18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

दानाचा आहेर

पश्चिम उपनगरातले एक मंगल कार्यालय. दिवस रविवारचा असल्याने कार्यालयातल्या मुंजीच्या समारंभाला नातलगांची, स्नेह्य़ांची भरपूर

गीता सोनी - geetazsoni@yahoo.co.in | Updated: March 30, 2013 1:01 AM

पश्चिम उपनगरातले एक मंगल कार्यालय. दिवस रविवारचा असल्याने कार्यालयातल्या मुंजीच्या समारंभाला नातलगांची, स्नेह्य़ांची भरपूर उपस्थिती. दारातच घातलेली संस्कार भारतीची मंडलाकार रांगोळी, दरवाजाला केळीचे खांब, कानावर पडणारे सनई चौघडय़ाचे सूर, ठेवणीतल्या रंगीबेरंगी पठण्या, किमती रेशमी साडय़ांची सळसळ, तरुणाईची प्रेक्षणीय लगबग, मधूनच आशीर्वादासाठी उंचावणारे नऊवारीतले सुरकुतलेले हात, उंची सुगंधांचे फवारे, पाटावर सोवळं नेसून बसलेला फुलांच्या मुंडावळ्यातला निरागस मुंजमुलगा. सारं कसं मनाला सुखावणारं.  
हे सर्व वाचून तुम्ही नक्कीच म्हणणार, ‘सगळ्याच मंगल कार्यालयात हेच दिसतं. अजून वेगळं काय दिसणार?’  पण या मुंज समारंभात मी नक्कीच काहीतरी वेगळं पाहिलं. मंगल कार्यालयाच्या दर्शनी भागातच देवळात असते तशी दानपेटी दिसत होती. ‘संत गाडगेबाबा रक्तपेढी’ या सेवाभावी संस्थेचे नाव तिच्यावर लिहिले होते. ‘मुंजीसाठी आलेल्या प्रत्येक नातलगाने किंवा स्नेह्य़ाने मुंज मुलासाठी आहेर म्हणून द्यावीशी वाटणारी रक्कम दानपेटीत टाकावी, जमलेला सर्व निधी एका सेवाभावी संस्थेला दिला जाईल,’ अशी तळटीप मुंजीसाठीच्या आमंत्रण पत्रिकेतच लिहिली होती. समारंभात त्या सेवाभावी संस्थेचे एक सक्रिय कार्यकत्रेही हजर होते. त्यांनी जमलेल्या सर्वाना संस्थेचे उद्दिष्ट, कार्य याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. साहजिकच प्रत्येकाला सत्पात्री दान केल्याचे समाधानही मिळाले. अर्थात हे सर्व ऐच्छिक व यथाशक्ती होते.
 आहेराची ही अभिनव कल्पना मला तरी फारच आवडली. गेल्या पंधरा-वीस वर्षांत लग्न, मुंजीतून आमंत्रितांनी आहेर देण्याची आणि घेण्याची प्रथा हळूहळू मागे पडत गेली आणि लग्न, मुंज सोहळे बऱ्यापकी सुटसुटीत झाले. आता याही पलीकडे जाऊन, लग्न, मुंजी, बारसं, वाढदिवस अशा सामूहिक समारंभांच्या वेळी असे एकत्र येऊन वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना, वृद्धाश्रमांना, अनाथालयांना, सेवाभावी संस्थांना ‘दानाचा आहेर’ करण्याची नवीन प्रथा कशी वाटली तुम्हाला?
आपल्यापकी प्रत्येकाला अशा प्रकारे सामाजिक संस्थांना मदत करण्याची इच्छा असते, जवळ देण्यापुरेसे पसेही असतात, फक्त प्रश्न असतो संधीचा. चांगल्या कामासाठी, मदतीखातर, पन्नास, शंभर रुपये खर्च करणे ही आपल्यासाठी खूपच मामुली गोष्ट आहे, पण जेव्हा समारंभाला जमलेले शंभर, दोनशे जण मिळून अशीच मदत करतील, तेव्हा त्या विशिष्ट संस्थेसाठी ती एकत्रित मदत खूप मोलाची ठरू शकते. कारण शेवटी ‘बुंद बुंद से बने सागर’ हेच खरे.
प्रत्येक गावातून, शहरातून, स्थानिक पातळीवर खरोखर मनापासून समाजातील दुर्बल घटकांसाठी, गरीब विद्यार्थ्यांसाठी, शैक्षणिक कार्यासाठी काम करणाऱ्या अनेक लहानमोठय़ा संस्था कार्यरत असतात. पण प्रत्येक संस्थेला सरकारी मिळणे शक्य नसते, अशा संस्था फक्त लोकाश्रयावरच अवलंबून असतात.
जे काही वेगळं पाहिलं, मनाला भावलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं इतकंच, यामागे उपदेशाचा हेतू मुळीच नाही.
आता येत्या लग्न-मुंजीच्या हंगामात या नावीन्यपूर्ण कल्पनेचा विचार जर कोणी अमलात आणायचे ठरवलेच तर मला मात्र त्या समारंभाला आवर्जून बोलवा, मी नक्की येईन, उत्सवमूर्तीना शुभेच्छा द्यायला आणि अर्थात दानाच्या आहेराचे पुण्य घ्यायला. हो! आपली ओळख नसली तरीही.

First Published on March 30, 2013 1:01 am

Web Title: different way of accepting gift in munj ceremony a donation to blood bank