डॉ. रवीन थत्ते rlthatte@gmail.com

पंचविशीला ‘गद्धेपंचविशी’ म्हणताना हा काळ कधी तरी संपणार हेही गृहीत धरलेले असावे. माझी ‘पंचविशी’ मात्र तेरा वर्षांचा असताना जी सुरू झाली, ती आता वयाची ८२ वर्षे पूर्ण झाल्यावरही थांबण्याचे नाव घेत नाही. परिणामांचा विचार न करता माझं उधळणं चालूच राहिलं! आपले मूळचे काम हाती असतानाही नसते लचांड गळ्यात घेण्याचे उद्योग मी एकविसाव्या वर्षांपासून करत आलो. पंचविशीमध्ये जो बिनधास्तपणा अंगी भिनलेला असतो तो होताच, पण ‘मी एक निमित्त आहे’ ही प्रगल्भता हळूहळू शिकत गेलो. एकापाठोपाठ झालेल्या अनेक ‘पंचविश्यां’चे हेच संचित आहे.

Shash Mahapurush Rajyog
३० वर्षांनी ‘शश राजयोग’ बनल्याने ‘या’ तीन राशी होणार प्रचंड श्रीमंत? शनिदेवाच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो पैसाच पैसा
Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
second wife of an invalid marriage may not complain of harassment but of dowry
अवैध लग्नाची दुसरी पत्नी छ्ळाची नाही, पण हुंड्याची तक्रार करू शकते
accused in child sexual abuse case arrest after three years
बाललैंगिक अत्याचारप्रकरणी तीन वर्षांनंतर आरोपीस अटक

गद्धेपंचविशीतला गाढव हा शब्द प्राणीमित्रांना आवडेल असे वाटत नाही. एका गाढविणीचे पिल्लू चौफेर उधळत होते तेव्हा त्याच्या आईने ‘माणसासारखा वागू नकोस’ असे सांगितल्याची गोष्ट सांगतात. गाढव दमले की ते लोळते, (हात) पाय झाडते तेव्हा ते आसने करीत असते. त्याला प्रशिक्षक लागत नाही. ते स्वावलंबी आणि हुशार असते. तेव्हा या लेखात केवळ ‘पंचविशी’ एवढाच शब्द वापरला आहे. हल्ली वर्ण, वंश आणि लिंग या विषयांबद्दलदेखील फार जपून बोलावे लागते. बुद्धिबळात पांढरे मोहरे आणि प्यादी असलेल्या व्यक्तीने पहिली चाल करण्याच्या सध्याच्या नियमाविरुद्ध मोहोळ उठले आहे. या परिस्थितीत भाषेचे काय होणार? मुखपट्टय़ा तर आहेतच. तेव्हा पुढे ‘शब्देवीण संवादिजे’ असे होणार की काय?  ते काळच ठरवेल.

वयाची ही जी पंचविशी आहे, ती परिणामाचा विचार न करता उधळण्याची आहे आणि ते संप्रेरकांमुळे (हार्मोन्स) घडते असे आपल्याला विज्ञान सांगते. त्यात ‘पंचवीस’ हा आकडा ढोबळ आहे. कारण सूर्योदय होण्यापूर्वी पहाटेचे तांबडे फुटते या नियमाप्रमाणे ही पंचविशी वयाच्या पंधरा वर्षांच्या आसपास सुरूहोते, असा स्वानुभव आहे. आणखी एक स्वानुभव असा, की लवकरच मी ८२ वर्ष पूर्ण करणार असलो, तरी माझी ‘पंचविशी’ थांबण्याची लक्षणे दिसत नाहीत. साक्षीभावाने जगावे म्हणजे सुख लागते, असे गीता आणि ज्ञानेश्वर म्हणतात ते एक आदिम सत्य आहे. मी सुस्थितीत जन्मलो, परंतु ती अनुभवण्याऐवजी स्वत:च्या स्वभावामुळे दु:स्थिती ओढवून घेतली त्यांचेही कालानुरूप वर्णन म्हणजे हा लेख.

