तो अरबी, ती पाश्चिमात्य. एके दिवशी तो आपल्या मुलांना घेऊन आपल्या मायदेशी निघून जातो. तिला काहीही न सांगता, पत्ताही लागू न देता. हे एकीच्याच नव्हे तर अनेकींच्या बाबतीत होऊ लागलं आणि डोन्या-अल-नही या ब्रिटिश स्त्रीने त्याविरोधात कामगिरी सुरू केली, अगदी जिवावर उदार होऊन. अरबी प्रांतात जाऊन मुलांना परत आणायचं आणि त्यांची आणि त्यांच्या मातांची भेट घडवून आणायची. त्यातच तिच्याही बाबतीत तेच घडलं.. अपहरण आणि सुटकेचा हा अत्यंत संघर्षमय अनुभव घेणाऱ्या धाडसी डोन्याविषयी.
दोन बायका सर्वस्वी अनोळखी देशात जातात.. तिथं हवा तो पत्ता धडपडून शोधतात.. त्या घरातली मुलगी कधी बाहेर पडते, शाळेला कधी जाते यावर लक्ष ठेवतात.. अखेर ती मुलगी शाळेत जात असते तेव्हा शाळेत तिला गाठतात.. त्यातली एक बाई त्या मुलीच्या शिक्षिकेला बोलण्यात गुंतवते, तोवर दुसरी बाई त्या मुलीला बाजूला घेऊन तिला अक्षरश: गाडीत ढकलते.. गाडी सुसाट वेगानं धावू लागते.. या मुलीचं असं अपहरण करून तिला पळवून नेणं अर्थातच सोपं नसतं.. आता अनेक अडथळ्यांची खडतर शर्यत पार करायची असते.. मृत्यू पावलापावलावर दबा धरून आहे. अशा परिस्थितीत, रणरणत्या वाळवंटात अनेक तास गाडी चालवून या दोन बायका देशाच्या सीमेपर्यंत पोहोचतात आणि.. सुटका करून घेतात..
 हा एखाद्या चित्रपटातला थरारक सीन वाटतोय ना? पण नाही, हे वास्तव आहे. यातल्या अपहरणकर्त्यां बायका ‘व्हीलन’ वाटतायत ना? पण नाही, यातली एक आहे मुलीच्या भेटीसाठी आसुसलेली तिची आई आणि दुसरी आहे, तिला बळ देणारी, कणखरपणे तिच्या पाठीशी उभी राहणारी, डोन्या-अल-नही- हिरॉईन ऑफ द डेझर्ट!.. या असामान्य धर्यामुळं एका आईला तिच्यापासून दूर गेलेली मुलगी परत मिळाली! या मोहिमेत धोका तर खूप होताच, शिवाय डोन्या तापानं फणफणली होती. अल्जिरिआच्या सीमेपर्यंत १७ तास आणि पुढं मोरोक्कोपर्यंत २४ तास इतक्या दिव्यातून ती यशस्वीपणे पार झाली.
डोन्या-अल-नही ही लंडनमध्ये राहणारी एक सामान्य ब्रिटिश गृहिणी, चार मुलांची आई. एके दिवशी नेहमीप्रमाणे ती बाहेर गेली असता तिला बस स्टॉपवर एक बाई भेटली,  डोक्याला स्कार्फ बांधलेली. डोन्या तिच्याशी बोलू लागली. तिचं नाव मेरी. त्या अतिशय हरलेल्या, तुटून पडलेल्या बाईशी बोलताना डोन्याला समजलं की, सहा महिन्यांपूर्वी तिचा नवरा त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन लिबियाला निघून गेला होता. काहीही न सांगता. तेव्हापासून ती मुलीला भेटण्यासाठी तळमळत होती, पण तिला कुठं शोधावं, कसं शोधावं, मेरीला काहीच कळत नव्हतं..
 डोन्या घरी आली, पण हा प्रसंग तिच्या मनातून जात नव्हता. त्या रात्री मुलांना कुशीत घेऊन झोपताना तिच्या मनात आलं, आपल्या पिल्लांना आपल्यापासून असं दूर नेलं तर? नुसत्या विचारानंही तिचा थरकाप उडाला. असं घडलं तर आपण काय करू? गप्प बसू? रडत राहू? कुणी तरी आपल्या मदतीला धावून येईल म्हणून वाट पाहत राहू?.. मुळीच नाही.. ती स्वत:शी ठामपणे म्हणाली. जर असं झालं तर मी आकाशपाताळ एक करेन. काहीही करेन, पण मुलीला परत मिळवेनच !
