परदेशात श्वानाच्या जन्माला आलं की आयुष्य सफल झालं असेच अनुभव येतात. आपल्याकडे घरात मुलांचे लाड होणार नाहीत इतके लाड या कुत्र्यांचे होतात. या लाडाचे कौतुक सांगणारा हा लेख.
आ मच्या लहानपणी ‘पाळीव प्राणी’ या विषयावर निबंध लिहायला सांगितला की तो हमखास ‘कुत्रा’ विषयावरच लिहिला जायचा. त्याचे नाव मोत्या असायचे व घराचे रक्षण करणे हे त्याचे कर्तव्य असायचे. यासाठी उद्धृत केली जाणारी एकमेव ‘सुरस आणि चमत्कारिक’ कथा म्हणजे चोर आले असताना रात्री मोत्याने कुटुंबीयांना जागे केले त्यामुळे चोरी झाली नाही आणि चोर पकडले गेले. या ‘वन अ‍ॅण्ड ओन्ली’ संकल्पनेला माझ्या अमेरिकेतील आणि ऑस्ट्रेलियातील वास्तव्यात छेद गेला.
एखाद्या माणसाला कुणीच विचारत नसेल तर त्याला कुत्रासुद्धा विचारत नाही असे म्हणायची पद्धत आहे. परंतु आपल्याकडे माणसाला किंमत नाही इतकी कुत्र्याला पाश्चात्त्य देशात किंमत आहे. अगदी सामान्यातल्या सामान्य माणसापासून ते राष्ट्राध्यक्षांपर्यंत कुत्रा हा कुटुंबातील प्रत्येकाच्या गळय़ातील ताईत असतो. त्यामुळे त्यांच्यावर अनेक पुस्तके लिहिली जातात, चित्रपट निघतात, कुत्र्यांच्या नावे मालमत्ता केल्या जातात. कुत्र्यांशी संबंधित वस्तूंची उलाढाल तेथे लाखो डॉलर्स असते आणि कुत्र्याशी संबंधित व्यवसाय आणि नोकऱ्या हजारो डॉलर्सच्या हिशेबात असतात.
याची एक झलक आपल्याला दिसते ती तेथील वृत्तपत्रांतून येणाऱ्या बातम्या व जाहिराती यामधूनच. या वेळच्या माझ्या ऑस्ट्रेलियातील वास्तव्यात याविषयीची कात्रणे मी घेतली आणि एकत्रितपणे वाचली तेव्हा आश्चर्यचकित झाले.
प्रत्येक सजीवाची मूलभूत गरज असते अन्न. आपल्याकडे भटकी कुत्री उकिरडे धुंडाळत ही गरज भागवतात. तर पाळीव कुत्र्यांना दूध, भाकरी व इतर शाकाहारी किंवा मांसाहारी भोजन मिळते. पाश्चात्त्य देशांत भटकी कुत्री हा प्रकारच नाही. पाळीव कुत्र्यांचे म्हणाल तर आपल्याकडे लग्नकार्यातल्या स्वेच्छाभोजनाइतकी विविधता कुत्र्यांच्या भोजनाची पाश्चात्त्य देशांत आहे. या भोजनासाठी असंख्य ब्रँडस् बाजारात असतात. त्यांचे डिस्काऊन्ट सेलही लागतात. शिवाय छोटय़ा पपी डॉग्जकरिता वेगळे मध्यम आकाराच्या कुत्र्यांकरिता वेगळे, प्रौढ कुत्र्यांकरिता वेगळे खाद्य तयार केले जाते. उदाहरणार्थ पेडिग्री ड्राय डॉग फूड, वेट डॉग फूड, लकी डॉग बोन्स यात बिस्किट फ्लेवर आणि बीफ  फ्लेवर, रॉयल कॅनिन-लॅबॅड्रोर अ‍ॅडल्ट आणि इतर अ‍ॅडल्ट यांच्यासाठी, फ्रन्टलाइन प्लस पॅक्स युकानुम्बा हेल्दी एक्सट्राज, बिग डॉग पॅटीस, होलिस्टिक सिलेक्ट वर डॉग फूड, वॅनपी डॉग ट्रीट्स-यात चिकन, बिस्किटे आणि स्वीट पोटॅरो हे फ्लेवर्स अशा अनेक जाहिराती. या अशा निवडप्रक्रियेतून राजमान्य राजश्री श्वान महाराजांचा जेवणाचा मेनू तयार होतो.
