स्वत:च्या आरोग्याबाबत बेफिकिरी, फाजील आत्मविश्वास, माहिती लपवण्याची वृत्ती किंवा न सांगण्यामागचा निष्काळजीपणा हे जेव्हा सुशिक्षित माणसे करताना दिसतात; तेव्हा राग येतो व वैषम्य वाटते.. कोणत्याही डॉक्टरकडे गेल्यावर स्वत:हून पूर्व आरोग्याची माहिती डॉक्टरांना देणे गरजेचे नाही का? आणि ते न केल्याने उद्भवणाऱ्या गंभीर प्रसंगांना कोण जबाबदार? की सगळ्याचे खापर फक्त डॉक्टरांवरच फोडायचे?
सुमारे दहा-बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. मुंबईच्या उपनगरात एका सर्जन डॉक्टरांना आलेला हा अनुभव. साधारण पस्तिशीचा जरासा स्थूल माणूस सकाळी पाठीत खूप दुखत असल्याच्या तक्रारीवरून त्यांच्याकडे आणण्यात आला. डॉक्टरांनी तपासून मुतखडय़ाचा अंदाज वर्तवला. त्याला थोडा दम लागत असल्याची व ही गोष्ट मुतखडय़ाशी संबंधित नसल्याची त्यांनी मनाशी नोंद केली. कोणत्याही औषधाची अ‍ॅलर्जी नसल्याचे विचारून डॉक्टरांनी त्याला वेदना कमी होण्याचे इंजेक्शन दिले व थोडा वेळ झोपण्याचा सल्ला दिला. दम्याचा त्रास, श्वासाचे आजार, हृदयविकार अशा काही आजारांचा पूर्वेतिहास विचारला; पण त्याने व त्याच्या पत्नीने असा काहीच त्रास नसल्याचे सांगितले. दम कमी होत नसल्याचे पाहून डॉक्टरांनी त्याला रिक्षाने तीन इमारती पुढे असलेल्या फिजिशियन मित्राच्या रुग्णालयात न्यायला सांगितले. दुर्दैवाने तिथे ते डॉक्टर तपासायला येण्यापूर्वीच तो मरण पावला. नातेवाईकांप्रमाणे डॉक्टरांनासुद्धा हा धक्काच होता. त्या विशिष्ट समाजाने त्यांच्याविरुद्ध मोर्चा, बहिष्कार, धमक्या सगळे प्रकार केले. नियमाप्रमाणे मृत्यूचे कारण समजत नसल्याने त्याचे पोस्टमॉर्टेम केले गेले व त्यात त्याला हृदयविकाराचा जबरदस्त झटका आल्याने मृत्यू असे निष्पन्न झाले. एकतर त्याचे तरुण वय, वेदनेचे स्वरूप, छातीत दुखण्याचा अभाव, हृदयविकाराचा नामोल्लेखदेखील नसल्यामुळे या निदानाची त्यांनी अपेक्षाच केली नव्हती. हस्तेपरहस्ते पंधरा दिवसांनी डॉक्टरांना कळले की त्याला मुळातच हृदयविकाराचा व उच्च रक्तदाबाचा त्रास होता, त्यावर औषधे चालू होती, अशा प्रकारे दम लागण्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात पूर्वी दाखल केले होते. पण यातील एकही गोष्ट स्वत: त्याने किंवा त्याच्या नातेवाईकांनी ऐन वेळी डॉक्टरांना सांगितली नाही. त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांचे नुकसान तर झालेच, पण काही दोष नसताना त्या डॉक्टरांची बदनामी, मनस्ताप, त्या समाजाकडून कायमचा बहिष्कार विनाकारण त्यांना सोसावा लागला. केवळ माहिती लपवण्यामुळे केवढा हा दुष्परिणाम!
