अर्चना जगदीश

अंतराळातून पृथ्वीवरच्या किंवा खरंतर जमिनीखाली दडलेल्या, जंगल किंवा इतर मानवनिर्मित गोष्टींमुळे नाहीशा झालेल्या अवशेषांच्या ठिकाणांचा शोध घेणं म्हणजे अवकाश पुरातत्त्व. सारा पार्काक या अमेरिकन पुरातत्त्ववेत्तीने उपग्रह प्रतिमांचा अभ्यास आणि वापर करून पृथ्वीच्या पोटात दडलेल्या आणि आतापर्यंत माहीत नसलेल्या प्रागतिहासिक किंवा त्याहूनही आधीच्या काळातल्या मानवाच्या खुणा, संस्कृती शोधल्या आहेत. तिच्या संशोधनाच्या अनोख्या पद्धती आणि त्यांची गरज याविषयी..

अंतराळाचा वेध घ्यायचा आणि विश्वाबद्दल जाणून घ्यायचं ही माणसाची, म्हणजे पृथ्वीवरच्या सगळ्यात बुद्धिमान प्रजातीची अभिलाषा. माणूस जेव्हापासून विचार करायला लागला त्या काळाइतकीच प्राचीन आहे. माणसाला आणखीही एक आदिम कुतूहल आहे, ते म्हणजे स्वत:ची उत्पत्ती कशी झाली ते शोधणे.

लाखो वर्षांच्या अलिखित, अज्ञात जीवनाचा वेध घ्यायचा आणि आपणच बदल केलेल्या, बिघडवलेल्या पृथ्वीवर आज राहताना, माणूस म्हणून जीवनाचं सातत्य सुरू ठेवायचं. त्या सगळ्या आकलनाचा उपयोग होईल का हे तपासून बघायचं. त्यासाठी त्याने जीवाष्म अभ्यास आणि पुरातत्त्वशास्त्र, तंत्रज्ञानाच्या मदतीने नवनवे शोध लावले. शक्य होते तिथे उत्खनन करून माणसाच्या आदिम, लाखो वर्षांपूर्वीपासूनच्या अस्तित्वाचे पुरावे जगासमोर आणले. मात्र तंत्रज्ञानाचा विस्तार आणि वसुंधरेचा माणसाने आपल्या उपयोगासाठी सुरू ठेवलेला अनिर्बंध वापर, याचा एकत्रित परिणाम म्हणून झालेला विकास, यामुळे पुरामानवाचा शोध किंवा जगभरात वेगवेगळ्या काळांत उदय पावलेल्या अनेक संस्कृती, सभ्यता जमिनीच्या पोटातच राहिल्या.

प्राचीन शहरांवर नवी शहरं वसली आणि जुनी शहरं शोधता येतील याच्या खुणाही नाहीशा झाल्या. नंतरच्या पाच-सहा दशकांमध्ये, कालौघात टिकून राहिलेल्या प्राचीन तसेच मध्ययुगीन स्मारकांमधले शिलालेख, विटा आणि त्यावरची चित्रलिपी वाचता येऊ लागली. त्यातूनच प्राचीन काळातल्या अनेक संस्कृतींची माहिती समजायला लागली. अनेक प्रागतिहासिक शहरे आणि अशा प्राचीन लिपीवाङ्मयात उल्लेख केलेल्या ठिकाणांबद्दल पुरातत्त्व संशोधक आणि इतिहासकारांमध्ये कुतूहल उत्पन्न झालं. मात्र आता बदललेल्या भूगोलामुळे, तसेच नद्यांची खोरी आणि पात्रं यांच्या सद्य:स्थितीमुळे हा शोध खूपच कठीण होता.

