डॉ. आनंद नाडकर्णी

anandiph@gmail.com

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो

माझी गद्धेपंचविशी सरलेली तर नाहीच, उलट चहुअंगांनी बहरली आहे.. गद्धेपंचविशीतल्या गुळाची चव खरंच प्रभावी ठरली माझ्यासाठी. या टप्प्याने ‘माणूस शिकण्याचे वेड’ लावलं, शिवाय जी समज आणि स्वत:बद्दलचा विश्वास दिला त्या बळावर मी मध्यमवयातल्या कमालीच्या तणावपूर्ण वर्षांनाही तोंड देऊ शकलो. संस्थेची आर्थिक विपन्नावस्था, विस्कटलेला पहिला संसार, शारीरिक स्वास्थ्यातल्या अडचणी आणि हक्काचे घर हरवल्यावर अगदी रस्त्यावर येण्याचा अनुभवदेखील. यातील एकाही अडचणीबद्दल माझ्या मनात आज कटुता नसण्याचे एकमेव कारण आहे,

माझी गद्धेपंचविशी!

प्रत्येक गाढवाला, आपापल्या जगण्याच्या गुळाची चव ज्या टप्प्यावर कळते त्या वयाला ‘गद्धेपंचविशी’ म्हणतात. मुळात ‘गद्धेपंचविशी’ हा गाढवपणा (गाढवपणे.. अनेकवचन) करण्याचा परवाना आहे हे अनेक मंदबुद्धी गाढवांना कळतच नाही.. गाढवपणाचे अनेक प्रकार आहेत. तीव्र आणि एकतर्फी प्रेमात पडून ‘ती’ दिसेल अशा ठिकाणी दबा धरून बसणे किंवा व्यसनांबरोबरची तोंडओळख समवयस्कांच्या साथीने करून घेणे या गोष्टी माझ्या काळात रूढ होत्याच. पण नव्या अनुभवांकडे कोणतेही पूर्वग्रह न ठेवता पाहणे, हा माझ्या गद्धेपंचविशीचा खास विशेष होता, असं आता लक्षात येतं.

मध्यमवर्गीय घराचा सुरक्षित, संस्कारी उंबरा ओलांडून मी मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये आलो. पुढची दहा वर्षे म्हणजे एमडीची परीक्षा पास झाल्यानंतरही, केईएम् रुग्णालय आणि

सेठ जी एस् मेडिकल कॉलेजच्या परिसराशी अक्षरश: एकरूप झालो. त्या काळामध्ये मुंबईतली सर्वसाधारण रुग्णालये ही समाजाच्या सर्व स्तरांसाठी होती. आज आपण ज्यांना ‘सेलेब्रिटीज’ म्हणू अशी विविध क्षेत्रातली मंडळीसुद्धा नि:संकोचपणे वैद्यकीय सल्ल्यासाठी केईएमसारख्या रुग्णालयांमध्ये यायची.

डॉ. रवी बापट आणि डॉ. शरदिनी डहाणूकर या दोन शिक्षकांच्या छत्राखाली आल्यावर माझ्यासाठी ‘माणसांच्या अभ्यासाचे’ एक प्रचंड मोठे दालन खुले झाले. सोपानदेव चौधरी,

सी. रामचंद्र, विजय तेंडुलकर, जब्बार पटेल, सुरेश भट यांच्यापासून ते कामगार चळवळ, राजकारण, खेळ संगीत, कला.. अगदी सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना जवळून पाहायला मिळाले. आणि पुढच्या चार वर्षांमध्ये तर माझी हॉस्टेलची खोली हीदेखील हरतऱ्हेच्या क्षेत्रातल्या अनेक धडपडणाऱ्यांसाठी हक्काचे वसतिस्थान झाली.. पत्रकार निखिल वागळे असो, गिर्यारोहक

वसंत वसंत लिमये असो, नगरहून मुंबईत आलेले सदाशिव अमरापूरकर असोत.. पुढेपुढे तर विजय तेंडुलकरांसारखे ज्येष्ठसुद्धा हॉस्टेलवर यायला लागले. नामदेव ढसाळ, अनिल बर्वे, अनंतराव भालेराव अशी अनेक वेगळ्या विचारांची मंडळी. नाना पालकर स्मृती समितीचे भिडे गुरुजी ते लाल निशाण गटाचे यशवंत चव्हाण.. अशोक शहाणे ते विनय सहस्त्रबुद्धे असा सगळा वैचारिक पट असायचा. ही सगळी अगदी उदाहरणासाठी घेतलेली नावे.. पण या सगळ्यांच्या सहवासामुळे त्या त्या क्षेत्रातल्या वाचनाला गती मिळाली. माझे मराठी साहित्याचे वाचन चौफेर होते पण इंग्रजीचे वाचन यथातथाच.. मग पेरी मेसेनच्या रहस्य कथांपासून सुरुवात करत पुढच्या दहा वर्षांत गाडी पाब्लो नेरुदा, जॉन स्टाईनबेक, जॅक लंडन अशी अस्ताव्यस्त स्टेशन्स घ्यायला लागली.

