07 July 2020

News Flash

गर्जा मराठीचा जयजयकार : मातृभाषेतल्या शिक्षणानंच दिला आत्मविश्वास

डॉ. अपूर्वा जोशी यांनी तरुण वयातच पादाक्रांत केलेली एकेक शिखरं न्याहाळताना आश्चर्य वाटत राहतं.

२०१८ मध्ये वुमन लिडर अ‍ॅवॉर्ड स्वीकारतांना अपूर्वा जोशी

मुग्धा बखले-पेंडसे / शुभांगी जोशी-अणावकर – Jayjaykar20@gmail.com

‘‘शिक्षणाचं माध्यम मराठी असो किंवा इंग्रजी, तुमच्या यशाच्या मार्गात त्याचा काही अडथळा होत नाही. उलट जेव्हा तुम्ही मातृभाषेतून शिक्षण घेता, तेव्हा तुमच्यात एक अंगभूत आत्मविश्वास निर्माण होतो, आणि मग विविध भाषा आत्मसात करण्यातल्या अडचणी सहज पार करता येतात. आपण जिथे व्यवसाय करतो तिथल्या माणसांशी जोडलं जाणं फार महत्त्वाचं असतं. मला त्यासाठी मराठीची मदतच झाली. या भाषेनं मला अधिक समृद्ध केलं.’’ सांगताहेत ‘न्यायवैद्यक लेखापरीक्षण’ क्षेत्रात आपली जागतिक स्तरावर ओळख निर्माण केलेल्या ‘फॉरेन्सिक एग्झ्ॉमिनर’ डॉ. अपूर्वा जोशी.

डॉ. अपूर्वा जोशी यांनी तरुण वयातच पादाक्रांत केलेली एकेक शिखरं न्याहाळताना आश्चर्य वाटत राहतं. ‘न्यायवैद्यक लेखापरीक्षण’ किंवा ‘फॉरेन्सिक अकाऊंटिंग’ अर्थात अर्थविषयक माहितीचं लेखापरीक्षण करून त्यातले घोटाळे शोधण्याच्या आगळ्यावेगळ्या क्षेत्रात काम करणारी आणि भारतात सर्वात कमी वयात ‘फॉरेन्सिक एग्झ्ॉमिनर’ म्हणून प्रमाणपत्र मिळवलेली ही तरुणी. याशिवाय ‘रिस्कप्रो मॅनेजमेंट कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या संचालक, ‘रिंडर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या स्वतंत्र संचालक, ‘क्विक हील फाऊंडेशन’च्या अध्यक्ष, ‘भारतीय महिला उद्योग संघटने’च्या सदस्य, दोन परदेशी विद्यापीठांकडून मानद डॉक्टरेट मिळवलेल्या आणि ‘लोकसत्ता’च्या ‘तरुण तेजांकित’ पुरस्काराच्याही मानकरी, ही त्यांची ओळख.

अपूर्वा यांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात मराठी माध्यमातून सोलापूर येथील ‘ज्ञानप्रबोधिनी’च्या शाळेत झाली. दहावीनंतर अकरावी-बारावीचं शिक्षण त्यांनी सोलापूर मधल्याच ‘संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालया’तून घेतलं. त्या वेळी माध्यम पूर्णपणे इंग्रजी होतं. अभ्यासक्रमातली दुसरी भाषा म्हणून त्यांनी आवर्जून संस्कृत भाषा निवडली, कारण मराठी आणि संस्कृत त्यांना खूप जवळचे विषय वाटायचे. त्यामुळे शिकत असताना जेवढा काळ हे विषय घेता येतील, तितका काळ ते घेण्याचं त्यांनी ठरवलं होतं. मराठी माध्यमातलं शिक्षण ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचं काम हे स्थित्यंतर त्यांनी कसं सहज पेललं, हे जाणून घेण्यासाठी अपूर्वा यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या.