पेरू या दक्षिण अमेरिकेतील देशात सापडलेली ‘माचू-पिचू’ची, माया लोकांची पर्वत संस्कृती किंवा इंग्रजांच्या काळात रेल्वेचे काम सुरू असताना लागलेला मोहेंजोदारो या पाच-सहा हजार वर्षे जुन्या नागरी संस्कृतीचा शोध, हे अपघातानेच उजेडात आले होते. तर सोळाव्या शतकात अंतोलिनो मॅडालेना या पोर्तुगीज प्रवाशाने पाश्चिमात्य जगासमोर प्रथम आणलेल्या अंगकोरवाट या कंबोडियामधल्या देवळांचा समूह आज जागतिक वारसास्थळ आहे. मात्र त्याचा संपूर्ण आणि नीट शोध लागला तो गेल्या दोन दशकात तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे आणि अवकाशातून पृथ्वीचा वेध घेणाऱ्या असंख्य मानवनिर्मित उपग्रहांमुळे.

सारा पार्काक या अमेरिकन पुरातत्त्ववेत्तीने अशाच उपग्रह प्रतिमांचा अभ्यास आणि वापर करून पृथ्वीच्या पोटात दडलेल्या आणि आतापर्यंत माहीत नसलेल्या प्रागतिहासिक किंवा त्याहूनही आधीच्या काळातल्या मानवाच्या खुणा, उदयास्त पावलेली शहरं आणि संस्कृती शोधल्या आहेत. अंतराळातून पृथ्वीवरच्या किंवा खरंतर जमिनीखाली दडलेल्या, जंगल किंवा इतर मानवनिर्मित गोष्टींमुळे नाहीशा झालेल्या अवशेषांच्या ठिकाणांचा शोध घेणं म्हणजे अवकाश पुरातत्त्व. बऱ्याचदा याचा अर्थ अंतराळातून विश्वातील इतर प्रगत जीवांचा किंवा मानवाच्या अस्तित्वाचा शोध, असा काढला जाऊ शकतो. पण साराचे संशोधन म्हणजे अवकाशातून उपग्रह प्रतिमांद्वारे घेतलेला शोध असाच आहे.

मूळ ठिकाणाच्या वर जाऊन हवेतून काढलेल्या छायाचित्रांचा वापर करून त्या ठिकाणच्या बारकाव्यांचा अधिक अभ्यास करायचा, या तंत्रज्ञानाचा वापर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झाला, तो अर्थातच सन्यासाठी. नंतर पहिल्या महायुद्धात डावपेच आखण्यासाठीही त्याचा वापर झाला. तंत्रज्ञान प्रगत झाल्यावर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक वैमानिक आपली विमाने इजिप्तसारख्या भागांमध्ये जरा खाली आणत आणि पिरॅमिड्स तसेच स्फिन्क्सची छायाचित्रं घेत. तिथपासूनच पुरातत्त्व अभ्यासासाठी हवाई छायाचित्रणाचा उपयोग होऊ लागला. पण ते अर्थातच त्या काळानुसार खूप खर्चीक होतं. आता त्याची जागा मनुष्यविरहित उड्डाणे आणि ड्रोन्स या त्यामानाने स्वस्त, वापरायला सोप्या साधनांनी घेतली आहे.

भूगोल आणि पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या देशांनी अक्षरश: हजारो मानवनिर्मित लहान-मोठे उपग्रह पृथ्वीभोवती वेगवेगळ्या उंचीवरून घिरटय़ा घालतात. त्यांच्याकडून विशिष्ट माहिती घेऊन वादळ, वारे, पाऊस आणि खगोलशास्त्रीय अभ्यास केला जातो; त्यावरून पृथ्वीच्या नजीकच्या भविष्याचा, बदलाचा वेध घेता येतो. या उपग्रहांमुळे विमानातून केलेल्या हवाई छायाचित्रणापेक्षा कितीतरी अधिक उंचीवरून म्हणजे अंतराळातून, सेकंदाला शेकडो छायाचित्रं घेता येतात. इन्फ्रारेड छायाचित्रण, कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून पृथ्वीवरच्या छायाचित्रांचे निरनिराळ्या पद्धतीने पृथक्करण करता येते. ते मात्र खर्चीक आहे. काही मोठय़ा संशोधन प्रकल्पांमधूनच ते करता येते.