 त्यानंतर डोन्या-अल-नही या निश्चयी आणि साहसी मातेच्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं. तिनं आजवर वीसेक मुलांची आणि त्यांच्या मातांची पुनभ्रेट घडवली आहे, तीसुद्धा जिवावर उदार होऊन.. धमक्या, सणसणत येणाऱ्या  गोळ्या, कायदा, कशालाही न जुमानता.. केवळ आई आणि तिचं मूल यांची भेट घडवायचीच या एकमात्र उद्देशानं.
पाश्चात्त्य वातावरणात, सांस्कृतिक भिन्नतेत तिथल्या जोडीदाराशी जुळवून घेणं नकोसे वाटू लागलेले, भ्रमनिरास झालेले अनेक अरब जोडीदार ‘आपल्या’ वातावरणात आपल्या मुलांनी वाढावं यासाठी त्यांना स्वत: मायदेशी तिथं घेऊन जातात, तेसुद्धा आईला गाफील ठेवून. यामध्ये त्या मातांची होणारी तगमग, तडफड आणि असाह्य़ता जाणून डोन्या त्यांच्यासाठी जणू देवदूत बनली आहे. कुणी तिला ‘आधुनिक काळातील संत’ असं संबोधतं, तर तिचे टीकाकार तिला ‘मुलं पळवणारी बाई’ असं म्हणतात, पण डोन्या म्हणते, ‘‘मी मुलं पळवत नाही, मी त्यांची त्यांच्या आईशी पुनभ्रेट घडवते आणि मुळात, मुलांना अशा प्रकारे नेताच कामा नये.’’
मुलांना अशा पद्धतीनं परत आणणं, त्यासाठी ती जी पद्धत वापरते त्याबद्दल शंका व्यक्त केल्या जात असल्या तरी तिचं काम प्रचंड वाढलेलं आहे, कारण पाश्चिमात्य स्त्रीशी थोडक्यात गोऱ्या स्त्रीशी लग्न करायचं आणि नंतर मुलांना परत मायदेशी न्यायचं हा मार्ग अनेकांनी अवलंबलेला आहे.
‘नॉट विदाऊ ट माय डॉटर’ या आत्मकथनातील बेटी मेहमुदीला आपली मुलगी परत नेण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला ते पुस्तक अनेकांनी वाचलं असेलच, पण इथे डोन्या दुसऱ्यांच्या मुलांना परत आणण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत होती.
डोन्याने ललाला अशाच पद्धतीने परत आणल्यानंतर या साहसाची बातमी लंडनमध्ये पसरताच तिच्याकडं मेरीसारख्या मातांची रीघच लागली. त्यानंतरचं तिचं ‘मिशन’ होतं मोरोक्को.. त्यापाठोपाठ जॉर्डन, तुर्कस्थान,इजिप्त.. डोन्याचं काम सुरूच होतं.. डोन्या जिवावर उदार होऊन अशा अपहृत मुलांना त्यांच्या मातांना भेटवत होती. कधी शाळेतून तर कधी समुद्रकिनाऱ्यावरून या मुलांना ताब्यात घेऊन गाडीत अक्षरश: कोंबून त्यांची सुटका करत होती.
 आणि एक दिवस अघटित घडलं.. अगदी अनपेक्षित. डोन्यानं विवाहानंतर इस्लाम धर्म स्वीकारला आहे. आपला नवरा असं काही करेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं, पण अचानक एके दिवशी तिचा नवरा तिच्या एका मुलाला आणि एका मुलीला घेऊन इराकला निघून गेला. आजवर डोन्या जे इतर मातांसाठी करत होती ते तिला स्वत:च्याच बाबतीत करण्याची वेळ आली. ज्या माणसासोबत आपण आयुष्याचं नातं जोडलं, ज्याच्यासोबत विश्वासानं आयुष्य घालवतोय, इतर मुलांना शोधण्याच्या कामात जो पाठीशी उभा राहतोय तोच माणूस आपल्याच मुलांना घेऊन असा गायब होईल असं कुणाच्या मनात येईल आणि प्रत्यक्षात असं घडल्यावर काय वाटेल?.. पण ती खचली नाही. तिनं इकडून तिकडून पसे जमवले आणि ती इराकला गेली, पण मुलांचा काहीच पत्ता लागेना, तेव्हा तिनं खासगी गुप्तहेराचीसुद्धा मदत घेतली, तरी काहीच पत्ता लागेना.. समोर काही मार्गच दिसेना. तितक्यात सद्दाम हुसेनची राजवट संपली आणि तिचा नवरा मुलांना घेऊन नजफ या त्यांच्या गावी आल्याचं डोन्याला कळलं आणि खडतर संघर्ष करावा लागला पण तिच्या वात्सल्यापुढं सारी प्रतिकूलता हरली.. डोन्याला तिची मुलं परत मिळाली!.. एका आईची जिद्द, तिची तळमळ जिंकली होती!
