News Flash

मदतीचा हात : चमत्काराचा अर्थ

‘‘दिलासातील रुग्णांची संख्या वाढत गेली तशी हळूहळू माझी साठलेली पुंजी संपून गेली. नंतर उज्ज्वलाचे दागिने मोडले. तरीही खर्च भागेना. शेवटी किराणावाल्याची उधारी एवढी वाढली की,

| September 6, 2014 01:01 am

‘‘दिलासातील रुग्णांची संख्या वाढत गेली तशी हळूहळू माझी साठलेली पुंजी संपून गेली. नंतर उज्ज्वलाचे दागिने मोडले. तरीही खर्च भागेना. शेवटी किराणावाल्याची उधारी एवढी वाढली की, नाइलाजाने ‘दिलासा’ बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याच दिवशी एकाने पैशांचे पाकीट माझ्या हातात ठेवलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. वाटलं, समाजात चांगले लोक  आहेत तोवर ‘दिलासा’ बंद पडणार नाही. चमत्कार म्हणजे तरी दुसरं काय, अशी अचानक मिळालेली मदतच तर असते. आज ‘दिलासा केअर सेंटर’मध्ये निराधार वृद्ध राहतात. तसेच कुटुंबवत्सल ज्येष्ठही राहतात. त्या सगळ्यांना सांभाळणं जिकिरीचं काम ठरतं अनेकदा,’’ असं म्हणत गेली १६ वर्षे वृद्धांची तळमळीने सेवा करणाऱ्या
सतीश जगताप यांच्याविषयी..