एम्बीबीएस्च्या दुसऱ्या वर्षांपासून लेखनमुशाफिरी सुरू झाली आणि ‘भरतशास्त्र’ या नाटय़विषयक मासिकाच्या ग्रुपशी जोडणी झाली. नाटय़क्षेत्रातल्या मंडळींबरोबर ओळख होऊ लागली. एकांकिकांचे लेखन सादरीकरण आणि स्पर्धाचे सर्कीट सुरू झाले. ‘भरतशास्त्र’ आणि पुढे ‘स्पंदन’ या दिवाळी अंकांसाठी, लेखकांकडून लेख मिळवणे हे काम असायचं तसेच जाहिराती मिळवण्यासाठीही धडपड करावी लागे. त्या निमित्ताने जयवंत दळवी,

मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, शांताबाई शेळके, विद्याधर पुंडलीक अशा अनेकांशी ओळख झाली. दिनकर गांगलांमुळे ‘ग्रंथाली’चा परिवार जवळचा झाला.. गंमत म्हणजे मी जाहिरात एजन्सीसाठी कॉपीरायटिंग करून थोडे पैसेही कमवायला लागलो. ‘दिनांक’, ‘साधना’, ‘चित्रानंद’, ‘लोकप्रभा’ अशा साप्ताहिकांमध्ये लिहू लागलो. जाहिरातक्षेत्रात काम करणारा दोस्त दिलीप वारंगमुळे कमलेश पांडे,

प्रभाकर कोलते, नलेश पाटील- गंगाधरन अशी अनेक माणसं जवळ आली.

‘मराठी वाङ्मय मंडळ’ नावाच्या कॉलेजातल्या उपक्रमामुळे माझ्यातला ‘इव्हेंन्ट मॅनेजर’ घडायला सुरवात झाली. दादा कोंडके , जयंत नारळीकर यांच्यापासून विविध व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती घ्यायला मिळाल्या. पाक्षिक भित्तीपत्रकाची निर्मिती करताना ‘हुकमी’ लिहिण्याची सवय तर झालीच, पण सजावटीसाठी म्हणून स्केचेस् काढणे सुरू झाले. त्यात भर पडली आम्हा डॉक्टरांच्या मराठी कवितांच्या वाद्यवृद्धांची. सुंदर भावकवितांना स्वतंत्र चाली लावून त्या सादर करणाऱ्या आमच्या गटाच्या निर्मितीचा मध्यबिंदू होता,

डॉ. मनोज भाटवडेकर. तो यशवंत देवांचा शिष्य. ‘स्वच्छंद’ या नावाने तब्बल २५ वर्षे आम्ही वर्षांला एक तरी जाहीर कार्यक्रम करायचो.. यामुळे मला दोन फायदे झाले. मराठी कवितेचे वाचन आणि गोडी कायम राहिली. आणि संगीतनियोजन, चाली लावणे असे हुन्नर जवळून पाहिले. या कार्यक्रमात मी असायचो निवेदक! त्यामुळे सततचा नवा अभ्यास करायची सवय लागली. समीक्षक, लेखक मं. वि. राजाध्यक्षांच्या नव्वदीनिमित्त विजयाबाईंना आमचा कार्यक्रम पुढे काही वर्षांनी ठेवला होता. मराठी साहित्यातले दिग्गज समोर होते. माझे निवेदन रंगले असावे. ‘‘अशा कार्यक्रमांमध्ये मुक्तिबोधांची कविता वाचणारा तू महाराष्ट्रात एकमेव..’’  अनंत भावेसर पाठीवर शाबासकीची थाप देत  म्हणाले होते. अनेक स्तरांवरच्या संभाषणकलेचे शिक्षण सुरू होते. वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा सुरूच होत्या.. आज सर्वज्ञात असलेल्या डॉ. नीलम गोऱ्हे, माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर या मैत्रिणी मिळाल्या त्या या स्पर्धामुळेच. इंग्रजी वाचनाकडून वक्तृत्वाकडे वळलो आणि जीएस् मेडिकलचा ‘जीएस्’सुद्धा बनलो.

