वसंत मुंडे

बीड शहरात राहणाऱ्या सुंदराबाई दगडू नाईकवाडे यांचे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी चारही सुनांनी पुढे येत त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला आणि  पारंपरिक, सामाजिक-सांस्कृतिक खांदेपालटच केला..

आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवीचा दर्जा दिलाय. मुलीला लक्ष्मी म्हटले जाते. मात्र कसोटीची वेळ आली, की मुलीला दुय्यम दर्जा देत मुलाला पुढे केले जाते. मृत्यूप्रसंगी खांदा देणे ही एक अशीच कसोटीची वेळ. बीडमधल्या चौघी जणींनी मात्र वर्षोनुवर्षे पुरुषाच्या खांद्यावर राहिलेले हे ‘कर्तव्य’ स्वत:च्या खांद्यावर घेत जणू सामाजिक-सांस्कृतिक खांदेपालटच केला आहे.

बीड शहरातल्या काशिनाथ नगर भागात राहणाऱ्या सुंदराबाई दगडू नाईकवाडे यांचं वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. सुनांवर त्यांचा खूप जीव. तसा सुनांचाही आपल्या सासूवर आणि ते त्यांनी दाखवून दिलं आपल्या अनोख्या कृतीने.

सासूबाईंच्या निधनानंतर अंत्यविधीच्या वेळी चारही सुनांनी पुढे येत त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. त्यांचं पार्थिव आपल्या खांद्यावर वाहून जणू त्यांनी सासूबाईंच्या ऋणातून मुक्त व्हायचा छोटासा प्रयत्न केला. अलीकडे मुलींनी अग्निडाग देण्याच्या घटना झाल्या असल्या तरी सुनांनी पार्थिवाला खांदा देण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी आणि तीही एका गावातल्या सामान्य कुटुंबातली.

नाईकवाडे कुटुंबाने हा नवा प्रघात सुरू केला त्यामागे आठ दशकांपूर्वी त्यांच्या कुटुंबात रुजलेले पुरोगामी विचाराचे बीज आहे. सुंदराबाई दोन वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्या वेळी त्यांची आई फुलाबाई यांनी दोन लहान अपत्यांसह पुनर्विवाह केला होता. ऐंशी वर्षांपूर्वीची ही गोष्ट. सुंदराबाई यांचेही लग्न त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी झाले. लहान वयात कुटुंबाची पडलेली जबाबदारी, त्यातच पतीने दुसरा विवाह केल्यानंतर सवतीलाही बहिणीप्रमाणे वागवताना सहनशीलतेचा लागलेला कस आणि यातून सासूपण जाऊन सुनांना लेकीसारखे वागवण्याची आलेली समज.. सुनांमध्ये सासूच्या पार्थिवाला खांदा देण्याची ओढ निर्माण झाली त्यामागे इतकी दीर्घ जिव्हाळ्याची जपणूक आहे.

रूढी, परंपरांना छेदण्याचे बळही या साध्यासुध्या स्त्रियांना मिळाले ते घट्ट नात्यांनी दिलेल्या प्रेमातूनच. दगडू नाईकवाडे यांच्याशी विवाह झाल्यानंतर सुंदराबाईंना चार अपत्ये झाली. त्यातील तीन जगली. दगडू सुतारकाम करायचे. परिस्थिती अत्यंत बेताची, हातावरच पोट. त्यामुळे अशा संसारात स्त्रीला जो त्रास सहन करावा लागतो तो सुंदराबाईंच्या वाटय़ाला आला. पतीकडून होणारा त्रास आणि मुलांचे पालनपोषण अशा कठीण काळात संघर्ष करत सुंदराबाईंनी मुलांना वाढवले.

दरम्यान, कोणतेही कारण नसताना पतीने दुसरा विवाह केला. सवत म्हणून आलेल्या राजुबाईला बहिणीचे प्रेम देऊन तिच्याही वाटय़ाच्या संघर्षांला सुंदराबाईंनी साथ दिली. यातूनच नाईकवाडे कुटुंबाला बांधून ठेवणारा एक घट्ट धागा निर्माण झाला. स्त्री म्हणून वाटय़ाला आलेल्या दु:खातूनच जणू रुढी-परंपरांच्या भ्रामक कल्पना बाजूला जाऊन पुरोगामी विचाराच्या बीजांचे रोपण होत गेले. ‘दैवापेक्षा कर्तृत्वावरच आयुष्य उभे राहते.’ हा विचार सुंदराबाईंनी आपल्या मुलांमध्येही रुजवला.

