डॉ. सुधीर रसाळ

‘‘आजही माझा दिनक्रम पहाटे पाच वाजता सुरू होतो, तो रात्री साडेदहापर्यंत चालतो. मी ज्या प्रकारे जगतो त्या प्रकारात माझी शारीरिक आणि मानसिक ऊर्जा मी निसर्गसंवादी पद्धतीने टिकवून ठेवली आहे. वाङ्मय आणि संगीत या दोन गोष्टी मला मन:शांती देणाऱ्या आहेत. आज वयाच्या ८५ वर्षांत माझं लेखन आणि वाचनही चालू आहे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.’’

मी १९९४ ला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ येथील मराठी विभागातून सेवानिवृत्त झालो. त्यानंतर ताबडतोब संगणक शिकण्यासाठी एका वर्गात दाखल झालो. सगळी तरुण मुले होती, त्यात मी एकच ‘म्हातारा’. त्यांनाही आश्चर्य वाटायचे, हा माणूस इथे काय करतोय? पण मी काळाबरोबर राहायचे ठरवले होते, म्हणून संगणक साक्षरही झालो.

मी जे लेखन करत असे, त्यासाठी तीन ते चार खर्डे करावे लागत. पुन्हा पुन्हा नव्याने लेख लिहून काढावे लागत. तो सगळा व्याप यामुळे कमी झाला. संगणकाचा फायदा असा, की तिथल्या तिथे तुम्ही मजकुरामध्ये बदल करू शकता. तो वाढवू किंवा कमी करू शकता. ही सोय लक्षात घेता संगणक आणि त्यावर मराठी टंकलेखन करायला शिकलो. माझी पाच पुस्तके मी स्वत: संगणकावर टंकलिखित केली तीही निवृत्तीनंतर.

काळाबरोबर जात असताना सद्य:स्थितीतील सगळय़ाच गोष्टी मला पटतातच असे नाही. माझ्यावर घरातील वडिलांपासूनचा संस्कार गांधीवादाचा, त्यामुळे गरजा कमीत कमी. निसर्गाशी संवादी जीवनपद्धती अवलंबण्याचे संस्कार माझ्यावर बालपणापासून झालेले. माझे वडील खादी वापरत. सूतकताई करणे हा त्यांच्या दिनक्रमाचा भाग होता. मीसुद्धा दिवसभरात एक तास सूतकताई करत असे. पुढे ते वडिलांकडूनही थांबले आणि बहुतेकांनी ते काम थांबवले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ‘आता सूतकताईची आवश्यकता नाही,’ असे लोकांना वाटू लागले होते. घरातही वेगळे चित्र नव्हते. आता याची गरजच नाही, असे वाटू लागले होते. वस्तुत: तशी परिस्थिती नव्हती, पण असे झाले खरे.

मात्र कुटुंबात गांधीवादी विचारांचे संस्कार होते. मी जेव्हा आजच्या जीवनाकडे पाहतो तेव्हा दोन गोष्टी खटकतात. एक म्हणजे चंगळवाद आणि दुसरे, आपल्या मूल्य व्यवस्थेवर व्यापारी वृत्तीचा पडलेला प्रभाव. मी काय खावे, काय ल्यावे, मी कोणती प्रसाधने, कोणती टूथपेस्ट, कोणता साबण वापरावा, या सगळय़ा दैनंदिन निवडीवर व्यापारी संस्कृतीचा प्रभाव आहे. त्यामुळे प्रत्येक भूभागाचे दैनंदिन जीवन आणि वैविध्य नष्ट होत चालले आहे. म्हणून मी कसे जगावे, हे अशा बाहेरच्या संस्थांनी ठरवणे मला अजिबात मान्य नाही. त्यामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण झाल्या. सांस्कृतिक चेहरा पुसट व्हायला लागला. जागतिकीकरणाचे हे स्वरूप मला अजिबात मान्य नाही.

निसर्गाने दिलेली, प्रत्येक भूभागाने दिलेली संस्कृती टिकवून ठेवली पाहिजे. कारण हे आरोग्यपूर्ण जगण्यासाठीही आवश्यक असते. मात्र माझा आधुनिकीकरणाला अजिबात विरोध नाही. जातीपाती नष्ट झाल्या पाहिजेत. ज्या गोष्टी माणसाच्या सोयीच्या आहेत त्या स्वीकारल्या पाहिजेत, तशा यंत्राचा स्वीकार केला पाहिजे. हे करत असताना मात्र आपलं निसर्गसंवादी जगणंही कायम ठेवलं पाहिजे. या भूमिकेतून आजच्या आणि येऊ घातलेल्या जीवन पद्धतीकडे मी पाहतो. या जीवन पद्धतीमुळे आपण जणू पाश्चात्त्य जगाचा एक उपग्रह बनत चाललो आहोत. आपला चेहरा आपण हरवून बसू लागलो आहोत, आणि ही गोष्ट मला अनिष्ट वाटते.