विजय बोंद्रेंसरांकडून नाटक आणि दृक्कलांचे पद्धतशीर प्रशिक्षण मिळालं ते याच काळात. विनायक पडवळबरोबर प्रायोगिक नाटकांचा अनुभव घेतला. दरम्यानच्या काळात सर्व भाषातले उत्तम चित्रपट पाहायचा सोसही लागला होता. इंटर्नशिपच्या काळामध्ये पुण्यात राहून, सतीश बहादूरसरांचा चित्रपट रसास्वादाचा कोर्सही केला.

इतक्या साऱ्या उचापती करत असताना मी मेडिकलचा अभ्यास कधी केला असा प्रश्न मलाच कधीकधी पडतो. पण आता जाणवते की कप्पाबंद समय नियोजनाबरोबरच, हातात पडलेल्या प्रत्येक मिनिटाचा १०० टक्के वापर त्या त्या वेळच्या ध्येयासाठी कसा करायचा याचा संपूर्ण दशकाचा प्रशिक्षण कार्यक्रमच होता तो.. त्यामुळे प्रत्येक काम मन:पूर्वक व्हायचे.

विशी ते पंचविशी या टप्प्यावर म्हणजे एमबीबीएस होताना माझ्या डोक्यात पक्के झाले की आपण मनोविकार क्षेत्रातच पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं. एक तर ‘माणूस शिकण्याचे वेड’ या काळात लागलंच होतं. अनोळखी माणसंसुद्धा मला छान जोडता येतात, असं निरीक्षण डॉ. एस्. एम. र्मचट  या माझ्या बालरोगतज्ज्ञ सरांनी केलं होते. बापटसर, डहाणूकर मॅडम यांच्यासोबत आता डॉ. विजय आजगावकरही मला मेंटॉर म्हणून मिळाले होते.

विद्यार्थिदशेतच मी कुष्ठरोग, होमोसेक्शुअ‍ॅलिटी अशा विषयांच्या मनोव्यापारावर यशस्वी एकांकिका लिहिल्या होत्या. त्यात भर पडली ती ‘वैद्यकसत्ता’ या माझ्या पहिल्या पुस्तकाची. इंटर्नशिप संपताना हे पुस्तक प्रकाशित झालं. गेली चार दशके त्याच्या आवृत्त्या निघत आहेत. पण या पुस्तकाच्या निमित्ताने जो अभ्यास झाला त्यातून कळलं की मला रुग्णाला मशीन मानणाऱ्या बायोमेडिकल अर्थात् जीववैद्यकीय आकृतिबंधावर आधारित प्रॅक्टिस करायची नाही तर सर्वसमावेशक म्हणजे शरीर, मन, समाज यांचा ठाव घेणाऱ्या वैचारिक चौकटीत व्यवसाय करायचा आहे. हा निर्णय हळूहळू विकसित झाला. स्वत:च्या जगण्याबद्दल स्वत:च्या हिमतीने घेतलेला हा माझा पहिला निर्णय!

दरम्यान, माझ्या विकासाच्या अश्वमेधाला जबरदस्त खीळ बसली ती एमबीबीएसच्या अंतिम वर्षांत आलेल्या अनपेक्षित अपयशाने. एमबीबीएसचे शेवटचे वर्ष.. डॉक्टरीच्या डिग्रीचा टप्पा. योगायोगाने त्याच वर्षी माझे प्राचार्य वडील  महाविद्यालयातून निवृत्त होणार होते. घरामध्ये मी सगळ्यात धाकटा. ‘‘किती छान.. मी निवृत्त होणार आणि तू डॉक्टर होणार,’’ असं ते मजेत म्हणायचे, पण त्यातली कृतार्थ भावनाच मी विस्कटून टाकली होती. खूप निराश झालो. तोपर्यंत केलेल्या इतर उलाढालींविषयी खंत नव्हती. पण आपण ‘चांगला’ मुलगा नाही हे विलक्षण डाचत होतं मनाला.

‘‘तुझं अपयश आपण नेमकं समजून घेऊया..’’ वडील नेहमीच्या शांत सुरात म्हणाले.

‘‘समजून काय घ्यायचं आहे.. करिअर संपली सगळी.. आजवर जपलेली.’’ मी म्हणालो.

