डॉ. मुक्ता पुणतांबेकर puntambekar@hotmail.com

आईच्या विचारातून आकाराला आलेलं ‘मुक्तांगण हे व्यसनमुक्ती केंद्र’, पण माझा तिथला प्रवेश सहज सोपा नव्हता. मानसोपचारामधलं  ‘सुवर्ण’शिक्षण, आईची ‘मित्रत्वाची’ तालीम आणि मला हेच करायचं आहे, याची पक्की खात्री झाल्यानंतरच ‘मुक्तांगण’ने मला स्वीकारलं.. आणि आज तीच माझी ओळख बनली आहे. मला घडवणारे आईबाबा आणि व्यसनाधीनतेत अडकलेल्यांच्या पराकोटीच्या चांगल्या-वाईट अनुभवातून जगणं शिकवणारं ‘मुक्तांगण’.. माझ्या गद्धेपंचविशीच्या याच वर्षांनी मला आयुष्यातलं ध्येय दिलं.. जोडीदारही दिला आणि पुढे काय करायचं आहे याचं नेमकं  भानही..   

chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
Rajendra Pawar vs Ajit Pawar
“..आणि तेव्हापासून पवार कुटुंबीयात दुरावा निर्माण झाला”, बारामतीमध्ये निनावी पत्र व्हायरल; राजेंद्र पवार म्हणाले…

माझ्या गद्धेपंचविशीनं मला सर्वात महत्त्वाचं काय दिलं असेल, तर ते म्हणजे ‘मुक्तांगण.’ ती आता माझी ओळखच बनली आहे.

माझे आई-बाबा डॉ. अनिल अवचट आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ अनिता (सुनंदा)अवचट यांनी पु. ल. देशपांडे यांच्या आर्थिक मदतीतून, डॉ. आनंद नाडकर्णी (मानसोपचारतज्ज्ञ) यांच्याबरोबर १९८६ मध्ये ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’ची स्थापना केली. तेव्हा मी महाविद्यालयात शिकत होते आणि अधूनमधून सहज म्हणून ‘मुक्तांगण’ला जायचे. पण तेच करिअर करायचं असं काही तेव्हा ठरवलेलं नव्हतं. १९९३ मध्ये मी पुणे विद्यापीठातून ‘क्लिनिकल सायकॉलॉजी’मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. विद्यापीठात पहिली आल्यामुळे मला कुलपतींचं सुवर्णपदक मिळालं होतं. स्वाभाविकच मी ‘पीएच.डी.’ करायचं ठरवलं. आमच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. म. न. पलसाने हे माझे गाईड असणार होते. त्यांच्याशी चर्चा केल्यावर, व्यसनाधीनतेच्या प्रश्नावर ‘मुक्तांगण’मध्येच संशोधन करावं, असं ठरलं.

त्यामुळे मी रोज ‘मुक्तांगण’ला जायला सुरुवात केली. कुठला विषय निवडायचा हे समजून घेण्यासाठी आधी ‘मुक्तांगण’चं काम समजून घ्यायचं ठरवलं. म्हणून मी रोज आई जिथे बसायची त्या खोलीत बसून ती रुग्णांशी कसं बोलते, ‘ग्रुप थेरपी’ कशी घेते, याचं निरीक्षण करायला सुरुवात केली. महिनाभर मी केवळ हेच करत होते आणि तो एक महिना माझ्या आयुष्यातला ‘टर्निग पॉइंट’ ठरला.

