News Flash

जीवनदायी पान्हा!

स्तन्यदा मातांनी आपल्या बाळाची दुधाची गरज भागल्यावर अधिकचे दूध इतर गरजू बाळांसाठी दान करण्याची संकल्पना नवी नाही.

शहरांमधील मोठय़ा रुग्णालयांमध्ये अशा ‘ह्य़ूमन मिल्क बँका’ कार्यरत असतातच, मात्र ज्या नवजात बाळांना आईचे दूध मिळू शकत नाही त्यांचा जीव वाचविण्यासाठी या दूध बँका किती महत्त्वाच्या आहेत, याची खरी जाणीव आताच्या टाळेबंदीच्या काळात झाली.

अपर्णा देशपांडे – adaparnadeshpande@gmail.com

स्तन्यदा मातांनी आपल्या बाळाची दुधाची गरज भागल्यावर अधिकचे दूध इतर गरजू बाळांसाठी दान करण्याची संकल्पना नवी नाही. शहरांमधील मोठय़ा रुग्णालयांमध्ये अशा ‘ह्य़ूमन मिल्क बँका’ कार्यरत असतातच, मात्र ज्या नवजात बाळांना आईचे दूध मिळू शकत नाही त्यांचा जीव वाचविण्यासाठी या दूध बँका किती महत्त्वाच्या आहेत, याची खरी जाणीव आताच्या टाळेबंदीच्या काळात झाली. अनेक नवमातांनी पुढे येऊन दुग्धदान केलेच, पण अनेक स्वयंसेवकांनीही पुढे येऊन हे दूध जमा केले आणि अर्भकांपर्यंत पोहोचवले. म्हणूनच अशा दुग्ध बँकांचे महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक जनजागृती होणे आवश्यक आहे.

‘कोविड-१९’ या विषाणूमुळे सारे जग त्रस्त असताना सगळ्या अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे ‘कोविड योद्धे’ सरळ सरळ त्या महामारीशी जाऊन भिडले. वैद्यकीय सेवा त्याच्या चरम सीमेवर होती. अशा परिस्थितीत नव्याने जन्माला येणाऱ्या जीवांची आणि नवमातांची काळजी घेण्यास कंबर कसून तयार असलेले डॉक्टर, परिचारिका आणि सगळा सेवावृंद यांनी अतिशय समर्पित भावनेने काम केले आणि आजही करत आहेत. अशाच काळात एप्रिल २०२० मध्ये मुंबईत एक स्त्री प्रसूत झाली. सर्वत्र अतिशय भीतीचे वातावरण, टाळेबंदी, वैद्यकीय सेवेवर आलेला प्रचंड ताण आणि त्यात त्या स्त्रीच्या प्रसूतीनंतर झालेली गुंतागुंत, यामुळे तिला त्वरित अतिसुरक्षा विभागात हलविण्यात आले. त्यातच ते मूल जन्मत:च खूप अशक्त होते. ती माता या अर्भकास स्वत:चे दूध देण्यास असमर्थ होती. त्या चिमुकल्या जीवास वाचवायचे तर आईचेच दूध द्यावे, बाहेरून इतर ‘सप्लिमेंट्स’ नको, असे डॉक्टरांचे मत होते. अशा वेळेला मदतीला धावून आली ‘ह्य़ूमन मिल्क बँक!

तेथील डॉक्टरांनी ‘दूध बँके’शी संपर्क केला आणि बंद डब्यातील पावडर दुधाच्या पर्यायाऐवजी त्या बाळाला दूध बँकेत राखून ठेवलेले, दुसऱ्या मातेने दान केलेले ‘मातेचे दूध’ मिळाले. तीन-चार दिवस त्या बाळाचे पोषण दूध बँकेत विशिष्ट तापमानात टिकवून ठेवलेल्या दुधावर झाले.

