28 May 2020

News Flash

लाचारीचं जीणं नाय जगायचं!

सुरुवातीला माझा दीर म्हनायचा, ‘तू रातची कंदी बी येती. ह्य़े आसलं हमालीचं काम करतीस. आमचं काय नांव रानार?’ तवा येकदा त्यान्ला सुनावलं, ‘कष्टाचं जीणं नाशिबात

| August 22, 2015 01:08 am

‘‘सुरुवातीला माझा दीर म्हनायचा, ‘तू रातची कंदी बी येती. ह्य़े आसलं हमालीचं काम करतीस. आमचं काय नांव रानार?’ तवा येकदा त्यान्ला सुनावलं, ‘कष्टाचं जीणं नाशिबात हाय. त्ये भोगत्ये! त्ये चालल मला! पन लाचारीचं जीणं नाय जगायचं मला!’’ हमाली करून कष्टाची भाकरी कमवणाऱ्या आणि स्वाभिमानानं जगणाऱ्या माथाडी कामगार रंजना चौधरी हिची कहाणी तिच्याच शब्दांत..

सकाळचे नऊ वाजलेत. घडय़ाळाचा काटा निसता पळतोय. आंघुळ करून यल्लमाआईची पूजा क्येली आन् स्वयंपाकाला भिडली. डाळ फोडणीला घातली. भात क्येला आन् भाकरीचं पीठ मळाया घेतलं न्हाय तो फोन वाजला. घेलाशेठ फोनवर व्हता. म्हनला ‘येक तासात माल यिल मावशी, लवकर या. संग मंगलाबायला बी घिऊन या. माल जादा हाय!’ न्हवऱ्यासाठी आन् पोरासाठी दोन भाकऱ्या थापल्या आन् बाकी पीठ तसच झांकून ठिवलं. लुगड सारखं केलं. बुचडा आवळला आन् निघाली. आज घेलाशेठच्या दुकानावर धा टायरवाला ट्रक आलेला दिसतोय! मंगला गावडे माजी जोडीदारीन. तिला निरोप दिला. अजून सहा गडी मदतीला घ्यावं लागतील! ट्रकमंदी साहशे बॉक्स असनारच! बसस्टापवर मी अर्धा घंटा थांबली. पाकिटातले पैसे मोजले. रिक्शाचं भाडं नाय निगणार! एकडाव वाटलं घ्यावी रिक्शा! कामाची लय ओढ लागती. त्यांत कालचा दिस निसता पंचायतीच्या हापीसात बसून ग्येला. समोर बस आली. चढली. घेलाशेठच्या दुकानापोत्तुर धावतच सुटली उतरल्याबरुबर!
माज्या समोर घेलाशेठचं दुकान! त्याला लागून धा टायरवाला ट्रक! आन् किसन हमालाची मान्स माल उतरवत व्हती. मला धा मिनिटं लेट झाला! मागून मंगल आली. माजा हात धरला. दोघीबी रस्त्यात फतकल मारून बसलो. आज बी हातातलं काम ग्येलं! बस धा मिनिटं येळेवर आली असती तर! आता दिसभर काम मिळल कां न्हाय ठाव! काम आन् मरान सांगून थोडंच येतं?
दुपार झाली. कामाचा निरोप यिना. निसत्या दोगी गप्प बसून राह्य़लो. सकाळधरनं पोटात निस्ता कपभर चा! भूक मेलीच जणू! तेवडय़ात काचसामान ट्रान्सपोर्टच्या हापिसात टाकायचं काम आलं. मी आन् मंगला लगीच उठलो. दुकानांतून बॉक्स उचलले. टॉवेलची चिंबुळ क्येली. डोक्यावर ठिवली आन् त्यावर एकावर एक चार बॉक्स ठिवले आन् ट्रान्सपोर्टाच्या हापिसात निघालो. तिथं वेगवेगळ्या रुटची हापिसं असत्यात. माजा माल बारामतीच्या हापिसात निऊन टाकायचा हुता! त्ये हापिस मार्केटपासून लय लांब! मी आन् मंगलानं