आता कुत्र्यांसाठी असलेली खेळणी. मॉलमध्ये याच्यासाठी वेगळे दालन असते. प्रथम हे दालन पाहिले तेव्हा मला ती छोटय़ा मुलांची खेळणी वाटली. मग माझ्या घोर अज्ञानाची मला लाज वाटली. शुअर पेट असरेर्टेड डॉग टॉइज-यात विविध रंगाचे रंगीबेरंगी चित्रमय चेंडू, कुत्र्यांना चघळण्यासाठी तऱ्हेतऱ्हेच्या रिंग्ज हे करण्यासाठी छोटय़ा छोटय़ा वेताच्या टोपल्या. असाच एक दुसरा ब्रँड चकिट टॉय रेंज. आता मालकाबरोबर सहलीला जायचे असेल तर कुत्रा कुठे खेळणार? तेव्हा त्याच्यासाठी अष्टकोनी तंबूसारखे आणि छत्रीप्रमाणे उघडणारे पार्टेबल पेट प्लेपेन. याचे कापड ऑक्सफर्ड ब्रँड आणि त्याला मऊ नायलॉनची जाळी. आतमध्ये कुत्र्याला खेळायला प्रशस्त जागा. कुत्र्याचे पिलू छोटे असले तर त्याला चावायला गंमत वाटावी म्हणून रंगीबेरंगी गुबगुबीत खेळण्यांतला साप. कुत्र्यांना खेळवण्यासाठी बॅट आणि बॉल. हा बॅटबॉल घेऊन कुत्र्यांचे मालक व त्यांची मुले कुत्र्यांसाठी आरक्षित हिरवेगार लॉन असलेल्या डॉग एक्सरसाइज एरियामध्ये जाणार व तेथे कुत्र्याशी खेळणार. आता तेथे कुत्र्याने शी केली तर मालक जवळ असलेल्या प्लॅस्टिक पिशवीत ती शीसुद्धा कौतुकाने उचलून ‘डॉग लिटर’ असे लिहिलेल्या कचराकुंडीत टाकणार.
खाऊन-पिऊन, खेळून श्रीयुत श्वान दमले की त्यांना आराम हवाच ना! तेव्हा त्यांसाठी शुअर पेट रेक्टॅँग्युलर बेड. डिलक्स मेमरी ऑथरेपेडिक पेट बेड असे बँड्र मिळतात. कुत्र्याला जर आर्थरायटिस झालेला तर त्या बेडची वळणे अशा पद्धतीने तयार केलेली असतात. ज्यान्वये कुत्र्याच्या दुखऱ्या भागांना आराम पडावा. थर्मल फ्लीसी पेट केव्ह ही तुमच्या कुत्र्यासाठी विशेष डिझाइन केलेली गादी असते. त्यामागे कुत्र्याला सुखनैव डुलकी काढता यावी हा विचार असतो. ही मऊ मऊ लोकरीची गादी आणि उशी असते ती कुत्र्याला ऊब देते आणि टोचत नाही. कुत्रा म्हातारा झाला की साहजिकच त्याच्या कमरेचे सांधे दुखणार. तेव्हा हिवाळय़ात उबदार आणि उन्हाळय़ाला थंड वाटावे अशी या गादीची रचना असते. यासाठी पाच सेंटीमीटर एक्स्ट्रा सॉफ्ट फोम वापरला जातो, शिवाय या गाद्या मशीन वॉशेबल असतात. जेणेकरून कुत्र्यांना जंतुसंसर्ग होणार नाही. एग केट्र ऑथरेपेडिक पेट बेड या बँड्रने डिलॅक्स सॉफ्ट पेट क्रेट तयार केला आहे. हे चौकोनी सूटकेससारखे छोटेसे घर असते. याची फ्रेम स्टीलची असूत ते एक्स्ट्रा स्ट्रॉग, पोर्टेबल, सॉफ्ट राऊंडेड कॉर्नरचे असते. आत प्रवेश करायला कुत्र्याला त्रास पडू नये म्हणून समोर तसेच बाजूंनी प्रवेशद्वार असते.
हवा खेळती रहावी म्हणून त्याला खिडक्या असतात, पाणी सांडले तर कुत्र्याला त्रास होऊ नये म्हणून ते वॉटरप्रूफ असते. आता इतके झाले तरी कुत्र्याला मालकाजवळ बसावेसे वाटते तर.. मग त्याला सोफ्यावर किंवा बेडवर चढणे सुलभ व्हावे म्हणून फोम पेट स्टेप्स असतात. या तीन स्टेप्स सोफ्याला जोडून ठेवायच्या, त्या मऊ मऊ असतात हे सांगायला नकोच.
आता समजा मालक वाचत बसलाय किंवा काही ऑफिसचे वगैरे काम करतोय. पण त्याच वेळी कुत्र्याला मालकाजवळ बसायचं आहे, मग त्याचीही सोय केलेली आहे. त्या सोयीचे नाव पेट क्रेट मॅगेझिन टेबल. कुत्रा खाली क्रेटमध्ये बसणार. मालक वरच्या टेबल टॉपवर वाचणार किंवा इतर काहीबाही काम करणार. हा क्रेट मालक त्याच्या लिव्हिंग रूम, बेडरूम किंवा फॅमिली रूम असे कुठेही नेऊ शकतो. त्या केट्रमध्ये कुत्र्याला घुसमटायला होऊ नये म्हणून लहान मुलांच्या पाळण्याला (क्रिबला) असते तशी उभ्या पट्टय़ांची जाळी. आता समजा मालक काही महत्त्वाचे काम करतोय, पण कुत्र्याला आणि मालकाला एकमेकांच्या नजरेच्या टप्प्यावर राहायचे आहे. तर त्यासाठी एक प्रकारच्या फोल्डिंग बॅरिकेडस मिळतात.
