डॉ. प्रसाद राजहंस यांनी भारतात सुरू केलेल्या ई.एम.एस. (इमर्जन्सी मेडिकल सव्‍‌र्हिस) अर्थात अत्याधुनिक रुग्णवाहिनीला शासकीय कवच मिळाले आहे. १०८ हा क्रमांक राज्यात कुठूनही आणि कोणत्याही नेटवर्कवरून वा लँडलाइनवरून फिरवला तरी रुग्णवाहिका रुग्णापर्यंत पोहोचून तातडीने उपचार सुरू करते. चार लाख रुग्णांनी ईएमएस सेवा घेतली असून सध्या ९३७ रुग्णवाहिका राज्यात कार्यरत आहेत.

गो ष्ट १८ वर्षांपूर्वीची! स्कॉटलंडमधून भरधाव चाललेल्या ट्रेनमध्ये अचानक घोषणा होते, ‘एक प्रवासी बेशुद्ध झाला आहे. कोणी डॉक्टर मदत करेल काय?’ एक भारतीय तरुण डॉक्टर मित्रासह त्वरेने उठून तिकडे धावतो. खरोखर तिथे असते एक मृतवत् व्यक्ती, हृदय आणि श्वास दोन्ही बंद. हे दोघं तातडीने सीपीआर चालू करतात. म्हणजे रुग्णाच्या छातीच्या हाडावर दाब द्यायचा, तोंडात जोराने फुंकर घालायची आणि हाताच्या प्रहारांनी त्याच्या हृदयाला चेतना द्यायची. हा प्रकार पुढचं स्टेशन येईपर्यंत अथक चालू राहतो. गाडी थांबते. प्लॅटफॉर्मवर एक सुसज्ज रुग्णवाहिका उभी असते. प्रशिक्षित कर्मचारी आत येतात, त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन तात्काळ हॉस्पिटलकडे रवाना होतात. ट्रेनमधील सर्व प्रवासी टाळ्या वाजवून तारणहार बनलेल्या डॉक्टरांचं अभिनंदन करतात. पुढे चौकशी केल्यावर त्या व्यक्तीचा जीव वाचला, असं कळतं.

ईएमएस ही संकल्पना रुजण्याची ही सुरुवात होती. भारतात परतलेला तो ध्येयवादी तरुण म्हणजे              डॉ. प्रसाद राजहंस. पुण्यात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अति दक्षता विभाग प्रमुख म्हणून काम करतानाच हृदयविकाराचा झटका आलेले रुग्ण त्वरेने रुग्णालयात कसे पोचवता येतील, भरती होण्याआधीच घरी किंवा वाहनात असतानाच प्राण वाचवणारे तातडीचे उपचार कसे करता येतील यावर त्यांच्या मनात विचार चालू झाला. त्यातून उपलब्ध असलेल्या एका रुग्णवाहिकेत जरूर ते बदल करून, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, डिफिब्रिलेटर इत्यादी गोष्टी बसवून ‘पुणे हार्ट ब्रिगेड’ची पहिली रुग्णवाहिका १९९९ मध्ये रस्त्यावर धावू लागली. तोपर्यंत अशा वाहनाचा उपयोग रुग्णाला इकडून तिकडे नेण्यापुरताच होत असे. त्यात रुग्णाची सुरक्षितता, आराम आणि तातडीचे उपचार याचा विचार नव्हता. तसंच असे उपचार करण्यासाठी विशिष्ट कौशल्य प्राप्त केलेले डॉक्टरही नसायचे. यासाठी डॉक्टरांना विशेष प्रशिक्षण देऊन तयार केलं पाहिजे या विचारानं प्रेरित होऊन डॉ. राजहंस यांनी पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या सहकार्याने ‘बीएलएस : बेसिक लाइफ सपोर्ट’, आणि ‘एएलएस : अ‍ॅड्व्हान्स्ड लाइफ सपोर्ट’ हे दोन लहान अभ्यासक्रम, तसंच तातडीची वैद्यकसेवा ही एक वर्षांची पदविका असे अभ्यासक्रम सुरू केले. याच्या पात्रतेसाठी अ‍ॅलोपथी, आयुर्वेद अथवा होमियोपॅथीची वैद्यक पदवी असणं आवश्यक आहे. या कोर्समध्ये अमेरिकन हार्ट असोसिएशनने (एएचए) प्रमाणित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अंतर्भाव केला असून सुरुवातीच्या पहिल्या गटासाठी शिक्षक म्हणून एएचएची एक तुकडी मुद्दाम पुण्याला आली होती. आजवर सुमारे ३५०० डॉक्टर यातून प्रशिक्षित झाले आणि ताबडतोब कार्यरतही झाले.

