05 March 2021

News Flash

ब्रह्मक्षण

एका चित्रपटात मी मुस्लीम होते. कुठल्या तरी प्रसंगाचं चित्रण चालू असताना अचानक दूर कुठे तरी खरीखुरी ‘अजान’ सुरू झाली आणि माझ्या पदरात काही दैवी क्षण

| May 17, 2014 01:01 am

एका चित्रपटात मी मुस्लीम होते. कुठल्या तरी प्रसंगाचं चित्रण चालू असताना अचानक दूर कुठे तरी खरीखुरी ‘अजान’ सुरू झाली आणि माझ्या पदरात काही दैवी क्षण टाकून गेली. हे सगळं फार सुंदर आहे. ‘याचसाठी केला होता अट्टहास’ असं म्हणायला लावणारे हे असे क्षण नशिबात लिहिणारी ती जी कोणी शक्ती असेल, त्या शक्तीला हात जोडून साकडं घालते. या ब्रह्मक्षणांचं हे दैवी धन असंच पदरात टाकत राहा.
नाटकात ‘ते’ क्षण जास्त वेळा आलेत. कारण नाटक सलगतेनं चालू असतं. चित्रपट तुकडय़ातुकडय़ानं चित्रित होतो. त्यामुळे तिथे हृदयापेक्षा डोकं जास्त चालू राहतं. पण तिथेही जर योग्य वाटेनं चाललं तर ती ही भूमिका देते, हे ब्रह्मक्षण..! त्या क्षणांना तुमची भूमिका तुम्हाला हाताला धरून अचानक तिच्या राज्यात ओढून नेते. काही क्षण तुमचं स्वत:चंही भान सुटल्यासारखं होतं. तुम्ही तंतोतंत ‘ती’च होता. पण काहीच क्षण. तो ब्रह्मकाळ संपला की तुम्ही क्षणात तुमच्यात परत येता. तुमच्या शरीरात, तुमच्या भवतालात. जाणवायला लागतं, हे नाटक आहे, समोर प्रेक्षक आहेत. पण त्या ब्रह्मकाळापुरतं हे सगळं भान काही, अगदी काहीच क्षण पूर्ण सुटल्यासारखं होतं. हे अनुभवायला माझ्या आयुष्यातली सुरुवातीची बरीच नाटकं खर्ची पडली. ती सुरुवातीची नाटकं मला रंगमंचाची, प्रेक्षकांची भीती वाटण्यातच गेली. हे ब्रह्मक्षण भीतीच्या आसपास टिकत नाहीत. फिरकतच नाहीत. भितीनं विरघळतात. सुरुवातीचे हे भितीचे दिवस सरल्यानंतर पहिल्यांदा हा क्षण माझ्या आयुष्यात ‘राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात’ आला. मी ‘लॉर्का’ नावाच्या नाटककाराचं ‘हाऊस ऑफ बर्नाडा अल्बा’ हे नाटक करत होते. हिंदीत ‘रुक्मावती की हवेली’. या हवेलीत फक्त स्त्रियाच स्त्रिया. अनेक अविवाहित बहिणी आणि त्यांची आई बर्नाडा अल्बा यांची ही कथा. घरातल्या कुणालाच पुरुषाचा सहवास नाही. एकटय़ा, दु:खी बायकांचं ‘काळघर’ आहे ही हवेली! मला अपेक्षा होती यात मला धाकटय़ा चुलबुल्या बहिणीची भूमिका मिळेल. कारण वर्गात मी सगळ्यात लहानही होते. छोटीशी, गोड, खटय़ाळ बाहुली अशी इतरांची आणि त्यामुळे माझीही माझ्याविषयीची प्रतिमा होती. नाटकाच्या दिग्दर्शिका त्रिपुरारी शर्मा यांनी वेगळंच काहीसं केलं. माझ्याबरोबरच सगळ्या वर्गालाही त्याचं आश्चर्य वाटलं. त्यांनी मला सगळ्यात मोठय़ा बहिणीची भूमिका दिली. शांत, घुमी. चाळिशीला पोचलेली, फहमीदा. ही एकटी तिच्या आईला तिच्या आधीच्या नवऱ्यापासून झालेली. बाकी सगळ्या दुसऱ्या नवऱ्यापासूनच्या. तिच्या आईचा हा आधीचा नवरा, फहमीदाचा बाप श्रीमंत. त्यामुळे त्याची सगळी संपत्ती फहमीदाच्या नावावर होणार हे साऱ्या गावाला ठाऊक. गावातले पुरुष या घराच्या आसपास यायची हिंमत करत नाहीत. याला कारण हवेलीची मालकीण आणि या