‘‘एका महत्त्वाच्या परीक्षेत, एका विषयामधल्या एका भागात म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये, एका प्रयत्नामध्ये तू अपयशी ठरलास हे वास्तव आहे. त्यावरून तू जो निष्कर्ष काढतो आहेस तो तपासून पाहा..’’

भावनेचा भर आवरून क्षणभर विचार केला आणि जाणवलं, एका परीक्षेतल्या अपयशावरून स्वत:वर असा कायमचा शिक्का मारणे योग्य नाही.

‘‘उद्या तुझ्या प्रयत्नांमधून तुला यश मिळणार याची मला खात्री आहे.. पण एक लक्षात ठेव, यश मिळो की अपयश.. माझ्यासाठी तू कायमचा राहणार आहेस माझा आवडता आंदू..’’

त्या विश्वासाने गलबलून गेलो. त्या विनाअट स्वीकाराने मोडलेल्या मनाला पुन्हा ताकद दिली. पुढच्या प्रयत्नामध्ये यश मिळाले. पण आता यशाने शेफारून न जाण्याची समजही आली होती.  पुढचे सहा महिने स्वत:च्या भावनांना पुन्हा एकदा लयीत आणण्याचे काम  करता आले आणि आता तर सायकिअ‍ॅट्रीला पर्याय उरलाच नव्हता.

एमडी करताना माझा परिचय मद्य आणि नंतर गर्दच्या व्यसनांवरच्या उपचारांबरोबर झाला. मला अपेक्षित असा व्यापक दृष्टिकोन घेऊन मी एकांडय़ा शिलेदारासारखा या विषयात घुसलो. मुंबईभर गर्दविरोधी समाज जागृती करत फिरलो. मानसिक समुपदेशनाचे गट घेतले, व्यक्ती- कुटुंब समाज यांच्यात उतरून काम करू लागलो. त्याच सुमारास आजगावकरसरांच्या मार्गदर्शनाखाली बालमधुमेही मुले आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर काम सुरू झाले. मुलांशी संवाद, गटसत्रे, कुटुंबासमवेत कॅम्पस् अशा उपक्रमांमधून चक्क रक्तातली साखर ताब्यात आणता येते, हे कळायला लागल्यावर भावनिक नियोजनाचं महत्त्व लक्षात आलं आणि एमडीच्या अभ्यासाला सुरुवात करतानाच लिहून ठेवलेलं, माझं ‘ड्रीम डॉक्युमेंट’ मी पुन्हा उघडलं, ‘मानसिक आरोग्य आणि समाज यामधली अज्ञानाची दरी कमी करणारी एक संस्था मला तयार करायची आहे..’ तिशी लागली त्या सुमारास ‘इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’ अर्थात् आयपीएच या संस्थेच्या स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या होत्या..

या काळामध्ये, व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातल्या खास करून गर्दच्या संदर्भातल्या माझ्या कामाची बऱ्यापैकी प्रसिद्धी झाली होती. त्यामुळे मी पूर्णवेळ त्याच क्षेत्रात काम करावं, असं माझ्या प्रोफेसरांनाही वाटत होतं. पण मनोविकारशास्त्राच्या एकाच दालनामध्ये बंद व्हायला माझं मन तयार होत नव्हतं. ‘मानसिक आरोग्य’ ही संकल्पना व्यापक आहे. मानसिक आजार आणि त्यांच्यावरचे उपचार हा या संकल्पनेचा फक्त एक स्तर आहे.. मानसिक विसंवाद म्हणजे ‘डिस्ट्रेस’ आणि मनोविकास म्हणजे ‘डेव्हलपमेंट’ यावर जर काम करायचं तर स्वतंत्र संस्था हवी. हे काम एकटय़ानं करून भागणार नाही.. कारण संघशक्ती आल्याशिवाय सामाजिक बदलाला गती मिळत नसते. जेव्हा संधी मिळेल तेव्हा असा व्यापक प्रयत्न करायचाच हा निर्धार माझ्या गद्धेपंचविशीला वळण देणारा महत्त्वाचा टप्पा. त्या वेळी हातात पैसे नव्हते, नेमकं काय करायचं याचा पक्का प्लॅनही नव्हता.. एमडीच्या परीक्षेत सुवर्णपदक होतं, व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातला प्रसिद्धीचा पाया होता. पण नाही.. करूयाच गाढवपणा!