सतीश जगताप नावाचा तरुण ‘दुरान्तो एक्स्प्रेस’ने छत्तीसगडला जायला निघतो. स्टेशनवर येतो आणि त्याला अरविंद आश्रमातून एक फोन येतो, ‘तू आज निघत असशील तर पुढे जाऊ नकोस. घरी परत जा!’ क्षणाचाही विलंब न लावता तो घरी परत जातो. दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये ठळक मजकुरात बातमी असते, ‘दुरान्तो एक्स्प्रेस’ला झालेल्या अपघाताची. या अपघातात ‘दुरान्तो’चा एक संपूर्ण डबा जळून खाक झालेला असतो. सतीश खिशातलं तिकीट काढून बघतो. त्याचं आरक्षण त्याच डब्यातील सीटचं असतं.
सतीश जगतापला जीवदान मिळणं या अतक्र्य घटिताचं सूत्र त्याच्या जीवनातच आहे. ‘चमत्कार घडतात, तुमचा विश्वास हवा,’ हे वाक्य अशावेळी खरं वाटायला लागतं. पण हा चमत्कार इथेच थांबत नाही, ते पुढेही त्याच्या वाटय़ाला आले याचं सार अंथरुणाला खिळलेल्या वृद्ध रुग्णांकरिता त्याने अंगीकारलेल्या सेवाभावी कार्यात आहे. खरं तर सतीशचं आयुष्य चार-चौघांसारखं जायचं! अभियंत्याची पदवी घेताच बहुद्देशीय आस्थापनात भक्कम पगाराची नोकरी लागली. आयुष्य मार्गी लागलं. एक दिवस कार्यालयातील मैत्रिणीसोबत तिच्या घरी जाण्याचा योग आला. तिच्या घराला कुलूप होतं. ते काढून तिने दार उघडलं आणि समोरचं दृश्य पाहून सतीश थिजून गेला. समोर दोन पलंगांवर तिचे आई-वडील झोपलेले होते. वडील पॅरालिसीसने तर आई अस्थिभंगामुळे अंथरुणाला खिळलेली. मैत्रिणीने आधी त्यांची शी-शू साफ केली. त्यांना आंघोळ घातली. चहा-बिस्किटे भरवली. नंतर स्वयंपाकाला लागली. रात्री साडेदहाला त्या दोघांच्या पोटात घासभर अन्न गेलं. दुसऱ्या दिवशी सतीशने आयुष्यातली पहिली सुट्टी घेतली. पुण्यातले वृद्धाश्रम तो शोधू लागला, पण प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर! स्वत:ची आंघोळ, दाढी स्वत: करणारे, हिंडते फिरते वृद्ध असतील तरच आम्ही त्यांना प्रवेश देतो. मग अंथरुणाला खिळलेल्या वृद्ध रुग्णांना कोण आधार देणार? क्षणात विचार सुचला. हे काम इतरांनी करण्याची अपेक्षा करण्यापेक्षा ते आपणच का करू नये? बस्स. दुसऱ्या दिवशी सतीशने नोकरीला रामराम ठोकला आणि ‘दिलासा केअर सेंटर’चा जन्म झाला. वृद्धाश्रमांनी सांभाळण्यास असमर्थतता दर्शविलेल्या, विविध रुग्णालयांनी पुढील उपचारास नकार दिलेल्या, घरातील अडचणींमुळे अंथरुणाला खिळलेल्या रुग्णाला सांभाळणे अशक्य झालेल्या अतिवृद्ध, अपंग रुग्णांच्या सेवेसाठी ‘दिलासा केअर सेंटर’ कटिबद्ध आहे.
 सतीश जगतापना १६ वर्षांपूर्वी भेटलेली पहिली केस लख्ख आठवते. ते सांगतात, ‘एका रस्त्यावरच्या आजीला मी रिक्षात घालून घरी आणलं. अंगावर धड कपडा नाही. मातीने अंग माखलेलं. जखमांनी भरलेलं. रिक्षावाला मलाच ओरडायला लागला. असं कसं घाणेरडय़ा तुझ्या आईला माझ्या रिक्षात ठेवतोस? मी गप्प राहिलो. तिला घरी आणून तिच्या जखमा धुतल्या. ड्रेसिंग केले. खाऊ घातलं आणि झोपवलं. खरं तर मलाच कळत नव्हतं मी हे का करतोय? दुसऱ्या दिवशी अशा आजीला पाहून घरमालकाने तिच्यासकट मला घराबाहेर काढले. आजीला घेऊन मी वणवण फिरत राहिलो. शेवटी २५ हजार डिपॉझिट आणि सात हजार भाडे देऊन धनकवडीला एक स्वतंत्र घर मिळालं. आजी होतीच. आणखी सहा रुग्ण मिळाले. हळूहळू अशा रुग्णांची संख्या वाढत गेली. ‘दिलासा केअर सेंटर’ जोमाने सुरू झाले.
