02 July 2020

News Flash

गद्धेपंचविशी : कर्नल

मी वाढलो दादरमध्ये. आमचं घर हिंदू कॉलनीत, गल्ली क्र. १. माटुंग्याच्या दडकर मैदानाच्या अगदी जवळ.

(संग्रहित छायाचित्र)

दिलीप वेंगसरकर

nitinarekar@gmail.com

‘‘मी मुंबईच्या संघात निवडला गेलो; पण अकरा खेळाडूंत माझी निवड झाली नाही. कर्णधार अशोक मंकड , सुनील गावस्कर, एकनाथ सोलकर, पद्माकर शिवलकर, सुधीर नाईक, रामनाथ पारकर, करसन घावरी, अब्दुल इस्माईल असा संघ होता. त्यामुळे वर्षभर मी फक्त स्कोअर लिहीत असे. एका बाजूला इंडियन युनिव्हर्सिटीचा कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला मुंबईचा स्कोअरर! पुढच्या वर्षी इराणी ट्रॉफीच्या सामन्याच्या वेळी सोलकर जखमी झाला आणि मला मुंबईच्या संघात अचानक संधी मिळाली. शेष भारतानं २२० धावा केल्या आणि आमची फलंदाजी आली. मी पाचव्या क्रमांकावर खेळायला गेलो. आपल्याला सिद्ध करायचं आहे, तेही आज, आत्ता. नाही तर कधीच नाही, असं मनाला बजावलं आणि गार्ड घेतला. समोर दिग्गज गोलंदाज बिशनसिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना. दडपण न घेता मी पंचाऐंशी चेंडूंत एकशे दहा धावा टोलावल्या.. आणि मला टोपणनाव मिळालं,  कर्नल!’’

लॉर्ड्सचं जगप्रसिद्ध मैदान. क्रिकेटचं तीर्थक्षेत्र! भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामना रंगात आला होता.. इंग्लंडला आम्ही २९४ धावांत आटोपलं होतं. फलंदाजीला आलेलो आम्हीही छान खेळत होतो. ४ बाद २३२ झालेल्या.. आणि अझर (मोहम्मद अझरुद्दीन) बाद झाला. त्यानंतर एकापाठोपाठ एक रवी, रॉजर, कपिल, चेतन बाद झाले आणि आमची स्थिती ८ बाद २६४ झाली. पहिल्या इिनग्जमध्ये अद्याप ३० धावांची पिछाडी होती. किरण मोरे आला.. तो आक्रमक खेळला, आम्ही ७ धावांची आघाडी घेतली; पण तोही बाद झाला. मी ८५ च्या आसपास होतो. मला शतक करायचंच होतं आणि मॅचही जिंकायची होती.. मणिंदर आला. मी त्याला म्हणालो, ‘‘फक्त सरळ खेळत रहा.’’ त्यानं ऐकलं आणि ‘लॉर्ड्स’वर माझं दुसरं शतक झळकलं. मुख्य म्हणजे ती मॅचही आम्ही जिंकली. त्या वेळी एका ब्रिटिश पत्रकारानं मला विचारलं, ‘‘आज तुझी विकेट पडावी म्हणून इंग्लंडच्या साऱ्या खेळाडूंनी देवाची प्रार्थना केली असेल.’’ मी पटकन म्हणालो, ‘‘देवही भारतीय असेल.’’ हे उत्तर तसं कदाचित उर्मट वाटेल; पण ते स्वाभिमानी होतं. कारण मी मुळात महाराष्ट्रीय आहे, मुंबईकर आहे..