‘मुक्तांगण’मध्ये एक वेगळंच विश्व मला बघायला मिळालं. त्यामुळे मला तिथे काम करायला जास्त आवडेल असं वाटायला लागलं. मी माझ्या सरांबरोबर चर्चा केली आणि त्यांनी मला काम करण्याची परवानगी दिली. त्यामुळे मी निश्चिंत झाले. ‘मुक्तांगण’मध्ये काम करायला सुरुवात केल्यावर मला ‘प्रॅक्टिकल’ ज्ञान हे माझ्या आईकडून, इतर कार्यकर्त्यांकडून आणि अर्थातच रुग्णांच्या अनुभवांतून मिळत गेलं. आईनं जेव्हा ‘मुक्तांगण’ची स्थापना केली, तत्पूर्वी तिनं एकही व्यसनमुक्ती केंद्र बघितलेलं नव्हतं. त्यामुळे तिनं ठरवलं, की ‘मुक्तांगण’मध्ये उपचार घेण्यासाठी जे रुग्ण येतील त्यांच्याकडून आपण शिकू या. त्यानुसार ती उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांशी चर्चा करत असे, त्यांच्या अपेक्षा समजून घेत असे. अशा प्रकारे त्यांच्याकडून शिकतच ‘मुक्तांगण’ची    उपचारपद्धती विकसित होत गेली. रुग्णांकडून शिकण्याची ती परंपरा आम्ही अजूनही सुरूच ठेवली आहे. बाबा (डॉ. अनिल अवचट) नेहमी म्हणतो, ‘मला सगळं समजतं, असं जेव्हा आपल्याला वाटतं, ती आपल्या अधोगतीची सुरुवात असते. आपण नेहमी एक चांगला विद्यार्थी असलोच  पाहिजे.’ लहानपणापासून बाबाचं हे वाक्य ऐकू न ऐकून आता मनावर ठसून गेलं आहे. त्यामुळे मी ‘मुक्तांगण’मध्ये एक विद्यार्थिनी म्हणूनच दाखल झाले.

आईची रुग्णांशी बोलण्याची पद्धत डॉक्टरसारखी नव्हती, तर एक आई आपल्या मुलांशी बोलते, त्या पद्धतीची होती. त्यामुळे रुग्णांबरोबर तिचं खूप छान नातं तयार व्हायचं. ते तिचं ऐकायला तयार व्हायचे. तिच्या सांगण्यानुसार आम्ही ‘मुक्तांगण’मध्ये रुग्णांना ‘मित्र’ म्हणतो. माझ्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी तिच्या खोलीत बसले असताना एक नवीन अ‍ॅडमिट झालेला ड्रग अ‍ॅडिक्ट मित्र समोर येऊन बसला. पिंजारलेले केस, लाल डोळे, चेहऱ्यावर राग,अविश्वास, असा एकूण अवतार होता. आईला त्याचं नाव आधीच माहिती होतं. त्यामुळे त्याच्या नावानं हाक मारून तिनं त्याची चौकशी केली, थोडय़ा गप्पा मारल्या, स्वत:च्या पर्समधून नेलकटर काढून त्याची नखं कापून दिली. तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणीच आलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो आईच्या समोर येऊन बसला, तेव्हा केस कापून, स्वच्छ आंघोळ करून आला होता. त्यानं तिला मोकळेपणानं त्याच्या व्यसनाचा इतिहास सांगितला. हा मित्र नंतर ‘मुक्तांगण’मध्ये खूप दिवस राहिला. व्यसनासाठी पैसे मिळवताना त्यानं खूप गुन्हे केले होते. घरी असताना आक्रमक व्हायचा. पण माझ्या आईच्या त्याच्याशी प्रेमानं वागण्यामुळे त्याच्यात झालेला आश्चर्यकारक बदल मला बघायला मिळाला आणि मला खूप शिकवून गेला.

चांगली समुपदेशक होण्यासाठी रुग्णांकडे माणूस म्हणून बघायची दृष्टी हवी, हे मला शिकायला मिळालं. सुरुवातीच्या दिवसांत व्यसनी लोकांच्या बाबतीत माझ्या मनात एक चीड होती. ‘कशी माणसं असतात ही! इतकी छान पत्नी, सोन्यासारखी मुलं.. हे सगळं असूनही कसं काय व्यसनाच्या अधीन होतात? त्यांच्याकडे बघून तरी ते का सोडत नाहीत?,’ असे प्रश्न मला छळायचे, पण व्यसनमुक्त होऊन ‘मुक्तांगण’मध्ये काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यांनं तेव्हा मला समजावलं, ‘‘आपल्याला जे कळतंय, ते त्यालासुद्धा कळतंय. पण ते समजूनही तो व्यसन सोडू शकत नाहीये. याचाच अर्थ तो नॉर्मल नाहीये, आजारी आहे. त्याला मदतीची आवश्यकता आहे.’’. हे ऐकलं आणि माझे डोळे खाड्कन उघडले. त्यानंतर असले प्रश्न कधीच मनातही आले नाहीत. व्यसनाधीन माणूस हा वाईट नाही, तर तो आजारी आहे, हा एक दृष्टिकोन मला मिळाला. व्यसनाधीन मित्रांची मी ताई झाले.