आजही ‘दिलासा’चा दिनक्रम ठरलेला आहे. वृद्ध, अपंग, जराजर्जर रुग्ण सहा वाजता उठतात. योगासनं होतात. प्रार्थनेनंतर सेवक त्यांना आंघोळ घालतात. चहा-नाश्ता होतो. ज्या रुग्णाला उच्च रक्तदाब, भाजलेल्या जखमा, बेडसोअर्स वगैरे झालेले असतात त्यांची डॉक्टर तपासणी करतात. जेवण व विश्रांतीनंतर कॅरम खेळणं, पुस्तके वाचन, धार्मिक पुस्तकांचे पारायण यात वृद्धांचा वेळ व्यतीत होतो. संध्याकाळी थोडे फिरणे होते आणि दिवस संपतो. विशेष म्हणजे इथे प्रत्येक वृद्धाला त्याच्या व्याधीनुसार जेवण पुरविलं जातं. सतीशजी त्यावर स्पष्टपणे उद्गारतात, ‘माझ्या आई-वडिलांना मी जसे ठेवणार तसेच मी यांनाही ठेवतो. मला जर जिलबी खावीशी वाटते तर मी त्यांनाही ती खिलवणार!’
‘दिलासा केअर सेंटर’चं काम सुरू झालं आणि थोडय़ाच काळात सतीशजींच्या जीवनात उज्ज्वलाने प्रवेश केला. संपन्न कुटुंबातील सुविद्य उज्ज्वलाने ‘दिलासा’तील प्रत्येक ज्येष्ठ रुग्णाला आपल्या मायेच्या पंखाखाली घेतलं. सतीशजी याची कृतज्ञ नोंद घेतात. ‘दिलासा’तील देशमुख आजी तर ‘ही जोडी म्हणजे साक्षात विठ्ठल-रखुमाई आहे’ अशी पोचपावती देतात. सतीश जगताप ‘दिलासा’ची पुढची वाटचाल सांगू लागतात. ‘दिलासातील रुग्णांची संख्या वाढत गेली तशी हळूहळू माझी साठलेली पुंजी संपून गेली. नंतर उज्ज्वलाचे दागिने मोडले. तरीही खर्च भागेना. शेवटी किराणावाल्याची उधारी एवढी वाढली की, नाइलाजाने ‘दिलासा’ बंद करण्याचा निर्णय घेतला. ज्या दिवशी मी हे ठरवलं आणि खिशातली शेवटची रक्कम किराणावाल्याला द्यायला गेलो त्या वेळी माझ्या खिशातून माझे कार्ड खाली पडले. ते एका गृहस्थाने उचललं. तो म्हणाला, ‘जगताप कोण?’ म्हटलं, ‘मीच!’ तो आनंदाने उद्गारला, ‘अहो तीन महिने झाले. मुलीच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला देणगी द्यावी म्हणून हे पाकीट तयार केलंय, पण मला तुमचा पत्ताच सापडत नव्हता. बरं झालं आज तुम्ही भेटलात! त्याने ते जुनं झालेले पैशांचे पाकीट माझ्या हातात ठेवलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. वाटलं, समाजात चांगली लोकं आहेत. तोवर ‘दिलासा’ बंद पडणार नाही. आपण त्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आज मला अनेक दाते भेटतात जे अन्नधान्य, औषधं पुरवतात. अ‍ॅल्कॉन कंपनी, नाशिक रन, मिडास टच, शालिमार हॉटेलचे मालक दीपक सर, अनिकेत कुलकर्णी हे लोक स्वेच्छेने ‘दिलासा’चे पालकत्व घेतात. मला तहान लागली की, पाण्याचा पेला देतात. मला दुसऱ्या प्रोजेक्टमधून कमाई झाली की मी ती ‘दिलासा’त टाकतो. तरीही महिन्याची तूट भरून काढताना जीव मेटाकुटीला येतो. इथले वृद्ध बिछान्याला खिळलेले असतात. दिवसातून किमान दोन वेळा त्यांच्या बेडशिटस् बदलाव्या लागतात. सतत धुतल्यामुळे एक बेडशिट जेमतेम तीन महिने टिकते. एक दिवस एका दात्याने मला ५० मीटर कापड बेडशीटसाठी दिले. एकाने १०० किलो कपडे धुण्याची पावडर दिली. ‘नासिक रन’सारखी संस्था देणगीस्वरूप फक्त वस्तू देते. त्यांचे नियम काटेकोर असतात. माझ्या पूर्ण प्रकल्पाचा अभ्यास करून त्यांनी मला पाच लाखाचे इंडस्ट्रिअल वॉशिंग मशीन दिलं. त्यामुळे रुग्णांचे कपडे धुणे आता खूपच सोयीचे झाले आहे.
