News Flash

गर्जा मराठीचा जयजयकार : इंग्रजी एक ‘अतिरिक्त’ भाषा

डॉ. संजय यांच्याशी मराठी भाषेतून शिक्षण घेण्याबाबत झालेल्या या मनमोकळ्या गप्पा.. 

डॉ. संजय मंगला गोपाळ

मुग्धा बखले-पेंडसे / शुभांगी जोशी-अणावकर – Jayjaykar20@gmail.com

‘‘मराठी शाळांमधून इंग्रजी ही दुसरी किंवा तिसरी भाषा- म्हणजेच दुय्यम प्राधान्याची भाषा असल्याप्रमाणे शिकवतात. त्यामुळे इंग्रजीचा अभ्यासक्रमही त्याच पातळीचा असतो. भाषांचं असं वर्गीकरण न करता मराठी माध्यमाच्या मुलांनाही इंग्रजी ही एक अतिरिक्त भाषा म्हणून शिकवली पाहिजे. तसं झालं, तर त्या भाषेची समज, तिचा वापर आणि तिच्यातून संकल्पना समजावून घेणं, हे सहज होईल आणि इंग्रजी ही अडचण राहाणार नाही,’’ सांगताहेत अभियांत्रिकीचे प्राध्यापक, मुंबईतील व्ही.जे.टी.आय. महाविद्यालयातील माजी सहयोगी अधिष्ठाता आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ.

डॉ. संजय मंगला गोपाळ यांचं कार्यक्षेत्र व्यापक आहे. मुंबईतील व्ही.जे.टी.आय. या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘मेकॅ निकल इंजिनीअरिंग’ विभागात विविध पदांवर सुमारे ३५ वर्षांंची यशस्वी कारकीर्द केल्यानंतर २०१८ मध्ये ते सहयोगी अधिष्ठाता या पदावरून निवृत्त झाले. ठाण्यामध्ये ‘समता विचार प्रसारक संस्थे’च्या माध्यमातून सुमारे ४० र्वष ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. ठाण्यातील ‘अक्षय ऊर्जा अभियाना’चे ते प्रवर्तक आहेत. अमेरिकेतील डेलावेअर विश्वविद्यालयाचे ‘प्रभावी नेतृत्व’ आणि ‘विशेष अध्ययन’ हे दोन पुरस्कार, मुंबईत निर्भय नागरिक, बहुजन मित्र हे पुरस्कार, ते शिकलेल्या मो. ह. विद्यालय- ठाणे शाळेचा ‘आदर्श माजी विद्यार्थी पुरस्कार’, सामाजिक, शैक्षणिक कार्याबद्दल मानपत्र असे विविध गौरव त्यांना प्राप्त झाले आहेत. शिक्षण आणि समाज हे एकमेकांशी निगडित असल्यानं या दोन्हीचा विस्तृत अनुभव असलेल्या डॉ. संजय यांच्याशी मराठी भाषेतून शिक्षण घेण्याबाबत झालेल्या या मनमोकळ्या गप्पा..

प्रश्न- आपण अनेक र्वष शिक्षण क्षेत्रात आहात. शिक्षणाचं माध्यम आणि आपल्या बहुभाषिकत्वाच्या क्षमतेबद्दल तुमचं मत काय?

डॉ. संजय: मी सुरुवातीपासून प्राध्यापक होतो आणि माझी पत्नी महापालिकेच्या शाळेत शिक्षिका होती. शिक्षणानं एक व्यक्ती म्हणून आपण किती आणि कसे समृद्ध होऊ, हे महत्त्वाचं आहे. आपला परिसर, कल आणि परिस्थिती याचा साकल्यानं विचार करूनच त्याबाबतचे निर्णय घेतले पाहिजेत, असं मला वाटतं. आमच्या मुलाला मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या बाबतीत आम्ही दोघंही आग्रही होतो. त्याला आम्ही घरापासून चालत जाण्याच्या अंतरावर असलेल्या शाळेत घातलं- सर्वोत्तम शाळा वगैरे न बघता. त्याच्या इतर भाषा समृद्ध व्हाव्यात आणि भारतात आणि जगात इंग्रजीचं महत्त्व असल्यानं इंग्रजीही समृद्ध व्हावी यासाठी आम्ही थोडे अधिक प्रयत्न करायला हवे होते, असं आता मागे वळून बघताना वाटतं. माझ्या आता हेही लक्षात आलं आहे, की लहान मुलांमध्ये उपजतच बहुभाषिकत्वाची क्षमता असते. जर त्यांच्या आजूबाजूची वेगवेगळी माणसं त्यांच्याशी वेगवेगळ्या भाषेत बोलत असतील, तर मुलं त्यांच्याशी त्या-त्या भाषेत बोलू शकतात. आई-वडिलांनी या गोष्टीचा फायदा करून घेऊन बालवयातच वेगवेगळ्या भाषा पाल्याच्या कानावर पडतील हे पाहिलं, तर मुलं सहज बहुभाषिक होतील.

