27 October 2020

News Flash

पिढय़ान्पिढय़ांचं ‘डॉक्टरी’ संचित

माणसं तेव्हा प्रगती करतात आणि समाधानीही असतात, जेव्हा त्यांचं कुटुंब त्यांच्याबरोबर असतं. असं पिढी दरपिढी कुटुंब एकमेकांबरोबर राहिलं तर त्या संपूर्ण घराचं एक संचित बनून

| January 12, 2013 01:02 am

माणसं तेव्हा प्रगती करतात आणि समाधानीही असतात, जेव्हा त्यांचं कुटुंब त्यांच्याबरोबर असतं. असं पिढी दरपिढी कुटुंब एकमेकांबरोबर राहिलं तर त्या संपूर्ण घराचं एक संचित बनून राहतं. अशाच काही कुटुंबांचं हे सदर. एकाच पेशात, उद्योग-व्यवसायात, कलेच्या साधनेत पिढय़ान्पिढय़ा असणाऱ्या कुटुंबांची रंजक कहाणी सांगणारं सदर.. दर पंधरवडय़ाने..
न त्वहं कामये राज्यं, न स्र्वग न पुनर्भवम् ।
कामये दुखतप्तानाम् प्राणीनां आíतनाशनम् ॥
धन्वंतरी देवतेला केलेली ही प्रार्थना आहे. ‘‘मला राज्य, स्वर्ग, पुनर्जन्म कशाचीही कामना नाही. दुखतप्तांच्या वेदनांचा नाश करण्याची शक्ती मला दे.’’
सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी खान्देशातील सिंदखेडचे डॉ. विष्णू शिवराम म्हसकर यांनी अतिशय मनोभावे ही प्रार्थना केली आणि जणू धन्वंतरीच त्यांना प्रसन्न झाला. प्रसन्न म्हणजे किती प्रसन्न व्हावा? आपण एखाद्याला खूप पसा मिळाला की सहजपणे म्हणतो ना ‘सात पिढय़ा पुरून उरेल एवढं कमावलंय’ डॉ. म्हसकरांकडेही धन्वंतरीच्या आशीर्वादानं आज सहावी पिढी वैद्यक व्यवसायात पदार्पण करत आहे. त्यांच्याकडे पाच पिढय़ांत मिळून ५२ डॉक्टर्स प्रॅक्टिस करणारे आहेत. शिवाय दोघे, डॉ. पूजा अमरापूरकर, डॉ.आदित्य अभिजित म्हसकर त्याच वाटेवर आहेत. या कुटुंबाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यातल्या १२ स्त्रिया डॉक्टर आहेत. त्यांच्या सहापकी पहिल्या ५ पिढय़ांचं वैशिष्टय़ असं की प्रत्येक पिढीतली सगळीच्या सगळी भावंडं डॉक्टरच आहेत, म्हणजे अपवादानं नियम सिद्ध होतो तो असा.
