News Flash

कसं जगायचं कण्हत की गाणं म्हणत?

आपले विचारच आपल्याला घडवत असतात. ते सकारात्मक आहेत की नकारात्मक यावर आपली त्यापुढील कृती आणि पर्यायाने आपलं आयुष्य ठरत असतं.

| September 28, 2013 01:01 am

आपले विचारच आपल्याला घडवत असतात. ते सकारात्मक आहेत की नकारात्मक यावर आपली त्यापुढील कृती आणि पर्यायाने आपलं आयुष्य ठरत असतं. हे विचार नेमके काय असतात, त्यांना तटस्थपणे पाहता येतं का किंवा कसं पाहिलं पाहिजे हे सांगून अनेकांच्या आयुष्याला सकारात्मक वळण देणाऱ्या डॉ. अल्बर्ट एलिस यांची जन्मशताब्दी कालपासून (जन्म-२७ सप्टेंबर १९१३) सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या ‘विवेकनिष्ठ उपचारपद्धती’वरचा हा खास लेख नवी दिशा देणारा.
बऱ्याच वर्षांपूर्वी वाचलेली एक गोष्ट आठवते.
एका अंधाऱ्या मध्यरात्री महामार्गावरून एक गाडी वेगाने जात असते. निर्जन रस्ता. मागचं गाव बरंच मागं पडलेलं आणि पुढचं गाव बरंच पुढे. गाणी ऐकत मजेत गाडी चालवणाऱ्या चालकाला गाडी हेलकावे खायला लागल्याचं जाणवून तो थांबतो. मागचा टायर पंक्चर झालेला असतो. चालक तसा शांत डोक्याचा. त्यात आवडत्या गाण्याची धून मनात सुरू. गाणं गुणगुणत तो डिकीतून स्टेपनी काढतो आणि त्याच्या लक्षात येतं, परवा गाडी धुताना काढून ठेवलेला जॅक गाडीत ठेवायचा विसरलाय. ‘असा कसा मी विसराळू? एवढी महत्त्वाची गोष्ट मूर्खासारखी विसरलो. नेहमीचंच आहे हे माझं.’ तो स्वत:वर खेकसतो.
मदतीसाठी इकडेतिकडे पाहणाऱ्या चालकाला दूरवर एक-दोन दिवे दिसतात. फार्म हाऊस असावं. उजाडण्याची किंवा दुसरी एखादी गाडी येण्याची वाट पाहण्यापेक्षा थंड हवेत मस्त एक-दोन मैल चालत जावं, त्या फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्याला विनंती करून त्याच्याकडचा जॅक मागून आणावा हे चालकाला सोपं वाटतं. स्टेपनी बदलून झाल्यावर जॅक परत नेऊन द्यावा लागणार एवढंच.
गुणगुणत दिव्यांच्या दिशेनं चालताना चालकाच्या मनात विचार येतो, ‘तो फार्महाऊसवाला शेतकरी हसतमुखानं दार उघडेल. आपली अडचण ओळखून जॅक घेऊन आपल्यासोबतच आला आणि टायर बसवायला मदत करून त्याचा जॅक घेऊनच परत गेला तर किती बरं होईल. आपली चांगली मैत्रीसुद्धा होईल.’ चालक खुशीत झपझप चालायला लागतो आणि वाटेतल्या दगडाला अडखळतो. आजूबाजूच्या किर्र्र अंधाराची जाणीव होऊन त्याला एकदम खूप भीती वाटते. त्याचं गुणगुणणं थांबतं. मनात येतं, ‘हल्लीच्या काळात कुणी कुणाला मदत करत नाही. या एकांडय़ा शेतकऱ्याला तर आपल्यासारख्या अडलेल्या लोकांनी रात्रीबेरात्री झोपेतून उठवणं नेहमीचं असणार. ‘काय ही रोजची कटकट?’ असं म्हणून त्यानं आपल्या तोंडावर दार बंद केलं तर? मला नाही आवडणार त्यानं असं केलेलं.’
