डॉ. नीलिमा गुंडी

nmgundi@gmail.com

‘‘आपली भाषा आपल्याला मुलांच्या नजरेतून जास्त चांगली कळते. भाषेतल्या खाचाखोचा कळतात. तिच्यातले व्याकरणाच्या दृष्टीने असलेले चकवे कळतात. याचा अनुभव मला माझ्या नातीबरोबरच्या संवादातून येत आहे.’’ २७ फेब्रुवारीला भाषा दिन साजरा करण्यात आला, त्यानिमित्ताने बालभाषेच्या निरीक्षणावर आधारलेला लेख.

शब्दांचा अंकुर कसा फुटतो, हे मी गेली तीन वर्षे अनाहिताच्या, माझ्या नातीच्या लडिवाळ भाषेतून अनुभवत आहे. ओल्या मनाच्या मातीत एकेक अक्षर कसं रुजतं, त्याचं ध्वनिरूप पकडता आलं की बालमन कसं मोहरून येतं, हे पाहणं ही माझ्यासाठी एक अद्भुत वाटावी अशी घटनाच आहे.

अनाहिता वर्षांची होण्याच्या आधीपासूनच मी तिला गाणी, गोष्टी सांगत असे. त्यातले काही शब्द, काही उच्चारांच्या लकबी, इतकंच काय, काही हातवारे तिनं अचूक लक्षात ठेवले आहेत. त्यामुळे ती माझ्या बोलण्याची अगदी नक्कल करते. मात्र ती केवळ पोपटपंची करत नाही. ती स्वतची अक्कलही अधूनमधून दाखवते. आई मुक्ता आणि बाबा सागर तसंच तिच्या वंदनाआजी यांच्यामुळेही ती सतत शब्दसुरांच्या सहवासात मजेत वाढत आहे. मी तिला सहा-सात महिन्यांची असताना ‘छान छान छान, मनीमाऊचं बाळ कसं गोरं गोरं पान’ हे गाणं ऐकवत असे. त्यातले ‘दुडूदुडूदुडू’ हे शब्द तिला फार आवडत असत. ते शब्द येण्याआधीच ती खुदुखुदु हसू लागत असे. इतक्या लहान वयात अर्थज्ञान नसतानाही ती उच्चाराचा – शब्दाच्या नादरूपाचा आनंद लुटत असे. तिचे कान किती तल्लख झाले आहेत, याचा एकदा आम्हाला अनपेक्षितपणे अनुभव आला. गणपतीच्या आरतीत ‘मुक्ताफळांची’ हे शब्द ऐकताच तिनं त्यात उत्स्फूर्तपणे भर घातली ‘अनाहिताफळाची’, ‘सागरफळाची’ म्हणजे फक्त आईचं नाव असून कसं चालेल? तिनं आणखी दोन नावं घालून ती ओळ जणू तिच्या दृष्टीनं परिपूर्ण केली होती. मी तिच्या आवडत्या खारूताईवर एक कविता केली आहे. ती कविता तिला अभिनयासह पाठ आहे. त्यात  ‘कुठे चाललीस उंचावर?’ असा प्रश्न आहे. गंमत म्हणजे तिचा बाबा एकदा स्वयंपाकघराच्या ओटय़ावर चढून घर साफ करत होता. त्याच्याकडे पाहात तिने एकदम ती कविता म्हणायला सुरुवातच केली. कविता तिला अर्थासकट पाठ झाली असल्याचं तिनं आम्हाला जणू दाखवून दिलं.

‘टंगळ मंगळ जुळे भाऊ’ ही माझी कविताही तिला आवडते. एकदा ‘मंगळसूत्र’ हा शब्द तिच्या कानी पडला आणि ती ‘टंगळ मंगळ’ म्हणत नुसती हसतच सुटली. अनाहिताला स्वत:च्या भावना व्यक्त करताना कधीकधी नवे शब्द सापडत असतात. तिला भरवताना मी एकदा काही कारणाने खुर्चीवरून सारखी उठत होते. तिने मला अगदी बजावलं, ‘‘निलूआजी, तू खुर्चीवर घट्ट बस.’’ लाडात आली की ती दोन्ही हात लांब करत, मान वेळावून मला म्हणते,

‘‘तू मला दहा आवडते.’’ हा तर माझ्यासाठी जीवनगौरव पुरस्कारच!

