News Flash

वेगळी लेखणी

किल्लारीचा भूकंप, सागरी त्सुनामी, चक्रीवादळे, बिहारमधल्या कोसी नदीचा पूर, अशा कित्येक नैसर्गिक आपत्ती घ्या.

| August 29, 2014 01:06 am

किल्लारीचा भूकंप, सागरी त्सुनामी, चक्रीवादळे, बिहारमधल्या कोसी नदीचा पूर, अशा कित्येक नैसर्गिक आपत्ती घ्या. स्त्री पत्रकारांनी त्याचं केलेलं चित्रण वेगळं होतं. स्त्रियांच्या नजरेतून या आपत्ती वेगळ्या दिसतात. त्यातले वेगळे पैलू उलगडतात. शिवाय संवेदनक्षम महिलांचं लिखाण म्हणजे दु:ख आणि वेदनाच हव्यात हाही चुकीचा समज आहे. यानिमित्तानं सकारात्मक जिद्दही लिखाणात दिसली..

त सं तर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय..  
फार लांब जायला नको. ‘आम्ही मुलींना दैनिकात घेत नाही.’ हे उत्तर मी स्वत: ३०-३२ वर्षांपूर्वी ऐकलेलं आहे. तेव्हापासून आत्तापर्यंतचा स्त्री पत्रकारांचा प्रवास थक्क करणारा म्हणता येईल. गजबजलेल्या न्यूजरूम्स, त्यातला मुलींचा मोकळा आणि महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वासपूर्ण वावर, रस्त्यावर कॅमेऱ्यात गोष्टी पकडण्यासाठी चाललेली त्यांची लगबग, कानाला अखंड मोबाइल लावून चाललेली धावपळ. एखाद्या राजकीय नेत्याला कोंडीत पकडणारा प्रश्न विचारल्यावर डोळ्यांत उमटणारी चमक, दंगल, अपघात, गुन्हेगारी कुठलंही क्षेत्र परकं  न मानता त्याला भिडण्याचं कसब; या सगळ्याच गोष्टी बदललेलं वातावरण दाखवत असतात. आपल्याला चकित करतात. पत्रकार स्त्री आहे की पुरुष याचा वेगळा विचारसुद्धा होऊ  नये एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर ही दृश्यमानता वाढली. विशेषत: बातम्यांचे अगणित चॅनेल्स सुरू झाल्यावर!
पूर्वी न्यूजरूममध्ये अपवादालाच असणारी एखादी मुलगी आणि ७ वाजल्यानंतर ती ऑफिसमध्ये दिसली तर तिला प्रेमळ दटावणी करत घरी पाठवणारे संपादक इथपासून ते आत्तापर्यंतचा हा प्रवास तसा झपाटय़ानं झाला. सुरुवातीला सभा-संमेलनं, चित्रकला प्रदर्शनं, संगीत, फॅशन, खाद्यपदार्थ एवढय़ाच विषयात मिळणारा प्रवेश मोकळा झाला. बदलाचा रेटाच तेवढा मोठा होता.  
चांगलंच दृश्य आहे हे. महिला पत्रकारांसाठी – आणि समाज म्हणून सगळ्यांसाठीच. फक्त पुरुषी क्षेत्र म्हणून मानल्या गेलेल्या आणि त्यामुळे थोडय़ा एकारलेल्या या व्यवसायाचा तोल सांभाळला गेला. विशेषत: माध्यमांना ‘समाजाचा आरसा’ ही उपमा दिली जाते. तेव्हा त्यात पडणारं प्रतिबिंब अस्सल हवं असेल तर ५० टक्के जनतेला या क्षेत्रात शिरकाव नाकारायचा ही काही बरी अवस्था नव्हेच. तर आता स्त्रियांची या क्षेत्रातील दृश्यमानता हा काही प्रश्न राहिलेला नाही. माध्यमांच्या ऑफिसात आणि प्रत्यक्ष बातम्याचे विषय म्हणूनही स्त्रिया मोठय़ा प्रमाणात दिसतात. (मात्र बातम्यांमध्ये अजूनही सेलिब्रिटी आणि पीडित अशा दोन टोकांच्या महिलांचाच टक्का अधिक असतो हेही काही फार बरं चित्रं नव्हे.)