प्रश्न- लहान असताना स्थानिक भाषा सहज कानावर पडू शकतात. पण इंग्रजी कानावर पडेल अशी व्यवस्था कशी करणार?

संजय: अलीकडे खासकरून मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागात तुम्ही जर मैदानावर गेलात किंवा कुठेही लहान मुलं खेळत असताना ऐकलंत, तर तुमच्या लक्षात येईल की त्यांचं संभाषण ‘इंग्रजी-हिंग्रजी-मिंग्रजी’त चालतं. तिथे राहणारे लोक वेगवेगळ्या राज्यांतून आलेले असतात. त्या मुलांच्या मातृभाषा वेगळ्या असतात. तिथली ९० टक्के  मुलं ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असल्यानं त्यांची परिसर भाषा आता इंग्रजी झाली आहे. पण अजूनही ग्रामीण भागातील, दुर्गम भागातील आणि शहरातील चाळीतून राहाणारी जी ७५ टक्के  जनता आहे, तिथे परिसर भाषा ही मातृभाषाच असल्यानं त्या मुलांसाठी मातृभाषेतून शिक्षण देणंच योग्य आहे. शहरात मात्र परिसर भाषा इंग्रजी झाली असल्यानं मराठी माध्यमाचं मूल तिथे खेळायला गेलं तर बुजतं. त्या मुलाला हिंदी, इंग्रजी भाषेचं ‘एक्सपोजर’ देणं हे पालकांना सहज शक्य आहे आणि त्यांनी ते द्यायला हवं.

प्रश्न- मराठी शाळांमधून हे करता येईल का?

संजय: नक्कीच. खरं तर आजच्या काळाची ती एक गरज झाली आहे. या बाबतीत आणखी एक मुद्दा विचार करण्याजोगा आहे. आपल्या मराठी शाळांतून इंग्रजी ही दुसरी किंवा तिसरी भाषा (निम्नस्तर) म्हणून शिकवतात. तिचा अभ्यासक्रमदेखील दुय्यम प्राधान्याच्या भाषेच्या दृष्टिकोनातून ठरवला आहे. त्याऐवजी इंग्रजी ही उच्च किंवा निम्नस्तरीय असं वर्गीकरण न करता एक ‘अतिरिक्त’ भाषा म्हणून शिकवली पाहिजे; तर त्या भाषेची समज, तिचा वापर, तिच्यातून कल्पना, संकल्पना समजावून घेणं, हे शक्य होईल.

प्रश्न- एकीकडे शिक्षणतज्ज्ञ सांगतात की मातृभाषेतून शिक्षण देणं आवश्यक आहे, कारण ती भाषा मुलांच्या सतत कानावर पडलेली असते, त्यातून ती बोलत असतात. शिवाय मातृभाषा नीट समजली असेल, तर इतर भाषा आत्मसात करायला सोपं जातं. मग याचा आपण या लहानपणापासून बहुभाषिकत्वाला उत्तेजन देण्याच्या विचाराशी मेळ कसा घालायचा?

संजय: जी भाषा मुलांच्या सतत कानावर पडत असते, ज्यातून ती बोलत असतात, त्या भाषेतून ज्ञानसंवर्धन करणं मुलांना स्वाभाविकपणे सोपं जातं. मुद्दा असा आहे, की बालवयात मुलांच्या कानावर एकाहून अधिक भाषा पडत असतील तर त्याही चटकन आत्मसात करण्याची क्षमता, लहान वयात अधिक असते. त्यामुळे परिसर भाषेतून शिक्षण आणि शक्य असल्यास बालवयात अनेक भाषांना सामोरं जाणं, यात मला कोणताही विरोधाभास दिसत नाही.