शेतकरी आपल्या तोंडावर दार बंद करू शकतो, या कल्पनेनं चालक फार अस्वस्थ होतो. जोरजोराने चालू लागतो. ‘अशा अपरात्री दारावर थाप पडली तर कुणीही घाबरेल. हल्ली चोऱ्यामाऱ्या फार वाढल्यात. तो शेतकरी आपल्याला भामटा समजला तर?’ ‘खूप बघितलेत तुझ्यासारखे अडचणीतले भामटे. मागच्या वेळी अशाच एकाला मदत केली तर जाताजाता त्यानं माझ्या दिवाणखान्यातल्या महागडय़ा वस्तू गायब केल्या. तुला मदतच काय, मी दारसुद्धा उघडणार नाही’ असं तो म्हणाला तर? शेतकरी आपल्याला ‘नाही’ म्हणून वर अपमान करतो आहे या विचारानं चालकाची चिडचिड झाली. मनातल्या त्या चिडक्या संवादानं तो अस्वस्थ झाला.
एव्हाना फार्महाऊसपाशी पोहोचून त्यानं घंटेचं बटन दाबलं होतं. शेतकऱ्यानं हसतमुखानं दार उघडलं होतं. पण चालकाचं लक्ष शेतकऱ्याकडे होतंच कुठे? दार उघडताक्षणी त्यानं तिरीमिरीनं शेतकऱ्याला म्हणाला, ‘मी चोरटा नाहीए. तूच बऱ्या बोलानं जॅक घेऊन माझ्यासोबत चलतोस.. की..’
   अडचणीत सापडलेल्या चालकाची ही गोष्ट मानवी मनाचे खूप सारे खेळ उलगडून दाखवते. चालकाचं मन सुरुवातीला समंजस विचार करत होतं. तो शेतकरी बहुधा मदत करेल. समजा त्यानं नकार दिला, तरी हायवेवरून जाणाऱ्या वाहनाची वाट पाहायचा पर्याय होताच. पण असा कुठलाच विवेकी विचार न करता पाहतापाहता त्याच्या मनातल्या विचारांनी, स्वगतानं परिस्थितीचं काल्पनिक ‘भयंकरीकरण’ करून त्याच्या शहाणपणावर कब्जा केला आणि परिस्थिती हातातून निसटून गेली.
ही कथा आठवते ती डॉ. अल्बर्ट एलिस यांनी मांडलेल्या ‘विवेकनिष्ठ उपचारपद्धती’च्या संदर्भात. ‘आपल्या सगळ्या त्रासदायक भावना आणि अतार्किक वागण्यामागे मनात चालणारे अतिरेकी विचार असतात’ हे डॉ. अल्बर्ट एलिस यांनी मांडलेल्या REBT (Rational Emotive Behavioral Therapy)  मधलं एक मुख्य तत्त्व. त्यांच्या मते, ‘मी प्रत्येक गोष्ट कुठल्याही परिस्थितीत चांगलीच केली पाहिजे, नाहीतर माझ्यात अर्थ नाही’, ‘प्रत्येकानं माझ्याशी कुठल्याही परिस्थितीत सन्मानानंच वागलं पाहिजे, नाहीतर ‘ते’ लोक वाईट’, आणि ‘जीवनाकडून मला हवं ते सहजपणे मिळालंच पाहिजे, नाहीतर मी ते सहनच करू शकत नाही’ या तीन टोकाच्या अपेक्षांमुळे (३ मस्ट) येणारे अविवेकी विचार आपल्या सगळ्या ताण, राग, निराशांचं मूळ असतं. त्यातूनच आपलं अविचारी  वागणं घडतं. यापैकी आपल्यावर त्या त्या वेळी काम करणारं ‘मस्ट’ शोधून त्याचं त्रासदायक, अतार्किक स्वगत (Irrational Self-Talk)वस्तुनिष्ठ विचारांनी बदलता येऊ शकतं. आपल्या विचारांचा मागोवा घेत ते स्वगत बदलण्याची सवय आपण स्वत:ला लावून घेऊ शकतो.