त्यामुळेच अंमळनेर, धुळे, नाशिक, वलसाड, कल्याण, ठाणे, पुणे या साऱ्या शहरांत ‘डॉ.म्हसकरांची शाखा’ आहेच आहे.  सव्वाशे वर्षांपूर्वी पुण्यातलं बीजे मेडिकल स्कूल इथून विष्णू शिवराम म्हसकर यांनी ‘सबअसिस्टंट सर्जन’ ही पदवी घेतली. पदवी घेतानाच काही काळ सरकारी नोकरी स्वीकारण्याची अट होती. त्यानुसार ते गेले ब्रिटिश सन्यासह आफ्रिकेत बोर वॉरवर! युद्धकाळात पडेल ते काम, त्यामुळे ब्रिटिश नामवंत सर्जन्सच्या हाताखाली छोटय़ा छोटय़ा शस्त्रक्रिया, भूल देणे, ड्रेसिंग्ज, देखभाल.. साऱ्याच गोष्टींचा प्रचंड अनुभव मिळाला. परत आल्यावर छोटय़ा-मोठय़ा नोकऱ्या करत ते अंमळनेरला स्थायिक झाले. डॉ.विष्णू म्हसकरांनी तिथल्या एका शेटजीच्या मुलाचं मूतखडय़ाचं ऑपरेशन पेरिनियल रुटने यशस्वीपणे केलं. या ऑपरेशननं ३ गोष्टी झाल्या. एक – शेटजी त्यांचे परममित्र झाले. दोन – हा मूतखडा एवढा मोठा होता की ‘लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सच्या हंटेरियन म्युझियममध्ये त्याला जगातला नंबर २ चा मोठ्ठा मूतखडा’ म्हणून स्थान मिळालं आणि डॉ.विष्णू म्हसकरांना आंतरराष्ट्रीय कीर्ती! आणि तिसरा फायदा म्हणजे शेटजींनी डॉ.म्हसकरांना हॉस्पिटल उभारणीसाठी काही एकर जमीन देऊ केली. अर्थातच डॉ.विष्णू म्हसकर यांनी त्या जमिनीची किंमत चुकती केली, पण हॉस्पिटल उभारण्याचं मान्य केलं.
१९०० साली डॉ.विष्णू म्हसकरांनी त्या माळरानावर एक अद्ययावत् ऑपरेशन थिएटर उभारलं. त्याचं डिझाइन एका ब्रिटिश आíकटेक्टनं केलं. साऱ्या खानदेशातून, विदर्भातून इथे रुग्ण येत. दूरवरून रुग्ण येणार म्हणजे बलगाडीतून पूर्ण कुटुंबच येणार. अगदी शेळ्या, कोंबडय़ांसकट! कुणाला नाही म्हणायचं नाही, पशासाठी किंवा जागा नाही म्हणून नाडायचं नाही हे तत्त्व. मग माळरानावर तंबू उभारायचे. हे मिल्रिटीचे संस्कार. जेवढी साधनसामग्री आहे तेवढय़ात, जास्तीत जास्त चांगली सेवा द्यायची.
१९०५मध्ये डॉ.विष्णू म्हसकर यांचे ज्येष्ठ पुत्र डॉ. रामकृष्ण त्यांच्याबरोबर काम करू लागले. ते मुंबईत जे.जे. हॉस्पिटलमधून एम्.बी.बी.एस. करून अंमळनेरला गेले. त्यांनी आणि त्यांच्या भावांनी, डॉ.नारायण आणि डॉ.त्र्यंबक मिळून, आजूबाजूच्या परिसरात फिरून, शिबिरं घेऊन वैद्यकीय सेवा देण्यास प्रारंभ केला. त्यांनी मिरजेला डॉ.वानलेस यांच्यासोबतही काम केलं होतं. आपणही मिशनरी वृत्तीनं काम करण्याचा निश्चय त्यांनी मनोमन केला. अन् हीच मिशनरी वृत्ती पुढच्या पिढय़ांपर्यंत झिरपत आली.
डॉ.रामकृष्ण म्हसकर आणि सीताबाई म्हसकरांनी अंमळनेरचं हॉस्पिटल खूप नावारूपाला आणलं. सीताबाईंच्या आठवणी सांगताना त्यांच्या सूनबाई-ठाण्याच्या डॉ.कुंदा म्हसकर खूपच भारावून गेल्या होत्या. ठाण्याचे डॉ.सुभाष आणि डॉ.कुंदा म्हसकर म्हणजे डॉक्टर्सची तिसरी पिढी. या वंशावळीचा बरोबर मध्य! त्यांनी, केवळ स्वत:च्या ज्ञानावर विश्वास ठेवून एक्स-रे-सोनोग्राफीसारख्या सोयी नसतानाची प्रॅक्टिसही बघितली आणि आता त्यांच्या नातीची, मुलीची अद्ययावत उपकरणंही ते बघतायत. कुंदाताई म्हणाल्या, ‘माझ्या सासूबाईंचा दिवस सुरू व्हायचा तो १००-१५० लोकांना रांगेत बसवून चहा वाटण्यापासून. जेवढे पेशंट्स येतील त्यांचं चहा-खाणं.. अंथरुण-पांघरुण सर्व त्या स्वत: जातीनं बघायच्या. इथे ठाण्यात मी हॉस्पिटल सांभाळून सर्व व्यवस्थाही बघते असं कुणी कौतुक केलं की माझ्या मनात येतं, सासूबाईंनी तर केवढा कामाचा डोंगर उपसला, अन् तोही हसतमुखानं.’