माझी पंचविशी सुरूहोण्याच्या आधीच माझे चरित्र तेराव्या वर्षी तीन तथाकथित गुन्ह्य़ांनी सुरू झाले. शाळेत असताना संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात पुण्यात सत्याग्रह चालू होते. तेव्हा मला अटक झाली तरी चालेल, या भावनेने सत्याग्रहाच्या ठिकाणी गेल्याचे आठवते. परंतु तसे काही झाले नाही. पोलिसाने मला अटक तर केलीच नाही, पण पाठीवर एक धपाटा मारून घरी हाकलून दिले. पुढे सोळा वर्षांचा असताना मी सांगलीला कॉलेजमध्ये होतो. आईवडिलांनी मला प्रेमाने महागडी ‘मॅक्सफ्लाय’ बॅडमिंटनची रॅकेट आणली होती. ती सायकलमध्ये अडकून मोडली, तेव्हा ‘तुला पैशाची किंमत कळत नाही,’ हे वाक्य जिव्हारी लागले होते. मग वडिलांचा बूट पॉलिशचा डबा चोरून ‘आता पैसे मिळवूनच दाखवतो,’ असे ठरवून मी गुपचूप घरातून पळून गेलो आणि मिरज गाठले. दहा तासांत माझे कपडे आणि गोरागोमटा चेहरा बघून माझ्याकडून बूट पॉलिश करून घेईल असे एकही गिऱ्हाईक मला मिळाले नाही. मग खिशात पैसे नाहीत आणि भूक तर लागलेली अशा स्थितीत मी विनातिकीट  घरी परतलो तेव्हा आईने रडत रडत आणि हसतही मला जवळ घेतल्याचे आठवते. तिसरे प्रकरण मी एकवीस वर्षांचा असतानाचे आणि जास्त गंभीर होते. त्या वेळी मी एका रुग्णालयात सर्जिकल हाऊसमन होतो. दररोज दुपारी चारला दुसऱ्या दिवशीच्या शस्त्रक्रियेसाठी सात-आठ रुग्ण दाखल होत असत. त्यांची लघवी आणि रक्त तपासण्याची जबाबदारी हाऊसमनवर असे. ते कोणीच कधी करत नसे. तशीच पद्धत होती, कारण तसे करणे अशक्यच असे. काही तरी आकडे किंवा अहवाल लिहून वेळ मारून नेली जायची. मीही तेच केले, परंतु एका हितशत्रूमुळे पकडला गेलो. आगाऊ लोकांना नेहमी हितशत्रू असतात. त्यातला मी एक. माझ्यावर शिस्तभंग आणि अनैतिक वागणूक म्हणून आरोप झाला. मला डीनच्या कार्यालयात सुनावणीसाठी बोलावण्यात आले. तेव्हा ‘माझे चुकले, मी राजीनामा देतो,’ असे सांगून मी मोकळा झालो. त्यामुळे अधिकाऱ्यांची जरा पंचाईतच झाली, कारण मी गयावया करीन अशी त्यांची अपेक्षा असणार. झालेली चूक कबूल करणे यात थोडा त्रास होतो, मात्र नंतर खूप शांतता मिळते. परंतु त्यानंतर ‘माझ्या आणखी मागे लागलात तर या प्रकरणाचे भांडे मी फोडीन आणि आतापर्यंत इथे काय चालले होते याला वाचा फोडीन,’ असेही मी सांगितले. त्यावर स्तब्धता पसरली. मी एका अर्थाने सुटलो, पण त्यानंतर  ते हॉस्पिटल सोडून मला शीवच्या (सायन) टिळक रुग्णालयात पलायन करावे लागले. पण या प्रसंगानंतर पद्धती बदलल्या. रुग्णांच्या या तपासणीच्या वेठबिगारीतून हाऊसमन लोकांची मुक्तता झाली आणि ते काम प्रयोगशाळेकडे देण्यात आले. या पलायनामुळे माझे शिक्षण थोडेफार लांबले आणि तीनच्या ऐवजी चार वर्ष चालले.