जुलै महिन्यात एका तीस वर्षीय स्त्रीने सांताक्रू झ येथील एका रुग्णालयामध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. मुदतपूर्व जन्मामुळे प्रत्येकी फक्त ६५० ग्रॅम वजनाच्या या बाळांना त्वरित अर्भकांसाठीच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. त्यांना दर तासाला फक्त ८ मिलिलिटर दुधाची गरज होती. पण त्यासाठीसुद्धा ती आई असमर्थ होती. तेव्हा रुग्णालयाच्या सुसज्ज मातृदुग्ध बँकेतून त्या बाळांच्या दुधाची गरज भागवण्यात आली. खूप लवकर त्यांनी बाळसे धरले आणि त्यांच्यात उत्तम रोगप्रतिकारक क्षमताही आली. ही कमाल निसर्गनिर्मित आईच्या दुधातच आहे हे निर्विवाद.

मोठय़ा शहरांमध्ये काही रुग्णालयांमध्ये जिथे प्रसूती आणि बालरुग्ण विभाग आहे, तिथे अशा प्रकारच्या दूध बँका आहेत. परंतु दररोज मोठय़ा संख्येने होणाऱ्या प्रसूती, तेथील बाळांची संख्या आणि बाहेरून द्याव्या लागणाऱ्या दुधाची गरज यांची सांगड घालणे एक महाअवघड कार्य आहे. रुग्णालयात प्रसूत झालेल्या किंवा समाजातील इतर स्तन्यदा मातांना दूध दान करण्याचे आवाहन केले जाते. आपल्या बाळाची पोषणाची गरज भागवून अधिकच्या दुधामुळे किती तरी अर्भकांचे जीव वाचवता येतात. मुंबई आणि पुण्यासारख्या मोठय़ा शहरांत अनेक रुग्णालये दूध बँकेची सेवा नि:शुल्क पुरवत आहेत, तर काही ठिकाणी त्यासाठी शुल्क आकारले जाते.

खरे तर नवमाता, मानवी दूध बँका आणि त्यांची गरज हा विषय कधी फारसा चर्चेत येत नाही. त्याची तीव्रता अधिक जाणवते ती ‘कोविड’सारख्या संकटकाळात. टाळेबंदीच्या काळात हा विषय आपल्यासमोर प्रामुख्याने आला तो एका स्त्रीच्या पुढाकाराने.

‘सांड की आँख’ या चित्रपटाच्या निर्मात्या निधी परमार यांना फेब्रुवारीच्या शेवटी पुत्ररत्न प्राप्त झाले. त्या वेळी ‘करोना’चा इतका उद्रेक झालेला नव्हता. आपल्या बाळाची दुधाची गरज भागूनही अजून बरेचसे दूध आपण शिल्लक ठेवू शकतो, हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. त्या वेळी असंख्य नवजात बालके आईच्या दुधाला पारखी असल्याने दूध बँकेत दुधाची तीव्र टंचाई झाल्याचे त्यांनी सांगितले. जन्मत: कमी वजनाची बाळे, अशा मातांची बाळे ज्यांना अंगावर पुरेसे दूधच नाही अथवा काही कारणाने बाळाला त्या स्तन्यपान करू शकत नाहीत. अशा बाळांना मातेच्या दुधाची किती गरज आहे हे निधी यांच्या लक्षात आले आणि त्यांनी दुग्धदानाचा निर्णय घेतला. टाळेबंदीच्या काळात त्यांनी वैयक्तिकरीत्या मोठय़ा प्रमाणात दूग्धदान के ले आहे. तेही स्वत:च्या बाळाचे परिपूर्ण पोषण करून. त्यांच्याबरोबरच काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण भारतातील कोईम्बतूर आणि त्रिपूर प्रभागात जवळपास ६०० आणि अहमदाबाद येथील २५० नवमातांच्या गटानेही ‘कोविड’च्या कठीण काळात दुधाचे दान के ले. तर चेन्नईमध्ये तरुण-तरुणींच्या एका स्वयंसेवी गटाने टाळेबंदीच्या काळात अथक परिश्रम घेऊन शेकडो नवजात अर्भकांपर्यंत १०० लिटर एमओएम- मॉम- ‘मिल्क ऑफ मदर’ पोहोचवले. या तरुणांनी चेन्नईच्या मिल्क बँकेतला साठा कमी पडू दिला नाही हे विशेष. हे करत असताना रुग्णालयासमोर सगळ्यात मोठी अडचण होती ती दाता मातांपर्यंत पोहोचण्याची. प्रशासनाच्या परवानगीने घरोघरी जाऊन अशा दुधाची पाकिटे गोळा करण्यात आली. त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचे ग्रुप तयार करून हे स्वयंसेवक नवमातांना सतत प्रोत्साहित करत होते. त्यामुळे टाळेबंदीच्या काळातही अनेक अर्भकांना जीवनदान मिळाले.