आपल्या मूड्सवर काम करण्याऐवजी अतार्किक आणि तार्किक विचार समजून घेऊन त्या मूड्समागच्या मनातल्या विचारांवर काम करण्याची क्षमता प्रत्येक माणसात असते. आपले बदललेले वस्तुनिष्ठ विचारच आनंदात राहण्यासाठी आपल्याला मदत करतात. आरईबीटी मनोरुग्णांसाठी तर उपयोगी आहेच, पण सामान्य माणसाला रोजच्या जीवनातल्या, मन आणि जगणं व्यापून राहणाऱ्या लहानमोठय़ा ताणांतून मोकळं होण्यासाठी ही विचारपद्धती खूप मदत करते. एलिस यांनी अतिशय सोप्या पद्धतीनं सूत्रबद्ध केलेली ही संकल्पना आपल्याला नवी दिशा देते, रोजची जीवनपद्धती बनू शकते.
डॉ. अल्बर्ट एलिस आणि ‘आरईबीटी’
डॉ. अल्बर्ट एलिस हे मानसशास्त्रमधील विवेकनिष्ठ उपचारपद्धती, म्हणजेच Rational Emotive Behavioral Theropy (REBT)चे जनक. भूतकाळाच्या विश्लेषणात अडकलेल्या मानसोपचारांना ‘आरईबीटी’च्या संकल्पनेद्वारे एलिस यांनी एक वेगळं परिमाण दिलं. आपल्या मनाचं स्वत:शी चालणारं अविवेकी स्वगत आपलं जगणं दु:खी करतं. हे अविवेकी वा अतार्किक (Irrational)  विचार  आपल्या काही ठाम मतांमधून, धारणांमधून (Beliefs) आलेले असतात. प्रत्यक्ष परिस्थिती किंवा घटनांपेक्षा त्यांच्याबद्दलचे आपल्या मनातले विचारच जास्त भीतिदायक असतात. आपल्या मनाची अशी खचवणारी निराशावादी स्वगतं जाणीवपूर्वक विवेकी स्वगतांमध्ये बदलून आनंदात राहण्यापर्यंत पोहोचण्याची क्षमता प्रत्येक माणसात असते यावर एलिस यांचा ठाम विश्वास होता. भूतकाळातल्या घटनांचं विश्लेषण करून त्यामध्ये आपल्या वागण्याची कारणं शोधण्यापेक्षा आपला सारासार विचार वापरून वर्तमानकाळाकडे फोकस करण्यावर ही पद्धती भर देते. डॉ. एलिस यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील समस्या तर विवेकनिष्ठ विचारांच्या या उपचारपद्धतीने हाताळल्याच शिवाय वैयक्तिक व समूहाच्या समुपदेशनातून लाखो रुग्णांना आनंदी आयुष्य जगण्यासाठी मदत केली.     
२७ सप्टेंबर १९१३ या डॉ. एलिस यांच्या जन्मशताब्दी दिवसाच्या निमित्ताने ‘आरईबीटी’च्या महत्त्वाच्या तत्त्वांची ओळख करून घेणं अगत्याचं ठरतं.
तीन अतार्किक अपेक्षा
एलिसच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या सगळ्या दु:ख आणि ताणामागे आपले तीन अविवेकी वा अतार्किक समज किंवा अपेक्षा असतात. प्रतिकूल परिस्थिती असताना या तीन ‘च’मुळे निर्माण झालेल्या अविवेकी स्वगतांमधून (Irrational self talk) सगळ्या त्रासदायक भावना पुन्हा पुन्हा उद्दीपित होतात.
* मी कुठल्याही परिस्थितीत प्रत्येक गोष्ट उत्तमच केली पाहिजे आणि सर्वाची मान्यता मिळवली पाहिजे. त्यामध्ये अपयश येण्याएवढं भयंकर काहीच नाही. तसं झालं तर मी निरुपयोगी, निर्थक आहे आणि माझी तीच लायकी आहे.
    – या समजामुळे मनात चिंता, विफलता, टोकाची भीती, खिन्नता, निराशा, निर्थक वाटणं अशा भावना उफाळून येतात.  