मी वाढलो दादरमध्ये. आमचं घर हिंदू कॉलनीत, गल्ली क्र. १. माटुंग्याच्या दडकर मैदानाच्या अगदी जवळ. माझी शाळा ही त्या वेळची किंग जॉर्ज, आताचं राजा शिवाजी विद्यालय! कॉलेज- पोदार कॉलेज. आता मला सांगा या परिसरात मी क्रिकेटर होणार नाही तर कोण होणार? मी क्रिकेट खेळावं म्हणूनच परमेश्वरानं मला या परिसरात वाढू दिलं, अशी माझी श्रद्धा आहे. आमच्या हिंदू कॉलनीत आणि जवळच्या शिवाजी पार्काच्या अवतीभवती भारताचा अख्खा क्रिकेटचा संघ राहात असे, असे तुम्ही बेलाशक म्हणू शकता. माझ्या शाळेचा क्रिकेटचा इतिहास अतिशय प्रेरणादायी आहे. भारताचे यष्टिरक्षक माधव मंत्री, भारताचे सर्वश्रेष्ठ जलदगती गोलंदाज रमाकांत देसाई, तंत्रसम्राट विजय मांजरेकर, क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम लेग स्पिनर सुभाष गुप्ते, उत्तम फलंदाज रामनाथ केणी हे सारे आमच्या शाळेतले. दादर युनियनचा संघ म्हणजे भारताचा संघ ठरावा अशी स्थिती. नरेन ताम्हाणे, वासू परांजपे, विठ्ठल पाटील ही ज्येष्ठ मंडळी आणि महानतम सुनील गावस्कर, रामनाथ पारकर हे समकालीनही त्यात असायचे.

सुनील गावस्करसारखे जगप्रसिद्ध खेळाडू परदेश दौऱ्यावरून आले की, दादर युनियनच्या क्लब मॅचेस खेळायला पॅड बांधायचे. हे सारं आम्ही पोरंटोरं दडकर मैदानाच्या आजूबाजूला उभं राहून पाहात असायचो. तो संस्कार मोठा होता. तसंही माझं क्रिकेट खूप आधीपासून सुरू झालं होतं. मी सातवीत असताना शाळेच्या टीमचा सदस्य झालो, नंतर नववीत मी शाळेचा कर्णधार झालो. गाईल्स शिल्ड, हॅरिस शिल्ड आम्ही जिंकली. मी त्यानंतर मुंबई स्कूल्सचा, पश्चिम विभागीय शाळांचा व भारतीय शाळांचा कर्णधार झालो. माझा क्रिकेटचा प्रवाह वाहता झाला. क्रिकेट ही आमची साऱ्यांची आवड होती; पण त्या काळातल्या कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे आमच्याही घरात शिक्षणाचं महत्त्व खूप होतं. काहीही झालं तरी पदवीधर व्हायलाच हवं, ही मनाशी बांधलेली खूणगाठ होती आणि त्या काळात फक्त क्रिकेटवर जगणं अवघड होतं. जगण्यासाठी नोकरीही हवी होती. आमच्या घरी सारेच उच्चशिक्षित होते, त्यामुळे शिक्षण घेणं अपरिहार्य होतं. अर्थात मी ते आवडीनं घेतलंही. माझ्या वेळी अकरावी मॅट्रिक होतं आणि चार वर्षांचं कॉलेज असायचं. मॅट्रिक झाल्यावर प्रोफेसर चंदगडकर मला भेटले नि म्हणाले, ‘‘तू पोदारमध्ये प्रवेश घे.’’ त्याप्रमाणे १९७३ मध्ये पोदारमध्ये प्रवेश घेतला व १९७८ मध्ये पदवीधर झालो. क्रिकेट आणि अभ्यास यांचा समतोल सांभाळत खेळलो. इंटरला असताना माझी निवड मुंबई संघात झाली होती आणि ज्युनिअर बी.कॉम.ला असताना माझी निवड भारतीय संघात झाली. विविध दौऱ्यांमुळे काही वेळा मी एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या काही परीक्षांना बसू शकलो नाही, पण ऑक्टोबरच्या परीक्षांना बसलो व उत्तीर्णही झालो. त्यात प्राध्यापक चंदगडकर यांचे सहकार्य मोठे आहे. त्यांनी मला स्वतंत्रपणे तर शिकवलंच, पण अन्य प्राध्यापकांनाही सांगून मला मार्गदर्शन करायची विनंती केली. आमच्या वेळी एटीकेटी प्रकरण नसे. सर्व विषय घेऊनच परीक्षा द्यावी लागे. एका परीक्षेच्या वेळी मला रणजी स्पर्धेचे तीन-चार सामने टाळावे लागले, कारण पदवीधर होणं हे आम्हाला त्या काळातल्या सर्वानाच अतिशय महत्त्वाचं वाटे.