‘दिलासा’मध्ये निराधार वृद्ध राहतात. तसेच कुटुंबवत्सल ज्येष्ठही राहतात. काही निराधार वृद्धांना निवृत्तिवेतन मिळते ते हे वेतन सतीशजींच्या हाती सुपूर्द करतात. विशेषत: अनिवासी भारतीयांचे पालक इथे राहतात. त्यांच्याकडून मिळणाऱ्या पैशांवर ‘दिलासा’चा डोलारा जेमतेम उभा आहे. सतीशजी निर्मळपणे सांगतात, ‘अनेकदा दाते मला ओळखत नाही आणि मी त्यांना, पण अलीकडेच कोणी तरी २०० किलो गहू आणि २०० किलो तांदूळ देऊन गेला. मला वाटते, मी नव्हे परमेश्वरच या वृद्धांची काळजी घेत आहे. माझ्याकडच्या एका मनोरुग्ण वृद्धाला मोफत औषधांची गरज होती. सिव्हिल हॉस्पिटलने ही मदत देऊ केली. शासन, इस्पितळ, डॉक्टर्स, आयकर विभाग सगळ्यांची मला मोलाची मदत मिळते. आता बघा मी इथल्या सेवकांना खूप पगार नाही देऊ शकत. तरीही ही मुलं आनंदाने माझ्याकडे पडेल ती कामे करतात. त्यातील काही जण निराधार आहेत. गेली १४ वर्षे रात्रंदिवस इथेच राहून ते या रुग्णांची सेवा करतात. माझ्याकडे एक मुका-बहिरा व दोन्ही पायांनी अपंग मुलगा कायमचा राहत आहे. सुरुवातीला मी स्वत: त्याला दाढी कशी करायची ते शिकवले. आज तो मुलगा सर्व रुग्णांची सकाळी छान दाढी करतो. माझा प्रत्येक सेवक सेवाभावी वृत्तीने काम करतो. मी स्वत:, माझी पत्नी व आई इथे पडेल ती कामं करतो. मी आजवर ५२ बेवारस वृद्धांचे अंत्यविधी पार पाडलेत.
इथे मिळणाऱ्या सोयी-सुविधांमुळे, वातावरणामुळे नातलग न्यायला आले तरी ज्येष्ठ घरी जायला तयार होत नाहीत. एकटेपणाच्या भयामुळे ते घरी जात नाहीत. त्यामुळे गरजू वृद्धांची प्रतीक्षायादी वाढत चालली आहे.
एकदा एक वृद्ध बेवारस अवस्थेत ‘दिलासा’त दाखल झाले. त्यांना कुत्रा चावला होता. पुढे हृदयविकाराने ते मृत्यू पावले. त्यांच्या नातलगांचा पोलिसांच्या मदतीने शोध घेतला तेव्हा त्यांना चार भाऊ आहेत, असं कळलं. त्यांच्या अंत्यविधीला त्यातील एकही जण आला नाही. परंतु पुढे त्या वृद्धाकडे रग्गड पैसा आहे हे कळताच त्यांचे दशक्रिया विधी मात्र चार भावांनी आपापल्या घरी केले. मात्र आजवर सतीशजींना त्यांनी एक रुपयाही डोनेशन दिले नाही. हल्ली असे अनेक ज्येष्ठ घरात दुर्लक्षित स्थितीत जगत आहेत. यासाठी पुढील काळात अशा उपेक्षित वृद्धांची, सेवक नेऊन घरी सेवा करण्याचा सतीश जगताप यांचा विचार आहे. तसंच अनेक बेवारस वृद्धांचा रस्त्याकडेला मृत्यू होतो. चार सेवक हाताशी घेऊन त्यांचे अंत्यविधी पार पाडण्याचा सतीश जगताप विचार करीत आहेत. नाशिकमध्ये नारायण नाग बळीसारखे विधी करण्यासाठी अनेक लोक येतात. त्यांनी दिलेल्या पैशातून वृद्धांच्या वैद्यकीय चाचण्यांची सोय होत असते. ‘दिलासा’च्या मुखपत्रातील चार ओळीत सतीश जगताप यांच्या कार्याचे सार आहे.
व्याधींनी ग्रासले तरी नाउमेद होऊ नकोस,
एकलेपणाचे दु:ख एकटय़ाने सोसू नकोस,
विश्वासाने ये, माझ्या विसाव्यास,
प्रेमाच्या सावलीला, मायेच्या उंबऱ्यास   

पत्ता- दिलासा केअर सेंटर
पारिजात हॉस्पिटल, सिडको ऑफिसमागे, राणाप्रताप चौक, सिडको, नाशिक.
फोन- ९४२२२५८७५६,  ९४२२७०४९३४ , dilasacarecenter@gmail.com
www.dilasacare.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 1:01 am

Web Title: dilasa care center for old people
टॅग : Chaturang
Next Stories
1 ‘चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी’
2 तिचं व्यसन
3 मृत्यू म्हणजे अंत नाही
Just Now!
X