*    कुठल्याही परिस्थितीत इतरांनी माझ्याशी चांगलं आणि सन्मानानंच वागलं पाहिजे. तसं झालं नाही तर ते भयंकर असेल. ते माझ्याशी कायमच वाईट वागणार. असे लोकच मुळात वाईट आहेत, माझ्याशी असं वागण्याची त्यांना चांगली शिक्षा मिळाली पाहिजे.
     – हा समज मनात राग, चीड, संताप, द्वेष, खुन्नस अशा भावनांना जन्म देतो.
*  माझं आयुष्य कायम माझ्या मनासारखं, अडथळयांशिवाय, सुरक्षित आणि सुखीच असलं पाहिजे. ते तसं नसेल तर ते भयंकर आहे. तसलं आयुष्य मी सहनच करू शकणार नाही. मला जगणं अशक्य होईल.
– अशा समजांमुळे खिन्नता, वैफल्य, परिस्थती असह्य़ होणं, स्वत:ची कीव करणं, राग, अशा भावना उद्दीपित होतात आणि त्यातून गोष्टी पुढे ढकलणं, काहीच न करणं असं  वागणं घडतं.
‘आरईबीटी’च्या तत्त्वांचं सार थोडक्यात असं मांडता येईल :
*    आपल्या स्वत:च्या भावना आणि कृतींसाठी आपण स्वत:च जबाबदार असतो.
*    आपल्या मनातल्या त्रासदायक भावना आणि अविचारी वागण्याला आपल्या  स्वत:कडूनच्या मागण्या, गोष्टींचं भयंकरीकरण, मनाविरुद्ध घडलेलं सहनच न करता येणं किंवा स्वत:चा बिनशर्त स्वीकार न करता येणं असे अविवेकी समज, विचार कारणीभूत असतात.  
*    विवेकी, वस्तुनिष्ठ विचार करायला आपण शिकू शकतो आणि प्रयत्नपूर्वक ती सवय अंगवळणी पाडू शकतो. स्वत:कडून टोकाच्या अपेक्षा करण्याऐवजी प्राधान्यक्रम ठरवायचे, ‘हे भयंकर आहे’ ऐवजी ‘हे काही एवढं वाईट नाही’ असा विचार करायचा, ‘हे सहन करणं शक्यच नाही’ ऐवजी परिस्थितीशी लढण्याची शक्ती वाढवायची आणि स्वत:वर व्यक्ती म्हणून प्रेम करायचं या मार्गानी अतिरेकी विचारांवर ताबा मिळवता येतो आणि अवघड परिस्थितीतही आनंदानं जगणं निवडता येऊ शकतं.
आपलं नेमकं स्वगत शोधण्यासाठी ‘आरईबीटी’च्या शास्त्राबद्दल व्यवस्थित माहिती करून घेण्याचा, प्रशिक्षणाचा आणि तशा प्रकारचा गट सोबत असण्याचा अवश्य फायदा होतो. परंतु सर्वसामान्यपणे आपल्या मनात पुन्हापुन्हा येऊन विचलित करणारे विचार- आपली ढोबळ स्वगतं तर आपल्याला नक्कीच शोधता येतात. त्याऐवजी योग्य स्वगत काय असावं ते वस्तुनिष्ठपणे ठरवता येऊ शकतं, आणि आपलं रोजचं जगणंही अधिक सुसह्य़ करता येऊ शकतं.