डॉ.रामकृष्णांची अंमळनेरची प्रॅक्टिस डॉ.प्रभाकर यांनी व्यवस्थित सांभाळलीच. त्याला अद्ययावत् अशा मोबाइल व्हॅन्सची जोड दिली. एक्स-रे मशीन, पॅथॉलॅब औषधसाठा, ओपीडी, टेंटस् अशा पाच गाडय़ा घेऊन त्यांनी धुळे परिसरातला आदिवासी भाग िपजून काढला. आशिया खंडातलं हे सर्वात मोठं ‘मोबाइल हॉस्पिटल’ गणलं गेलं. स्पॅनिश संस्थेच्या मदतीनं यात आणखी दोन अद्ययावत् गाडय़ांची भर पडली. याची कहाणी म्हणजे कोणत्याही व्यवसायात कौटुंबिक वीण घट्ट असली तर कसं काम उभं राहतं त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. ठाण्याच्या डॉ.सुभाष म्हसकर आणि डॉ.कुंदा म्हसकर यांच्याकडे एक स्पॅनिश विद्यार्थी रोटरी एक्स्चेंज मोहिमेत आला होता. तो जाताना म्हणाला की, ‘माझ्या काही मित्रांना इथली वैद्यकीय व्यवस्था बघायची आहे.’ डॉ.सुभाष यांनी त्याला आनंदानं आमंत्रण दिलं. अवघ्या २-३ दिवसांची आगाऊ सूचना देऊन एकदम २५ परदेशी विद्यार्थी येऊन हजर झाले. एवढय़ा मुलांची राहण्याची आणि त्यांना ऑपरेशन्स दाखवण्याची सोय कशी करणार? सुदैवानं ते घराणं होतं डॉ.म्हसकरांचं, त्यामुळे ठाणे, कल्याण, अंमळनेर आणि बलसाडच्या घरच्याच हॉस्पिटल्समध्ये ७-७ जण पाठवले. २ महिने मुलांना भरपूर अनुभव मिळाला; अन् त्यांनी त्यांच्या देशात जाऊन जे वर्णन केलं, त्यामुळे अंमळनेरच्या हॉस्पिटलला २४ लाख रुपयांची देणगी आली.
अंमळनेरच्या हॉस्पिटलमध्ये वडीलबंधू स्थिरावले, तर ठाण्यात डॉ.सुभाष म्हसकरांनी हॉस्पिटलच्या प्रॅक्टिसमध्ये सोयी वाढवायच्या तर जोड-उत्पन्न हवं म्हणून शनिवार-रविवार अतिअल्प दरात पोलिओ डोस द्यायला सुरुवात केली. आपल्याकडे प्रथमच त्यांनी कोल्ड चेन उभारून गावोगाव फिरून पोलिओ डोस दिले. ठाण्यात पहिली मोबाइल एक्स-रे व्हॅन यांनीच आणली. १९७० साली त्यांनी दोघांनी मिळून फर्स्ट एडचं प्रशिक्षण देण्याचे वर्ग घ्यायला सुरुवात केली. पाठोपाठ बांगलादेशचं युद्ध आलं. त्यामुळे फर्स्ट एड आणि औद्योगिक सुरक्षितता, अपघात टाळणं याला महत्त्व मिळालं. म्हसकर दांपत्यानं इंग्लंडमध्ये जाऊन याचं विशेष प्रशिक्षण घेतलं. प्रात्यक्षिकाच्या बाहुल्या आणल्या आणि हे प्रशिक्षण रंजक केलं. आज त्यांची कन्या डॉ.सुनीता हे वर्ग देशपातळीवर यशस्वीपणे घेते आहे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या ५० हजारांवर गेली आहे.