हे काम करत असताना, मुलांना अशा प्रकारे आईपासून दूर नेण्याचीसुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे असं डोन्याच्या लक्षात आलं आहे. आता मेरी आणि ललाचंच उदाहरण. वडिलांनी आईच्या नकळत मुलीचा लिबियन पासपोर्ट बनवला. मुलीला डेन्टिस्टकडं न्यायचं आहे, असं सांगून तिला शाळेतून लवकर घेऊन आले. आईनं मोबाइलवर फोन केला तेव्हा ‘आम्ही मॅकडोनाल्डमध्ये आहोत’ असं सांगितलं गेलं. रात्रीचे आठ वाजले तरी ते परत आले नाहीत तेव्हा आईनं पुन्हा फोन केला, तर काहीच प्रतिसाद नाही.. कारण ते खूप दूरवर पोहोचलेले..
 डोन्याचं स्वत:चं बालपण अतिशय खडतर होतं. तिची आई तिला प्रचंड मारहाण करायची. वयाच्या पंधराव्या वर्षी ती घरातून पळून गेली होती. वयाच्या १९ व्या वर्षी तिचा एका टय़ुनिशिअन माणसाशी विवाह ठरला, पण लग्नाच्या दिवशीच ती पळून गेली. जवळ पसे नव्हते म्हणून टॅक्सी ड्रायव्हरला हातातल्या सोन्याच्या बांगडय़ा दिल्या होत्या. त्यानंतर तिनं पुन्हा मागं वळून पहिलं नाही. अशी पाश्र्वभूमी असताना तिनं आई आणि मुलांची पुनभ्रेट घडवण्यासाठी असा धोका पत्करणं आश्चर्य वाटण्याजोगं आहे, पण डोन्याची भावना पाहा. ती म्हणते, ‘‘माझ्यापेक्षा नशीबवान असलेलं आणि प्रेमळ आई लाभलेलं कुणीही मूल आईपासून हिरावलं जाऊ नये असं मला वाटतं.’’
 या कामामध्ये डोन्याला काही विचित्र अनुभवही आले आहेत. एकदा इजिप्तमध्ये ती एका मुलाची सुटका करायला गेली होती तेव्हा त्या मुलानं तिला त्याच्या हातावरचे सिगरेटच्या चटक्यांचे डाग दाखवले होते. ते चटके त्याला त्याच्या आईनंच दिले होते. डोन्या म्हणते की, तोवर मला वाटायचं की, सगळ्या बायका चांगल्याच असतात आणि पुरुष वाईट, पण आता मला कळून चुकलंय की, असं फक्त चांगलं-वाईट असं काही नसतं!
 गेल्या वर्षी डोन्याला आणखी एक अनुभव मिळाला. सारा फॉथिरगहॅम या ब्रिटिश महिलेसोबत ती दुबईला गेली होती, तिच्या तारिक या दहा वर्षांच्या मुलाला शोधण्यासाठी. तारिकला घेऊन तिथून निघणार इतक्यात त्यांना अटक झाली. अपहरणाच्या गुन्ह्य़ाबद्दल डोन्याला तीन वर्षांची शिक्षा होऊ शकणार होती. या दरम्यान डोन्याला आणखी एक धक्का बसला. तारिकनं मला तुझ्यासोबत यायचं नाही, असं साराला सांगितलं. त्या दोघांमध्ये काही ओढच दिसली नाही. त्या वेळी डोन्याला स्वत:ची चूक कळली, पण तोवर खूप उशीर झाला होता. तीन रात्री तुरुंगात काढल्यानंतर डोन्याची जामिनावर सुटका झाली आणि अखेर ती या प्रकरणातून मुक्तही झाली.
 तिच्या घरच्यांना तिनं आता आणखी धोके पत्करू नयेत असं वाटतं, पण डोन्या अपहृत बालकं आणि त्यांच्या मातांची भेट घडवण्याचं काम करतच आहे. ‘हिरॉइन ऑफ द डेझर्ट’ हे तिच्या या विलक्षण साहसावरचं पुस्तक बेस्टसेलर्सच्या यादीत आहे, तसंच, ‘नो वन टेक्स माय चिल्ड्रन’ या पुस्तकातही तिच्या धाडसाची कहाणी वाचायला मिळते. या कामात मिळणाऱ्या अनुभवांबद्दल जसं ती लिहिते तसंच घडलेल्या चुकांची ती प्रांजळ कबुलीही देते.
 आधुनिक काळातली ही ‘हिरकणी’ विलक्षण धाडसानं, सगळ्या प्रतिकूलतेवर मात करत स्त्री-शक्तीचं एक निराळंच रूप दाखवत आहे.    
supriyawakil@gmail.com