एकत्र कुटुंबात राहणं अशक्य झालेली एक सून सांगते, ‘‘माझ्या सासूबाई परफेक्शनिस्ट आहेत. एक काम करता करता पुढचा विचार करून त्या दुसरं काम पुढे नेत असतात. त्यांच्यासारखं मल्टिटास्किंग मला जमत नाही आणि तसं सुबक-नेटकं करणंही जमत नाही. माझ्यात काही अर्थ नाही असंच वाटत राहतं मग मला. ‘सासूबाई आता काहीतरी म्हणणारच’ असं दडपण कायमचं असतं. स्वत:चा खूप राग येतो. आमच्या नातलगांना, शेजाऱ्यापाजाऱ्यांना त्या माझ्याबद्दल काहीतरी सांगत असणारच. मला सारखं वाटतं की शेजारणी त्यांच्यामुळे मला बावळट समजत असणार. वेगळं राहावंसं वाटतं, पण मनात येतं, नातलग, शेजारी मला बावळटाच्या जोडीला घर फोडणारी पण म्हणतील.’’ आता हे सारं या सूनबाईच्या मनातले संवाद आहेत. त्याला वास्तवाचा आधार असा नाही. तिला विचारलं, ‘‘सासूबाईंना इतरांना असं काही सांगताना तुम्ही कधी ऐकलंत?’’ तर तिचं उत्तर असतं, ‘‘नाही, पण मला नेहमी म्हणतात म्हणजे इतरांशी तेच बोलत असणार?’’
या सुनेच्या सासूबाई परफेक्शनिस्ट असतील, त्यांचा घरात वरचष्मा असेल, तिला एखादा शब्द बोलतही असतील, पण सासूबाईंपेक्षासुद्धा तिच्यावर जास्त राज्य करतायेत ते तीनही अतार्किक मस्ट (irrational MUSTs) – नवरा, आई, बॉस अशा कुणाही परफेक्शनिस्ट माणसाबद्दल थोडय़ाफार फरकानं असंच स्वगत असू शकतं). ‘परफेक्शन म्हणजे सासूबाईंसारखंच. तसं नसेल तर माझ्या कुठल्याच कृतीला काही अर्थ नाही. मी पूर्ण बाद आहे, सासूबाईंसमोर उभीच राहू शकत नाही, त्यांचा एखादा खोचक शब्द- असं अपमानकारक वागणं सहनच करू शकत नाही. सासूबाई तशाच आहेत, नातलगांना, शेजाऱ्यांना त्या माझ्याबद्दल वाईट सांगतात आणि तेही मला वाईट समजतात हा तिचा ‘सेल्फ टॉक’ तिच्या लग्नापासून किमान दहा-पंधरा वर्षे तिची ऊर्जा संपवतो आहे. तिला अकार्यक्षम करणारं हे अविवेकी स्वगत बदलल्याशिवाय तिच्या आयुष्यात आनंद आणि आत्मविश्वास येणार नाही. ‘‘सासूबाईंएवढं नसलं तरी मीही छान करते, माझ्या हाताला माझी अशी चव आहे. त्यांनी कौतुक केलं नाही म्हणजे सगळं संपलं असं थोडीच आहे?’ असा काहीसा विचार तिनं केला, किंवा ‘सासूबाई आपल्या बदनामीशिवाय इतरांशी दुसरं काही बोलतच नाहीत असं असू शकतं का?’ असा वस्तुनिष्ठ प्रश्न तिनं स्वत:ला केला तर ‘त्या मला ‘कायम’ बावळटच समजतात’ हे त्यांच्यावर लावलेलं पक्कं लेबल निघायला मदत होऊ शकते.