इतर कुठल्याही विज्ञान शाखेप्रमाणे या विज्ञान शाखेत संशोधन करतानासुद्धा सुरुवात एखाद्या प्रश्नानेच करावी लागते आणि सारा पार्काकचा प्रश्न म्हणजे मानवाच्या सर्वात पुरातन अस्तित्वाचे, विकासाचे, उत्क्रांतीचे पुरावे कसे आणि कुठे मिळतील? मात्र हे सगळं एखाद्या खेळासारखं, जिगसॉ कोडय़ासारखं वाटतं आणि उपग्रहांद्वारे घेतलेली छायाचित्रं म्हणजे या कोडय़ाचे तुकडे.

लहानपणापासून न्यूयॉर्कच्या समुद्रकिनारी शंख-शिंपल्यांचे जीवाष्म शोधायचा छंद असलेल्या साराने पुढे जीवाष्मशास्त्र आणि पुरातत्त्वशास्त्र यातच कारकीर्द घडवली हे साहजिकच होतं. सरळ जमिनीवर उत्खनन करताना लक्षात आलं, की अनेक गोष्टी अंतराळातून काढलेल्या छायाचित्रांमध्ये वेगळ्या दिसतात. त्यांचं इन्फ्रारेड तंत्रज्ञानाने पृथक्करण केलं, वेगेवेगळे कृत्रिम थर आणि गाळण्या लावून बघितल्या तर तापमान फरकामुळे जमिनीच्या पोटाला अवशेषांची अधिक सुस्पष्ट कल्पना येते.

त्याबरहुकूम उत्खनन आणि प्रत्यक्ष शोध घेतल्यावर आश्चर्यकारक पुरावे हाती लागतात. नवी माहिती समोर येते. अर्थात, या संशोधनातल्या ‘अंतराळ, अवकाश’ या शब्दांमुळे अनेकदा फसगत होते याचा सारालाही अनुभव आला आहे. तिच्या एका संशोधन प्रकल्पाला विद्यापीठाने मंजुरी दिली तरी अर्थसाहाय्य करणाऱ्या संस्थेने मात्र या प्रकल्पाचा विम्याचा खर्च खूप जास्त म्हणजे पन्नास हजार डॉलर्स आहे म्हणून तो प्रस्ताव नाकारला. त्यांना वाटलं, सारा प्रत्यक्ष अंतराळयानात जाऊन छायाचित्र काढणार आहे.

साराचा ध्यास आणि अभ्यास यातून अनेक नवी ठिकाणं समजली आहेत, जी आजच्या शहरीकरणाच्या काळात कधीच सापडली नसती. तिने रोमच्या विमानतळाच्या परिसरात हजारो प्राचीन थडगी शोधलीत. म्हणूनच ‘सारा आता अनेक ‘इंडियाना जोन्स’ना बेकार करणार.’ अशा शब्दांत सहकारी तिचं कौतुक करतात. इजिप्तमध्ये आणखी १७ पिरॅमिड्स येत्या काळात उत्खननातून सापडतील. त्यांच्या जागा तिने निश्चित केल्या आहेत. उपग्रह-चित्रं आणि त्यावरून तयार केलेले नकाशे यातून त्यांनी प्राचीन इजिप्तची कैरोजवळची टेनिस ही राजधानी आणि तिचा परिसर शोधला आहे. नाईल नदीकाठचं टेनिस संस्कृतीनंतरच्या काळातील महत्त्वाचं शहर इजिटावा शोधलं आहे.

नाईल नदीने हजारो वर्षांत प्रवाह कसे बदलले आणि त्या काठच्या शहरांच्या, मानवी वस्तीच्या जागा कशा बदलल्या, हेसुद्धा तिच्या अथक संशोधनानं समजलं आहे. तिने घनदाट जंगलातल्या प्राचीन ‘माया संस्कृती’च्या आजवर माहीत नसलेल्या खुणा उजेडात आणल्या आहेत. एरवी लोकसंस्कृतीतून जपली जाणारी पांढरीच्या टेकाडांची माहिती आणि आदिवासींच्या लोककथा हाच अशा शोधांचा आधार असायचा. मात्र आता ही नवी परिमाणे आपल्याला माणूस या प्रजातीचा इतिहास आणि क्रमाक्रमाने त्याच्या पाऊलखुणा सर्वत्र उमटल्यानंतर होणारे बदल याचा आणखी स्पष्ट पुरावा देतात.