कल्याणला ‘माहेर’ हॉस्पिटल चालवणाऱ्या म्हसकरांच्या दुसऱ्या पातीतील डॉ. विकास अन डॉ.मेघना यांनी कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात (म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरी) अशा शिबिरांचा विक्रम केला आहे. सतत गरज हेरत राहायचं आणि आपल्याला शक्य ते करत राहायचं हा या घराण्याचा स्थायीभावच आहे. डॉ. विकासनं ३९ सर्जन्सना प्रशिक्षण दिलं आहे. या सगळ्या केसेसमध्ये कुणीच कन्सल्टेशन फी आकारत नाही हे त्यांचं वैशिष्टय़ आहे.
या कुटुंबातल्या सर्वाना वेगवेगळे प्रश्न आम्ही विचारले. त्यातला अर्थातच पहिला प्रश्न होता मेडिकलच का? तर अध्र्याहून अधिक जणांचं उत्तर आलं, ‘‘दुसरा विचारच नाही आला मनात.’’ कल्याणचे डॉक्टर विकास म्हणाले, ‘‘दुसरीतला मुलगा तिसरीत जातोच, तसं आम्ही सहजपणे मेडिकलला गेलो. डॉक्टर होऊन आल्यावर घरात काही आनंदीआनंद .. जंगी स्वागत नव्हतं, पण हां, पहिलं ऑपरेशन यशस्वी केल्यावर मात्र वडील-डॉ.गोपाळराव अन् अंमळनेरच्या आजीनं अबोलपणे पाठ थोपटली होती.’’ डॉ.विकासनी चौथ्या पिढीच्या वतीनं एक आठवण सांगितली .. आमच्या लहानपणी अंमळनेरच्या घरात माझ्या आजोबांवरचा पवाडा ऐकल्याचं आठवतं. तेव्हा आम्ही भारावून गेलो होतो. मग मेडिकलला न जाण्याचा प्रश्नच येत नाही. बलसाडला स्थायिक झालेले डॉ.सुहास अन् डॉ.पद्मा या दांपत्यानंही बलसाडमध्ये शासकीय वैद्यक सेवेचा विस्तार अन् दर्जा दोन्हीत आदर्श घालून दिले. नंतर स्वत:चं हॉस्पिटल काढून ते मोठं केलं. त्यांची दोन्ही मुलं, दोन्ही सुना अन् आता नातूही डॉक्टर आहे. दुर्दैवानं डॉ.सुहास यांचं अकाली निधन झालं. त्यावेळी म्हसकर कुटुंबातल्या सर्वानी आळीपाळीनं बलसाडला जाऊन पद्मावहिनींचं हॉस्पिटल सांभाळलं, त्या खंबीरपणे उभ्या राहीपर्यंत. अन् त्यांची मुलंही त्याच सहजपणे मेडिकलला जाईपर्यंत हा पािठबा कायम राहिला.