रजोनिवृत्तीच्या काळात अनेकींना एकटं वाटणं, अस्वस्थ वाटणं, चिडचिड होणं अशा प्रकारचे त्रास होतात. या वयातलं हार्मोन्सचं असंतुलन हे शारीरिक कारण त्यामागे असतंच. पण हा त्रास बऱ्याच मोठय़ा प्रमाणात मानसिक असतो. आपल्याला फार उदास वाटतंय किंवा जरुरीपेक्षा जास्त चिडचिड होते आहे असं वाटलं तर स्वत:ला एक प्रश्न विचारून पाहावा. ‘‘मनात काय विचार येतायेत म्हणून माझी चिडचिड होतेय किंवा उदास वाटतंय?’ उत्तर येईल, ‘मला कुणी समजून घेत नाही’, ‘उमेदीचे दिवस मी स्वत:ला विसरून घरासाठी दिले, आता जो तो आपल्या नादात, माझी कोणाला गरज नाही, काय अर्थ आहे अशा जगण्यात? आता यापुढे नव्यानं करिअर तरी कसं सुरू करणार?’ ‘माझ्याशी एक शब्द बोलू नका, मला शांत राहू दे’ इत्यादी इत्यादी. शारीरिक बदलांच्या जोडीला एखादीच्या मनात सतत असा काहीतरी ‘सेल्फ टॉक’ चालू असेल तर खिन्नता, वैफल्य वाढणारच. काही जणींना ‘रजोनिवृत्तीच्या काळात असं होतं’ हे माहीत असतं. त्यांच्या प्रत्येक अस्वस्थेला त्या तिथेच जोडतात. ‘पन्नाशी आली ना, आता हे सगळं होणारच.’ हे गृहीतच धरतात. हे गृहीतक कायमचं पक्कं करणं हादेखील एक अविवेकी समजच होतो. ‘प्रत्येकानं मला वाटतो त्या पद्धतीनंच मला सन्मान द्यायलाच हवा’ हे ‘मस्ट’ इथे जास्त काम करतं आहे. हे लक्षात घेऊन ‘मी माझा त्रास कुणाला सांगितलाच नाही तर मला कोण कसं समजून घेईल? घरासाठी एवढी र्वष मी पूर्ण विचार करूनच दिली ना? मुलांना वाढवण्यातला केवढा मोठा आनंद मला मिळाला. आता मुलं मोठी झालीत. ती पूर्वीसारखी भोवतीभोवती कशी करतील? त्यांचं न आवडलेलं वागणं आणि माझी अपेक्षा मी त्यांना शांतपणे सांगायला नकोत का? मुलं, नवरा त्यांच्या त्यांच्या नादात आहेत याचा अर्थ त्यांना माझी किंमत नाही असं मी म्हणू शकते का?’ अशा प्रकारे उदास विचारांची दिशा वस्तुनिष्ठतेकडे वळवता येऊ शकते. ‘पन्नाशीला असंच होणार’ असं म्हणून निराशेत राहण्याऐवजी, ‘ही फेज काही काळासाठीच असते. अनेकींना रजोनिवृत्तीचा त्रास होतही नाही, त्यामुळे असंच होणार असलं तरी माझा त्रास मी कमी करून घेऊ शकते’ असा विचार करता येऊ शकतो. आतापर्यंत जे काही केलं त्याविषयी स्वत:ची प्रशंसा करणं, आयुष्यातल्या चांगल्या, सकारात्मक गोष्टींची उजळणी करणं आणि दुसऱ्यांमधले दोष काढत बसण्यापेक्षा त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी पाहिल्या तर हा रजोनिवृत्तीचा काही वेळा एक ते पाच वर्षेपर्यंत चालणारा काळ सुसह्य़ होऊ शकतो. कुटुंबासाठीही ते चांगलं ठरू शकतं.

घटस्फोटाचा अनुभव अनेक स्त्री-पुरुषांचं जगणं अवघड करतो. एकदा एक घटस्फोटित नवरा भकासपणे म्हणाला, ‘‘येत्या २३ तारखेला माझ्या घटस्फोटाला वर्ष होईल. तो दिवस मी कसा काढू? या कल्पनेनं कालपासूनच कासावीस झालोय. जगण्यात काही अर्थ वाटत नाही.’’ खरंतर जुळवून घेण्याचा पुरेसा प्रयत्न केल्यानंतर, ‘आपलं जमणार नाहीये’ हे मान्य झाल्यावर परस्परसंमतीनं ते दोघं वेगळे झाले होते. पण त्याचा ‘सेल्फ टॉक’ त्याला भूतकाळातून बाहेरच येऊ देत नव्हता.