प्रश्न असा आहे की दृश्यमानता वाढली तरी कोणत्या पद्धतीनं काय बदल घडले? माध्यमांच्या ऑफिसांत, वृत्तपत्रांत, बातम्यांच्या आणि लेखांच्या गुणवत्तेत? दृष्टिकोनांत? समाजाच्या विचारांत? या व्यवसायाचा पोत बदलला का? नेमकं काय झालं? याचा शोध घ्यायला हवा. अर्थात अशा प्रश्नांची उत्तरं, कोणत्याही व्यवसायाबाबत २+२= ४ अशी देताच येत नाहीत. बदलत्या काळात तर प्रभाव पाडणाऱ्या, सूक्ष्म आणि गुंतागुंतीच्या इतक्या बाबी असतात की या या घटकामुळेच हे हे झालं असं काही चिमटीत पकडून दाखवणं कठीण आहे. दुसऱ्या बाजूनं, महिलांना पत्रकार म्हणून व्यवसाय करताना लाल पायघडय़ा आहेत. त्यांचे प्रश्न मिटलेत, तक्रार करायला जागा नाही, स्त्री म्हणून त्यांना डावलले जात नाही असाही नाही. पण प्रस्तुत लेखाचा तो विषयही नाही.
 विषयाच्या एवढय़ा मोठय़ा पसाऱ्यातून, मग आपल्याला, इथे फक्त हे बघायचं आहे की काही एका विशिष्ट दिशेनं बदल घडत आहेत का? महिला पत्रकारांच्या कुठल्या बाजू जमेच्या ठरताना दिसत आहेत? गुणवत्ता कोणत्या बाबतीत सुधारते आहे? घटनांकडे बघायची वेगळी नजर आल्यानं समाजाच्या आजवर पुढे न आलेल्या काही बाजू दिसत आहेत का? कारण आपण ज्या स्थानावर आहोत तिथून गोष्टी वेगळ्या दिसतात. पुरुषांपेक्षा स्त्रिया या समाजात वेगळ्या स्थानावर असल्यानं स्त्रियांच्या नजरेतून वेगळ्या कोनातून गोष्टी दिसतात का? एकंदरीत समाज म्हणून पुढे जायला त्याचा उपयोग होतो का, अशा प्रश्नांचा धांडोळा घ्यावा लागेल. फक्त एकाच कोनातून गोष्टी वाचायची सवय लागलेल्या वाचकांना नवीन काही मिळतंय का? हे काही उदाहरणांनी बघता येईल.  
अशांतता, बंडखोरी, युद्धखोरी या प्रकारच्या बातम्या स्फोटक जरूर असतात, पण बहुतेक वेळी चाकोरीबद्ध पद्धतीनं येतात. त्यापलीकडे मानवी दृष्टिकोनातून लेखांचे अनेक विषय असतात, जे नेहमीच्या बातम्यांच्या धबडग्यात निसटून जातात किंवा ते दिसत नाहीत. कित्येक वेळा ते महत्त्वाचे वाटत नाहीत. स्त्रियांना ते जाणवतात. त्या ते समोर आणतात. उदाहरणार्थ मणिपूरमधल्या काही स्थानिक पत्रकार. एकूणच ईशान्य भारतातली परिस्थिती जाणून घेण्याबाबत आपण उदासीन असतो. तिथली बंडखोरी, हिंसाचार, लष्कराचा सततचा हस्तक्षेप, भीतीचं वातावरण यामुळे पत्रकार म्हणून काम करणं ही तिथे तारेवरची कसरत असते. स्वतंत्र पत्रकार अन्जुलिका थिंगम हिने २३ मिनिटांची एक फिल्म बनवली आहे. ‘शाडो लाइव्हज्’ नावाची. सततची बंडखोरी, घुसखोरी, दहशतवाद यामुळे तिथे इतके तरुण मारले आणि पळवले जातात की मणिपूरमध्ये तरुण विधवांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढते आहे. त्याचं जगणं मांडणारा हा माहितीपट आहे. एरवी हा प्रश्न बाहेरून काम करणाऱ्या कुणा पत्रकाराच्या नजरेत आला नसता. तिथेच राहत असल्यानं आणि बघायची वेगळी नजर असल्यानं तिनं तो मांडला. त्याविषयी लिहिलं. मणिपूरमधल्याच चित्रा अन्थेमसारख्या आणखी काही पत्रकारांनी, एका बाजूला घुसखोर आणि दुसऱ्या बाजूला लष्कर या दोन्हींच्या कात्रीत सापडलेला आणि भांबावलेला सामान्य माणूस मांडला.   