असं म्हणतात की, जन्मनक्षत्राचा माणसाच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव असतो. म्हसकर कुटुंबात मुलं सहजपणे मेडिकलला गेली पण सुनांचं काय? या सुनांचा जन्मही ‘धन्वंतरी’ नावाच्याच नक्षत्रावर झाला होता की काय? साऱ्यांनीच मोठं नाव कमावलं. कल्याणच्या माहेर हॉस्पिटलच्या गोपाळरावांच्या पत्नी उषाताई तर साऱ्या कल्याण परिसराच्या आई झाल्या. अंमळनेरला डॉ.कमलताई, ठाण्याला डॉ.कुंदाताई अन् त्यांची मुलगी सुनीता (डॉ.अपूर्वा देशपांडे), कल्याणलाच डॉ.मेघना, बलसाडला डॉ.पद्मा यांनी साऱ्या गावाचं प्रेम मिळवलं. कल्याणच्या उषाताईंनी दोन मुलांच्या जन्मानंतर एक परीक्षा दिली- आयुर्वेदाची अन् त्यात सुवर्णपदक मिळवलं. डॉ.मेघनानंही एका मुलाच्या जन्मानंतर होमिओपॅथीची पदवी मिळवून घरचं हॉस्पिटल सांभाळलं. डॉ.पद्मानं पहिल्या बाळाच्या वेळी वेणा यायला सुरुवात झाल्यावर आधी एमडी व्हायवा दिली अन् मग बाळाला जन्म.
मी मिश्कीलपणे विचारलंही की, ‘‘साऱ्याच सुना एवढय़ा प्रेमळ, सेवावृत्तीच्या कशा?’’ डॉ.मेघनाचं उत्तर असं की, ‘घरात मोकळं वातावरण, विश्वास, काम करण्याचं स्वातंत्र्य अन् प्रत्येक घरातली सासू कर्ती. खंबीरपणे घरचा अन् हॉस्पिटलचा व्याप सांभाळणारी. मग ती डॉक्टर असो वा नसो. हे पाहिलं अन् आम्हीही तसंच वागू लागलो. पेशंटशी बोलताना आमच्या सासूबाई नेहमी फार गोड बोलत, आधार देत. खरंय ! काही गुण वारसानं मिळतात तर काही गुणांचा वसा सासू सुनेला देते. म्हसकरांच्या साऱ्या सुनांनी तो वसा मनापासून जपलाय.
म्हसकरांच्या घरात मुली खूपच कमी. डॉ.सुभाष म्हसकरांची मुलगी डॉ.अंजली अमरापूरकर ही संशोधनाकडे वळली. तिनं आपलं वेगळंच स्थान या घराणेशाहीत निर्माण केलंय. तिनं पॅथॉलॉजिकल बायोप्सीत विशेषत: पोटाचे रोग अन् लिव्हरचे संसर्ग यात काम केलं, आणि आता भारतात फक्त लिव्हरसाठी अशी वैयक्तिक लॅब चालवणारी ती एकटीच आहे. इतर देशांमधून तिच्याकडे बायोप्सीची सॅम्पल्स सेकंड ओपिनियनसाठी येतात. शिवाय ती मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमध्ये असोसिएट प्रोफेसर आहे, तर तिचे पती डॉ.दीपक अमरापूरकर हे पोटाच्या विकारांचे तज्ज्ञ आहेत.
सारी मंडळी एकमेकांना पेशंटस् रिफर करतात. अवघड केसेसची चर्चा करतात. ठाण्याहून काही पेशंटस् कल्याणच्या हॉस्पिटलपर्यंत जातात. कारण कल्याणचं माहेर हॉस्पिटल अत्यंत नाममात्र दरात सर्जरी करतं. तिथे पोलीस, पोस्टमन, शिक्षक अन् सनिकांकडून सल्ला-फी आकारली जात नाही. हा नियम डॉ. विकास यांच्या वडिलांनी घालून दिलाय.
डॉ. विकासना पहिल्या ऑपरेशनपूर्वी वडिलांनी सांगितलं होतं, ‘‘एखादे वेळी तुझं निदान काही अंशी चुकलं तर तुला क्षमा मिळेल, पण जर मनातला हेतू चुकला अन् सर्जरी केलीस तर आपल्याकडे त्याला क्षमा नाही, अशा कृतीला प्रत्यक्ष परमेश्वरही क्षमा करणार नाही.’’
पिढय़ान्पिढय़ांचं संचित म्हणतात ते असंच प्रकटतं अन् ते असंच प्रकटत राहो…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2013 1:02 am

Web Title: dr mhaskars family
टॅग Doctor,Medical
Just Now!
X