जिनिया. तिनं पदवीचं शिक्षण अमेरिकेत सुरू के लं आणि ते पॅरिस आणि व्हिएन्नामधून पूर्ण केलं. या दरम्यान तिनं

फ्रें च, जर्मन, इटालियन आणि कामचलाऊ रशियन या भाषा आत्मसात केल्या. पदवीचं शिक्षण संपवल्यानंतर तिला अमेरिकन परराष्ट्र सेवेत जाऊन अमेरिकेसाठी काम करण्याची इच्छा होती; पण तिचा अर्ज ‘नो वुमन, नॉट गोइंग टू हॅपन’ असं  सांगून नाकारण्यात आला. तरीही हार न मानता दुसऱ्या मार्गानं या सेवेत शिरकाव करायचा असं तिनं ठरवलं. त्यासाठी प्रथम तिनं वॉरसॉ आणि नंतर टर्कीमधील अमेरिकन दूतावासात काम सुरू केलं. या दरम्यान, काही मित्रांबरोबर शिकारीला गेली असताना तिच्या पायाला गोळी लागली आणि तिचा पाय कापावा लागला. तिनं अमेरिकेत आल्यावर पुन्हा आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्ज केला. या वेळेस कारण दिलं गेलं ते तिच्या व्यंगाचं. यानंतर १९४० मध्ये व्हर्जिनिया पॅरिसला गेली. त्या वेळी जर्मनी फ्रान्सवर ताबा मिळवण्याच्या तयारीत होती. तिनं या वेळी रुग्णवाहिका चालकाचंही काम केलं; पण फ्रान्स जर्मनीला शरण गेल्यावर ती ब्रिटनमध्ये पळून आली. लंडनमध्ये एका पार्टीत व्हर्जिनिया हिटलरच्या विरोधात हिरिरीनं बोलत असताना एका व्यक्तीनं तिच्या हातात एक कार्ड दिलं. त्यावर लिहिलं होतं, ‘तुला हिटलरला खरंच रोखायचं असेल तर मला येऊन भेट.’ ते कार्ड होतं गुप्तहेर तयार करणाऱ्या

व्हिरा अ‍ॅटकिन्स हिचं. प्रसिद्ध लेखक इयान फ्लेमिंग यांच्या ‘बाँड’ कादंबऱ्यांमधलं ‘मिस एम’ हे पात्र या अ‍ॅटकिन्स यांच्यावर आधारलेलं आहे असं बोललं जातं, अर्थात फ्लेमिंग यांनी हे कधीही मान्य केलेलं नाही. अ‍ॅटकिन्स या चर्चिलनं सुरू केलेल्या ‘स्पेशल ऑपरेशन्स एग्झीक्युटिव्ह’साठी (‘एसओई’) गुप्तहेरांच्या नेमणुका करायच्या. व्हर्जिनिया ही ब्रिटनची पहिली, परदेशात राहून काम करणारी स्त्री ‘एसओई एजंट’ बनली. फ्रान्समध्ये व्हर्जिनिया अमेरिकन वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क पोस्ट’ची पत्रकार म्हणून राहिली. फ्रान्समधून तिनं फक्त जर्मन सैन्याची माहितीच दिली नाही, तर असं गुप्त काम करणाऱ्या हेरांची नियुक्तीही केली. संध्याकाळच्या ‘बीबीसी’च्या बातम्यांमधील गुप्त संदेशांतून तिला लंडनहून निरोप पोहोचवले जायचे. ती तिच्या ‘न्यूयॉर्क’मधील संपादकांना ‘बातम्यां’मधून इथले संदेश पोहोचवायची. एखादी वस्तू पोहोचवायची असेल तर ती तिच्या लियाँमधील घरासमोर एक विशिष्ट कुंडी  ठेवायची. लंडनहून काही संदेश येणार असेल, तर एका कॅफे किंवा बारमध्ये गेल्यावर तिथला मालक आपणहून तिला एक ग्लास आणून द्यायचा. व्हर्जिनिया हॉल ही नाझींसाठी इतकी धोकादायक ठरली होती, की तिला पकडण्यासाठी त्यांनी भित्तिपत्रकं  लावली होती. त्यामुळे व्हर्जिनियानं फ्रान्समधून पळ काढला. यासाठी तिनं आपल्या कृत्रिम पायाची पर्वा न करता नोव्हेंबरच्या कडाक्याच्या थंडीत अवघड अशी पिरेनीज पर्वतरांग पार केली आणि स्पेनमधून लंडनला परतली; पण व्हर्जिनियाची हिटलरबरोबरची लढाई अद्याप संपली नव्हती. जेव्हा ‘एसओई’नं तिला पुन्हा फ्रान्सला पाठवण्यास नकार दिला, तेव्हा तिनं ‘युनायटेड स्टेट्स ऑफिस ऑफ स्ट्रॅटेजिक सव्‍‌र्हिस’बरोबर (‘ओएसएस’- ‘सीआयए’चं आधीचं रूप) काम करायचं ठरवलं. १९४४ मध्ये नॉर्माडीमध्ये दोस्त राष्ट्रांनी (ब्रिटन, अमेरिका, सोव्हिएत संघ) केलेल्या निर्णायक हल्लय़ाच्या काही महिने आधी तिनं जर्मनांविरुद्ध हल्लय़ांचा आराखडा रचला. या वेळी व्हर्जिनियानं ६० वर्षांच्या मेंढपाळ स्त्रीचं रूप धारण के लं होतं. तिच्या नेतृत्वाखाली काही मालवाहू गाडय़ा पकडल्या गेल्या, चार पूल पाडण्यात आले आणि १५० नाझींना मारण्यात आलं, तर ५०० नाझींना अटक करण्यात यश मिळालं. अमेरिकेत परतल्यावर तिला ‘डिस्टिंग्विश्ड सव्‍‌र्हिस अ‍ॅवॉर्ड’ हा बहुमान मिळाला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान हा मान मिळवणारी व्हर्जिनिया ही एकमेव स्त्री होती; पण एका स्त्रीला निमलष्करी दलाचं अधिकारपद देणं तेव्हा वादग्रस्त ठरलं असतं, म्हणून अमेरिकेनं तिला अधिकृतपणे कधीही नेतृत्वाचं पद दिलं नाही. आज जीना हॅस्पेल ही ‘सीआयए’चं संचालकपद भूषवत आहे; पण त्या काळी मात्र स्त्रिया या पुरुषांच्या तुलनेत अधिक भावनाप्रधान, वस्तुनिष्ठता आणि आक्रमकता कमी असलेल्या अशा समजल्या जायच्या. वयाच्या ६० व्या वर्षांपर्यंत व्हर्जिनिया ‘सीआयए’मध्ये काम करत होती.