सा खेपा टाकल्या. परत माल उचलायला दुकानात ग्येले. डोस्क्यावर बॉक्स ठिऊन निघाली आन् मार्केटच्या झिम्मड गर्दीत येका सायकलवाल्याचा मालाला लय जोराचा धक्का लागला. चारीबी बॉक्स डोस्क्यावरून खाली पडले. माजा बी तोल गेला. माज्या डोळ्यासमुर बॉक्समधल्या काचच्या ग्लासचा चुरा चुरा झाला. सकाळधरनं उपाशी! त्यांत हा प्रकार! माजं पाय थरथरायला लागलं. घशाला कोरड पडलीया. आता शेठ पुन्नांदा माल उचलाया नाय बोलवनार! मार्केटमधी येकडाव नांव खराब झालं का कोनीबी काम नाय देनार. जीव निसता धकधक करतोया! हमाली मागाया कसं जावं शेठसमुर काय बी कळंना झालंय! समदा माल ट्रान्सपोर्टच्या हापिसात गाडीत लोड क्येला आन् खाली मान घालून शेठसमोर हुबी ऱ्हायले. शेठ गप्प! मला अजून भीती वाटली.
‘‘किती बॉक्स गेले?’’
‘‘चार शेठ!’’
‘‘ठीकय! चार जादा बॉक्स गोडावूनमधून घिऊन जा!’’
‘‘शेठ येकडाव माफी करा. पुन्नांदा आसं होनार नाय!’’
‘‘मावशीबाय कशाला टेंशन घेता? तुम्ही मुद्याम पाडलं का?’’
‘‘न्हाय जी!’’
शेठनी पुरी हमाली हातांत ठेवली आन् मी त्या पैशाला कपाळी लावलं.
हातांत मजुरी पडली तशी मी आन् मंगलाबाय ‘कष्टाची भाकरी’त ग्येलो. तिथं धा रुपयात पोटभर झुणका-भाकरी मिळती. ती खाल्ली घिऊन. त्यावर पानी प्यायलं आन् गाडय़ा जवळ बसून राह्य़ले. आमच्या समुर हमाल गाडय़ावर सामान लोड करून निघत व्हते. आम्हा दोघी निसत्या टकामका बघत राह्य़लो. कोनाचा निरोप येतू कां ह्य़ाची वाट बगत राह्य़लो.
कामाच्या आशेनं समुरच्या रस्त्याकडं नजर लावून बसले व्हते तर येक सायबीण खांद्याला पर्स लटकावूनशान चालली व्हती. टकाटक! येकडाव वाटलं, आईबापानं शिकून दिलं असतं तर मी बी आज हापिसात बसूनशान काम क्येलं असतं. पन पदर आला तशी श्येतीची कामं कराया लागले आन् बाराव्या वर्षी माजं लगीन लावून दिलं. मालकांची बी शेतीच व्हती. शिवाय पुन्यात ते वेल्डिंग काम करायचे. पन फुडं अ‍ॅसिडच्या धुरानं डोळ्यांना दिसना झालं. तवा ते काम बंद क्येलं. मालक बी घरी बसून व्हते आन् मी बी. लय वंगाळ दिस! सकाळी भाजी केली तर रात्री कोरडं जेवायचं. भाकरी निस्ती पान्यांत कालवायची. कधी कधी ती बी नसायची. लहान लेकरू भुकेनं रडरडून झोपून जायचं. मग येक दिवस हिंमत क्येली आन् घराभाएर पडले. येक बगितलं व्हतं..कितीबी क्येलं.. घरांत बसून वायर कटिंगचं काम क्येलं, पेपर कटिंग, लोखंडाचं जॉब ठोकन्याचं, रांगोळी पिशवीत भरन्याचं.. आसं लय काम क्येलं, पन त्यानं भागत न्हाय घरखर्च. ते काम नसलं तर निसतं दिवसदिवस बसून राहायचं. म्हणून घराभाएर पडले. पन येक पक्कं ठरीवलं व्हतं. पडल ते कष्टाचं काम करायचं. वझं व्हायचं पन कुनाच्या दारांत कामासाठी जायचं नाय, दुसऱ्याची खरकटी काढण्यापरीस हमालीचं काम बरं! कुनाची बांधीलकी नाय आन् कुनाची हुकमत बी नाय. आपण आपलं राजं! कदी बी जा कदी बी या!