त्या वेळी मी केईएम रुग्णालयात व्याख्याता म्हणून पूर्णवेळ काम करत होतो. सुरक्षित नोकरी सोडून बाहेर उतरणं भाग होतं. माझे एक ज्येष्ठ सर म्हणाले, ‘‘तू केईएममध्येच पूर्णवेळ राहा.. क्वार्टर्स मिळतील. नियमित पगार.. तुझे साहित्य – नाटय़ क्षेत्रातलं कामही सुरू ठेवू शकशील.’’ पण दुसरे सर म्हणाले, ‘‘नवीन कल्पना जर प्रत्यक्षात आणायच्या तर स्वत:ची संस्था तयार कर.. सरकारी यंत्रणेमध्ये कल्पकतेला नेहमीच मर्यादित वाव असतो.. तुझ्यातली उपक्रमशीलता इथे गंजूनही जाऊ शकते.’’

मनात संघर्ष सुरू झाला, ‘काय करू?..’ इथेही गाढवपणाच मदतीला आला.. पूर्ण जबाबदारीने, स्वत:च्या पर्यायाचे स्वामित्व स्वीकारून हसतमुखाने नवा रस्ता खोदायला सुरुवात करायची. म्हणून पूर्णवेळ नोकरी सोडून स्वत:ची प्रॅक्टिस सुरू करायची आणि पुढे जे करायचं ते शून्यातून उभं करायचं; असा निर्णय घेतला.. कुठून आलं हे धाडस?.. गद्धेपंचविशीनेच शिकवलं होतं की मनस्वीपणे जगायचं तर त्याचीही किंमत असतेच. ती कधी भौतिक सुविधांच्या अभावातून घ्यावी लागेल, तर कधी लौकिक अपयशाला प्रेमानं जवळ घेऊन.. एकदा निर्णय झाल्यावर पाठी वळून न बघण्याचा गुणधर्मही याच टप्प्यानं दिला.

यंदा आमच्या संस्थेची तीन दशके पूर्ण होताहेत. ठाणे आणि पुणे शहरांमध्ये, मनआरोग्य व्यावसायिक, स्वयंसेवक आणि पूर्णवेळ कार्यकर्ते असा साडेतीनशे लोकांचा गट मनआरोग्याच्या दीडशेहून जास्त आयामांवर (verticals) कार्यरत आहे. व्यसनमुक्तीच्या कामाला ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्राच्या रूपाने संस्थारूप आले आहे. डॉ. सुनंदा-अनिल अवचट आणि मुक्ता पुणतांबेकर तसेच आमच्या शंभरावर कार्यकर्त्यांचा गट अविरतपणे कार्यरत आहे. आणि आम्ही एकविसाव्या शतकातल्या ‘स्क्रीन ऑब्सेशन’ या समस्येवर मात करण्याच्या उपचार रचना तयार करत आहोत. ‘स्वयंभू’ ही दिव्यांग मुलांची संस्था, ‘तपस्’ ही ज्येष्ठ नागरिकांसोबत काम करणारी संस्था, ‘संवेदना’ ही एपीलेप्सी विषयातली चळवळ अशा अनेक उपक्रमांमध्ये प्रेरक म्हणून काम करायची संधी मिळते आहे.