दुसऱ्या महायुद्धामध्ये आणि मुख्य म्हणजे ब्रिटिशांविरुद्धच्या लढय़ात भारतीय स्त्री गुप्तहेरांनी मोठी कामगिरी केली होती. त्यांपैकीच एक म्हणजे नूर इनायत खान. भारतीय वंशाच्या नूर इनायत खान यांचा जन्म १९१४ मध्ये मॉस्कोमध्ये झाला. त्यांचे वडील भारतीय (-त्यांचं म्हैसूरच्या राजा टिपू सुलतान यांच्याशी नातं सांगितलं जातं), तर आई अमेरिकन. त्यांचं शिक्षण हे प्रथम ब्रिटन आणि नंतर पॅरिसमध्ये झालं. नोव्हेंबर १९४० मध्ये फ्रान्सचा पाडाव झाल्यावर त्या ब्रिटनमध्ये पळून आल्या आणि ‘विमेन ऑक्झिलरी एअर फोर्स’मध्ये रुजू झाल्या. १९४२ मध्ये त्यांना ‘एसओई’मध्ये घेण्यात आलं आणि फ्रान्समध्ये पाठवण्यात आलं. तिथे मॅडलीन या नावानं त्यांनी काम सुरू केलं. पुढे एका फ्रें च स्त्रीनं दगा दिल्यामुळे त्यांना जर्मन ‘गेस्टापो’नं ताब्यात घेतलं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शौर्यासाठी ‘जॉर्ज क्रॉस पदका’नं त्यांना गौरवण्यात आलं.

भारतीय गुप्तहेर सेहमत खान (बदललेलं नाव) यांच्या कामाबद्दलची माहिती हरिंदरसिंग सिक्का यांनी लिहिलेल्या ‘कॉलिंग सेहमत’ या पुस्तकामुळे समोर आली. या पुस्तकावर आधारलेला ‘राझी’ हा चित्रपटही २०१८ मध्ये प्रदर्शित झाला.

याशिवाय भारतातील स्त्री गुप्तहेरांची फारशी माहिती उपलब्धही नाही. अर्थात नामानिराळं राहून आपल्याला दिलेलं काम अचूक फत्ते करणं हेच तर त्यांच्या कामाचं मर्म. त्यामुळे त्यांची माहिती नसणं हे एकप्रकारे त्यांनी ती गुप्तता शेवटपर्यंत टिकवली, असंही म्हणता येईल!