१९९६ मध्ये मी ‘युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स’, मलेशिया- पेनांग इथं जाऊन ‘अ‍ॅडिक्शन काउन्सिलिंग’चा कोर्स केला. या विषयावर जगभरात काय काम केलं जात आहे, ते समजायला या अभ्यासक्रमाची खूप मदत झाली. त्यानंतर काही वर्षांनी भारत सरकारनं एका ‘एक्सचेंज प्रोग्राम’मार्फत मला फ्रान्सला पाठवलं. तिथे मी खूप व्यसनमुक्ती केंद्रांना भेट दिली. एका केंद्रात मला इंटर्नशिप करायला मिळाली. त्या सर्व केंद्रांमध्ये रुग्णांना खूप सोयीसुविधा दिल्या जात होत्या, पण रुग्ण व्यसनमुक्त राहाण्याचं प्रमाण ‘मुक्तांगण’पेक्षा खूप कमी होतं. याचं कारण आम्हाला लक्षात आलं, की आपल्या देशात ज्या पद्धतीनं कुटुंबीय या रुग्णांना मदत करतात, तशी मदत तिथे केली जात नव्हती. मी परत आल्यानंतर आम्ही उपचारांमध्ये या मित्रांच्या कुटुंबीयांना खूप वेगवेगळ्या प्रकारे सहभागी करून घेणं सुरू केलं.

दरम्यान, आईला कर्क रोगाचं निदान झालं, पण तिच्या कामात कुठलाच खंड पडला नाही. आमच्या घरात आम्ही फार पूर्वीपासून वापरत असलेला ‘तरी बरं’ हा मंत्र तिनं जपला. ‘तरी बरं, मला कॅन्सर झाला. हार्टअटॅकनं किंवा अ‍ॅक्सिडेंटमध्ये अचानक गेले असते, तर राहिलेलं काम पूर्ण करता आलं नसतं. आता मला माहिती आहे की माझ्यापाशी कमी वेळ आहे आणि खूप काम करायचंय,’ या वेगळ्या विचाराचा वापर करत तिनं त्या काळातही खूप काम के लं. ती फक्त ‘केमोथेरपी’च्या दिवशी सुट्टी घ्यायची. दुसऱ्या दिवशी पुन्हा उत्साहानं कामावर हजर! तिच्या शेवटच्या वर्षांमध्ये तिनं ‘टीम बिल्डिंग’साठी खूप प्रयत्न केले. आमच्या सगळ्यांवर जास्तीत जास्त जबाबदाऱ्या सोपवल्या. बाहेरचे तज्ज्ञ आणून आमच्यासाठी व्याख्यानं आयोजित केली. आमच्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला पत्रं लिहिली. ही पत्रं हा आमच्या सगळ्यांपाशी असलेला तिचा अमूल्य ठेवा आहे. १० फेब्रुवारी १९९७ या दिवशी तिचं निधन झालं. त्याआधी काही वर्षं जेव्हा माझ्या आजीचं, आईच्या आईचं निधन झालं होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी ‘मुक्तांगण’मध्ये आधीच ठरवलेला एक मोठा कार्यक्रम होता. स्वत:च्या आईचं निधन होऊनही माझी आई दुसऱ्या दिवशी ‘मुक्तांगण’ ला हजर होती. ती गेल्यावर मीसुद्धा हेच केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि

डॉ. आनंद  नाडकर्णी ‘मुक्तांगण’ला गेलो. आनंद सर्वाना म्हणाला, ‘‘ती आपल्यातून गेलीय असं समजू नका. ती आता आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा भाग झाली आहे. जेव्हा आपल्या मनात प्रश्न येईल, नेमकं काय करावं हे समजणार नाही, तेव्हा तिनं काय सांगितलं असतं, असा विचार करा आणि तुम्हाला उत्तर मिळेल.’’ आई गेल्यानंतर बाबा संचालक आणि मी उपसंचालक म्हणून ‘मुक्तांगण’चं काम बघू लागलो.