इकडे ‘पुणे हार्ट ब्रिगेड’च्या चळवळीनंही आकार घेतला. मंगेशकर हॉस्पिटलच्या पाठोपाठ अन्य मोठय़ा रुग्णालयांनीही आपापल्या रुग्णवाहिका सुसज्ज केल्या आणि ‘ईएमएस’साठी सक्रिय केल्या. मात्र ‘ईएमएस’च्या उपक्रमाला राज्य सरकारचा एक शासकीय कार्यक्रम म्हणून राबवायची सुरुवात प्रथम आंध्र प्रदेशात २००५ साली झाली. त्यांच्याकडे पैसा होता, तंत्रज्ञान होतं, पण प्रशिक्षित मनुष्यबळ नव्हतं. ते पुरवलं गेलं महाराष्ट्रातून, पुण्यातून. त्यासाठी डॉ. राजहंस यांच्याशीच संपर्क साधला गेला. तातडीची वैद्यकसेवा देण्यात निष्णात अशा ४० डॉक्टरांची तुकडी तेव्हा आंध्र प्रदेशात जाऊन कामाला लागली. त्यानंतर गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, आसाम, गोवा इत्यादी राज्यांनी ‘ईएमएस’ सेवा द्यायला सुरुवात केली.

२०१४ मध्ये प्रत्यक्षात आलेला मेम्स (महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सव्‍‌र्हिस) हा एक शासकीय उपक्रम असून त्याच्या दैनंदिन कारवाईची जबाबदारी ‘भारत विकास ग्रुप’ (बीव्हीजी) या खासगी संस्थेकडे सोपवण्यात आलेली आहे. सर्व कामकाजाला येणारा खर्च महाराष्ट्र शासनाकडून भागवला जातो. ‘बीव्हीजी’ला महाराष्ट्र शासनाकडून मिळालेल्या ९३७ रुग्णवाहिका सध्या राज्यात संचार करण्यासाठी तयार आहेत. त्यांपैकी ७०४ गाडय़ा बेसिक लाइफ सपोर्ट देतात तर २३३ गाडय़ांमध्ये अ‍ॅड्व्हान्स्ड सपोर्ट देण्याची व्यवस्था आहे. नियमाप्रमाणे ही वाहने सार्वजनिक किंवा सरकारी संस्थांच्या आवारात ठेवावी लागतात, उदा. रेल्वे किंवा बस स्थानक, सरकारी रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक उपचार केंद्र, ग्रामपंचायती, पोलीस चौकी, महामार्ग, टोल प्लाझा अशा अनेक ठिकाणी या रुग्णवाहिका नियुक्त केलेल्या आहेत. प्रत्येक रुग्णवाहिकेची रचना आणि आतली उपकरणं अत्युच्च दर्जाची आहेत. या गाडय़ा कायम दुरुस्त राहाव्या म्हणून काळजी घेतली जाते.

बीएलएस सेवा देणाऱ्या प्रत्येक गाडीत हलक्या वजनाचं स्ट्रेचर, मानेला आधार देण्यासाठी कॉलर, पोर्टेबल ऑक्सिजन, रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजणारं ऑक्सिमीटर हे उपकरण, रक्तदाब, रक्तशर्करा मोजण्याचं यंत्र, शिरेतून ग्लुकोज, सलाइन, तसंच तातडीची औषधं देण्याची सोय असते. डॉक्टर आणि वाहनाचा चालक या दोघांनाही रुग्णाला त्रास न होता हलकेच उचलून गाडीत ठेवण्याचं कौशल्य शिकवलेलं असतं. रुग्णाचा रक्तदाब, हृदय, श्वसन या जीवनावश्यक क्रिया नीट चालू ठेवण्याची जबाबदारी डॉक्टरची असते. रुग्ण बेशुद्ध होणे, रक्तदाब घसरणे, श्वास बंद पडणे, रक्तस्राव होणे, झटके मारणे, हालचाल करता न येणे, अशा विविध प्रकारच्या बिकट प्रसंगी कोणते उपचार तातडीने केले पाहिजेत याचा अभ्यास त्यांच्याकडून करून घेतलेला असतो. जरूर वाटल्यास तो भ्रमणध्वनी वापरून कार्यालयात उपस्थित ज्येष्ठ डॉक्टरांचा सल्ला घेऊ  शकतो.