‘गद्धेपंचविशी’त मिळवलेल्या संवादकौशल्याच्या बळावर ‘वेध’ही आमची जीवनशिक्षण परिषद महाराष्ट्रातल्या ११ शहरांमध्ये पोहोचली आहे. यंदा शतकमहोत्सवी ‘वेध’बरोबर मी मुलाखती घेण्याची सहस्र सत्रे पूर्ण करेन. ‘इव्हेंट मॅनेजमेट’बद्दल जे शिकलो त्यातून ‘द्विज’ पुरस्कारापासून ते ‘बहुरंगी बहर’पर्यंतचे उपक्रम जन्माला आले. चित्रपटांबद्दलची जी समज मिळाली ती, ‘देवराई’, ‘कासव’, ‘कदाचित’, ‘आणि काशिनाथ घाणेकर’ अशा चित्रपटांसोबत सल्लागार म्हणून काम करताना कामी आली. ‘आवाहन आयपीएच’ या यू टय़ूब चॅनेलची निर्मिती तर झालीच, पण या निमित्ताने ‘आयपीएच’चा माध्यमविभाग जन्मला आणि त्यातून लघुपटांची निर्मिती सुरू आहे. कविता आणि संगीताची जी जाण ‘गद्धेपंचविशी’ने दिली त्यातून पन्नासहून अधिक ‘वेध’ गीते लिहिली आणि संगीतबद्ध केली. त्याचे तीन अल्बम निघाले. व्यावसायिक रंगभूमीसाठी एकूण आठ नाटके लिहिली आणि अनेक पुरस्कारांसहित राज्यशासनाचा ‘राम गणेश गडकरी पुरस्कार’ मिळाला तो ‘त्या तिघांची गोष्ट’ या नाटकाच्या लेखनासाठी! मानसिक आरोग्याच्या अनेक उपक्रमांमध्ये नाटक, संगीत, चित्रपट ही माध्यमे वापरली आणि या क्षेत्रातल्या कलाकारांना मनआरोग्याचं संवर्धन करण्याची तंत्रे शिकवता आली. म्हणता म्हणता २० पुस्तके लिहून झाली आणि त्यातल्या ‘स्वभाव विभाव’ पुस्तकाच्या २० आवृत्त्याही आता पार होतील. जाहिरातीची कॉपी लिहिता लिहिता विविध उपक्रमांची चपखल शीर्षके द्यायला शिकलो. अगदी ‘ब्रॅन्डिंग’ कसे करायचे तेही. वेळेच्या नियोजनाचा फायदा आजही हरघडी होतोच. वाचनाच्या वेडाला आता मनआरोग्य आणि तत्त्वज्ञान तसेच इतिहास या दोन प्रवाहांमध्ये रचनाबद्ध केले आहे. ‘वैद्यकसत्ता’च्या वेळी केलेला वैद्यकरचनेचा अभ्यास आणि ती शिस्त आज अद्वैत तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाला लावतो आहे. त्या काळात करायचो तसे पेन स्केचिंगही मी नियमितपणे करून ‘इन्स्टाग्राम’वर पोस्ट करत असतो तर ‘मनोगती-कवितारती’ या ब्लॉगवर नियमित कविताही लिहीत असतो.

म्हणजे गद्धेपंचविशी सरलेली तर नाहीच, पण चहूअंगांनी बहरली आहे.. त्याचे एक मजेदार दृश्यस्वरूप असं की वयाच्या त्या टप्प्यावर लिहिलेलं माझं ‘गद्धेपंचविशी’ हे पुस्तक आज माझी साठी सरली तरी अनेकांना अजूनही आपला गाढवपणा ‘व्हॅलिडेट’  करण्यासाठी मदत करते आहे. गद्धेपंचविशीतल्या गुळाची चव खरंच प्रभावी ठरली माझ्यासाठी.

या टप्प्याने जी समज आणि स्वत:बद्दलचा विश्वास दिला त्या बळावर मी मध्यमवयातल्या कमालीच्या तणावपूर्ण वर्षांनाही तोंड देऊ शकलो. संस्थेची आर्थिक विपन्नावस्था, विस्कटलेला पहिला संसार, शारीरिक स्वास्थातल्या अडचणी आणि हक्काचे घर हरवल्यावर अगदी रस्त्यावर येण्याचा अनुभवदेखील. यातील एकाही अडचणीबद्दल माझ्या मनात आज कटुता नसण्याचे एकमेव कारण आहे, ‘गद्धेपंचविशी’!

विशी ते तिशी या दहा वर्षांनी पेरलेल्या रसरशीत जीवनऊर्जेची साथ अजूनही क्षीण झालेली नाही, होणारही नाही.

आयुष्याचा प्रवास..  खूप काही घडवणारा. त्याची सार्थकता दडलेली असते त्याच्या पूर्णत्वात. मुक्कामापेक्षा हा प्रवासच अनेकदा रोमांचक ठरतो.. भेटणारी माणसे आणि येणारे अनुभव याहीपलीकडे आयुष्य खूप काही देत असतं.  बालपण ते तारुण्य हा  प्रत्येकाच्या आयुष्यातला पायाभरणीचा काळ. कसोटीच्या वेळी घेतलेले निर्णय असोत की ठरवून केलेल्या कृती, उक्ती त्याच ठरवत असतात प्रत्येकाच्या जगण्याचा पोत!  ‘गद्धे पंचविशी’ हे सदर उलगडणार आहे, याच अनुभवांच्या गाठी. नामवंत सांगणार आहेत, त्यांच्या ‘विशी ते तिशी ’या वयादरम्यानचे आयुष्यातले उभेआडवे धागे..  त्यांच्या आयुष्याला व्यापून उरणारे.. दर शनिवारी.