आपत्ती मानवनिर्मित असो की नैसर्गिक, कायमच असं म्हटलं जातं की त्याचा सर्वात जास्त फटका स्त्रियांना बसतो. अनेक पातळ्यांवर त्यांना त्याच्याशी लढायला लागतं. नेहमीच्या बातम्या आणि लेख यात त्याचं प्रतिबिंब पडतंच असं नाही. किल्लारीचा भूकंप, सागरी त्सुनामी, चक्रीवादळे, बिहारमधल्या कोसी नदीचा पूर, अशा कित्येक नैसर्गिक आपत्ती घ्या. स्त्री पत्रकारांनी त्याचं केलेलं चित्रण वेगळं होतं. स्त्रियांच्या नजरेतून या आपत्ती वेगळ्या दिसतात. त्यातले वेगळे पैलू उलगडतात. त्यापलीकडची गोष्ट म्हणजे, संवेदनक्षम महिलांचं लिखाण म्हणजे दु:ख आणि वेदनाच हव्यात हाही चुकीचा समज आहे. यानिमित्तानं सकारात्मक जिद्दही लिखाणात दिसली. पुराला तोंड देण्यासाठी महिलांनी सुरू  केलेली सहकारी सोसायटी आणि कुटुंबाचा एकहाती केलेला सांभाळ काय किंवा धान्य बँका काय. अशा कृतीतून दिसलेली कर्तृत्वाची चुणूक आपतींच्या निमित्तानं तावूनसुलाखून वर आली. महिला पत्रकारांनी ती जगासमोर आणली.
 इथे एक गोष्ट नोंदवायला हवी. एरवीही प्रेरणा देणाऱ्या आणि जिद्दीच्या कहाण्या दहामधल्या सात वेळा बायकांनीच लिहिलेल्या असतात आणि बहुतकरून त्या बायकांविषयीच असतात. कदाचित वैयक्तिक, सामाजिक सर्वच प्रकारच्या अडथळ्यांच्या शर्यतीतून स्त्री पत्रकारांनाही सततच जावं लागतं असल्यानं, एखादीची जिद्द, दुसरीचं धाडस, तिसरीचा लढाऊपणा त्यांना पटकन जाऊन भिडतो. गेल्या काही वर्षांत अशा जिद्दीच्या कथा लक्षणीय प्रमाणात आल्या. गावाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या महिला सरपंचापासून ते शाळेची पायरीही न चढलेल्या पण हातात व्हिडीओ कॅमेरा घेऊन शूटिंग करणाऱ्या दलित महिलांच्या गटापर्यंत! आणि ब्रॅण्ड वुमनपासून ते कडक वर्दीतल्या धडाडीपर्यंत अशी कित्येक जिद्दीची उदाहरणं महिला पत्रकारांनी पुढे आणली. फार लांब जायला नको ‘चतुरंग’ पुरवणीच अशा अनेक लेखांची साक्ष देईल. या लिखाणातून कायमच एक ऊर्जा वाचकांना मिळत राहिली आहे. आश्वासक दिलासा मिळतो आहे. समाजात एक वातावरण तयार होण्यासाठी, असं प्रेरणादायी लिखाण खूप आवश्यक असतं.