एएलएसची सुविधा असलेल्या गाडीत वरील साऱ्या गोष्टी असतातच पण शिवाय कृत्रिम श्वसनयंत्र, अनियमित, अतिजलद ठोके पडणाऱ्या हृदयाला शॉक देऊन जागेवर आणणारं डिफिब्रिलेटर नामक यंत्र आणि अत्यंत प्रभावी जीवरक्षक औषधं नेमक्या मात्रेत शिरेतून देण्यासाठी सिरिंज पंप या गोष्टी जास्तीच्या असतात. तसंच २ मोठे ऑक्सिजन सिलिंडर असून त्यात किती ऑक्सिजन शिल्लक आहे तो आकडा एका पॅनेलवर स्पष्ट दिसत असतो.

हा उपक्रम शासकीय असल्यानं बहुतेक वेळा रुग्णाला जवळच्या सरकारी रुग्णालयात पोचवलं जातं. हृदयविकाराचा रुग्ण असेल तर पुढचे उपचार करणाऱ्या अतिदक्षता विभागात, अपघात असेल तर ‘ट्रॉमा युनिट’मध्ये, गर्भवती असेल तर स्त्रीरोग-प्रसुतीच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाला घेऊन जातात. शहरी रुग्णाला मात्र विशिष्ट डॉक्टर किंवा रुग्णालयात जायचे असल्यास त्यांच्याकडून तसं लिहून घेऊन त्यांना इच्छित ठिकाणी पोचवलं जातं. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळ अजिबात न दवडता ही सेवा दिली जाते, तीसुद्धा विनाशुल्क. अतितीव्र आजारात उपचारांना जास्तीत जास्त यश मिळण्यासाठी एक तासाच्या आत उपचार सुरू झाले पाहिजेत. याला ‘गोल्डन अवर : सुवर्ण घटिका’ म्हटलं जातं. रुग्णवाहिकेला संदेश मिळाल्यापासून रुग्णावर प्रत्यक्ष उपचार सुरू होईपर्यंतचा आजचा वेळ एक ते दीड तास आहे. तो अजून कमी करण्यासाठी ईएमएस प्रयत्नशील आहे.

ही सेवा अधिकाधिक कार्यक्षम करण्यासाठी उच्च दर्जाचं आयटी तंत्रज्ञान लागतं. संस्थेच्या मुख्य कार्यालयाचं स्वरूप एखाद्या अत्याधुनिक सॉफ्टवेअर कंपनीसारखं आहे. या संस्थेचा रोजचा कारभार कसा चालतो हे प्रत्यक्ष पाहणं मोठं रोमहर्षक आणि स्फूर्तिदायकही आहे. इथला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कॉल सेंटर. ८-८ तासांच्या शिफ्टमध्ये अहोरात्र चालू असलेल्या या ठिकाणी कोणत्याही क्षणी सुमारे ३० कर्मचारी दूरध्वनीवर आलेले कॉल्स घेत असतात.

संभाषण सुरू होताच त्याचा ओळख क्रमांक दिला जातो. कॉल घेणारा कर्मचारी रुग्णाची प्राथमिक लक्षणं आणि पत्ता विचारून घेतो. त्या वेळी घाबरलेल्या, गोंधळून गेलेल्या कॉल करणाऱ्या व्यक्तीला तो धीरही देत असतो. त्याच वेळी त्याच्या पुढय़ातल्या दुसऱ्या स्क्रीनवर दिसणाऱ्या महाराष्ट्राच्या नकाशात हा पत्ता कुठे आहे हे तो ‘गुगल मॅप’च्या साहाय्याने बघत असतो. शहरी भागात पत्ता मिळायला अडचण नसते. ग्रामीण भागात, दूरस्थ ठिकाणी जवळचं मोठं गाव, रेल्वे स्टेशन इत्यादी माहितीवरून ती जागा सापडताच आजूबाजूला असणाऱ्या संस्थेच्या रुग्णवाहिका स्क्रीनवर दिसू लागतात. त्या भागातील जवळात जवळ असलेल्या रुग्णवाहिकेशी कॉलरचा संपर्क थेट करून दिला जातो. हे सर्व संभाषण ध्वनिमुद्रित होत असतं.