पोदार कॉलेजच्या संघात मी होतो, वयात येत होतो.. जोशात असायचो.. भरपूर धावा करायचो. साहजिकच मी मुंबई विद्यापीठाचा कर्णधार झालो, नंतर भारतीय विद्यापीठाच्या संघाचा कर्णधार झालो. त्या काळात विदेशी संघ आल्यावर त्यांचा एक तरी सामना भारतीय विद्यापीठांच्या संघाशी व्हायचा. १९७६ मध्ये टोनी ग्रेगच्या इंग्लंड संघाविरुद्ध भारतीय विद्यापीठांच्या संघाचा मी कर्णधार होतो आणि कपिल देव, राहुल मंकड, रॉजर बिन्नी, योगराज सिंग, कीर्ती आझाद संघात होते. आमच्या घडत्या वयात, मुंबईत क्लब क्रिकेटला नितांत महत्त्व होतं. दादर युनियनच्या संघात स्थान मिळवणं ही खूप मोठी गोष्ट असायची. कारण त्या संघातून सुनील गावस्कर, रामनाथ पारकर, वासू परांजपे खेळायचे. चाळीस वर्षांचे वासू परांजपे कर्णधार होते. ‘पुरुषोत्तम शिल्ड’च्या एका अंतिम सामन्यात मी दादर युनियनकडून पदार्पण केलं. समोर ‘न्यू हिंद क्लब’ होता आणि देशातला त्या वेळचा सर्वात जलदगती गोलंदाज

पांडुरंग साळगावकर गोलंदाजी करत होता. मी जेमतेम सोळा वर्षांचा होतो. क्लबचं प्रतिनिधित्व करतोय, हा आनंदच खूप मोठा होता. मला फलंदाजी करताना साळगावकरचं अजिबात दडपण आलं नाही. त्या वेळी मी पंचाऐंशी धावा केल्या, आम्ही तो सामना जिंकलो व मी सामनावीर ठरलो. वासू परांजपेंनी मला ‘मेहताब स्पेशल’ बॅट बक्षीस म्हणून दिली. हे माझं पहिलं पारितोषिक! क्लब क्रिकेटमध्ये ज्येष्ठ खेळाडू वागतात कसे, बोलतात कसे, विचार करतात कसे, सर्वाना सांभाळून नेतात कसे, निर्णय घेतात कसे हे सारं शिकण्याजोगं असायचं. सुनीलसारखे कसोटीपटूही क्लब क्रिकेटला कसं महत्त्व देतात, प्रत्येक सामन्याला ते सारखंच महत्त्व का देतात हे तिथं कळलं आणि मग त्यांच्या सातत्यपूर्ण यशाचं गमक कळत गेलं. तोही एक धडाच होता आयुष्य घडवण्याच्या काळातला. एक खेळाडू म्हणून हवा डोक्यात न जाता, तारुण्याच्या मस्तीत वाहावत न जाता आपण स्वत:ला सांभाळून प्रदीर्घ काळ कसं खेळायचं याचं नकळत झालेलं प्रशिक्षण होतं ते.