प्रश्न- महाविद्यालयात जेव्हा मराठी आणि इंग्रजी माध्यमातील मुलं तुमच्या वर्गात येतात, तेव्हा तुम्हाला त्यांच्यात फरक जाणवतो का?

संजय: मी ३०-३५ र्वष अभियांत्रिकीच्या पदविका आणि पदवी अशा दोन्ही शाखांमध्ये शिकवलं आहे. पदविका अभ्यासक्रमाची मुलं ही बव्हंशी मराठी माध्यमाची असत आणि पदवी अभ्यासक्रमाची मुलं निम्मी मराठी आणि निम्मी इंग्रजी माध्यमाची असत. वेगळा, सामान्य विचारधारेच्या बाहेर जाऊन विचार करायची क्षमता दोघांकडेही असते. सगळं वातावरण इंग्रजाळलेलं असल्यानं स्थानिक भाषांतून शिकलेली मुलं सुरुवातीला थोडी बुजतात. स्थानिक भाषांमधून होणाऱ्या अभ्यासक्रमेतर कार्यक्रमात ती अधिक सहजपणे सहभागी होतात. तर इंग्रजी माध्यमातून शिकलेली मुलं ही वेगळ्या उपक्रमांत भाग घेतात, कारण ती इंग्रजीतून अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होतात. पण मातृभाषेतून शिकून आलेल्या विद्यार्थ्यांंच्या क्षमतेबद्दल बोलायचं, तर ती कुठेही कमी पडत नाहीत.

प्रश्न- मातृभाषेतून शिकलेली मुलं अध्ययन क्षमतेत मागे पडत नाहीत, पण या व्यक्त करण्याच्या क्षमतेबद्दल मराठी माध्यमाच्या मुलांमध्ये काही न्यूनगंड होता असं वाटलं का?

संजय: ते व्यक्तीवर अवलंबून असतं. काही मुलं हे समजून घेऊन आपली बाजू मजबूत कशी करायची- मग त्यात इंग्रजी कसं सुधारायचं किंवा ते नीटसं येत नसलं तरी आपल्या क्षमतेचा या परिस्थितीत कसा वापर करायचा हे बरोबर शिकतात. पण काही मुलं लाजरी, मुखदुर्बळ असतात. त्यांना विषय येत नसतो असं नाही आणि मराठीत त्यांना उत्तम व्यक्त होता येतं. मग त्यांना हा बदल सुकर व्हावा, त्यांच्या आत्मविश्वासाला बाधा येऊ नये, यासाठी सुरुवातीला काही वेळा त्यांना मराठीतून बोलू देण्यात काही गैर नाही. त्याच वेळी ‘क्लासवर्क’ वगैरे सर्व इंग्रजीतूनच करायचं असतं. त्यामुळे मुलं हळूहळू रु ळतात. ग्रामीण भागातून आलेल्या किंवा लाजऱ्याबुजऱ्या मुलांचं नुकसान होऊ नये, याकरता आता ‘व्ही.जे.टी.आय.’सारख्या स्वायत्त  महाविद्यालयातून इंग्रजी भाषेतून संभाषण आणि लेखनकला विकसित करण्यासाठीचे विशेष विषय हे शिक्षणक्रमाचा भाग बनवण्यात आले आहेत. इंग्रजी भाषेच्या विशेष कार्यशाळा चालवल्या जात आहेत. मी जेव्हा अमेरिकेला पीएच.डी. करायला गेलो, तेव्हा मी एक बघितलं, की जगाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येत आणि त्यातल्या बऱ्याच जणांना इंग्रजी नीट बोलता येत नसे. पण प्राध्यापक ते गृहीत धरत. आणि त्यांना मदत करत. आपणही तसंच केलं पाहिजे.

प्रश्न- मराठी शाळांनी संभाषणात्मक इंग्रजी हा त्यांच्या नेहमीच्या अभ्यासक्रमाचा भाग केला, तर हा बदल मुलांसाठी सोपा जाईल का?

