लोकान्ला आजकाल खेळ बघाया बी येळ न्हाय. आमी खावं काय? शिक्शान नाय तर कुठं नोकरी मिळणार? घरकामालाबी साक्षीपुरावे लागतात. आताशा काम बी झेपत न्हाय. जवानीत कसरत केलीया. आता हातपाय लय दुखत्यात! त्या डोंबाऱ्याच्या खेळानं आमचा बुढापा बरबाद केलाया. आन् पोरांच्या जवानीचा इस्कोट केलाय!
सांगताहेत, डोंबारी कमलाबाई जाधव.
दिस डोईवर आला तरी मालक दारू ढोसून झोपलेला व्हता. त्याच्यासाठी भाकर करून ठिवली आन पोरान्ला घिऊन झोपडीभाएर पडली. पुन्याच्या म्युनशिपालटीच्या फुटपाथवर सामान लावलं. पयले गज ठोकले. मंग त्याला चार बाजूला लाकूड लावलं. ते नीट हलवून बगितलं. लाकूड हाललं आन गज उडालं तर डोक्यात बसतं. ल्हानी भईन आशीच दोरीवरून चालत व्हती तर गज उडालं आन् ती लांब जाऊन डोस्क्यावर पडली. आजून डोकं दुकतं तिचं! तवाधरनं मी लय काळजी घेती. गजावर लोखंडी तार बशिवली, काठी फिरवायला घेतली. हिलाल म्हंजी आगीच्या गोळ्याची रिंग घेतली आन् आवाज करत खेळ सुरू केला.
पोरगा ढोल गळ्यात घिऊन वाजवाया लागला. मानसं जमा झाली तशी बारक्याची भईन काजल सरासरा खांबावर चढली आन् काठी तोलत दोरीवरून चालाया लागली. बारक्या जोरांत ढोल बडवाया लागला अन् मी हाळी घालाया लागली. ती खाली उतरत न्हाय तवर दुसरं लेकरू फटाफट कोलांटय़ा उडय़ा घालाया लागलं. त्यानं दंड ठोकलं तसं सगळ्यात ल्हान्या लेकराला मी मुडापलं. पार उलटंपालटं क्येलं. मंग त्याच्यावर रिंग टाकली त्यानं ती डोक्यातनं काढली. तवर बारक्यानं पान्यानं भरलेला गिलास आनला. पायाचं आंगठे धरून डोक्यावरून आळी काढली आन त्वांड वर घिऊनशान कपाळावर पानी भरून गिलास ठेवला. मंग झोक आवरत हातावर ओणवं चालत एक राऊंड मारली. तवा समद्या बगणाऱ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. त्यो दम खाईस्तवर धाकलं पोरगं हाताहातावर उडय़ा मारत गोल फिरून आलं. आता काजलनं घासलेटचा डिब्बा घेतला आन् गोल रिंगला चिंध्याचे बोळे बांधले व्हते त्यावर घासलेट वतलं. पेटवलं. बारक्यानं लांब जाऊन धावत यिऊन त्या पेटलेल्या बोळ्याच्या आगीतून पल्याड उडी घेतली तवा बगनाऱ्या बाया किंचाळल्या. त्यांनी डोळे बंद क्येले. पोरं आन् बाप्ये टाळ्या वाजवाया लागले. मी येक मोठ्ठा दगूड घेतला. दगडाला दोरी बांधली. केस दोन बाजूला क्येले. दगडाला बांधलेली दोरी माज्या केसांना बांदली आन् गुडघ्याला हात लावून तो जडशीळ दगूड उचालला. बारक्या ढोल बडवत हुता. काजलनं एक फडका फुटपाथवर घातला. मी त्यावर झोपली. तिनं माज्या तोंडावर फडकं टाकलं आन् पोटावर त्यो मोठ्ठा दगूड ठिवला. बारक्यानं मला हुशार केलं. तसा मी दम कोंडला. पोट कडक केलं आन् बारक्यानं हत्यारानं घाव घालून दगूड फोडला. आज मालक सोबत न्हाय! नाय तर मी गजाचा खेळ बी क्येला असता. गजाला आकडा अडकावला का तो माज्या मानेवर ठिवतात. मंग मी मान खाली वाकवली का गजाच्या येका कोपऱ्याला मालक जोरात पाय दाबतो आन् मंग माज्या मानेवरचा गज वाकतो.