आंतरविद्यापीठीय रोहिंग्टन बारिया ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दिल्लीविरुद्ध मुंबई विद्यापीठाकडून खेळताना मी मॅटिंग विकेटवर १७१ धावा केल्या, पाठोपाठ मुंबईत इंटरकॉलेजिएट सेमी फायनलमध्ये २४० धावा केल्या. स्वाभाविकच मी मुंबईच्या संघात निवडला गेलो. मी चौदा जणांच्या संघात होतो, पण पहिल्या वर्षी अंतिम अकरांत माझी निवड झाली नाही. मुंबईचा संघ अफाट गुणवत्तेनं भरलेला होता. एक वेळ भारतीय संघात समावेश होणं सोपं, पण मुंबई संघात समावेश होणं अवघड अशी स्थिती होती. अशोक मंकड कर्णधार सुनील गावस्कर, एकनाथ सोलकर, पद्माकर शिवलकर, सुधीर नाईक, रामनाथ पारकर, करसन घावरी, अब्दुल इस्माईल असा संघ होता. त्यामुळे वर्षभर मी स्कोअर लिहीत असे. एका बाजूला इंडियन युनिव्हर्सिटीचा कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला मुंबईचा स्कोअरर! पण कोणताही गंड वाटायचा नाही. त्या वेळी आम्हाला दिवसाला पंचवीस रुपये मिळायचे. आम्ही खेळण्यातच खूश असायचो.

पुढच्या वर्षी इराणी ट्रॉफीच्या सामन्याच्या वेळी नेमका एकनाथ सोलकर जखमी झाला आणि मला मुंबईच्या संघात अचानक संधी मिळाली. या संधीचा पुरेपूर फायदा उठवण्याचा आपण प्रयत्न करायचा एवढीच खूणगाठ मनात बांधली होती. शेष भारतानं २२० धावा केल्या आणि आमची फलंदाजी आली. स्लो टर्नर असणाऱ्या, फिरकीसाठी नंदनवन ठरणाऱ्या त्या खेळपट्टीवर आमचे तीन फलंदाज बाद झाले – गावस्कर, नाईक आणि पारकर. अशोक मंकड समोर होता. मी पाचव्या क्रमांकावर खेळायला गेलो. आपल्याला सिद्ध करायचं आहे, तेही आज, आत्ता. नाही तर कधीच नाही, असं मनाला बजावलं आणि गार्ड घेतला. समोर महानतम फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना. ते गोलंदाजी करताना चेंडूला हातभर वळवत होते; पण मुंबईचा खेळाडू होतो मी आणि लहानपणापासून जागतिक दर्जाचे खेळाडू पाहात आलो होतो. समोर कोण गोलंदाजी करतं आहे याचं दडपण जरादेखील आलं नाही. मी पंचाऐंशी चेंडूंत एकशे दहा धावा टोलावल्या. त्यात सात षटकार ठोकले- तीन बेदीला आणि चार प्रसन्नाला! सगळीकडे नाव झालं. समालोचक लाला अमरनाथ यांना सी. के. नायडू यांची आठवण झाली व मला ‘कर्नल’ हे टोपणनाव त्या सामन्यानंतर मिळालं. या गोष्टी मी मनावर फारशा घेतल्या नाहीत. आपण बरं आपलं क्रिकेट बरं, हीच भूमिका कायम ठेवली.

