‘डॉक्टरांच्या जगात’साठी लिहिताना समाजातील स्त्रीविषयक दुय्यम दृष्टिकोनाच्या व कुप्रवत्तींच्या व्यथा आणि कथा मांडताना; ज्या सद्प्रवृत्ती माझ्यापर्यंत पोहोचल्या त्यांची दखल घेण्याची, त्यांचं स्वागत करण्याची माझी जाणीव बोथट तर नाही ना झाली? तर चांगुलपणाचे असे काही अविस्मरणीय अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी या लेखाचा प्रपंच!
आ म्हा ‘डॉक्टरांच्या जगात’ वावरताना विविध स्तरांतील माणसांचे मनुष्यस्वभाव, भावभावनांचे आविष्कार नेहमी पाहायला मिळतात. त्यातल्या मनाला व्यथित करणाऱ्या अनुभवांच्या जशा कथा होतात; तसेच काही चांगुलपणाचे अनुभवदेखील हृदयावर कायमचे कोरले जातात. आजपर्यंत समाजातील स्त्री-पुरुष विषमतेवर आधारित मला आलेले काही अनुभव तुमच्यासमोर मांडले. पण २२ वर्षांच्या मेडिकल प्रॅक्टिसचे सिंहावलोकन करताना काही छान सद्प्रवृत्तींचे अनुभवही माझ्याकडे अपेक्षेने पाहात असल्याचे जाणवले. त्यामुळे आज मी ठरवलंय, त्यांना न्याय द्यायचा व तुमच्यापर्यंत पोहोचवायचं.
एकदा एक केरळी ख्रिश्चन गृहस्थ त्याच्या बायकोला दाखवण्यासाठी माझ्याकडे आला. ती होती शाळेत शिक्षिका व तो होता एका फर्ममध्ये ऑफिसर. तो अतिशय विद्वान, चिकित्सक, बुद्धिवादी, चौकस होता. तिला दोन महिन्यांचं बाळ होतं व ती बाळाला स्तनपान करत होती. एका दिवशी तिला एका बाजूच्या स्तनात एक गाठ जाणवली. गाठ दुखत नव्हती, दूधही अडकलेले नव्हते. दोघांनी याविषयीची बरीच माहिती इंटरनेटवर वाचली व दुसऱ्या दिवशी तो तिला दाखवायला घेऊन आला. मी तिला तपासून ती गाठ कॅन्सरची असावी असे निदान केले व त्यानुसार काही तपासण्या सांगितल्या. ‘मुळात स्तनपान करणे हा स्तनांच्या कर्करोगाचा प्रतिबंधात्मक उपाय असताना माझ्या पत्नीला तुम्ही या अवस्थेत कर्करोगाचे निदान करूच कसे शकता?’ या मुद्दय़ावर त्याने माझ्याशी भरपूर वाद घातला. स्तनातील न दुखणारी कडक गाठ असल्यामुळे मी माझ्या वर्तवलेल्या शक्यतेवर ठाम राहिले व पुढील तपासण्यांचा आग्रह धरला. त्याने इंटरनेटवरून काही संदर्भ िपट्र करून मला आणून दिले व तो कर्करोग कसा नाही याचे मतप्रदर्शन केले. पण आश्चर्य म्हणजे एका बाजूला माझा सल्ला न डावलता त्याने तिच्या तपासण्या चालू केल्या. सुईने केलेल्या पॅथॉलॉजीच्या तपासणीत ती गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाले. दोन महिन्यांच्या बाळाच्या आईला, वयाच्या ३२व्या वर्षी स्वत:ला झालेल्या कर्करोगाचे निदान पचवणे सोपे नव्हते. पण त्यावेळेस बुद्धीवर भावनेने मात करू न देता दोघांनीही अतिशय समजुतीने व त्वरित निर्णय घेतले. स्तनपान करीत असताना होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण अत्यल्प असले तरी तो एक स्वतंत्र प्रकारचा कर्करोग – mastitis carcinomatosa आहे ही गोष्ट मी त्याला इंटरनेटवर वाचायला सांगितली. त्यानेही ती माहिती वाचली, इतकेच नाही तर दुसऱ्या दिवशी तो तिचे स्तन काढून टाकण्याचे ऑपरेशन ठरवायला आला. त्याच आठवडय़ात आमच्या कर्करोगतज्ज्ञ मित्राने तिचे ऑपरेशन आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन केले व त्या बाजूला कृत्रिम स्तन बसवण्याची प्लॅस्टिक सर्जरीदेखील केली. नंतर किमोथेरपी पूर्ण झाल्यावर ती बरी होऊन कामावर जायला लागली. आज या घटनेला ७ वष्रे होऊन गेली आहेत तरी दोघेजण ऑपरेशनच्या तारखेला दरवर्षी नित्यनेमाने येऊन भेटतात व मला त्यांच्या मुलाच्या हस्ते चॉकलेट देऊन जातात. त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धतसुद्धा इतकी बोलकी आहे की, माझ्या मनात विचार येतो, ‘या माणसाने त्या दिवशी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून भराभर कृती केली नसती, तर कदाचित या मुलाला फार पूर्वीच मातेचं छत्र गमवावं लागलं असतं. या कल्पनेने मन हादरतं.’