परवा माझ्याकडे एक सुशिक्षित मध्यमवयीन बाई तब्येत दाखवायला आली होती. तिला तपासून मी मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग (urinary infection) झाल्याचे निदान केले व औषधे लिहिण्यापूर्वी तिला विचारले, ‘तुम्हाला कोणत्या औषधाची कधी अ‍ॅलर्जी किंवा रिअ‍ॅक्शन आली होती का?’ त्यावर तिने लगेच सांगितले, ‘हो, पाच-सहा वर्षांपूर्वी मला एका औषधाने इतका त्रास झाला, माझी जीभच अख्खी बाहेर आली होती, मला श्वास घेता येत नव्हता, म्हणून मला गंभीर अवस्थेत अतिदक्षता विभागात ठेवले होते, त्यातून मी वाचले.’ मग मी विचारले, ‘कोणत्या औषधाने असे झाले त्याचे नाव माहीत आहे का? त्या वेळी दिलेले कागदपत्र, निदान त्यावेळचे डिसचार्ज कार्ड तरी आहे का?’ यावर उत्तर होतं, ‘नाही, त्या औषधाचे नाव आता लक्षात नाही. डॉक्टरांनी कार्डात सगळे लिहिले होते, अ‍ॅलर्जी असलेल्या औषधाचे नाव घालून एक वेगळा कागदपण दिला होता.’ मी म्हणाले, ‘हरकत नाही, आत्ता तुमच्या ते नाव लक्षात नसेल तरीपण मला तुम्ही ते कागदपत्र घरून आणून द्याल का, मगच मी आत्ताच्या आजाराची औषधे लिहून देते’. यावर दोघे नवरा-बायको म्हणाले, ‘कोण जाणे ते आता घरी तरी कुठे ठेवले असेल की नसेल. तुम्ही असे करा ना डॉक्टर, तुम्ही एखादे कमी पॉवरचे औषध लिहून द्या ना, आता कुठे सापडणार ते जुने रेकॉर्ड?’ उत्तर ऐकून मी अवाक् झाले. ज्या औषधाने एकदा आपल्या जिवावर बेतले होते, त्याची नोंद सतत आपल्याबरोबर ठेवणे, कोणत्याही कारणाने कोणत्याही डॉक्टरकडे गेल्यावर स्वत:हून ही माहिती डॉक्टरांना देणे गरजेचे नाही का? स्वत:च्या आरोग्याबाबत माणूस एवढा निष्काळजी कसा असू शकतो?
आपण दररोज घेत असलेल्या गोळ्यांची माहिती शस्त्रक्रियापूर्व तपासणीत डॉक्टराना न दिल्याने शस्त्रक्रियेच्या वेळेस बेहोषीकरणात व शस्त्रक्रियेत अनेक गुंतागुंती निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे धोका वाढतो. एका रुग्णाच्या फाइलमध्ये कुटुंबीयांपकी इतरांचे रिपोर्ट लावून नेल्याने कामाच्या गडबडीत डॉक्टरांच्या ही बाब लक्षात आली नाही तर घोटाळे निर्माण होतात. तपासणीचे कागदपत्र घरी ठेवून फक्त रिपोर्ट दाखवल्याने रुग्णाला आपण हे कोणत्या संदर्भात करायला सांगितले, आधी काय काय औषधे चालू केली होती, हे दिवसाकाठी इतक्या रुग्णांना तपासल्यावर डॉक्टरांच्या कसे लक्षात राहणार? याउलट प्रत्येक रुग्णाला मात्र आपल्या एकटय़ाचेच कागदपत्र व रिपोर्ट सांभाळायचे असतात; ज्यायोगे डॉक्टरांना संदर्भासहित त्या रिपोर्टवर निर्णय घेता येतो. कोणत्याही आजारासाठी डॉक्टरांकडे जाताना आपल्या जुन्या आजारांचे उपलब्ध सर्व कागदपत्र नेऊन दाखवणे आवश्यक आहे. त्याचा आत्ताच्या आजाराशी, औषधोपचाराशी, शस्त्रक्रियेशी संबंध आहे की नाही किंवा त्यातल्या कोणत्या रिपोर्टस्ना आत्ताच्या पाश्र्वभूमीवर महत्त्व आहे; हा अन्वयार्थ डॉक्टरांना लावू दे. पण स्वत:च्या आरोग्याची माहिती लपवण्यात किंवा ती नीट जपून न ठेवण्यात दोष कोणाचा?
कधी कधी रुग्णांना दिलेली औषधे, सल्ला, पथ्य ते नीट पाळत नाहीत आणि वरकरणी मात्र डॉक्टरांचे ऐकत असल्याचे दाखवतात. काही वर्षांपूर्वी असाच एक रुग्ण माझ्याकडे आवेच्या जुलाबाच्या त्रासाने वारंवार येत असे. सखोल चौकशी केल्यावर लक्षात आले, की त्याला बाहेर रस्त्यावरच्या गाडय़ांवर विविध पदार्थ खायची सवय होती. मी प्रत्येक वेळी त्याला आवेसाठी विशिष्ट अँटिबायोटिकची सात दिवसांची औषधे व बाहेर अस्वच्छ जागेत न खाण्याचा सल्ला देत असे. तो ऐकल्यासारखे दाखवी, पुन्हा एक-दीड महिन्यात त्याच तक्रारी व अर्धवट खाल्लेल्या औषधांची पाकिटे घेऊन परत येई. शेवटी त्याला एकदा पोटफुगी, असह्य़ वेदना, मलविसर्जन बंद अशा अवस्थेत रुग्णालयात दाखल केले व त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली. मोठय़ा आतडय़ाचा एक भाग आवळला जाऊन वाटच बंद होण्याची पाळी आली होती. आतडय़ाचा रोगिष्ट भाग काढून टाकून मलविसर्जनाची तात्पुरती सोय केली. काढलेल्या आतडय़ाचा पॅथॉलॉजी रिपोर्ट नशिबाने कर्करोग आला नाही. दर वेळेस खाल्लेले अस्वच्छ अन्न व अर्धवट घेतलेली औषधे यामुळे आजार समूळ बरा न होता गुंतागुंतीचा झाला व हा दुष्परिणाम झाला. एक-दीड महिन्याने पुन्हा दुसरी शस्त्रक्रिया करावी लागलीच. बेफिकीर वागण्यामुळे केवढी किंमत मोजावी लागली त्याला!