त्या काळात सगळ्याच रुग्णालयांत निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची परवड होत असे आणि ते किडामुंगीचे जीवन जगत असत. त्या असंतोषाचा जो भडका उडाला, त्याची ठिणगी माझ्यामुळेच पडली आणि निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा टिळक रुग्णालयातला पहिला संप मागण्या मान्य करून यशस्वी झाला. काळाच्या प्रवाहात माझा स्वभाव निमित्त मात्र ठरला याचं हे उत्तम उदाहरण आहे. हल्ली ‘मार्ड’ हे नाव वारंवार डॉक्टरांच्या संपाच्या वेळी ऐकू येते. त्याचा उगम १९६४ च्या दरम्यान झालेल्या त्या पहिल्या संपात होता. त्यानंतर जवळजवळ सात-आठ वर्षांनी शिकागोतल्या कुक कौंटी रुग्णालयात अशीच परिस्थिती उद्भवली. मी तिथे त्या वेळेला शिकत होतो. तेव्हा तिथल्या काही भारतीय डॉक्टरांनी मला ‘हाच तो मुंबईचा संपवाला’ म्हणून हेरला आणि ते लचांडदेखील मी गळ्यात घालून घेतले. तो संपही यशस्वी झाला. तिथलीही नोकरी मग सोडावी लागली. माझा व्हिसा केवळ त्या रुग्णालयाशी संबंधित होता. तेव्हा बाकीची दीड वर्ष एक बेकायदेशीर रहिवासी म्हणून अमेरिकेत राहून जे थोडेफार शिक्षण मिळाले ते घ्यावे लागले. तेव्हा कधी ‘इमिग्रेशन’वाले येतील अशी भीती वाटत असे, पण रात्री झोप लागली नाही असे काही घडले नाही. तुम्हाला झोप येवो अगर न येवो, काळ चालतच राहातो. तेव्हा झोपमोड करण्यात काहीच हशील नसतो.

मी भारतात परत आलो १९७३ मध्ये. प्लास्टिक सर्जरीचा व्यवसाय सुरू केला, पण इतर उपद्व्याप सुरूच होते. मी जिथे राहातो तिथल्या एका उद्यानासाठी राखून ठेवलेल्या भूखंडावर एका उद्योगपतीचा डोळा होता आणि तो भूखंड त्याने बळकावला. एकदा लढा देऊन तो सोडवून घेतला, पण मी बेसावध झालो आणि तो त्यांनी परत बळकावला. ‘पुन:श्च हरि ओम’ म्हणून जवळजवळ तीस वर्ष लढा द्यावा लागला. प्रकरण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापर्यंत गेले. त्यांना मी विचारले, ‘‘हा भूखंड तुमच्या घराशेजारी असता तर तुम्ही काय केले असते?’’. कोर्टकचेऱ्या केल्या, सत्याग्रह केला. मग प्रकरण सुटल्यावर तिथे वृक्षारोपण केले. चळवळ चालू असताना काही मित्रांचे शत्रूत परिवर्तन झाले. प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागला. परंतु शेवटी तिथे उद्यान उभे राहिले. आतापर्यंत उल्लेख न केलेले माझे वैद्यकीय क्षेत्रातले ‘तथाकथित’ यश (-त्याबद्दल नंतर) बघता खरे तर ‘त्या अमुक रुग्णालयात तुम्हाला नेमणूक देतो, तुम्हाला स्वतंत्र विभाग देतो,’ ही प्रलोभने मी खुशीने नाकारली. त्या उद्यानात हल्ली शेकडो लोक फिरायला येतात. समाजाला पर्यावरण या विषयाची चाहूल लागण्याचा तो काळ होता आणि मी एक निमित्त ठरलो.