प्रश्न : शाळेत दहावीपर्यंत मराठी आणि ‘सेमी इंग्लिश’ माध्यम होतं आणि महाविद्यालयात मात्र पूर्णपणे इंग्रजी माध्यम होतं. हा बदल कसा स्वीकारलात?

अपूर्वा : इंग्रजीतून विज्ञान आणि गणित हे विषय शिकवत असताना आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी इंग्रजी या विषयावर जास्त भर दिला होता आणि त्याची काठिण्यपातळी हळूहळू वाढवत नेली होती. शिवाय त्यांनी ‘मातृभाषेवर प्रेम करा, पण इतर भाषांचा तिरस्कार करू नका,’ हे आमच्या मनावर चांगलं बिंबवलं होतं. ते आम्हाला सांगत, की तुम्ही मराठीशी कायम जोडलेले राहा, कारण ती तुमची दैनंदिन व्यवहाराची, कामकाजाची भाषा आहे. पण त्याच वेळी काळाची गरज, तसंच आपली मुलं स्पर्धेत मागे पडू नयेत म्हणून आमच्या शिक्षकांनी मराठीबरोबरच इंग्रजी शिकवण्यावरही भर दिला होता. मी एक बघितलं आहे, की ज्या विद्यार्थ्यांचा मुळात भाषा हा विषय चांगला आहे, त्यांना इंग्रजीचं आकलन होणं फारसं कठीण जात नाही.

प्रश्न : पण इंग्रजी समजणं आणि बोलता येणं यात फरक आहे. महाविद्यालयात गेल्यानंतर इंग्रजी माध्यमातून आलेल्या मित्रमैत्रिणींशी बोलताना आपण कुठे कमी पडत आहोत असं कधी वाटलं का? विशेषत: ‘फाडफाड इंग्रजी’ बोलणाऱ्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधताना?

अपूर्वा : नाही.. कारण काय झालं, पूर्वी विविध शिष्यवृत्ती परीक्षा असायच्या. त्या वेळी शिकवणी वर्गात ‘कॉन्व्हेंट’मध्ये शिकलेल्या मुलांशी संपर्क यायचा.  इंग्रजीतून शिकल्यानं ही मुलं जास्त आत्मविश्वासानं बोलत आहेत का, आपण त्यांच्यापेक्षा कमी पडत आहोत का, असं सुरुवातीला वाटायचं. पण लवकरच लक्षात आलं, की भाषा हा कधीच अडथळा नसतो. जेव्हा त्यांचे आणि आमचे शिष्यवृत्ती परीक्षा अथवा अन्य परीक्षांमधील गुण अथवा यश यांची तुलना केली तेव्हा आम्ही कुठेच कमी नाही हे लक्षात आलं. आमच्या गुणांनी आम्हाला दाखवून दिलं, की मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम हे तुमच्या यशामध्ये अडथळा ठरत नाही. मग न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यताच नाहीशी झाली, कारण ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे, हे समजून चुकलं. शिवाय मला आणखी एक गोष्ट जाणवली होती, की आम्ही त्या वेळी मराठी, संस्कृत, हिंदी या भाषा बोलू शकत असू. पण ही मुलं मात्र मराठी अथवा अन्य भाषा बोलताना अडखळायची. असं का व्हावं?.. याचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही मातृभाषेतून शिक्षण घेता तेव्हा तुमच्यामध्ये एक अंगभूत आत्मविश्वास निर्माण होतो. मग विविध भाषा शिकतानाचा अडथळा पार होऊ शकतो. त्या मुलांच्या घरी मराठी बोललं जायचं आणि शाळेत इंग्रजी. त्यामुळे खूप सरमिसळ व्हायची. आम्ही मात्र मराठीतून मूलभूत शिक्षण घेतल्यानं एकेक अन्य भाषा सहज शिकत जात होतो आणि त्यावर हळूहळू प्रभुत्वही मिळवत होतो.