कधी कधी डॉक्टरांचे सल्ले पाळून, व्यवस्थित औषधे घेऊनसुद्धा आजार बळावतात, तेव्हा कोणाचाच दोष नाही; पण ज्या गोष्टी मनुष्याच्या नियंत्रणात आहेत त्या तरी त्याने अनुसराव्यात ही अपेक्षा! एरवी हीच माणसे आल्यागेल्याचे अनाहूत व अशास्त्रीय सल्ले व पथ्ये मनोभावे पाळताना दिसली की हसावे की रडावे ते कळत नाही.
आमच्याकडे एक मधुमेही गृहस्थ येत असत. कितीही समजावले तरी गोड खाण्याबाबत त्यांचे कुपथ्य ठरलेले असायचे. घरात त्यांची पत्नी इतक्या काटेकोरपणे त्यांच्या आहाराचे पथ्य सांभाळायची, घरात गोड पदार्थ बनवायचे टाळायची, तर हे गृहस्थ हॉटेलमध्ये जाऊन गोड पदार्थ खायचे. एकदा एका पायाच्या दोन बोटांना गँगरीन झाला म्हणून ती बोटे काढावी लागली, तरी त्यापुढेदेखील जिभेवर ताबा नाही तो नाहीच. रक्तातील साखर तपासण्याचा सल्ला दिला की हे मुद्दाम रात्री कमी जेवत म्हणजे रिपोर्टमध्ये आपोआप साखरेचे प्रमाण कमी येई. डॉक्टरांपुढे मधुमेह अगदी नियंत्रित असल्याचे दाखवायचे, पण खाण्याच्या बाबतीत पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’! या तऱ्हेने वागून आपण डॉक्टरांची नव्हे तर आपली स्वत:चीच फसवणूक करतो आहोत हे लक्षात कोण घेतो? लवकरच दुसऱ्या पायाची बोटेही काढावी लागली आणि काही दिवसांत ते कमी वयात हृदयविकाराचा झटका येऊन गेले.
जिभेचे काम बोलणे आणि खाणे. अविचाराने बोलण्याने नाती दुरावतात, तर अविचाराने खाण्याने आरोग्य बिघडते. त्यामुळे ‘ज्याने जिव्हा जिंकली, त्याने अर्धाअधिक परमार्थ साधला’ असे एक गुरू नेहमी सांगत. जे खरोखरच अशिक्षित, अडाणी आहेत त्यांचे सोडा, पण स्वत:च्या आरोग्याबाबत बेफिकिरी, फाजील आत्मविश्वास, माहिती लपवण्याची वृत्ती किंवा न सांगण्यामागचा निष्काळजीपणा हे जेव्हा सुशिक्षित माणसे करताना दिसतात तेव्हा राग येतो व वैषम्य वाटते. रुग्णांची वैद्यकीय कुंडली संगणकावर साठवून प्रत्येक वेळेस ती व्यक्ती आल्यावर डॉक्टरांना समोर दिसेल अशी सॉफ्टवेअर्स येऊ लागली आहेत; ज्यायोगे या महत्त्वाच्या गोष्टीसाठी डॉक्टरांना रुग्णावर अवलंबून राहावे लागणार नाही; पण ही सोय प्रत्येक डॉक्टरकडे व प्रत्येक संस्थेकडे मिळणे भारतासारख्या देशात अशक्य आहे. त्यामुळे तूर्तास तरी हे ‘छुपे रुस्तुम’ रु ग्ण म्हणजे डॉक्टरांना अधिक खबरदारी घ्यायला लावण्याचे आव्हान आहेत. कारण सरतेशेवटी होणाऱ्या परिणामांना डॉक्टरच जबाबदार हा इथला अलिखित संकेत आहे!