सगळ्या मुलींची आई बर्नाडा अल्बा! तिला सगळे घाबरतात. सगळ्या गोष्टी तिच्या तंत्रानेच होतात. तिच्या खुर्चीमागे लटकणाऱ्या बंदुकीचा सर्वानाच धाक आहे. तिच्या मनाविरुद्ध हवेलीत काहीही होणं शक्य नाही. फहमीदाच्या संपत्तीमुळं इतर बहिणी तिच्यावर जळतात, तिला एकटं पाडतात. नाटक सुरू होतं तेव्हा तिच्यावर जळण्याचं अजून एक मोठं कारण घडलेलं आहे. तिचं लग्न ठरतं आहे. तिला पुरुषाला सहवास मिळणार आहे. सगळ्या बहिणी तिच्यामागे तिच्याविषयी फक्त वाईट बोलतात. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव ‘अतहर’ आहे. ‘तो तिच्या संपत्तीसाठी तिच्याशी लग्न करतो आहे, नाहीतर तिच्यात आहे काय..’ अशी चर्चा तिच्या मागे बहिणींमध्ये चालू आहे. सगळ्यात धाकटी मुलगी सगळ्यात सुंदर, तारुण्यानं मुसमुसलेली. तिचं अतहरबरोबर छुपं प्रकरण चालू आहे, हे फहमीदालाच काय त्यांच्यातली एक बहीण सोडली तर घरात कुणालाच माहीत नाही. फहमीदा चाळिशीची, जून. तिच्या आसपास काय चालू आहे तिला माहीत नाही. पण ती अतहरला भेटते तेव्हा तिला जाणवतं. हा माझ्याबरोबर आहे, पण हा माझ्याबरोबर नाहीसुद्धा.. ती याविषयी तिच्या आईशी एक संवाद बोलते. बाकी ती नाटकभर घुमी, पण या संवादात फहमीदा कळते. ती अशा अर्थाचं बोलते, ‘अतहर माझ्याबरोबर असताना बऱ्याचदा माझ्यापासून दूर जाताना मला दिसला आहे. मला असं का वाटतं मला कळत नाही..’ मी फहमीदाला शोधत होते. त्या भूमिकेच्या वयापेक्षा माझं वय खूप लहान होतं. तरी मी मनापासून तिच्या जवळ जाऊ पाहात होते. बी. व्ही. कारंथ या महान संगीतज्ञानं या नाटकाचं संगीत केलं होतं. मला कारंथजींविषयी नितांत प्रेम आणि आदर होता.
   ती भूमिका करता करता मी कारंथजींना संगीतामध्ये सहायक म्हणूनही काम करत होते. प्रयोग जवळ आला तसं एके दिवशी विद्यालयातल्याच कोपऱ्यातल्या अद्ययावत ‘साउंड स्टुडिओ’मध्ये संगीताचं रेकॉर्डिग करायचं ठरलं. त्या दिवशी नाटकाच्या पहिल्या अंकापासून कुठकुठल्या संवादामागे, कुठकुठलं संगीत, किती वेळ गाजणार याचा लिखित कागद घेऊन मी स्टुडिओत गेले. ध्वनिमुद्रण सुरू झालं. तिसऱ्या अंकात फहमीदा आईबरोबर बोलते तो संवाद आला. मी वर नमूद कलेला तोच संवाद.. तिथे संगीत असेल असं मला वाटलं नव्हतं. माझ्या दिग्दर्शकांनीसुद्धा मला हातातल्या कागदावर किंवा संहितेवर तशी काही खूण केली नव्हती. पण कारंथजी मला म्हणाले, ‘‘यहाँ संगीत होगा। तुम्हारे संवाद बोलो।’’ मी बोलायला सुरुवात केली. ‘‘अतहर माझ्याबरोबर असताना बऱ्याचदा माझ्यापासून दूर जाताना मला दिसला आहे.’’ अशा अर्थाचं माझं वाक्य मी म्हणताच कारंथजींनी पलीकडच्या ध्वनिमुद्रणाच्या खोलीत बसलेल्या एका बुजुर्ग सारंगीवादकाला डोळ्यांनी खूण केली. त्या वादकासमोर कारंथजींनी खास या प्रसंगासाठी रचलेली सुरावट होती. तो ती वाजवू लागला आणि त्या गूढ संगीतानं अचानक माझ्या आयुष्यात तो ‘ब्रह्मक्षण’ आला. अचानक स्टुडिओचा प्रकाश, कारंथजी, ते बुजुर्ग सारंगीवादक मावळून गेल्यासारखे नाहीसे झाले. मी एका हवेलीबाहेर. एका भव्य दरवाजापाशी उभी. ही मी