यानंतर मी भारतीय संघाचा संभाव्य सदस्य मानला जाऊ गेलो. त्या वेळी श्रीलंकेविरुद्ध अनधिकृत कसोटी सामन्यांसाठी माझी भारतीय संघात निवड झाली. त्या संघात मी सलामीचा फलंदाज म्हणून खेळलो. रणजी ट्रॉफीत अंशुमन गायकवाडच्या बडोदा संघाविरुद्ध सुधीर नाईकसोबत मी सलामीला गेलो व सव्वाशे धावा केल्या. नंतर श्रीलंकेविरुद्ध भारतीय विद्यापीठांच्या संघात ब्रिजेश पटेलच्या नेतृत्वाखाली खेळताना आणखी एक शतक काढलं आणि निवड समितीनं न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी माझी निवड केली. मी आंतरराष्ट्रीय खेळाडू झालो. एखाद्या माशाला पाण्यात सोडल्यावर तो आपसूक पोहायला लागतो, तितक्या सहजपणे मी आंतरराष्ट्रीय सामने खेळू लागलो. बिशनसिंग बेदी आमचा कर्णधार होता. त्याने एक मंत्र दिला, ‘‘आता तू एकोणीस वर्षांचा आहेस वगैरे विसर. तू आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेस. त्यामुळे स्वत:ला कमी समजू नकोस.’’ ते खरंच होतं. न्यूझीलंडचा संघ फारसा नावलौकिक मिळवलेला नसला, तरी खडूस संघ होता. शिवाय तिथली थंडी भयानक होती. अशी थंडी यापूर्वी मी कधी अनुभवली नव्हती. अंगात तीन तीन स्वेटर्स घालून आम्ही खेळत होतो. मैदानात थंडगार वारे तर असे वाहात की, डोळ्यांतून पाणी यायचं आणि पुढचं काही दिसेनासं व्हायचं; पण तो दौरा पार पडला. त्यानंतर आम्ही वेस्ट इंडिजला गेलो. तिथला अनुभव आणखी वेगळा. एका वेळी चार-चार गतिमान गोलंदाज क्षणाचीही फुरसत न देता गोलंदाजी करत होते. अँडी रॉबर्टस, होल्डिंग, ज्युलियन, डॅनियल असे एकापेक्षा एक गतिमान गोलंदाज. एका वेळी त्यांना सहन करायची माझी पहिलीच वेळ होती. सुनीलने ज्या प्रकारे त्यांना तोंड दिलं ते एक प्रशिक्षण होतं. एका कसोटीत जागतिक विक्रम करून भारतानं तो कसोटी सामना जिंकला. तो संपूर्ण दौरा क्रिकेटचं शिक्षण म्हणून मला खूप मार्गदर्शक ठरला.

माझं पहिलं कसोटी शतक वेस्ट इंडिजविरुद्ध झालं. समोर सुनील होता. आम्ही दोघांनी ३४४ धावांची भागीदारी केली. सुनीलने १८२ तर मी १५७ धावा काढल्या. सुनील व मी क्लब क्रिकेटपासून एकत्र खेळलो होतो. आमच्यातलं सामंजस्य पक्कं होतं. नुसतं एकमेकांकडे पाहिलं तरी पुरेसं असायचं. शतक कधी झालं हे कळलंही नाही. कित्येक वेळा प्रेक्षकांना प्रश्न पडतो, की दोन खेळाडू भागीदारी रचतात, तेव्हा काय बोलत असतील? आम्ही त्या वेळी फक्त क्रिकेटवर बोलत असतो. आधीचा चेंडू कसा खेळला गेला, तो कसा खेळायला हवा होता, दुसऱ्या चेंडूवर कोणता फटका मारायला हवा होता किंवा अमुक फटका चांगला मारला गेला, अमक्या पद्धतीने खेळू नकोस, हेच बोलत असतो. भारतीय खेळाडूंना एक मोठा फायदा असतो, तो म्हणजे आपल्या देशात अनेक भाषा आहेत व एक राष्ट्रभाषा आहे. आम्ही मैदानात मुद्दामच आमच्या मातृभाषेत किंवा हिंदीत बोलतो. त्यामुळे आमच्या स्ट्रॅटेजीज, आमची विचारपद्धती परदेशी खेळाडूंना कळत नाही. त्यात फलंदाजी करणारे दोन्ही खेळाडू एकच भारतीय भाषा बोलणारे असले तर आणखी धमाल येते. मी व सुनील एकत्र खेळताना मराठीतच बोलायचो. भारतीय संघ ही एक मोठी गंमत असते. त्या सोळा खेळाडूंत अख्खा भारत सामावलेला असतो. आम्हाला आमच्याकडून असलेल्या अपेक्षांची जाणीव असते. मणामणाचं ओझं असतं, फक्त ते ओझं न समजता, ती संधी आहे, असं समजलं की ओझं हलकं होतं.