एवढं करूनही मालकाला अगदी महत्त्वाच्या कामासाठी कुत्र्याला सोडून जावंच लागणार आहे तर बेबी सीटिंगप्रमाणे डॉग सीटिंग ताशी ठरावीक डॉलर्स या हिशेबाने केले जाते किंवा संस्थाही सांभाळतात. काही घरांत कुत्र्याचे छोटेसे घर म्हणजे एक खोलीचे असते. पण या विषयावरच्या एका फिल्ममध्ये कुत्र्यासाठी वन बीएचके टाइप घर होते आणि ते कुत्र्याला पसंत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी मालकाने कुत्र्याला ते घर दाखवायला आणले होते.
अशा रीतीनं कुत्र्याचे दर्जेदार पालनपोषण होऊनही एखादा कुत्रा चोरीला जातो किंवा लापता होतो. मग वृत्तपत्रात जाहिरात येते. अमुक वर्णाचा, अमुक जातीचा, अमुक वयाचा आमचा प्रिय कुत्रा हरवला आहे किंवा चोरीला गेला आहे. आम्ही पोलिसात रीतसर तक्रार नोंदविली आहेच, पण कुणाला तो सापडल्यास या पत्त्यावर त्याला आणून सोडावे.
माणसांना जसे या ना त्या निमित्ताने एकत्र यावेसे वाटते तसे कुत्र्यांनासुद्धा वाटणारच ना! तेव्हा त्यांच्यासाठी स्नेहसंमेलनसुद्धा असते. त्याची बातमी वृत्तपत्रात येते. त्याचा मसुदा साधारण पुढीलप्रमाणे ‘हे संमेलन शैक्षणिक, गमतीदार आहे. त्यात कुत्र्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, फेस पेंटिंग, फ्री हेल्थ चेकअप, यमी पदार्थ आणि छान छान नव्या उत्पादनांचे सादरीकरण होणार आहे. कुत्र्यांची पेरेड होणार आहे. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी धर्मगुरू येणार आहेत. त्यानंतर कुत्र्यांच्या गळय़ात ‘आय हॅव बीन ब्लेसड’ असे टॅग बांधून त्यांचा सन्मान होणार आहे. हे सगळं तुमच्या कुत्र्याला खूप आवडेल. कारण त्याला सोशलायझेशनची गरज आहे ती आपण ओळखली पाहिजे’-आता बोला!
पण हे येथेच थांबत नाही. आणि त्या ठिकाणी पाश्चात्त्यांची सामाजिक जाणीव प्रतीत होते. हा पैलू दाखवणारी ही तळटीप पाहा- या समारंभात प्रत्येक कुत्र्याच्या मालकाने कमीत कमी एक डॉलर देणगी द्यावी अशी अपेक्षा आहे. कारण आपल्या समाजात अनेक वंचित कुत्रे आहेत. ज्यांना स्वत:चे कुटुंब नाही. त्यांना स्वत:चे घर सुविधा नाहीत. त्यांच्यासाठी ही देणगी वापरण्यात येईल.
आणि आता अंतिम क्षण. जो प्रत्येक सजीवाच्या बाबतीत अपरिहार्य आहे. तो म्हणजे मृत्यू. त्यासाठी पेट क्रिमेशन आणि फ्युनेरल सव्‍‌र्हिस असते. जी कुत्र्याचा अंत्यविधी विधिवत करते.
 हे सगळं वाचलं आणि मनात आलं पाश्चात्त्य देशातील कुत्रे भारतातील सामान्य माणसापेक्षा भाग्यवान आहेत. कदाचित गेल्या जन्मी त्यांनी तेथील सामान्य माणसापेक्षा अधिक पुण्यकर्मे केली असावीत. त्यामुळे त्यांचे रोटी, कपडा, मकान हे प्रश्न तर सुटलेले आहेतच, पण ते अधिक उच्चश्रेणीचे जीवन जगत आहेत. सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे कुत्र्यांचे काम घराचे रक्षण करणे हे नाही. उपयुक्तता हे मूल्य डोळय़ांसमोर ठेवून पाश्चात्त्य माणूस कुत्रा पाळत नाही. श्रीयुत राजमान्य राजश्री श्वानमहोदय हे पाश्चात्त्यांच्या प्रेमाचे निधान आहे.