नाही. त्या सारंगीच्या सुरावटीनं मला माझ्यातनं खेचून माझ्या आत दुसरंच कुणीसं वस्तीला आणलेलं. त्या हवेलीच्या भव्य दरवाजासमोर घनमिहं रात्र, धुकंही पसरलेलं. माझ्यासमोर घोडय़ावर एक आकृती. माझ्यापासून दूर दूर जात धुक्यात विलीन होऊ घातलेली. माझा अतहर. तो माझा आहे का पण..? फक्त काळी आकृती त्याची. दूर दूर निघून चाललेली. फहमीदाचं बिनअश्रूंचं कोरडं दु:ख क्षणात माझ्या गळ्यात दाटून आलं, पण तिथेच अडकलं. काही दु:खं रडून पटकन् मोकळी होणारी. पण फहमीदाच्या दु:खाला ही मुभा नाही. त्या दु:खाला बाहेर पडायची वाट सापडत नाही. असं अडकलेलं दु:ख बाहेर काढायला जवळ आपलं प्रेमाचं माणूस लागतं. फहमीदाच्या आयुष्यात ते नाही. तिचं दु:ख आतल्या आत रडणारं. ही मी नाही. मी रडून मोकळी होणारी आहे. ही फहमीदा. माझ्या बावीस वर्षांच्या शरीरात ही चाळीस वर्षांची फहमीदा. रडूच न येणारी. ते संगीत ऐकल्यापासून पुढची प्रत्येक तालीम आणि प्रत्येक प्रयोग फहमीदाचं मूक  दु:ख त्या प्रसंगात माझ्या छातीवर दडपणासारखं ओझं आणायचं. डोळे कोरडेठाक. पण आवाज वेगळाच दगडी होऊन जायचा. त्या काही क्षणांना मी तंतोतंत फहमीदा होऊन जायचे. माझा स्वत:चा मागमूस नसलेली. भवतालाचंही भान विसरलेली..
हे सगळं फार थरारक होतं. हे पुढेही अनेकदा घडत राहिलं. अनेक नाटकांमधल्या अनेक भुमिकांमध्ये. उत्तम संहिता, उत्तम दिग्दर्शक आणि उत्तम छायालेखक असलेल्या काही चित्रपटांमध्येही. पण दरवेळी घडतंच असंही नाही. काही वेळा नाहीच घडलं. ते जमून येणाऱ्या मैफिलीसारखं आहे. दरवेळी त्याच असोशीनं तानपुरे लावले तरी नादब्रह्माची रोज ब्रह्मानंदी टाळी लागेलच असं नाही. पण त्यातही मजा आहे. या ब्रह्मक्षणांनी असं बेसावध पकडण्यात. त्या क्षणांकडे जाण्याचा नक्की रस्ता कोणता? ते क्षण नक्की येतीलच अशी प्रक्रिया कोणती?  या प्रश्नाला उत्तर नाही किंवा अनेक उत्तरं आहेत. फहमीदा त्या सारंगीच्या रस्त्यानं आली.
एका चित्रपटात मी मुस्लीम होते. कुठल्यातरी प्रसंगाचं चित्रण चालू असताना अचानक दूर कुठेतरी खरीखुरी ‘अजान’ सुरू झाली आणि माझ्या पदरात काही दैवी क्षण टाकून गेली. हे सगळं फार सुंदर आहे. ‘याचसाठी केला होता अट्टहास’ असं म्हणायला लावणारे हे असे क्षण नशिबात लिहिणारी ती जी कोणी शक्ती असेल, त्या शक्तीला, त्या सटवाईला हात जोडून साकडं घालते. या ब्रह्मक्षणांचं हे दैवी धन असंच पदरात टाकत राहा. आरती प्रभूंचे शब्द आठवतात,
‘‘पाण्यात ओंजळीच्या यावा चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यात अर्थ जावा
तारांवरी पडावा केव्हा चुकून हात
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा’’
मला यातला ‘चुकून’ हा शब्द फार आवडतो. या चुका, हे सुंदर योगायोग पुन्हा पुन्हा माझ्या पदरात पडू देत. तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा..   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2014 1:01 am

Web Title: divine moment
टॅग : Chaturang,Drama
Next Stories
1 पुरस्कार
2 फणा
3 विमान
Just Now!
X