तासभर आसं खेळ क्येलं आन् मंग थाळी हातात धरून पैका मागायला बारक्या लोका म्होरं फिराया लागला. थोडय़ा लोकांनी पाच-धा रुपयं टाकलं. बाकीचं निस्त खेळ बघूनशान निघून गेलं. येक बाई भाजी-भाकरी घिऊन आली. ती कटोऱ्यांत भरली आन् पोरांना घिऊनशान आडोशाला खायला बसली. पोरं भुकेली व्हती. ती त्या भाजी-भाकरीवर तुटून पडली. थोडंसं जेवन उरलं तेवढच मी पोटात घातलं. तेवढय़ात काका (गिरीश प्रभुणे) मजजवळ आले. म्हनले, दोनदा सांगितलं तुला. मी काजलला शिकायला गुरुकुलमधे घेऊन जातो! ती हुशार आहे. शिकू दे तिला! शेवटाला मी हो म्हनलं. पण मला तिला सोडवना झालंय.
लांडेवाडीची एक बाय धा वर्सामागं एका लेकराला पुलावरनं खाली फेकत व्हती. मी तिला धरलं, लेकरू हातातनं घेतलं. अशी काटकुळी पोर व्हती. माकडासारकं डोकं! इस रुपयांचं दूध घेतलं. तिला पाजलं. तर घटाघटा प्याली. दुसऱ्या दिवशी ती बाय माज्या घरातल्या पटकुरावर हे लेकरू आन् सहा केळी सोडून निघून गेली. पोर मराया टेकली हुती. मी तिला दवाखान्यात ठिवली. दोन दिसांत पाच हजार खर्च केला तो मी अजून फेडतेय. पन माज्या सहा लेकरांत मी तिलाबी वाडवली. आता तिला मी काकाच्या साळत धाडीन. ती शिकली न्हाय तर माज्यावाणी, माज्या पोरांवाणी भिकारी बनल. नगं ते! पोर हुशार हाय! शिकली पायजे. माज्या पोरान्ला मी साळत न्हाय घातलं. त्येन्ला साळत घातलं तर माज्यासंग खेळ कोण करंल? पोट भराया पैसा नगं? आमच्यामधी पाच पट्टय़ा असत्यात. पाच भावांचे पाच हिस्से! माज्या नवऱ्याचा वाटा मी भरती. त्यातून देवाचा गोंधळ घालतो. सासू-सासरा आजारी पडला का त्यांना पैसं त्या हिश्शातून द्याया लागतात. हिश्शाचं चाळीस हजार कर्ज हाय माज्या डोस्क्यावर. काका लय मदत करतो. दाटतो पन पैका देतो बी. तरी कर्ज फिटत नाय. चा-पानी नाय करायचं आन् कर्ज फेडायचं. पोर रडत आलं की बी त्याला उपाशी ठिवायचं. का? तर कर्ज फेडायचंय!
पोराला पैका न्हाय म्हून उपाशी ठिवायचं आन् पैका कमवायला जनमल्यापासून त्याच्याकडनं खेळ मात्तुर करून घ्यायाचं! तवाधरनंच त्यांन्ला शिकवलं जातं. एक दिवसाच्या लेकराला आंघूळ घातली का वर फेकायचं आन् हातांत झेलायचं. जरा मान रापली का हातावर तोलून एकदम त्याला उंच धरायचं म्हंजी त्याची भीती मरते. येकदा लेकरू उबं ऱ्हायला शिकलं का तळहातावर उंच खुलं ठिवायचं. खाली पडलं तर पानी नाय मागायचं ही माझ्या मनांतली भीती! आमच्या गोपाळ समाजातल्या समद्या लेकरांची हीच गत! सहा लेकरं झाली पन कधी गलती नाय झाली अजून! येक दिवसाच्या लेकराला काय नाय कळत. तीन म्हयन्यानं शिकाया लागलं का भीतं ते! म्हनून जलमल्यापासून शिकावलं का ते घाबरत न्हाय. जसं ते खेळ करत जातं तसं त्याचं हाडुक ढिलं पडतया.