सुरुवातीचे दिवस मी खूप तणावाखाली होते. आई गेल्याचं दु:ख होतंच, त्यात ‘मुक्तांगण’ची आर्थिक परिस्थितीही  फारशी चांगली नव्हती. आम्हाला तेव्हा सरकारी अनुदान मिळायचं. पण ते कधीच वेळेत यायचं नाही. कार्यकर्त्यांचे पगार तर वेळेवर द्यायलाच लागायचे. या सगळ्यात माझी खूप ओढाताण व्हायची. मग मी एकदा माझ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेतलं. आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि आपल्याला आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र कसं होता येईल याचा आम्ही विचार करायला लागलो. व तसं करत गेलो. आमच्या प्रशिक्षण केंद्रामुळे पुढे तर सरकारी मदत घेण्याची गरजच उरली नाही.

माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीनं मी ‘मुक्तांगण’च्या ‘डॉक्युमेंटेशन’कडे खूप काटेकोर लक्ष दिलं. त्याची फळं खूप चांगली मिळाली. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मुख्य म्हणजे ‘आय.एस.ओ.’ हे जागतिक दर्जाचं प्रमाणपत्र मिळालं. हे प्रमाणपत्र मिळाल्यावर आम्ही एक पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि खूप अभिमानानं आम्ही आमच्या ‘आय.एस.ओ.’ बद्दल सांगत होतो. कार्यक्रमाच्या शेवटी बाबा म्हणाला, ‘‘माझ्या दृष्टीनं हे सर्टिफिकेट म्हणजे फक्त एक कागदाचा तुकडा आहे. आपलं खरं सर्टिफिकेट कोणतं, तर आपल्या रुग्णांच्या चेहऱ्यावरचं समाधान, त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद. त्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे.’’ बाबाच्या बोलण्यानं आम्ही खरंच जमिनीवर आलो. ‘प्रोफेशनल’ राहूनही आपल्या संस्थेच्या मूल्यांना धक्का न लावता तळागाळातील लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल, हाच आम्ही प्रयत्न करू लागलो.

आई गेल्यानंतर बरोबर एक महिन्यानं- १० मार्च १९९७ ला तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ आम्ही ‘सहचरी’ गटाची स्थापना केली. ‘सहचरी’ हा व्यसनाधीन रुग्णांच्या पत्नींचा आधार गट आहे. असा गट सुरू करावा ही आईची इच्छा होती. नंतर या स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभं राहाता यावं म्हणून सहचरी प्रकल्प सुरू केला. महाराष्ट्रातल्या हजारो स्त्रियांना आज या गटाच्या रूपानं आधार मिळाला आहे.

आई गेली तेव्हा माझं वय होतं सव्वीस वर्षं. गद्धेपंचविशीमध्ये मी ‘मुक्तांगण’च्या कामात गुंतून गेले. हे सगळं सुरू असतानाच माझा मित्र आशीष पुणतांबेकर याच्याशी माझं लग्न झालं. माझ्या आई-बाबांचं एक आदर्श सहजीवन मी लहानपणापासून बघत होते. त्यामुळे सहजीवन कसं असावं, हे शिकायला मिळत होतं आणि ‘मुक्तांगण’मध्ये समुपदेशन करताना कित्येकदा सहजीवन कसं नसावं, हेसुद्धा शिकायला मिळत गेलं. त्यामुळे आम्ही सुरुवातीलाच ठरवलं, की आपलं लग्न झालं तरी आपण ‘संसारी’ व्हायचं नाही, तर एकमेकांचे मित्र-मैत्रीणच राहायचं. लग्नाचा ‘रौप्यमहोत्सव’ साजरा केल्यानंतर मी अभिमानानं सांगू शकते, की आमच्यातली मैत्री अजूनही कायम आहे.