‘‘तिच्याशी जुळवून घ्यायला मी कमी पडलो. मी नालायक आहे म्हणूनच तिनं मला नाकारलं ना. स्वत:चं तेच खरं करायचं असाच स्वभाव आहे तिचा. आता वेगळं होऊनसुद्धा तिला सुख मिळणार नाही.’’ अशा त्याच्या मनातल्या विचारांमुळे, स्वगतामुळे नाकारलेपणाचं दु:ख, राग, अपमान अशा भावना पुन्हापुन्हा उद्दीपित होत होत्या आणि त्यामुळे तो जास्त खचत होता हे त्याला समजत नव्हतं. ‘‘मी २३ तारखेला काहीच न घडल्यासारखा नॉर्मल वागलो तर लोक काय म्हणतील? ती मनमानी करून मला ‘उद्ध्वस्त’ करून गेली. आता मी आनंदी कसा दिसू शकणार? मी कायम असाच ‘कासावीस’ जगणार’’ अशा विचारांतून त्या  दिवसाचं तो प्रत्यक्षापेक्षा भयंकरीकरण करत होता. तो दिवस सहन करणं शक्यच नाही असं त्याचं मत होतं. एलिसची तीनही ‘मस्ट’ त्याच्यावर आलटूनपालटून काम करत होती.
स्वत:च स्वत:ला भूतकाळात अडकवून घेऊन केविलवाणं होणं, ‘ती तशीच आहे’ आणि ‘मी नाकारला गेलेला बिचारा आहे.’ किंवा उद्ध्वस्त, कासावीस असे शब्द स्वत:बद्दल वापरून स्वत:ची कीव करणं ही स्वगतांची अविवेकी दिशा बदलल्याशिवाय अशा व्यक्तीची तगमग, ताण संपणार नाही. ‘जगातल्या एका माणसाशी माझं पटलं नाही म्हणून माझ्या आयुष्यातलं बाकीचं सगळं कुठे संपतं? तसं मी पूर्ण वर्ष तिच्याशिवाय काढलंय. २३ तारखेलाही इतर दिवसांसारखाच सूर्य उगवणार आणि मावळणार आहे. मग मी त्या दिवसाची एवढी भीती का बाळगू?’ अशा स्वगतातून परिस्थितीशी झगडण्याची ताकद त्याला स्वत:त आणता येऊ शकते.
आग्रहानं वेगळ्या झालेल्या त्याच्या पत्नीलाही पुढचे बरेच दिवस त्रासदायकच गेले होते.  ‘लहानपणापासून कमिटमेंटनं गोष्टी करण्याबद्दल मला सगळे ओळखतात. पण आयुष्यातली ही सर्वात महत्त्वाची कमिटमेंट मला झेपली नाही. मग इतर लाख गोष्टी कमिटमेंटनं केल्या तरी उपयोगच काय? माझ्यात काही अर्थ नाही.’ या स्वगतानं तिलाही पछाडलं होतं. शिवाय ‘‘त्याच्यासाठी मी माझी ओळख असलेल्या कित्येक गोष्टी सोडल्या. मी कथ्थक उत्तम करायचे ते थांबवलं. याला फिरती आवडत नव्हती म्हणून पाच आकडी पगाराची नोकरी सोडली. खाण्यापिण्याच्या आवडी बदलल्या. माझं असं पूर्वीचं काहीच माझ्याजवळ राहिलं नाही.’’ या विचारांच्या भोवऱ्यात तीदेखील बराच काळ फिरत होती. भूतकाळात अडकून स्वत:वर दोषारोप करत होती. तिचा आत्मविश्वास संपलाच होता.