ती दोन वर्षांंची झाल्यापासून तिला गोष्टी ऐकण्यात रस वाटू लागला आहे. बुटबंगन महाराजांची गोष्ट साभिनय ऐकताना ती हरखून जाते. तिच्या गोष्टींमध्ये तिचे भावजीवन सामावलेले असणे मात्र गरजेचे असते. त्यामुळे सध्या तिचा बाबा नोकरीमुळे दुसऱ्या गावी राहतो, त्याची ती फार वाट पाहत असते. हे लक्षात घेऊन तिला सांगितलेल्या अनेक गोष्टींचा शेवट ‘बाबाला त्याच्या मुलीनं मिठी मारली,’ असाच मला करावा लागतो.

मी तिला शिवाजी महाराज आणि सावळ्या यांची गोष्ट सांगितली आहे. गोष्टीला अनुरूप अशा ओळी मी तिला शिकवल्या आहेत. त्या अशा, ‘खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधडय़ा उडवीन राई राईएवढय़ा’ या ओळी म्हणायला तिला फार आवडतात. एक दिवस तिचा आबा तिला काहीतरी कारणाने रागावला. त्याबरोबर तिने त्याला त्या ओळी साभिनय म्हणून दाखवल्या. शब्दांचा एखाद्या शस्त्रासारखा वापर करता येतो, हे तिला शिकवावे लागले नाही. भाषेचे ज्ञान पूर्णपणे होण्याच्या आधीही भाषेची नाना प्रयोजनं मुलांना कळू शकतात तर!

आपली भाषा आपल्याला मुलांच्या नजरेतून जास्त चांगली कळते. भाषेतल्या खाचाखोचा कळतात. तिच्यातले व्याकरणाच्या दृष्टीने असलेले चकवे कळतात. याचाही अनुभव मला येत आहे. एक दिवस मी तिला भटजीची गोष्ट सांगत होते. भटजीने जेवण केले. अर्थात गोष्टीतल्या जेवणात तिच्या आवडत्या पदार्थाची नावे होतीच. जेवल्यावर भटजीने पोटावर हातबित फिरवला, असे मी म्हटले. त्यासरशी ती मला म्हणाली, ‘‘थांब.’’ आणि तिनं क्षणार्धात म्हटलं, ‘‘दिवाबिवा , पिशवीबिशवी ,पडदा बिडदा, उशीबिशी. आता सांग.’’ म्हणजे माझा ‘हातबित’ हा शब्दप्रयोग वेगळा आहे, हे तिनं हेरलं , त्याचा उपयोग जवळच्या वस्तूंवर तिनं करून दाखवला आणि मग मला गोष्ट पुढे सांगायची परवानगी दिली. असे अभ्यस्त शब्द आपण कधीकधी वापरत असतो. मराठीची ही एक खास भाषिक लकब आहे. मला माझ्या नातींकडे ती लकब जणू वारसा सोपवावा, तशी पोहोचवता आली, याचा आनंद झाला नि त्याचवेळी आपण फार अघळपघळ तर बोलत नाही ना? -असा प्रश्नही पडला. अनाहिता तीन वर्षांपर्यंत गांधीनगरमधल्या ‘आयआयटी’च्या आवारात राहत होती. त्यामुळे तिच्यावर बहुभाषिक संस्कारही झाले आहेत. तिथल्या

‘डे केअर’मध्ये शिकवलेलं ‘एक बिलाडी जाडी’ हे गुजराती गाणं तिला येतं, तसंच काही इंग्लिश व हिंदीही गाणी तिला येतात. एकदा

एका इमारतीवरची रोषणाई पाहून तिनं पटकन म्हटलं, ‘लाईक अ डायमंड इन द स्काय’ खरंच, हल्ली भाषा शिकवताना दृश्य माध्यमांची मदत घेतली जात आहे, त्याचा चांगला परिणामही होऊ शकतो.

सध्या अनाहिता मला गोष्टींची पुस्तकं सतत वाचून दाखवायला लावते. अनेक गोष्टी तिला पाठ झाल्या आहेत. माधुरी पुरंदरे यांच्या यशविषयीच्या गोष्टी तिला फार आवडतात. त्यातली पात्रं तिच्या मनात वावरत असतात. त्यातल्या अनुसारखी तिलाही केसांना कधी रिबीन बांधायची असते. अनाहिताला झोपवताना मी एक गाणे म्हणते. ते गाणं म्हणजे जणू  स्तोत्र आहे. त्यात मी म्हणते : अनाहिता माझी लाडकी, अनाहिता माझी लाडकी. दिसते कशी सांगू का? जुईच्या फुलासारखी!

सध्या मी जणू त्या जुईच्या फुलातला भाषेचा गंध अनुभवत आहे. अगदी खोलवर हुंगून घेत आहे!