अर्थात टाळेबंदीपूर्वी दूध बँकांमध्ये दर महिन्याला साधारण १५ लिटर दूध जमा होत होते, ते टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळापर्यंत कसेबसे पुरले. पण त्यानंतर नवमातांनी पुढाकार घेतल्याने सांताक्रूझ येथील एका रुग्णालयात मे २०२० नंतर १२० लिटर दूध जमा झाल्याची नोंद आहे. हे खरेच खूप स्पृहणीय आहे. इतर अनेक रुग्णालयांमध्येही टाळेबंदीच्या काळात दूध बँकेत नवमातांनी दूध जमा केल्याच्या नोंदी आहेत. एक सशक्त माता एका वेळेस तिच्या क्षमतेनुसार ५० ते ३०० मिलिलिटर दूध जमा करू शकते. दूध बँका या अशाच मातांनी दान केलेल्या दुधावर आजपर्यंत टिकून आहेत. या गेल्या काही महिन्यांत टाळेबंदीमध्ये तर अशा दूध बँकांनी फार मोठी जबाबदारी पार पाडली, हे प्रगत आणि स्नेहाद्र्र समाजाचे लक्षण आहे.

नवजात बाळांसाठी सगळ्यात महत्त्वाचे आणि आयुष्यभराचे वरदान म्हणजे मातेचे स्तन्य. अनेक रोगांविरुद्ध लढण्याची क्षमता प्रदान करणारा जीवनरस. त्यातही जन्मानंतर मातेकडून मिळणाऱ्या अगदी पहिल्या दुधाचे (कोलोस्ट्रम) महत्त्व साऱ्या जगाला ठाऊक आहे. त्यामुळे  जर बाळास जन्म दिलेल्या आईची प्रकृती नाजूक असेल, तिला ‘ब गट’ काविळीसारखा आजार असेल अथवा इतर अनेक कारणांनी ती बाळास प्रत्यक्ष स्तन्यपान देण्यात असमर्थ असेल, तर अशा वेळी दुग्ध बँके तील दूध नवजात बाळांसाठी खूप उपयुक्त ठरते. जी नवमाता ह्य़ूमन मिल्क बँके साठी दुग्धदान करू शकते अशा मातेचे दूध वैद्यकीयदृष्टय़ा योग्य वातावरणात सुरक्षित ठेवून मग आवश्यक तेव्हा दुसऱ्या बाळांपर्यंत पोहोचवण्यात येते. कित्येकदा काही कारणाने आईच्या शरीरात पुरेसे दूध तयारच होऊ शकत नाही किंवा बाळंतपणात आईचा अंत झाला, तर इतर नवमातांनी दान केलेले, दूध बँकेत साठवलेले दूध बाळास देण्यात येते. अनेकदा अशी परिस्थिती येते, जेव्हा बाळाच्या भुकेच्या वेळी आई तिथे उपलब्ध असू शकत नाही. अशा वेळीही ते आईचे दूध र्निजतुक केलेल्या बाटल्यांमध्ये जमा करून घरीच शीतपेटीत ठेवता येते. बाळाच्या भुकेनुसार ते बाहेर काढून सामान्य तापमानात बाळाला देता येते. ही एक वैयक्तिक दूध बँकच झाली. असे काढून ठेवलेले दूध शीतपेटीत बराच काळ टिकवता येते हे विशेष.

आईच्या दुधाच्या या नैसर्गिक गुणामुळेच १९०९ मध्ये व्हिएन्नामध्ये जगातील पहिली ‘ह्य़ूमन दूध बँक’ स्थापन करण्यात आली. भारतात त्या मानाने ही संकल्पना रुजायला बराच काळ जावा लागला. २७ नोव्हेंबर १९८९ ला भारतात मुंबईच्या सायन रुग्णालयात दूध बँकेची सुरुवात झाली. अशा बँकेत काही विशिष्ट प्रकारची काळजी घेऊन मातांचे दूध साठवले जाते. उणे २० अंश तापमानात हे दूध तब्बल सहा महिने उत्तम टिकू शकते.

टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात किती तरी चिमणे जीव मृत्यूशी झुंज देताना त्यांना मातेच्या दुधाची गरज होती. त्या वेळी दूध बँकांकडे सगळीकडून मातृदुग्धाची मागणी होत होती, पण ‘करोना’चा कहर असताना अनंत अडचणी पार करून काही थेंब जीवनरस मिळवणेही शक्य होत नव्हते. अपुरा कर्मचारी वर्ग, वाहतूक समस्या, ‘दूधदात्या’ मातांच्या मनात असलेल्या करोनाच्या भीतीमुळे त्यांनी घेतलेली माघार, अशा अनेक अडचणींना तोंड देत बालकांवर उपचार सुरू होते. निसर्गाने आईच्या दुधात रोगांविरुद्ध लढण्याची इतकी प्रचंड ताकद दिली आहे की ‘डब्ल्यूएचओ’च्या निर्देशानुसार ‘कोविड’बाधित मातेचं दूध काढून नवजात अर्भकाला पाजता येतं. मात्र त्यावेळी योग्य ती काळजी घ्यायला हवी. बाळाच्या जन्मानंतर येणाऱ्या आईच्या पहिल्या दुधात इतर रोगांप्रमाणे ‘करोना’शी लढण्याची ताकद असल्याने ते दूध पाजणं आवश्यक आहे.

टाळेबंदीच्या काळात अनेक जणांनी दूध बँकेकडे इंटरनेटद्वारे ‘ऑनलाइन दूध पॅकेट नोंदणी’ उपलब्ध करून देण्याची मागणीही केली. परंतु आपल्याकडे अशा प्रकारे खासगीरीत्या मागणी आणि पुरवठा करण्यास परवानगी नाही. याचे कारण स्पष्ट आहे. दूधदान करणारी स्त्री, तिची आरोग्य तपासणी, ‘एचआयव्ही’ परीक्षण आणि दुधावर आवश्यक असलेली प्रक्रिया, या बाबी खूप महत्त्वाच्या आहेत. यात आर्थिक फायदा निगडित असल्याने बाळाच्या सुरक्षिततेचा मुद्दा डावलला जाऊ शकतो. टाळेबंदीच्या काळात सगळीकडून आर्थिक फटका बसलेल्या कुटुंबातील स्त्रीने काही मोबदला घेऊन आपले दूध इतर कुठल्या बाळासाठी विकण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परंतु अशा घटनांमुळे दूध बँकांचे महत्त्व किंचितही कमी होत नाही, उलट वाढतेच. आईच्या दुधाला पर्याय नाही हे सत्य साऱ्या जगाने स्वीकारलेले आहे, पण त्या दुधाला पारखे होत जन्माला येणाऱ्या असंख्य बालकांच्या आरोग्यासाठी सुसज्ज दूध बँका प्रत्येक शहरात असायला हव्यात. अतिरिक्त दूध दान करण्यासाठी मोठय़ा संख्येने नवमातांनी पुढाकार घ्यायला हवा आणि त्यासाठी जागृतीही व्हायला हवी.

टाळेबंदीच्या अत्यंत कठीण काळात अनेक मातांनी आपला पान्हा दान केला आणि ‘जगवी देवकीचा कान्हा, गोकुळी यशोदेचा पान्हा’ हे प्रत्यक्षात उतरले. दूध बँका नव्याने समृद्ध झाल्या.

समाजाने खरेच मनावर घेतले तर अशा अनेक दूध बँका स्थापन होऊन निरोगी बालकांची नवी पिढी सहज तयार होऊ शके ल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 12:06 am

Web Title: donating mothers milk mothers milk bank dd70
Next Stories
1 गर्जा मराठीचा जयजयकार : मराठी शाळा आधुनिकतेशिवाय पर्याय नाही!
2 हेल्पलाइनच्या अंतरंगात : पीडित स्त्रियांचा आधार
3 चित्रकर्ती : गोधडीची कलात्मक ऊब
Just Now!
X