आमच्या काळातही टीम मीटिंग्ज होत असत. त्यात गंभीरपणे चर्चा होत असे. प्रत्येक सामन्याच्या पूर्वसंध्येस, दररोज संध्याकाळी, काही वेळा अचानक गरज भासल्यास अगदी सामना चालू असतानाही लंचच्या वेळात टीम मीटिंग्ज होत असत. त्यात समोरच्या खेळाडूंची सामर्थ्यस्थळं आणि त्यांची दुबळी स्थळं आम्ही शोधून काढत असू. त्यावर उपाय शोधत असू; पण एका गोष्टीची कायमची खंत मनात आहे, ती म्हणजे आजच्या खेळाडूप्रमाणे आम्ही फिटनेसवर कधी भर दिला नाही. कित्येकदा मैदानात गेलं की थेट पॅड चढवून फलंदाजीचा सराव करायचो. जर आम्ही फिटनेसकडे लक्ष दिलं असतं, तर आज माझ्या नावावर आणखी तीन हजार धावा नक्की लागल्या असत्या; पण आयुष्यात जर-तर या गोष्टीला स्थान नसतं आणि क्रिकेटमध्ये तर नाहीच नाही. एक गोष्ट सांगतो, या खेळात आणखी एक आवश्यक बाब आहे ती म्हणजे नम्रता. आपल्यासमोर कोण आहे याचं कधीही दडपण घ्यायचं नाही, पण त्याच्या कर्तृत्वाबद्दल आदरही बाळगायचा. मला आठवतं, त्या वेळी आमचा कर्णधार बिशनसिंग बेदी होता. त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो होता. तो एक महान दौरा ठरला. त्या दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघाचं स्वागत करायला विमानतळावर स्वत: सर डॉन ब्रॅडमन आले होते. आमचे कोच व मार्गदर्शक होते पॉली उम्रीगर. पॉलीकाकांनी प्रत्येकाची सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी ओळख करून दिली. केवढी धन्यता वाटली होती तेव्हा आम्हाला. त्यांच्या वागण्यातली सहजता, नम्रता, आपुलकी सारं मनोज्ञ होतं. त्या दौऱ्यात आम्ही किती तरी लिजंड्सना भेटलो. लिंडसे हॅसेट, कीथ मिलर, अ‍ॅलन डेव्हिडसन, नील हार्वे. एकेक दिग्गज खेळाडू, प्रत्येकानं आपली मुद्रा काळाच्या पटलावर उमटवलेली होती, पण त्यांचं वागणं स्वाभाविक आणि सहज होतं. १९६७ चं वर्ष. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आला होता. केरी पॅकरच्या ग्रहणानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट उभारी घेत होतं. (पॅकर प्रकरणावर पुढे लिहिणारच आहे.) त्या दौऱ्यात आम्हाला अलोट प्रेम मिळालं. बॉबी सिंप्सन हे निवृत्तीनंतर पुन्हा खेळायला उतरले होते. जेफ थॉम्सन, व्हेन क्लार्क, किम ह्य़ूज, पीटर टूही असे खेळाडू त्यात होते. अ‍ॅलन बॉर्डरने त्या मालिकेत पदार्पण केलं होतं. हा दौरा कसोटी क्रिकेटचं महत्त्व अधोरेखित करून गेला.