माझी धाकटी बहीण यशोदा (यशो) आणि मला माझ्या आई-बाबांनी खूप वेगळ्या प्रकारे वाढवलं. यशोला असलेल्या ‘एपिलेप्सी’च्या (अपस्मार- फिटस् येणं) आजाराशी तिला आईनं मैत्री करायला शिकवलं. पुढे मेंदूची शस्त्रक्रिया करून तिचा आजार बरा झाला. पण तिच्या ‘संवेदना’ या गटामार्फत आता ती एपिलेप्सीच्या क्षेत्रातच काम करते. आम्हाला दोघींना आई-बाबांनी झोपडपट्टीत असलेल्या महानगरपालिकेच्या शाळेत घातलं. आपल्या देशात कशा पद्धतीनं लोक राहातात, हे आम्ही लहानपणापासून बघत आलो आणि बहुधा यामुळेच आम्ही दोघीही सामाजिक क्षेत्रात काम करायला लागलो.

माझ्या दोन मुलांचा- ईशान आणि कावेरीचा जन्म ही माझ्या आयुष्यातली सर्वात आनंदाची घटना मला वाटते. मी जेव्हा आई झाले तेव्हा एक ‘वर्किंग मदर’ची भूमिका मला सुरुवातीला जड गेली. पण सासू-सासऱ्यांची मदत होती आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मुलांना हवं तेव्हा मी ‘मुक्तांगण’ला बरोबर घेऊन जाऊ शकत होते. त्यामुळे माझं आईपण खूप अवघड गेलं नाही.

गेल्या काही वर्षांत व्यसनाधीनतेच्या प्रश्नामध्ये काही नवीन प्रवाह आले आहेत. व्यसनाधीनतेचा सरासरी वयोगट खाली येत चालला आहे. खूप लहान वयातली मुलं व्यसनाच्या आहारी जात आहेत. तसं स्त्रियांमध्ये, लहान मुलींमध्येही व्यसनाचा प्रश्न वाढतो आहे. पूर्वी व्यसन फक्त अमली पदार्थाचं केलं जायचं. आता इंटरनेटच्या व्यसनाची एक नवीनच समस्या भेडसावते आहे.

गरजेनुसार या प्रत्येक प्रश्नावर आम्ही काम सुरू केलं. हे काम करत असताना माझ्या लक्षात येतं की मी फक्त एक समुपदेशक, एक कार्यकर्ती म्हणून हे करत नाहीये. मला माझ्या मुलांसाठी

एक चांगलं जग निर्माण करावंसं वाटतं, म्हणून करते आहे.

आज पाठी वळून बघताना, हे सगळं लिहिताना सरळ सोपं वाटतंय, पण या दरम्यान खूप अडचणीचे प्रसंग आले. कित्येक वेळा तर मी खचून गेले. बाबाच्या, आनंदच्या शांतपणे बोलण्यामुळे बाहेर येऊ शकले. ‘समस्यांकडे एक ट्रेनिंग प्रोग्राम म्हणून बघ,’ असं बाबाचं वाक्य ऐकलं की मी त्या प्रसंगातून काय शिकता येईल याचा विचार करायला लागते आणि माझी निराशा मागे पडते. टीम चांगली असेल तर कुठल्याही समस्यांना आपण तोंड देऊ शकतो. ‘मुक्तांगण’मध्ये सुरुवातीपासूनच व्यसनातून बरे झालेले कार्यकर्ते आणि व्यावसायिक कार्यकर्ते असा बॅलन्स ठेवला गेला. करोनाच्या परिस्थितीत ‘मुक्तांगण’च्या टीमनं केलेल्या प्रचंड कामाबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच वाटतं.