कर्करोगाचे निदान होण्यापूर्वीची त्याची चिकित्सक वृत्ती, नंतर दाखवलेले धर्य, स्वीकृती; कृतीची तत्परता हे सारंच अविस्मरणीय होतं. अलीकडे इंटरनेटमुळे मिळणाऱ्या अफाट माहितीच्या उपलब्धतेने काही गोष्टी संगणकसाक्षर रुग्णांना पटवून सांगणे आम्हाला पण सोपे झाले आहे. प्रश्न असतो तो फक्त समोरच्या व्यक्तीच्या विश्वासाचा व स्वीकृतीचा!
अजून एक चटका लावून गेलेली अशीच एक घटना! माझ्यावर व माझ्या नवऱ्यावर कमालीचा विश्वास ठेवणारी केतकी जेव्हा तिची गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया तुमच्याच हॉस्पिटलला करायची असे ठरवून सोलापूरहून इथे आली तो प्रसंग. मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉइडचा त्रास व अतिवजन हे सगळे धोके तिच्यात होते. त्यावेळी तरी सर्व आजार बरेच नियंत्रणात होते. रक्ताच्या सर्व तपासण्या, हृदयाच्या तपासण्या, फिजिशियनकडून तिच्या फिटनेसची खातरजमा या सर्व खबरदारी घेऊन आमच्या स्त्रीरोगतज्ज्ञ मित्राबरोबर आम्ही दुर्बणिीने ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. पण ऑपरेशन टेबलवर शरीराची पोझिशन बदलून बेहोषीतून बाहेर काढताना तिचे हृदय बंद पडले. त्यातून तिला वाचवण्याची आम्ही व आमच्या भूलतज्ज्ञांनी शिकस्त केली. हृदयक्रिया सुरू झाली ती काही मिनिटांत पुन्हा बंद झाली. त्यातूनही तत्काळ उपाय केले व तिला कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या यंत्रावर काही दिवस ठेवले. पण यात तिच्या मेंदूवर कायमचा विपरीत परिणाम झाला. शाळकरी वयापासून जिला हसतीखेळती बघत होतो, अशा केतकीला आता ५ वर्षांच्या मुलाची आई असताना असं निश्चेतन अवस्थेत बघणं आम्हालाही तितकंच क्लेशदायी होतं. शस्त्रक्रिया चांगली होऊनपण बेहोषीतून बाहेर येताना अशा गुंतागुंतींमुळे ही वेळ आली. त्यानंतर काही दिवस झोप विसरून गेलो होतो आम्ही! रोजचं काम संपल्यासंपल्या तिच्याकडे आय.सी.यू.मध्ये जाऊन बसायचो, किरणशी चर्चा करायचो. पण तिच्याशी प्रेमविवाह केलेल्या किरणने प्रत्यक्ष परिस्थिती, डॉक्टरांचे अथक प्रयत्न समजावून घेऊन आपल्या अंथरुणाला खिळलेल्या पत्नीची सेवा करण्याची पूर्ण सिद्धता केली- तीदेखील कोणालाही दोष न देता. तिच्या शस्त्रक्रियेत इतर आजारांमुळे धोका अधिक असल्याचे सोलापूरच्या डॉक्टरांनी त्याला सांगितले होते. पण अशा प्रसंगातून जात असताना देखील -डॉक्टरांच्या प्रयत्नाच्या पराकाष्ठेलासुद्धा कधीकधी अपयश येऊ शकतं; त्यात त्यांचा दोष नसून मूळ आजारच तितका गंभीर असतो- ही सदसद्विवेकबुद्धी त्याने शाबूत ठेवली; याचं कौतुक वाटतं. सोलापूरला घेऊन गेल्यावर तिचं स्पंजिंग, वेणी घालणं, डायपर्स बदलणं, तिला खायला भरवणं, तिची पोझिशन सारखी बदलणं हे तो मनापासून करतो. मधून काही शंका आल्यास आम्हाला फोन करतो. हे असं किती दिवस चालणार हे माहीत नसताना, आपल्या लहान मुलाला बरोबर घेऊन, कामावर जाण्यापूर्वी व आल्यानंतर तिच्या सेवेला स्वत:ला वाहून घेणं हे किती कठीण आहे! आज दैनंदिन जीवनात वावरताना दिसणाऱ्या उतावीळ व प्रक्षोभक मानसिकतेपुढे हे उदाहरण फार दुर्मीळ आहे. नियतीच्या अनपेक्षित व अनिष्ट दानाचा स्वीकार करण्याचा त्याचा समजूतदारपणा व आपल्या आप्तांविषयीच्या प्रेमातून अंगीकारलेली सेवावृत्ती मला आयुष्यभर लक्षात राहील.
‘डॉक्टरांच्या जगात’साठी लिहिताना एका वळणावर थोडे विसावून मी माझ्याच मनाचा अंदाज घेतला. समाजातील स्त्रीविषयक दुय्यम दृष्टिकोनाच्या व कुप्रवृत्तींच्या व्यथा आणि कथा मांडताना; ज्या सद्प्रवृत्ती माझ्यापर्यंत पोहोचल्या त्यांची दखल घेण्याची, त्यांचं स्वागत करण्याची माझी जाणीव बोथट तर नाही ना झाली? तर चांगुलपणाचे असे काही अविस्मरणीय अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेखनप्रपंच! एरवी आपण म्हणतो ना, की मूठभर चांगल्या माणसांमुळेच समाज टिकून राहत असतो; ते अगदी खरं आहे.
५१िंल्लिं६ं३ी@ॠें्र’.ूे

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…