सुंदराबाई यांची मोठी सून लता नवनाथ नाईकवाडे सांगत होत्या, ‘‘मला सासूनेच पसंत करून आणले. लग्नानंतर तीन महिने मी माहेरी गेले नाही. त्यांच्या मोकळ्या स्वभावाने सासरी आल्याचेच कधी जाणवले नाही. अगदी पहिल्या पंचमीलाही काही तासांसाठीच माहेरी गेले. तीस वर्षांत त्या कधी रागावलेल्या मला आठवत नाही. उलट आमच्याकडूनच चुका झाल्या तर समजून सांगून त्यांनी कुटुंबाला बांधून ठेवले. सावत्र मुलांसाठीही त्यांनीच मुली पसंत केल्या. चारही सुनांना सारखी वागणूक देत मोकळेपणा दिला. त्यामुळे आमच्या कुटुंबात सासुरवास आम्हाला माहीतच नाही. सुनांनी सक्षम झाले पाहिजे, मुली आत्मनिर्भर असल्या पाहिजेत असे त्यांचे सांगणे असे.’’ सुंदराबाईंविषयी बोलताना लता यांना किती सांगू आणि किती नाही असे झाले होते.  ‘‘सासूबरोबरच प्रत्येक विषयात चर्चा होत असे. चेष्टेने आम्ही ‘तुमचा लेकीवर जास्त जीव आहे तर तिलाच पाणी पाजायला सांगू,’ असे म्हणायचो, तेव्हा त्यांनी ‘लेकीने पाणी पाजले तरी तुम्ही सुनांनी मला खांदा द्यावा,’ असे सांगायच्या. ती त्यांची इच्छाच होती जणू. आयुष्यभर न रागावता चिडता त्यांनी सारं समजावून घेतलं त्यामुळे त्याही छान, समृद्ध आयुष्य जगल्या आणि आम्हीही.’’

निधनाच्या काही दिवस अगोदर सुंदराबाईंनी नेत्रदानाचाही संकल्प केला होता. त्यांचे निधन झाल्यानंतर लता यांनी पुढाकार घेतला आणि मनीषा, मीना आणि उषा या जावांना आपल्या सासूची इच्छा सांगत ‘आता आपण खांदा द्यायचा’ हे नक्की केले. रूढी, परंपरांमुळे ऐनवेळी लोक बिचकतील, विरोध करतील आणि वेळ निघून जाईल, अशी शंका आल्याने कुटुंबातील मोजक्याच लोकांना ही बाब सांगितली होती. त्यामुळे अंत्यविधीला निघताना अचानकपणे सुनांनी खांदा दिल्यामुळे फारसा कोणी विरोध केला नाही. लता यांचे पती नवनाथ नाईकवाडे यांनीच खांदा देण्याच्या विचाराला साथ दिली. पहाटे निर्णय घेतल्यानंतर नवनाथ यांनी भाऊ राधाकिसन, मिच्छद्र आणि जालिंदर यांना सांगितले होते. नवनाथ हे सुरुवातीपासूनच अंधश्रद्धा निर्मूलन, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन अशा सामाजिक कामांत सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाने घेतलेल्या निर्णयाबाबत समाजातून फारशा नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या नाहीत.

कुठलंही परिवर्तन सहज होत नसतं, विचाराच्या पक्केपणानेच परिवर्तनाला बळ मिळते हेच नाईकवाडे कुटुंबातील घटनेने दिसते. यानिमित्ताने सासू-सुनेच्या नात्यातला ओलावा मन सुखावून गेला. सोबत एरवी क्वचितच कुणी चोखाळेल अशी बदलाची बिकट वाटही नवी पाऊलवाट बनू पाहतेय.

vasantmunde@yahoo.co.in

chaturang@expressindia.com