पहिल्यांदा नामदेव मोहितेनं सारसबागेजवळ काम दिलं. तिथं ग्राऊंडवर पत्र्याच्या शेडमंदी सुतळ बांधलेली दगडुशेठ गणपतीची तोरणं यायची. त्ये नारळ सुटं करून पोत्यांत भरायचं. शंभर नारळांचं येक पोतं. ते पोतं परत वाहूनशान दुकानांत घिऊन जायचं! समद्यांनी माझं काम बगितलं. त्यांना कळालं, ही बाई कामाची हाय! मग गलांडे बाईनं मला हिथं हमालीच्या कामावर आनलं. हिथं बी दोनतीन आठवडं निसतं बसून ग्येलं.
येक दिवस काय झालं, दोन धट्टय़ाकट्टय़ा हमाल बाया आल्या की मजजवळ! म्हनल्या, ‘एऽऽ ००* तू कशाला हिथं आली गं? तुला कोनीबी पावती फाडल्याबिगर हमालीचं काम देणार न्हाय. तू गाडी खाली करायची न्हाय! चलं उठ हिथून!’ मी गपगुमान बसून राह्य़ले. काय बी बोलले नाय. रोज त्या बाया मला त्रास द्यायच्या. मी नवीन! कुनाचा आधार नाय! गप ऐकायची. येक दिवस एका बाईनं मला गचांडी धरून रस्त्यातून उठीवलं आन् हाकललं. ते मानकर सायेबांनी पाह्य़लं. मला म्हनले, ‘तुला काम करायचं हाय? तू काळजी करू नको. तू कामाची पोरगी हाएस. पैसं घिऊन ये. मी तुजी पावती फाडतो.’ ते बाबा आढावांच्या हमाल पंचायतचे अध्यक्ष व्हते. त्यांनी मला माथाडी कामगार बोर्डाचीबी सभासद करून घेतली. तवा त्या बायांचा उच्छाद थांबला.
पयलं काम मला भेटलं ते नारळाचा गाडा (हातगाडी) ओढण्याचं! गाडय़ावर पंधरा पोती नारळ व्हते. त्या गाडय़ाला धक्का देत मंडईपोत्तुर जायचं व्हतं! लय अवघड वाटलं! पन साथ द्यायला कोनी न्हवतं. उभं ऱ्हावंच लागतं. पोट उपाशी ऱ्हायलं का काय करायचं? खांद्यावर पट्टा बांधला आन् त्यो जडगीळ गाडा वढाया लागले. डोळ्यांत पाणी येत व्हतं पन मनावर ताबा ठिवला. दुसऱ्या दिवशी येका दुकानातून हाळी आली. येका हापिसमध्ये स्टेशनरी द्यायची व्हती. शेठ म्हनला, ‘बाय तू शिकली हाएस? तुला कळल कुठं माल द्यायचा ते?’ म्हनलं, ‘चवथी पास हाय. तुम्ही रस्ता दावा. मी जाईन इचारत.’ मंग डोक्यावर पन्नास किलोचं वझं घेतलं आन् दुकानाचं बोर्ड बगत, मानसांना पत्ता इचरीत बरोबर गेल्ये. येक दिवस एका व्यापाऱ्यानं इचारलं, ‘ट्रान्सपोर्टचं-हापिस म्हाईत हाय?’ मी म्हनलं ‘कुठल्या बाजूला जायचं तेवडं फकस्त सांगा!’ त्यांनी सांगितलं. मी त्या गावचं ट्रान्सपोर्टचं हापिस शोधलं, माल दिला. पावती घेतली. व्यापाऱ्याला निऊन दिली. तवाधरनं त्यांना इश्वास पटला आन् मला काम मिळाया लागलं. पन कामाचं काय हाय. कदी भेटतं कदी नाय. कधी तीनतीन दिवस निस्त जागेवर बसून ऱ्हावं लागतया. आता जेवल्याधरनं निसती गाडय़ाजवळ बसलेय. हांऽ फरशीवाल मणिकशेठचा माणूस हीथंच येतोया. त्यानं निरोप दिला. तशी लगालगा उठली. खरंतर सहा वाजलेत. घरी जायाची येळ आलीय. पन आता काम घ्यावंच लागेल, फरशांचे बॉक्स ट्रकमधल्या हमालानं फळकुटावर ठिवले. तिथनं उचलले. बारा फरशांचा येक बॉक्स! असे तीन बॉक्स येकावर येक ठिवले. डोईवर घेतले आन गोडावूनकडं निघावे. गोडावून लय लांब! तेवढं चालत जाऊनशान वीस पायऱ्या चढायच्या तवा माल द्यायची जागा येती. फरशा लय जड! घासणी, बिस्कीट, चाकलेटचं वझं बरं पडतं! त्यांत रात झालीया. अजून अर्धा बी ट्रक खाली झाला नाय? नंबीजवळ आला. म्हनला, ‘मावशी माल उतरू?’ मला दया आली. मी अर्धा दिस बसून काढला. तसं त्याचं नग व्हायला. त्यालाबी संग घेतला. मंगल मदतीला व्हतीच.
रात्रीचं बारा वाजलं. आता रिक्शावालं आन् हमाली करनारी मानसं रस्त्यावर दिसना झाली. भलतीसलती मानसं दिसाया लागली. वझं डोक्यावर घिऊनशान घाईनं चालाया लागले तशी सुतळीच्या तोडय़ात अडाकली. फरशी पायावर पडली. रगात व्हायला लागलं. रस्त्याकडचा येक फडका घेतला आन् जखमेवर बांधून टाकला. उद्या माथाडी बोर्डात जाऊन चिठ्ठी घेतली कां दवापाणी भेटल. आमची हमाली तिथं भरली कां फंड, लेव्ही कापूनशान पैसं बँकेत जमा व्हतात. येकडाव संडासची भांडी घिऊन चालली व्हती तर रस्सी पायांत गुंतली आन् मी खाली पडले. लय लागलं. पन हमाल पंचायतचे निमंत्रक नितीन पवार सर हायेत न्हवं, त्यांनी लय धावाधाव केली. दोन दिवस घरी राह्य़ले. पन घरी कंटाळा आला. करमना झालं. तिसऱ्या दिवशी कामावर हजर झाली. आम्हाला काम केल्याबिगर घरी राह्य़लं कां लय पाय दुखत्यात. आंगं दुखतं. उभं नाय व्हता येत. त्यापरीस हीथं कामासाठी रस्त्यावर यिऊन बसलं, काम मिळालं कां लय बरं वाटतं! हां. पन मी वझ्याला पाठाण नाय लावत! बबीबाय गडय़ासारकी वझं पाठीवर घेती. तिच्या मणक्याला त्रास होतोय. आता सत्तर वर्साची हाय न्हव ती! चालायचंच! मर्जी तिची!
रातचा एक वाजला. ट्रकचं सामान उतारलं, शेठकडनं हमाली घेतली आन् रातराणी पकडाया स्टँडवर मी आन् मंगल निघालो. मला आठवलं, ‘‘सुरुवातीला माझा दीर म्हनायचा, ‘तू रातची कंदी बी येती. ह्य़े आसलं हमालीचं काम करतीस. आमचं काय नांव रानार?’ तवा येकदा त्यान्ला सुनावलं, ‘कष्टाचं जीणं नाशिबात हाय. त्ये भोगत्ये! त्ये चालंल मला! पन लाचारीचं जीणं नाय जगायचं मला!’’

माधुरी ताम्हणे -madhuri.m.tamhane@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2015 1:08 am

Web Title: dont fade away
Next Stories
1  शिक्षणदूत
2  रोजच्या जगण्यातले आरोग्यशास्त्र
3  काजू 
Just Now!
X