अर्थात ‘प्लास्टिक सर्जरी’ या विषयाची पाठ मी आजपावेतो सोडलेली नाही. त्याची सुरुवात तर फारच वाईट झाली. माझी मुले लहान असताना जनरल सर्जरीची प्रॅक्टिस गुंडाळून घरातच अभ्यास करून प्लास्टिक सर्जरीची परीक्षा देण्याचा एक जरा साहसी प्रयत्न मी केला. परीक्षा बरी झाली, पण ‘अधिकृत वरदहस्त’ नसलेल्या मला ‘हा तर उपटसुंभ’ म्हणून डावलण्यात आले. त्यांचे योग्यच होते. व्यवस्था महत्त्वाची असते. मग अमेरिकेत शिकत असताना संपाचे लचांड घडले. पण माझ्या हिकमती स्वभावामुळे मी टिकलो. थोडाफार चमकलो. अमेरिकेला चलाख लोक हवे असतात, शहाणे नव्हे; असे माझे मत आहे. मी बेकायदेशीर रहिवाशी असूनही मला नोकरी देणारा म्हणाला, ‘‘तू व्हिसाची कशाला काळजी कशाला करतोस? मी तुला नागरिकत्व देण्याची व्यवस्था करतो.’’ आणि मला त्याने चांगल्या हुद्दय़ाची नोकरी देऊ केली. परंतु ‘पंचविशी’ माझ्या पाचवीला पुरली असल्यामुळे ‘सागरा प्राण तळमळला.. ने मजसी ने परत मातृभूमीला,’ ही भावना मनात घेऊन परत आलो. भारतात भारतातल्या परिस्थितीला साजेशा शस्त्रक्रिया करण्याच्या प्रयत्नात एकदा एक कल्पना सुचली आणि जणू लॉटरी लागली. ज्या काळात परदेशातल्या नियतकालिकांत आणि पाठय़पुस्तकांत भारतीयांचे नाव जवळजवळ नसेच, तेव्हा तिथे माझे नाव झळकू लागले. विज्ञान जगातही दरबार असतात. तिथे एकदा चंचूप्रवेश मिळाला, की असल्या नव्या दरबाऱ्यांना शोधनिबंध प्रसिद्ध करणे जास्त सुलभ असते हे सत्य आहे आणि ते मी अनुभवले आहे. हे सत्य कालातीत आहे. त्या काळात जे संपादक भेटले, ते उदारमतवादी होते,  भारतधार्जिणे होते. अशा तऱ्हेने काळ मला अनुकूल ठरला. एके काळी नापास झालेल्या मला कल्पना सुचाव्यात, नंतर मी लिहावे, सांगावे आणि त्यांनी ऐकावे, प्रसिद्ध करावे असे झाले. परदेशात प्रसिद्ध होतो, म्हणून इथेही भारतात माझे नाव झळकत राहिले. त्या ओघात पारितोषिकांची लयलूट झाली आणि नंतर मला चक्क ‘फु लब्राईट’ स्कॉलरशिप मिळाली. तिथे अमेरिकेत पोहोचल्यावर मीच शोधलेल्या एका शस्त्रक्रियेमध्ये टीचभर संशोधन करण्यासाठी एक वर्ष काढावे लागेल, हे बघून ऐकून माझी ‘पंचविशी’ परत जागली. त्यातले सहा  महिने कुत्र्यांवर प्रयोग करण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी लागणार होते. एका वर्षांत टिळक रुग्णालयात मी किती तरी जास्त परोपकार करू शकेन, या भावनेने प्राण परत एकदा तळमळला आणि मी ती सुवर्णसंधी नाकारून परत आलो. ते घडण्याचे कारणही स्वभावच. लोक मला हसले पण. ‘लोकांनी मला हसणे’ याची मला सवय आहे.