लेकरू वर्साचं झालं का त्याची मान उलटी करूनशान त्याच्या पायाला लावायची. डोस्क येकदा मागं घ्यायचं, परत उलटं घ्यायचं! ते झालं का पोराला हातावर उलट गरागरा फिरवत ऱ्हायचं, का ते हुबं ऱ्हातं. तवर ते दीड-दोन वर्साचं होतं. मंग त्याला फडक्यावर टाकूनशान टांग धरून गनागना फिरवलं का त्याला चक्कर नाय येत कदी! आसं तान्ह्य़ा लेकरान्ला लय शिकवावं लागतं.
लेकरू हिंडतंफिरतं झालं का येक गोल रिंग घ्यायची. आन् पोट येकदम आत घेतलं का आंग त्या छोटय़ा रिंगमधून बराबर कसं भाएर पडतं ते त्याला शिकवायचं. मी सोता त्याला तसं करून दाखवायची. माज्या सहा पोरान्ला मी आन् मालकानं आसंच खेळ शिकवलेत. हळूहळू त्या लेकराला जंप मारायला शिकवायचं. त्याची हड्डी, कमरंचा काटा ढिला झाला आन् त्याची भीती ग्येली का त्याला आगीचा खेळ शिकवायचा. पयले बिगर आगीचं, डोळे बांदून रिंगमधून उडी मारायला शिकवायचं. ते जमलं का चिंध्या घासलेटमंदी बुडवून ते गोळे रिंगभोवती लावायचे आन् पेटवून द्यायचे. आपण जवळ हुबं ऱ्हायचं. पोराची मांडी, हातपाय, पाठ भाजती पण हळूहळू शिकतं ते! माजा बारक्या आगीला घाबरायचा. येकदा थरथरत उडी मारली आणि पेटला तो! तर फडका टाकूनशान आग विझवली. लय भाजला व्हता.
येका खेळात चाकू मध्येमध्ये गोळ्यांत अडकवला व्हता आन् त्या गोळ्यातून उडी मारायला धाकल्याला शिकवत व्हते तर त्याची उडी चुकली आन पोट, पाठ पार फाटून ग्येली. चार दिवस दवाखान्यात ठिवावं लागलं, पन शिकलं पोरगं! आमी बी असंच शिकलो. माजे आईबाप खेडय़ात ऱ्हायचे. आमाला खेळ शिकवून गावोगाव फिरायचे. दिल्ली, अहमदाबाद, मुंबई फिरलेय मी! शिकशान नाय काय नाय! खेळ करून आम्हाला जेवण, कपडालत्ता मिळतो. थाळीभर चिल्लर घावते. मंग वावरात काम करायला कशापायी जायचं? दुसऱ्याच्या दारांत कशापायी पडायचं? अख्खा गोपाळ समाज तेच काम करतो. डोंबाऱ्याचं! कोनाला वावरात जायला नगं. पान्यापावसात, उन्हात कष्टाचं काम कराया नगं.
आता कसरत करनारे हात बी तुटल्यागत झालेत. कोनी कंपनीत कामाला जातं. गावात खुली जागा नाय तर खेळ कुठं करनार? लोकान्ला आजकाल खेळ बघाया बी येळ न्हाय. खेळ करून बी आमची थाळी रिकामीच ऱ्हाती. आमी खावं काय? करावं काय? शिक्शान नाय तर कुठं नोकरी मिळणार? घरकामालाबी साक्षीपुरावे लागतात. मंग सकाळी भीक मागाया जायचं ते रातच्याला घरी यायचं असं करावं का आम्ही? आताशा काम बी झेपत न्हाय. जवानीत कसरत केलीया. आता हातपाय लय दुखत्यात! पाठ पार मोडून गेलीया!
त्या डोंबाऱ्याच्या खेळानं आमचा बुढापा बरबाद केलाया. आन् पोरांच्या जवानीचा इस्कोट केलाय!

parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’