ज्या क्षणी रुग्णवाहिकेतील डॉक्टर दूरध्वनी करणाऱ्याशी बोलू लागतो तेव्हापासून सुरू होतो त्याचा ‘प्रतिसाद समय’! आता ती रुग्णवाहिका रुग्णाच्या दिशेनं दौडू लागते. हे गाडीचं मार्गक्रमण आपल्याला स्क्रीनवर दिसू लागतं, कारण प्रत्येक गाडीला ट्रॅकर बसवलेला आहे. तसंच काही कारणानं गाडी बंद पडल्यास त्याच भागातल्या किमान पाच गाडय़ा उपलब्ध होऊ  शकतील अशी काळजी घेतली आहे. हे सगळे दूरध्वनी पोलीस आणि अग्निशामक दलांशी संलग्न केलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही विभागांना या कॉलची खबर आपोआप मिळत राहते. पूर, भूकंप, दरड कोसळणे, आग, अशा प्रकारच्या संकट समयी ईएमएसबरोबर पोलीस आणि अग्निशामक दल हेसुद्धा त्या ठिकाणी धावून जातात आणि सेवा देतात.

कार्यालयात दुसऱ्या एका मोठय़ा स्क्रीनवर महाराष्ट्रातील सर्व रुग्णवाहिका दिसत असून त्यातल्या मोकळ्या किती, रुग्णांना नेणाऱ्या किती, त्या बेसिक आहेत की अ‍ॅड्व्हान्स्ड हे वेगवेगळ्या रंगात दर्शवलेलं आहे. यामध्ये ‘रियल टाइम’ वापरल्यामुळे क्षणोक्षणी पडद्यावर ही माहिती बदलताना आपण पाहू शकतो.

२६ जानेवारी २०१४ रोजी सुरू झालेली ही रुग्णसेवा. १०८ हा ३ आकडी नंबर राज्यात कुठूनही फिरवला तरी तत्क्षणी प्रतिसाद मिळणारच. मग तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर असा नाहीतर लँडलाइनवर. कॉल योग्य तिथेच जाणार, मात्र तुम्हाला तातडीची वैद्यकीय सेवा हवी असली तरच कॉल करा! गेल्या  दीड वर्षांत इथे ४३ लाखांहून जास्त कॉल्स आले. त्यातल्या इमर्जन्सीज होत्या फक्त ३ लाख ९५ हजार ८४५. म्हणजेच आलेल्या कॉल्सपैकी ९० टक्के कॉल्स चुकीच्या कारणासाठी केलेले होते. त्यातल्या हृदयविकारासारख्या मेडिकल इमर्जन्सीज होत्या १ लाख ४६ हजार ९७८, अपघात ५८ हजार ५९०, प्रसुतीसाठी निघालेल्या स्त्रिया १२३९८, (त्यांपैकी ४१९० रुग्णवाहिकेतच प्रसूत झाल्या). याशिवाय विषबाधा १ लाख ५३ हजार १११ आणि इतर आत्महत्या, खून, मारामारी, पाण्यात बुडणे, विजेचा झटका, भाजणे इत्यादी अनेक कठीण प्रसंग. आतापर्यंत जवळजवळ ४ लाख रुग्णांनी ईएमएस सेवा घेतली आहे. अत्यंत गरजेच्या वेळी धावून येऊन प्राणदान देणारी ईएमएस ही सेवा खरोखर संजीवनी विद्याच म्हटली पाहिजे.

(या लेखासाठी विशेष साहाय्य : डॉ. प्रसाद राजहंस, एम. डी. अनेस्थेशिया, प्रमुख, अतिदक्षता विभाग, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय. ज्येष्ठ सल्लागार, महाराष्ट्र ईएमएस आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ dmhicu@gmail.com)
-डॉ. लीली जोशी – drlilyjoshi@gmail.com