साराने आपल्या सगळ्या प्रवासाबद्दल आणि तिच्या अतिशय वेगळ्या विज्ञान शाखेबद्दल अंतराळातून पुरातत्त्वशास्त्र अर्थात ‘आर्किऑलॉजी फ्रॉम स्पेस’ हे पुस्तक लिहिले आहे. तिची तळमळ आणि हा नवा विषय समजून घ्यायचा असेल तर हे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे. साराचा ‘नॅशनल जिओग्राफिक सोसायटी’ने सन्मान केला आहे. २०१७ मध्ये साराला तिच्या कामासाठी एक लाख डॉलर्सची मानाची ‘टेड’ पाठय़वृत्ती मिळाली. या पाठय़वृत्तीचा उपयोग करून तिने आफ्रिकेमधल्या विषुववृत्तीय घनदाट अरण्यांमधील लाखो वर्ष जुन्या मानवाच्या खुणा शोधल्या आहेत.

सारा सांगते, ‘‘माणसामध्ये कुतूहल आहे, बुद्धिमत्ता आहे आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची अचाट क्षमता आहे. म्हणूनच आपण नष्ट होण्यापासून स्वत:ला वाचवलं पाहिजे, थोडं थांबून, नव्या पद्धतीने आपणच बिघडवलेल्या वातावरणाशी कसं मिळतंजुळतं घेता येईल याचा विचार केला पाहिजे, कृती कार्यक्रम ठरवला पाहिजे. यासाठी प्राचीन काळापासून अशा लढायांना सामोरं गेलेला माणूस या पुराव्यांमधून काहीतरी सांगतो आहे, तो आवाज आपण आज ऐकायला हवा.’’

पृथ्वीसारखा एकमेवाद्वितीय ग्रह पुढे कोटय़वधी वर्षे बदललेल्या स्वरूपात राहीलच, नवे प्रगत जीवही तयार होतील. मात्र गेल्या लाखो वर्षांत इतर नष्ट झालेल्या डायनोसॉरसारख्या प्रजातींप्रमाणेच कदाचित आपणही संपून जाऊ, ही जाणीव पुन्हा करून देणं हेच तिच्या संशोधनाचं फलित आहे. सारा आणखी मनापासून आवाहन करते ते अशा ठिकाणांना जपून ठेवण्याचं..

भवतालाचा वेध म्हणजे केवळ वर्तमानकाळात काय घडतं आहे हे नाही, तर पृथ्वीवर जगण्याची, प्रजाती म्हणून स्थिर होण्याची धडपड करणारा माणूस, त्याचा हजारो वर्षांच्या भूतकाळातला प्रवास, हे सगळं समजून घेणंही आहे. शिवाय माणसाच्या या प्रदीर्घ प्रवासात अनेक संस्कृती उदयाला आल्या, बहरल्या आणि पृथ्वीचं वातावरण, स्वरूप बदललं तशा नाहीशा झाल्या. कधी हा बदल बदलणाऱ्या नदीच्या प्रवाहांनी घडवला तर कधी ज्वालामुखी आणि त्यानंतर येणारी हिमयुगं, त्सुनामी यांनी तो झाला, पण त्याच्याशी जमवून घेत माणसाचा प्रवास सुरूच राहिला.

अर्थात, आज माणूस अनेक कारणांनी वातावरण बिघडवतो आहे. त्यामुळे पृथ्वीचा नाश होणार नाही. माणूस ही प्रजाती मात्र कायमची नष्ट होण्याची ही सुरुवात नक्कीच आहे. म्हणूनच पुरामानवशास्त्रीय अभ्यासावरून आपण मानवजातीच्या भविष्यासाठी शिकलं पाहिजे. त्यासाठी या सगळ्या; खरं तर एका अर्थाने स्थलकालातीत अशा पुराव्यांचे संरक्षण केले पाहिजे, आपल्या आधुनिक व्याख्येतल्या विकासाचा वेग थोडा कमी केला पाहिजे.

godboleaj@gmail.com

chaturang@expressindia.com