प्रश्न : म्हणजे त्यांचा ना धड मराठी-ना धड इंग्रजी असा गोंधळ व्हायचा. याउलट तुमचा मराठीचा पाया भक्कम असल्यानं इतर भाषा आत्मसात करताना तुम्हाला खूप अडचणी निर्माण झाल्या नाहीत. बाकी त्या-त्या विषयातली शब्दसंपदा वाढवणं, हे बोलून, वाचून सवयीचा भाग होतो असंच ना?

अपूर्वा : हो. म्हणजे त्या वेळी माझ्यात हळूहळू एक भावना अशी विकसित होऊ लागली, की आपल्याला मराठी भाषाही येते आहे आणि इंग्रजीसुद्धा येते आहे. म्हणजे दैनंदिन व्यवहाराची भाषा आणि भविष्यातली ज्ञानभाषा या दोन्हीवर आपण प्रभुत्व मिळवत आहोत. यामुळे आत्मविश्वास वाढायला खूप मदत झाली.

प्रश्न : हे प्रभुत्व मिळवण्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागले का?

अपूर्वा : त्या वेळी इंग्रजी बोलण्याच्या शिकवण्यांचं पेव फुटलं नव्हतं. त्यामुळे एखादा मुलगा पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी शहरात गेला तर सुरुवातीला त्याला थोडं चाचपडायला व्हायचं, थोडी कोंडी व्हायची. पण त्यावर थोडी मेहनत घेतली, की पुढे सहज जाता यायचं. त्यासाठी मी रोजच्या व्यवहारात इंग्रजी संभाषण करायचं ठरवलं आणि मग बोलून-बोलून त्याचा सराव झाला. भाषेमुळे माझ्या प्रगतीत किंवा विकासात काही अडथळा आल्याचं मला तरी आठवत नाही.

प्रश्न : बारावीनंतर तुमची वाणिज्य शाखा पुढे सुरू राहिली ना?

अपूर्वा : हो. बारावीनंतर माझं ‘बी.कॉम.’चं पहिलं वर्ष, ‘सी.ए.’चंही पहिलं वर्ष सुरू झालं होतं. मी ‘बी.कॉम.’, ‘एम.कॉम.’ हे महाविद्यालयात न जाता बाहेरून केलं. सर्व पेपर इंग्रजीतून द्यायचे होते. पण काही अडचण आली नाही. ‘आर्टिकलशिप’ करण्यासाठी मी पुण्यात आले. ‘आर्टिकलशिप’मध्ये रोजचा कार्यालयीन कामकाजाचा मजकूर, संवाद, यातून इंग्रजी भाषा सामोरी येत गेली, सराव वाढत गेला आणि आत्मविश्वासही.

प्रश्न : नंतर तुम्ही स्वत:ची संस्था सुरू केलीत. त्या वेळी तुमचा साहजिकच विविध भाषिक व्यक्तींशी संपर्क येत असणार. त्या वेळी तर संवादाचं माध्यम इंग्रजी असणार. तेव्हा काही कठीण गेलं का?

अपूर्वा : नाही. कारण सरावानं हळूहळू इंग्रजी भाषेचा आत्मविश्वास येत होता. शिवाय मी कोणत्याही भेटीला जाताना संभाषण, वागायचे शिष्टाचार याची पूर्वतयारी करून जायचे. मला वाटतं की तयारीनं सर्व काही साध्य होतं. समोरची व्यक्ती अन्य भाषिक असली तरी कसलीच अडचण येत नाही. त्यामुळे माझी कधी गडबड झाली नाही.

प्रश्न : कामाच्या निमित्तानं तुमचा दुबई अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील अन्य लोकांशी देखील संबंध येत असतो ना?