तीच गोष्ट कौटुंबिक वास्तव आणि नातेसंबंध यांच्याविषयी. विशेषत: मासिकं, दैनिकांच्या पुरवण्या यातल्या पत्रकारांनी या नातेसंबंधातली नवी वळणं सातत्यानं समोर आणली. कधी रोखठोक तर कधी तरल; कधी नर्मविनोद तर कधी हृदयाला भिडणाऱ्या शब्दांत. कधी वाचकचर्चाच्या रूपात सगळ्यांना सामील करून घेत! यामुळे निश्चित एक वातावरण तयार होतं. काही वेळा निषिद्ध मानल्या गेलेल्या विषयांवर चर्चा होते. लहान किंवा उमलत्या वयातल्या मुलींच्या वाटय़ाला जे नकोसे ओंगळ स्पर्श येतात, त्याविषयी कित्येक जणींनी लिहिलं आहे. इथे एक उदाहरण सांगण्यासारखं आहे. – एका वृत्तपत्राचं कार्यालय. न्यूज रूममधली नेहमीची धावपळ सुरू होती. त्या तरुण पत्रकार तरुणीसमोर पोलीस प्रेस-नोट होती. त्यावरून बातमी तयार केली की तिचं त्या दिवशीचं काम संपणार होतं. दिवसभरातल्या अनेक घटनांपैकी एक घटना होती- एका क्लासचालकाविरोधात एका पालकांनी तक्रार नोंदवल्याची. कारण दिलेलं नव्हतं. व्यक्तिमत्त्व विकाससदृश हे क्लास होते. अशा अनेक बातम्या सतत पोलिसांकडून येत असतात. ही बातमीही एरवी एका ओळीत येऊन गेली असती, परंतु ती बातमीदार थबकली. आपल्या सहकाऱ्याला तिनं ती दाखवली. त्यात विशेष काही नाही, असा निर्वाळा त्यानं दिला, पण तरीही तिनं ठरवलं की दुसऱ्या दिवशी या बातमीचा छडा लावायचा. पोलिसांकडून आणखी माहिती मिळवून तिनं त्या पालकांचा पत्ता मिळवला. नेहमीप्रमाणेच ते बोलायला तयार नव्हते. परंतु या पत्रकार मुलीनं आश्वासन दिलं की ओळखच काय पण ते ज्या भागात राहतात ते नावही येणार नाही पण घटना जर सामाजिक दृष्टीनं महत्त्वाची असेल तर समोर यायला हवी. आईनं सांगितलं की क्लासची वेळ झाली की मुलगी रडायला लागायची. पालक तिला जायचा आग्रह करायचे. विश्वासात घेऊन विचारल्यावर तिनं सांगितलं की ते क्लासचालक विचित्र वागायचे. शरीराशी चाळे करायला बघायचे. या पत्रकार तरुणीनं मग इतर पालकांची भेट घेतली. त्यांना या गोष्टीचा पत्ताच नव्हता. इतर मुली बोलायला लागल्या. त्यांनाही असेच अनुभव आले होते. इतर पालकांच्या तक्रारी दाखल झाल्या, बातमी आली आणि लष्कराची पाश्र्वभूमी असलेल्या त्या क्लासचालकावर कारवाई करावी लागली. जागरूक महिला पत्रकार असेल तर काय घडू शकतं याचं हे उत्तम उदाहरण. अशा घटनांच्या बाबत कुठे तरी पाणी मुरतंय ही शंका स्त्री पत्रकारांना पटकन येत असावी.    
‘स्त्री आणि आरोग्य’ हा एक विषय महिला पत्रकारांनी सखोलतेने  हाताळला. केवळ आहार-विहार आणि उपचार याविषयी म्हणत नाही मी. त्यापलीकडे स्त्रियांचं शरीर आणि त्यावरचा त्यांचा हक्क, कुटुंब नियोजनाची साधनं, एड्स आणि त्यामागचं राजकारण, गिनिपिग म्हणून त्यांच्यावर लादल्या गेलेल्या चाचण्यांवर लिहिलं गेलं.