आता थोडय़ाच दिवसात मी माझा पन्नासावा वाढदिवस साजरा करणार आहे आणि त्याच वेळी ‘गद्धेपंचविशी’बद्दल लिहिते आहे. खरं तर रोज इतकं काही नवीन नवीन शिकायला मिळत असतं,अनुभव येत असतात, की गद्धेपंचविशीतून मी बाहेर आले आहे असं मला वाटतच नाही. याची मला जाणवणारी बरीच कारणं आहेत. बाबा, मी आणि यशो असं आमचं तिघांचं एक छोटंसं जग आहे. अजूनही आमच्या वाढदिवसाला बाबानं काय प्रेझेंट द्यायचं याबद्दल आम्ही हट्ट धरतो, तर कधी आम्ही दोघी मिळून त्याच्याविरुद्ध आघाडी उघडतो! मी, आशीष आणि मुलं असंही आमचं एक वेगळं जग आहे. दरवर्षी देशात आणि परदेशात आम्ही प्रवास करतो. ट्रेकिंग किंवा साहसी प्रकार आवर्जून करतो. हे बाहेरचं मोठ्ठं जग बघितल्यावर आपण त्यामानानं खूपच छोटे आहोत हे लक्षात येतं. निसर्गाची भव्यता नम्र राहायला शिकवते. चाळिशी उलटल्यावर मला ‘फिटनेस’चं वेड लागलं. आम्ही ‘मॅरेथॉन’ पळायला लागलो. त्यामुळे आता सायकलिंग, धावणं (रनिंग) या सगळ्यात वय पुढे जाण्याऐवजी मागे जाऊ लागलं..

आणि आणखी एक जग म्हणजे लहानपणीच ओळख झालेलं पुस्तकांचं जग. आई-बाबामुळे आवडत्या पुस्तकांचे कित्येक लेखकसुद्धा प्रत्यक्ष भेटले. शांताबाई शेळके, भा. रा. आणि लीलावती भागवत, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, नरेंद्र दाभोलकर, सुमित्रा भावे असे कितीतरी ग्रेट लोक आमचे मावशी किंवा काका होते. मुख्य म्हणजे पु. ल.आणि सुनीताबाई देशपांडे यांचा सहवास लाभला. ते संस्थांना देणगी देऊनही कधीच स्वत:चं नाव त्या संस्थेला देत नसत. अशा लोकांकडून कितीही शिकलं तरी कमीच होतं. कधी एखादं पुस्तक वाचायला काढलं की त्यावर खास माझ्यासाठी त्या लेखकानं लिहिलेला संदेश दिसतो. मग मी ज्या भाबडय़ा वयात त्यांची सही घेतली होती, तीच  ‘मुक्ता’ होऊन जाते. कितीही मोठं व्हायचं ठरवलं, तरी अगदी शाळा-कॉलेजपासून असलेले किंवा नंतर नव्यानं झालेले मित्रमैत्रिणी मला मोठं होऊच देत नाहीत. एखादा महत्त्वाचा पुरस्कार मिळाला किं वा अभिनंदनाचा वर्षांव होत असताना हे भेटतात, चेष्टामस्करी करतात आणि ‘अरे! मी अशी कोणी मोठी व्यक्ती नाहीये. यांची फक्त एक मैत्रीण आहे,’ हे लक्षात येतं. आणि महत्त्वाचं म्हणजे ‘मुक्तांगण’ हे माझं विस्तारित कुटुंब. ‘तुला भाऊ नाही का?’ असा प्रश्न मला कोणी विचारतं, तेव्हा मी अभिमानानं सांगते, ‘मला तर पंचवीस हजार भाऊ आहेत!’. आता ‘मुक्तांगण’ची मी जरी संचालक असले तरी माझ्या सर्व भावांना नेहमीच असं वाटतं, की माझी जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे संचालकाच्या भूमिकेत जायचा प्रश्नच येत नाही.

आई-बाबानं जाणीवपूर्वक आम्हाला घराबाहेरच्या अवकाशाची सतत ओळख करून दिली होतीच. पण ऐन ‘गद्धेपंचविशी’त ‘मुक्तांगण’शी जवळचं नातं जोडलं गेल्यावर ती कक्षा व्यापक होत गेली.. आज ती इतकी विस्तारत गेली आहे की जितकं  काम करू तितकं  थोडंच आहे.. द स्काय इज द लिमिट..