अपूर्वा : हो, आणि तिथे मराठीचा किती उपयोग झाला ते सांगते.. मी जेव्हा दुबईला गेले, तेव्हा दुबईमध्ये कामासाठी वातावरण फारसं चांगलं नव्हतं. तेव्हा मी तिथल्या महाराष्ट्र मंडळाशी ‘फेसबुक’वरून संपर्क साधला. त्यांनी मला अतिशय छान प्रतिसाद दिला. तिथे माझं व्याख्यानही ठेवलं. मला भेटून तिथले कायदे, काम करण्याच्या पद्धती या सगळ्याची सविस्तर माहिती दिली. इतर देशांमध्येही परिषदा, चर्चासत्रं, पेपर सादरीकरण यासाठी मला जायला मिळालं. तिथेही कामापुरतं, संवादापुरतं, विषयापुरतं इंग्रजी बोलणं सहज जमू शकतं. तुम्ही मराठी भाषक आहात की इतर हा प्रश्न उद्भवत नाही.

प्रश्न : तुम्हाला तुमच्या न्यायवैद्यक लेखापरीक्षणाच्या क्षेत्रात मराठीचा फायदा होतो का?

अपूर्वा : खूपच. माझा व्यवसायाचा पसारा महाराष्ट्रात आहे. जेव्हा आर्थिक घोटाळे होतात, तेव्हा त्या संदर्भात आलेल्या पुराव्यांची तपासणी वा विश्लेषण आम्ही करतो. माझ्या कामाच्या निमित्तानं माझा पोलीस, इतर अधिकारी किंवा सामान्य नागरिक अशा विविध लोकांशी संबंध येतो. सामान्य माणसाशी जोडलं जाण्यासाठी, मला हवी असलेली माहिती मिळवण्यासाठी, घटनेचे अंतर्गत पैलू समजून घेण्यासाठी, पुराव्यांमधली माहिती पोलिसांना सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी, त्या अनुषंगानं त्यांना प्रश्न विचारण्यास मदत करण्यासाठी, अशा विविध गोष्टींसाठी मला मराठी भाषेचा खूपच उपयोग होतो. जिथे तुम्ही व्यवसाय करता तिथल्या लोकांशी तुम्ही एकरूप झालं पाहिजे. त्यासाठी मला मराठी खूपच उपयोगी पडते.

प्रश्न : मुलांना मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण द्यावं, यावर आपलं काय मत आहे?

अपूर्वा : प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून द्यावं असं मला वाटतं, पण त्यासाठी पालकांनी पुढे आलं पाहिजे. मुलांना इंग्रजी शाळेत घालणं हा प्रतिष्ठेचा प्रश्न करू नये. त्याबरोबरच मराठी शाळांनीही आपला दर्जा वाढवला पाहिजे. ‘ज्ञानप्रबोधिनी’सारख्या शाळांचा आदर्श ठेवून मुलांना काळाबरोबर चालण्यासाठी सक्षम केलं पाहिजे.

प्रश्न : मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्यानं काय कमावलं आणि काय गमावलं?

अपूर्वा : काहीही गमावलं नाही, उलट कमावलंच. आपल्या महाराष्ट्रात अनेक मोठे लोक, व्यावसायिक, उद्योजक आहेत. कामाच्या निमित्तानं त्यांना भेटताना किंवा अगदी कोल्हापूर विद्यापीठात न्यायवैद्यक लेखापरीक्षण विषयाचे अभ्यासक्रम सुरू करताना त्याचं महत्त्व समजावून सांगण्यासाठीही मला मराठीचा दुवा म्हणून मदतच झाली. माझी व्यक्तिगत ओळख निर्माण झाली. मी या भाषेमुळे समृद्ध झाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 1:34 am

Web Title: dr apurva joshi forensic science garja marahicha jaijaikar dd70
Next Stories
1 कथा दालन : आठवणींच्या हिंदूोळ्यावर
2 चित्रकर्ती : बंधन बांधणीचं!
3 महामोहजाल : माहिती तंत्रज्ञान कायदा आणि आपण…
Just Now!
X