माणसाचा संयम हा स्थायिभाव असायला हवा, असं मला कायम वाटत आलंय. काही वेळा तो ढळतो, पण लगेच सावरायला हवं. मी कसोटी खेळाडू झालो, तेव्हा अवघा एकोणीस वर्षांचा होतो. अवतीभवती मोठं फॅन फॉलोइंग होतं; पण त्याच्या मागे मी गेलो नाही. मला क्रिकेट खेळायचं होतं. ज्या विचारसरणीत मी वाढलो, ती विचारसरणी मला कोणतीही अविवेकी गोष्ट करू देणार नव्हतीच. खरं म्हणजे, आमच्या सर्व पिढीचं जगणं पापभिरू होतं. कसोटी खेळाडू झालो, तेव्हा मी महाविद्यालयीन विद्यार्थी होतो. माझ्यासमोर फक्त एकच लक्ष्य असायचं, ते म्हणजे क्रिकेट खेळणं. चित्त वगैरे विचलित होण्याजोगं मी कधीही वागलो नाही. माझ्या मर्यादा मीच आखून घेतल्या व त्यात राहिलो; पण ‘अरे’ला ‘कारे’ नक्की करतो तेही माझ्या स्वभावानुसारच. एक किस्सा सांगतो. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आम्ही होतो. मी शतकाच्या अगदी जवळ पोहोचलो होतो, ९४ धावा झाल्या होत्या. माल्कम मार्शल, अँडी रॉबर्ट्स, मायकल होल्डिंग, जोएल गार्नर हे पूर्ण भरात गोलंदाजी करत होते. मार्शल दोन यार्ड पुढे येऊन गोलंदाजी करत होता. अंपायर त्याकडे दुर्लक्ष करत होते. विव्ह रिचर्ड्स डोळेझाक करत होता. अखेरीस वैतागून मी अंपायरकडे तक्रार केली. त्याने मार्शलचा पुढचा चेंडू ‘नो बॉल’ ठरवला. मार्शल चिडला, विव्ह वाद घालू लागला. माझ्याकडे आला व म्हणाला, ‘‘आमचे गोलंदाज ओव्हरस्टेप करत नाहीत.’’ वगैरे वगैरे. मी त्याच्याकडे शांतपणे दुर्लक्ष केलं.

आम्ही सुरुवात केली, तेव्हा क्रिकेटमध्ये फारसा पसा नव्हता. माझी कारकीर्द सुरू झाली आणि क्रिकेटवर केरी पॅकर नावाचं वादळ घोंघावलं त्यानं व त्याच्या ‘चॅनेल नाइन’नं जगभरातल्या क्रिकेट खेळाडूंशी करार करून ‘पॅकर सर्कस’ सुरू केली. या करारांतून क्रिकेटपटूंना अफाट पसा मिळायला लागला. हे सामने रंगीत कपडे घालून, पांढरा चेंडू वापरून दिवस-रात्र खेळले जाऊ लागले. त्याचं आकर्षण अनेक खेळाडूंना वाटायला लागलं. भारतातही मोठय़ा खेळाडूंना पॅकरचं निमंत्रण आलं. सुनील, बेदी, प्रसन्ना, किरमाणी, चंद्रशेखर, विश्वनाथ व मी अशा सात जणांना ऑफर आल्या. आम्ही एकत्र बसून निर्णय घ्यायचो. त्या वेळी ‘बीसीसीआय’ने आम्हाला विनंती केली की, असं करू नका. ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष चिन्नास्वामी होते. त्यांनी, गुलाम अहमद यांनीही तेच सांगितलं. ‘बीसीसीआय’ हे एक संपूर्ण कुटुंब होतं. आम्ही त्यातले सदस्य होतो. पॅकरबरोबर आम्ही गेलो असतो तर आमच्यावर बंदी आली असती. आम्हाला कसोटी क्रिकेट खेळायला मिळालं नसतं. आम्हाला कसोटी खेळणं महत्त्वाचं वाटलं. कसोटी क्रिकेट खेळत असताना तुम्ही तुमच्या देशाचं प्रतिनिधित्व करत असता, ते करता आलं नसतं. पसा की देश, या प्रश्नाचं उत्तर देश महत्त्वाचा, असं देऊन आम्ही सर्वानी पॅकरची ऑफर नाकारली.