संजय: नक्कीच. मी आधी म्हटलं तसं- इंग्रजी ‘अतिरिक्त भाषा’ म्हणून शिकवायला पाहिजे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पालकांनाही ती शिकवली तर मुलांचं इंग्रजी सुधारणं सहज शक्य आहे. त्यायोगे मुलं इंग्रजी बोलण्यातही मागे पडणार नाहीत. आता ‘करोना’नंतर जागतिकीकरणाचे वारे पुन्हा कोणत्या दिशेनं वाहणार आहेत, का स्थानिकीकरणाला महत्त्व येतं आहे, हे सगळं बघायला लागेल.

प्रश्न- मग पालकांनी मुलांच्या शिक्षणाचं माध्यम कोणतं निवडावं?

संजय: शहरी पालकांनी आजूबाजूचे लोक, मित्र, नातेवाईक आपल्या मुलांना कुठल्या शाळेत घालत आहेत याचा विचार न करता मुलांसाठी काय योग्य आहे ते बघावं. ग्रामीण भागातील पालकांनी तर मातृभाषेतूनच मुलांना शिकवावं.  शाळा अधिक परिणामकारक होण्यासाठी त्यांच्या व्यवस्थापनात पालकांनीही सहभागी व्हावं. सर्व गोष्टी शाळेवर न सोडता, आपण पुढाकार घेऊन नवीन, मुलांच्या विकासाला पूरक असे उपक्रम राबवावेत. शहरी पालकांनी आपण ज्या परिसरात राहातो तेथील व्यवहार भाषा कोणत्या आहेत याचं भान ठेवून शक्यतो मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा निवडाव्या आणि इंग्रजी माध्यमातील शाळा निवडल्याच, तर आपल्या पाल्याची मातृभाषेची समज दुर्बळ राहाणार नाही याची खबरदारी घ्यावी.

शेवटी भाषा हे केवळ शिक्षणाचं माध्यम इतकंच मर्यादित नसून, आपली विचार करण्याची क्षमता, शैली आणि दिशा, आपली संस्कृती, आवडीनिवडी आदी जीवनव्यवहारांवर खोल परिणाम करणारी आणि त्यांच्याशी सतत आदानप्रदान करणारी बाब आहे, याचं भान असणं आवश्यक आहे. आपल्या म्हणी, रामायण, महाभारत, पंचतंत्र आदी आपल्या परिसरातील आणि संस्कृतीत निर्माण झालेलं साहित्य, आपण आपल्या भाषेत शिकणार की दुसऱ्या भाषेत अनुवादित केलेलं शिकणार, याची ही निवड आहे, असं मला वाटतं. दुर्दैवानं असा र्सवकष विचार करत न बसता पालक व्यवहाराचा विचार करण्याचा दावा करतात आणि अत्यंत अव्यवहार्य पर्याय निवडतात.

प्रश्न- ‘सेमी-इंग्रजी’ माध्यम हा पर्याय तुम्हाला कसा वाटतो?

संजय: विज्ञान आणि गणित इंग्रजीतून शिकणं असा या ‘सेमी इंग्लिश’चा खाक्या आहे. म्हणजे शाळेनंतर विज्ञान शाखेत जाऊ पाहाणाऱ्या विद्यार्थ्यांंना धीर देण्याचा हा प्रकार आहे, असं मला वाटतं. मराठी माध्यमातील शिक्षकच हे विषय मुलांना शाळेत शिकवतात. भाषा इंग्रजी, पण शिकवणं मातृभाषेतच असाच प्रकार इथे असतो.

मी आधी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीपासूनच जर इंग्रजी भाषा अधिक नीट समजावणं, शिकवणं, हा प्रयत्न मातृभाषेतील शाळांनी व्यवस्थित केला, तर वरच्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांच्या गळ्यात हे निर्थक ‘सेमी’ लोढणं अडकवावंच लागणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 5:01 am

Web Title: doctor sanjay mangala gopal english another language garja marahicha jayjaykar dd70
Next Stories
1 हेल्पलाइनच्या अंतरंगात : आपदा सेवा सदैव!
2 चित्रकर्ती : ‘पोटोचित्रां’चा ‘माया उत्सव’
3 महामोहजाल : धोकादायक ‘लिंक्स’
Just Now!
X