एके दिवशी मात्र तिच्या या स्वगतांमधून तिची तीच अचानक बाहेर आली. मैत्रिणीला ती नेहमीप्रमाणे ‘मी अशी होते, तशी होते, आता सगळं संपलं’ असं पोटतिडकीनं सांगत होती. आणि तिलाच एकदम जाणवलं, ‘काय बोलतेय मी? मी ‘होते’ कधीपासून झाले? मी ‘आहे’ ना अजून. बोलताबोलता ती एकदम गप्प झाली. भूतकाळात अडकून आपणच  स्वत:ला ‘बिचारी’ करून घेतलंय हे तिला जाणवलं. ‘खरंतर माझं सगळं माझ्याजवळच आहे. नृत्याचं कौशल्य, कामाची क्षमता, कमिटमेंट सगळं माझ्याजवळच आहे. माझ्या जुन्या आवडीचं खाणपिणं मी कधीही करू शकते. चांगल्या नोकरीसाठी थोडे प्रयत्न करावे लागतील एवढंच. सगळं जिथल्यातिथेच आहे. फक्त त्याच्याकडे पाठ करून ‘मी होते होते’ करत बसलेय.’ स्वत:च्या विचारांमधला टोकाचा अतिरेक तिचा तिलाच जाणवला. ‘मी आहे’चं महत्त्व असं खोलवर समजल्यानंतर वर्तमानात येण्याचा शॉर्टकट सापडला. स्वत:ला दोष देत भूतकाळात राहिल्यामुळे पुढचा रस्ता बंद झाल्यासारखा वाटत होता. त्यातून बाहेर आल्यावर अनेक पर्याय दिसले. मी संपले नाही, मी काहीही करू शकते हा आत्मविश्वास जागा झाला.
० निसर्गत:च प्रत्येकाजवळ आनंदात राहण्याची क्षमता असते, पण तरीही अशी समज-गृहीतकं असतात खरी. ही गृहीतकं घरातल्या मोठय़ा माणसांकडून येतात, शिक्षकांकडून, शिक्षणपद्धतीतून, मित्रमंडळींकडून, घरातल्या धार्मिकपणातून, कर्मकांडातून कुठूनही येतात. अतिशय घट्ट रुजतात. अनेकदा एरवी आपण खूप बुद्धिमान, समंजस, विवेकी असलो तरी काही ठिकाणी हे अविवेकी भोवरे आपल्याला गाठतातच. विशेषत: अडचणीत सापडल्यावर तर या भोवऱ्यात अडकून गरगरत राहायची सवय लागलेलीही कळत नाही. प्रत्येकाच्या अस्वस्थ होण्याच्या अशा विशिष्ट गोष्टी, मेंटल ब्लॉक्स वेगवेगळे असतात. या सगळ्यातून ‘कण्हत जगणं’ ही जीवनशैली आपण अजाणतेपणी बनवतो.
मात्र आपल्या ताणांमधली मनाच्या स्वगताची सर्वव्यापी भूमिका लक्षात आल्यानंतर ‘आता गाणं म्हणत जगायचं’ असंही ठरवता येतं. मग जुन्या सवयी थोडय़ा वळवून घ्याव्या लागतात. म्हणजे घटनांकडे घटना म्हणून स्वतंत्रपणे, तारतम्याने पाहायला शिकावं लागतं. आपण काही ठिकाणी अकार्यक्षम होतो, आहोत हे आधी लक्षात घ्यावं लागतं. मग त्यामागचं अविवेकी स्वगत शोधायची सवय करावी लागते. स्वत:वर सारखं सारखं रागवत बसणं थांबवून स्वत:ला आहे तसं स्वीकारायला शिकावं लागतं. तेव्हा कळतं, संपूर्ण चूक, संपूर्ण बरोबर असं संपूर्ण सत्य किंवा असत्य काही नसतं. सगळं सापेक्ष असतं आणि  जग शक्याशक्यतेच्या (स्र्१ुं्र’्र३८) च्या नियमांवर चालतं. माणसाच्या हातात परिस्थिती बदलणं नसतंच. मात्र परिस्थितीकडे पाहण्याचा आपला स्वत:चा दृष्टिकोन बदलणं फक्त त्याच्याच हातात असतं. शंभर वर्षांपूर्वी जन्मलेल्या डॉ. अल्बर्ट एलिस यांनी हे इतक्या वर्षांपूर्वी सांगून ठेवलंय. ते धन प्रत्येकाने आपल्या आयुष्यात लुटायला हवं. मग काय बिशाद आपलं आयुष्य आनंदी, समाधानी न होण्याची!    
neelima.kirane1@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 1:01 am

Web Title: dr albert ellis and rebt
टॅग : Chaturang
Next Stories
1 बालसंगोपनातील एक धडा
2 लग्नातला अडथळा – व्यसन
3 प्रतिसाद
Just Now!
X