या साऱ्या झगमगण्यामुळे मला भारतात, भारताबाहेरील परिषदांमध्ये बोलवण्याची जणू प्रथाच पडली. अशाच एका गोवा परिषदेला जाताना डेरवण या कोकणातल्या गावात एक बऱ्यापैकी चांगले बांधलेले रुग्णालय दिसले. मराठीतला ‘खाज’ हा शब्द फारसा सभ्य नसला, तरी मी तिथे जे विचारले त्याला खाजच म्हटले पाहिजे. ‘इथे येऊन मी विनामूल्य प्लास्टिक सर्जरी करू का?’ असा तो प्रश्न होता. मी तेव्हा साठी ओलांडली होती, पण स्वभावातली ‘पंचविशी’ चालूच होती आणि काळानेच तो प्रसंग घडवला होता. तिथे त्यानंतर स्वत:च्या सहकाऱ्यांचा ताफा घेऊन अनेक वर्ष  विनामूल्य शस्त्रक्रिया केल्या. परंतु माझ्या आक्रमक आणि अपारंपरिक स्वभावामुळे पुढे तिथेही अवज्ञा आणि खप्पामर्जी होण्याचा प्रसंग उद्भवला आणि मला ती जागा आणि तिथले काम सोडावे लागले. परंतु दोन घ्यावे दोन द्यावे, या न्यायाने मी ते फार मनाला लावून घेतले नाही. पंचविशीचा तो एक गुण असतो. त्याला ‘बिनधास्तपणा’ म्हणतात. तिथल्या दोन सर्वेसर्वाशी माझे संबंध अजूनही अगत्याचे आणि स्नेहपूर्ण आहेत. त्याचे कारणही तसेच आहे.

ज्यांच्याशी मतभेद होतात त्यांना शत्रू समजणे मूर्खपणा आहे, हे मला काळानेच शिकवले आहे. त्याबद्दल आता थोडे लिहितो. घरात घडलेल्या एका अनपेक्षित जीवघेण्या गोष्टीमुळे आणि तितक्याच अनपेक्षित वैद्यकीय शाखेतल्या यशामुळे हादरून जाऊन ही सगळी काय भानगड आहे हे शोधण्यासाठी मी वयाच्या चाळिशीत ‘ज्ञानेश्वरी’कडे वळलो. ती काही समजेना, म्हणून हळूहळू करत मी ती अर्थासकट लिहून काढली. मग एक दिवस त्यातल्या काही ओव्यांवर छोटेखानी निबंध लिहून तो एका मातबर प्रकाशकाकडे ओळख नसताना पाठवून दिला. आणि तिथेही एका अर्थाने लॉटरीच लागली. ते ‘जाणीव’ नावाचे पुस्तक भराभर खपले. ते बघितल्यावर ‘ज्ञानेश्वरी’वर पुस्तक लिहिण्याचा सपाटाच लावला, असे म्हणायला हरकत नाही. त्यातल्या एका पुस्तकाचे नाव होते, ‘मी हिंदू झालो’. त्या काळात ते नाव जरा खोडकर किंवा प्रक्षोभकच होते आणि मुद्दामच तसे ठेवले होते. पुस्तक बरे होते, परंतु त्याला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला त्याचे श्रेय त्या वेळच्या सरकारच्या हिंदुत्वपणाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोष्टी घडत जातात. त्या कोणी करत नाही. त्यावर काळाची छाया असते असे म्हणतात. ते काही खोटे नाही आणि तेच इथे सिद्ध झाले. आणि ‘ज्ञानेश्वरी’ वाचल्यामुळेच ते ध्यानात आले आहे. या पुस्तकांमुळे ‘ज्ञानेश्वरी’वरच्या भाषणांचा अध्याय सुरू झाला. कशावर बोलाल ‘ज्ञानेश्वरी’वर की ‘प्लास्टिक सर्जरी’वर, असे प्रश्न मला लोक विचारू  लागले. ‘तुम्ही प्रॅक्टिस बंद केलीत का?’ असे जीवघेणे प्रश्नदेखील विचारले गेले.  ‘ज्ञानेश्वरी’वर भाषणे देताना इंग्रजी माध्यमात शिकणारे त्या भाषणांमध्ये रमत नाहीत, म्हणून ती ‘ज्ञानेश्वरी’ इंग्रजीमध्ये लिहायला हवी, असे जाणवू लागले. परत पंचविशी जागी झाली. पोटापाण्याच्या व्यवसायाला अर्धी छाट देऊन मग तो उपक्रम आरंभला. हे पुस्तक जमेल का? ते कोण छापेल? ते खपेल का? त्याचे नाव काय ठेवायचे? असले विचार पंचविशीत जाणवत नाहीत. त्याचा अनुभव साठीनंतरच्या पंचविशीत परत एकदा उमटला.