शहरीकरण म्हटलं की काही ठरावीक प्रश्न आपल्या डोळ्यांसमोर येतात. परंतु मुंबईसारख्या उमद्या आणि खुल्या महानगरातदेखील सार्वजनिक अवकाश (पब्लिक स्पेस), स्त्रियांसाठी कसा संकोचत चालला आहे ही बाब वेगळी लक्षात आणून दिल्याशिवाय येत नाही. एक पत्रकार, एक प्रसारमाध्यम अभ्यासक आणि एक आर्किटेक्ट अशा तिघींनी मिळून, तीन र्वष संशोधन करून हा विषय मांडला आहे. समीरा खान, शिल्पा फडके आणि शिल्पा रानडे यांनी Why Loiter?  Women and risk on Mumbai Streets’  या त्यांच्या संशोधनपर पुस्तकातून! वेगवेगळ्या जाती आणि समाज यातल्या बायकांना मुंबईच्या रस्त्यावर कशाकशाला तोंड द्यावं लागतं, स्त्रियांच्या रस्त्यावरच्या सुरक्षेची काय अवस्था आहे याचं भेदक दर्शन त्यातून होतं. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी हा विषयही वेगळ्या पद्धतीनं आणि वेगळ्या नजरेतून मांडला पत्रकार कल्पना शर्मा यांनी. ‘हिंदू’ या दैनिकातल्या सदरातून! धारावी आणि तिथली माणसं यांचा नव्या कोनातून शोध घेणारी ही संवेदनशील नजर महत्त्वाची ठरते.
शेवटी तुमच्या हे लक्षात आलं का? की युद्ध, अशांतता, गुन्हेगारी, आपत्ती, राजकारण अशा पूर्वी वज्र्य मानलेल्या अनेक क्षेत्रांत महिला पत्रकार वेगळं काही करत आहेत. अधिकारपदावरही आहेत. इथे फक्त त्यातली काही उदाहरणं दिली. आपल्या वेगळ्या नजरेतून महिला पत्रकारांनी काही मांडलं आहे. ऊर्जा आणि प्रेरणा देईल असं काही लिहिलं आहे. अगदी फॅशन, सिनेमा, झगमग दुनिया या गोष्टी कमी मानायचं कारण नाही. कारण इथे वार्ताकन करणाऱ्यांनाही, वेगळ्या नजरेतून वेगळं काही तरी दिसू शकतंच.
याचा अर्थ सर्वच महिला पत्रकार वेगळं काही समाजाला दाखवायचा प्रयत्न करत आहेत का? तर मुळीच नाही. कोणत्याही व्यवसायात असतात तशी बरी-वाईट, कार्यक्षम-अकार्यक्षम माणसं इथेही आहेत. स्त्री-पुरुष दोन्हीही. काही जणी आजवर जशा गोष्टी दिसत आल्या त्याच व्यवस्थेची री ओढतात. काहींना तर आपण सामाजिक प्रश्नांवर लिहिलं तर पत्रकार म्हणून आपलं कौशल्य कमी गणलं जाईल अशीही भीती वाटत असते.
दुसऱ्या बाजूला, अनेक पुरुष पत्रकार उत्तम दर्जाचं लिहीत असतात. वेगळ्या नजरेतून काही दाखवत असतात. संवेदनक्षम असतात. थोडक्यात, सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे कोणताही व्यवसाय आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम यांची २+२ अशी मांडणी करता येत नाही.
पण तरीही महिला पत्रकारांबाबत एका दिशेचा अंदाज येतो आणि ती नक्कीच
आशादायक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:06 am

Web Title: different style
टॅग : Chaturang
Next Stories
1 पोलिसी खाक्या
2 महाराष्ट्रकन्या
3 कायद्याचे हाती
Just Now!
X