मला काहीही झालं तरी निष्ठा महत्त्वाची वाटते. तुमच्या निष्ठा तुम्ही जे काही करता, त्याच्याशी संपूर्णपणे असायलाच हव्यात. मी ‘टाटा स्पोर्ट्स क्लब’साठी पंचवीस वर्ष खेळलो, नोकरी कधीही बदलली नाही, माझा क्लब मी कधीही बदलला नाही, माझा रणजी संघ कधी बदलला नाही. मी रणजीसाठी फक्त मुंबईकडूनच खेळलो. पंचवीस वर्षे दादर युनियनकडून खेळलो, आज त्या क्लबचा मी अध्यक्ष आहे. माझी स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी आहे. या अ‍ॅकॅडमीमध्ये आठव्या वर्षांपासून मुलं येतात, क्रिकेट शिकतात, काही वर्षांनी ती मुलं पालकांच्या महत्त्वाकांक्षासाठी दुसऱ्या संघात जातात, त्या वेळी मला वाईट वाटतं. कारण अशा प्रकारे मिळालेली संधी ही दीर्घकाळ यश देत नाही. अंतिमत: तुमचं टॅलेंट, तुमची गुणवत्ताच तुम्हाला टिकवते. संयम, निष्ठा आणि सचोटी यांची जोड गुणवत्तेला मिळाली की खेळाडू घडत जातो. माझी खेळावर प्रचंड निष्ठा होती व आहे. अगदी परीक्षांच्या काळातही. बी.कॉम.चा शेवटचा पेपर दिला आणि त्या रात्री विमानाने मी दिल्लीला गेलो, मुंबईसाठी शेष भारताविरुद्ध इराणी चषकाचा सामना खेळलो, त्यात रामनाथ व सुनील लवकर आऊट झालेले. अशोक व मी, आम्ही दोघांनी दोनशे धावांची भागीदारी केली. त्या वेळी तीन महिने बॅट हातात धरली नसताना मी ९४ धावा केल्या. क्रिकेटपुढे सर्व गोष्टी मी दुय्यम मानल्या.

सामना खेळत असताना मी कधीही पाटर्य़ाना गेलो नाही. दररोज रात्री दहा वाजता मी झोपत असे. सामना, मग तो क्लबचा असो, रणजी असो किंवा कसोटी सामना असो; त्यात बदल केला नाही. मी नेहमीच आदर्श राहण्याचा प्रयत्न केला. नियमांनुसार राहिलो, वागलो, जगलो. त्याचं फळ मला मिळालं, असं नक्की वाटतं.

माझी कारकीर्द सुरू झाली आणि क्रिकेटवर केरी पॅकर नावाचं वादळ घोंघावलं. त्यानं व त्याच्या ‘चॅनेल नाइन’नं जगभरातल्या क्रिकेट खेळाडूंशी करार करून ‘पॅकर सर्कस’ सुरू केली. या करारांतून क्रिकेटपटूंना अफाट पसा मिळायला लागला. हे सामने रंगीत कपडे घालून, पांढरा चेंडू वापरून दिवस-रात्र खेळले जाऊ लागले. त्याचं आकर्षण अनेक खेळाडूंना वाटायला लागलं. भारतातही मोठय़ा खेळाडूंना पॅकरचं निमंत्रण आलं. सुनील, बेदी, प्रसन्ना, किरमाणी, चंद्रशेखर, विश्वनाथ व मी अशा सात जणांना ऑफर आल्या. आम्ही एकत्र बसून निर्णयावर चर्चा करत होतो. त्या वेळी ‘बीसीसीआय’ने आम्हाला विनंती केली की, असं करू नका. पॅकरबरोबर आम्ही गेलो असतो तर आमच्यावर बंदी आली असती. कसोटी क्रिकेट खेळत असताना तुम्ही तुमच्या देशाचं प्रतिनिधित्व करत असता, ते करता आलं नसतं. पसा की देश, या प्रश्नाचं उत्तर देश महत्त्वाचा, असे देऊन आम्ही सर्वानी पॅकरची ऑफर नाकारली.

शब्दांकन – डॉ. नितीन आरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2020 1:00 am

Web Title: dilip vengsarkar gadhe panchvishi chaturang abn 97
Next Stories
1 नापासाचा अर्थ!
2 पास-नापासाचं अद्वैत!
3 जीवन विज्ञान : उपवास-अतिआहाराचा सुवर्णमध्य!
Just Now!
X