ते लिहून झाल्यावर खर्चासाठी सगळीकडे हात पसरले. हे हात पसरणे म्हणजे धीटपणा की निर्लज्जपणा, असा प्रश्न त्या साठीतल्या पंचविशीत मला पडल्याचे आठवत नाही. या उपक्रमाला सहा वर्ष लागली आणि त्या पुस्तकाची चौथी आवृत्ती निघेपर्यंत मी सत्तरी पार केली होती. परंतु महत्त्वाचा मुद्दा असा की, ज्या डेरवणच्या रुग्णालयातून मी एका अर्थाने हाकलला गेलो होतो, त्या रुग्णालयाच्या सर्वेसर्वानीच पहिल्या आवृतीला भरघोस मदत केली होती हे सत्यदेखील सांगायलाच हवे. त्या अकराशे पानांच्या अगडबंब पुस्तकाचे पालकत्व आता महाराष्ट्रातल्या एका प्रसिद्ध उद्योगपतीने स्वीकारून पाचवी आवृत्ती निघणार ही बातमी हल्लीहल्लीच कळली. ‘छप्पर फाड के देणे’ म्हणतात ते हेच. हीदेखील काळाचीच किमया आहे. एकापाठोपाठ अनेक ‘पंचविश्या’ झाल्या असल्यामुळे तसा मी नाही म्हटले तरी थोडाफार ‘मॅच्युअर’ झालो आहे. कर्माचे काही ना काही फळ मिळतेच. परंतु अध्यात्म दुष्कर आहे हे माझ्याबाबतीत तंतोतंत खरे आहे.

हल्ली विषाणूच्या साथीमुळे माझ्या बाहेर जाण्याच्या नाडय़ा आवळल्या गेल्या आणि व्यवसायाला मी टाळे ठोकले. विषाणूचे एकार्थी आभारच. आमच्या सहनिवासाला, वीर सावरकर मार्गाच्या कडेला तीनएकशे चौरस फुटांचे एक अंगण आहे. तिथे मी पूर्वी झाडे लावली होती. बाहेर जाता येत नाही म्हणून त्या अंगणात गेलो कारण साथीमुळे माळी येईनासा झाला, तेव्हा तिथली परिस्थिती बघून मी हादरलो. त्या जागेचा उकिरडा झाला होता. किमान साठ दारूच्या बाटल्या आणि गर्दुल्ल्यांच्या चिलिमी आधी काढाव्या लागल्या. मग स्वत: रान साफ केले. त्यात एक महिना गेला आणि झाडू मारून घेतला. कम्पोस्टिंग खताला चालना दिली आणि भाज्या लावल्या, पावसाळा झाल्यावर अळू आणि पालक या दोन्ही भाज्यांचे उदंड पीक आले आहे. ते सहनिवासात प्रत्येक घरी  स्वहस्ते नियमितपणे वाटून टाकतो. आमच्यासारख्यांच्या उच्चभ्रू सहनिवासात असे कसे झाले? माळी तर होता, पण तेव्हा त्याच्यावर देखरेख का केली गेली नाही, असले प्रश्न विचारणे फोल आहे.  हे माझ्या पूर्वीच्या अनेक पंचविश्यांमध्ये अनुभवाने शिकलो आहे. ती गोष्टदेखील काळाने माझ्या स्वभावाला थोडीफार मुरड घातल्याचे लक्षण आहे.

खरे तर ‘संध्या छाया भिवविती हृदया’ असा माझा सध्याचा काळ आहे. परंतु मला मात्र संध्याकाळीचे सप्तरंग भुलवू पाहात आहेत. इथेच आवरते  घेतो. जे काही होते ते पाण्यावरील मगरीचे रेखाटन असते, असे ज्ञानेश्वर म्हणतात तेच खरे.