आता माझे वय ८५ वर्षे आहे पण मी ज्या प्रकारे जगतो त्या प्रकारात माझी शारीरिक आणि मानसिक ऊर्जा मी टिकवून ठेवली आहे. किंबहुना, ती टिकवायची असेल तर निसर्गसंवादी पद्धती अवलंबली पाहिजे, हे मी बघतो. मी दररोजच्या जेवणात ज्वारीची भाकरी आणि हिवाळय़ात बाजरीची भाकरीच खातो. एक फळभाजी आणि एक पालेभाजी जेवणात असते. आजही माझा दिनक्रम पहाटे पाच वाजता सुरू होतो, तो रात्री साडेदहापर्यंत चालतो. जेवणाच्या वेळा मी कटाक्षाने पाळतो. आपली प्रतिकारशक्ती टिकावी म्हणून मी गरम लिंबू-पाणी घेतो. मला चहा अतिशय आवडतो. दिवसभरात मी सात वेळा चहा घेतो. हे व्यसन मी कमी करू शकलो नाही. मात्र त्याचा माझ्या शरीरावर परिणाम झालेला नाही.

तरुणपणी मी धूम्रपान करत असे पण त्याचे शरीरावर विपरीत परिणाम दिसून आल्यानंतर मी ते सोडले. माझे शरीर निसर्गत:च थकत चालले आहे. या शरीरावर मी जाणीवपूर्वक अधिक बोजा टाकत नाही. पूर्वी मी सकाळी पाच किलोमीटर चालत असे. हळूहळू निसर्गत:च हे कमी होत गेले. आता मी फक्त एक किलोमीटर चालतो. म्हणून ‘शरीर जे स्वीकारेल, तेच आणि तेवढय़ाच प्रमाणात’ हे सूत्र मी कायम ठेवले. मी घरातही सर्व प्रकारची कामे करतो. बायकोला पूर्णपणे मदत करतो. अगदी पहिल्यापासून संसार हा दोघांचा आहे, हे समजूनच मी हे काम करतो. त्यामध्ये जे थोडेबहुत शारीरिक कष्ट होतात, त्याने आजही मला थकवा येत नाही. याप्रकारे जगत असल्यामुळे कदाचित माझी ऊर्जा टिकून आहे. मी लेखनाचे काम दिवसभरात चार तास करतो. आता माझे डोळे दुबळे होत चालले आहेत. वाचनावर पुष्कळ बंधने आली आहेत. तरीही सामान्यपणे मी दोनएक तास वाचन करतो.

माझी बुद्धी अजूनही कार्यक्षम आहे. स्मरण चांगलं आहे. मी जे लिहितो, ते लेखन सुबुद्ध आहे, त्यावर मेंदूच्या विकलतेचा कुठेही परिणाम झाला नाही, असे माझे मित्र आणि वाचक सांगतात. त्यामुळे मी वयाच्या पंचविशीत ज्या प्रकारे विचार करू शकत होतो, ती विचाराची शिस्त आजही कायम आहे. माणसाचे अवयव वापरात असतील तर त्यांची नैसर्गिक कार्यक्षमता टिकते. शरीर आणि बुद्धी या दोन्ही गोष्टींचा वापर मी जगताना करतो. त्यामुळे माझ्या श्रमाच्या आणि बौद्धिक शक्ती कमी झाल्या असल्या तरी त्या टिकून आहेत.

मी धर्म, देव, या कल्पनांबद्दल उदासीन आहे. देव आहे की नाही, हा प्रश्न मी स्वत:ला विचारत नाही. ज्यांना जगण्यासाठी परमेश्वर या कल्पनेची गरज आहे, जरूर त्यांनी त्याचा स्वीकार करावा. ज्यांना त्याची गरज वाटत नाही, त्यांनी ही संकल्पना मानण्याचे काही कारण नाही. मन:शांतीसाठी परमेश्वर या कल्पनेची गरज आहे, असे मला वाटत नाही. माझे बौद्धिक ताण मी संगीतातून दूर करतो. मी लिहिताना एकीकडे शास्त्रीय संगीत चालू असते. या संगीताच्या पार्श्वभूमीवरच माझे लेखन आणि चिंतन घडू शकते. ही सवय मला तरुणपणापासून आहे. गाणं ही गोष्ट अशी आहे, की ज्यामुळे एक कलानंद जसा मिळतो, तसे बौद्धिक श्रमही हलके होतात. भावनिक ताणतणाव कमी होतात. वाङ्मय आणि संगीत या दोन गोष्टी मला मन:शांती देणाऱ्या आहेत. फार पूर्वीपासून मी दोन कलांच्या संगतीत राहिल्यामुळे कदाचित माझी मन:शांती आजही टिकून आहे.

वाङ्मयातही माझे मुख्य वाचन कवितेचे आहे. खरं म्हणजे, आयुष्यात मी कवितेची एकही ओळ लिहिली नाही. मला कवितेची गोडी उशिरा लागली. माझ्या काही गुरुजनांमुळे मी कवितेकडे ओढला गेलो. मुळात माझी आवड नाटक ही होती आणि मी इंग्रजी आणि मराठी नाटय़वाङ्मयाचे भरपूर वाचन केले आहे. नाटकावर मी बरेच लिहिलेदेखील आहे. आजही मी कवितेखालोखाल नाटकाचे वाचन अधिक करतो. त्यामुळे दोन्ही प्रकारचे वाङ्मय मी वाचतो आणि त्यांच्यावर समीक्षात्मक लेखनही केले आहे.

अगदी ज्ञानेश्वरांपासून ते आजच्या कवींपर्यंत अनेकांच्या साहित्यावर मी समीक्षात्मक लेखन केले आहे. ‘कविता निरुपणे’ या माझ्या संग्रहात ज्ञानेश्वरांच्या स्फुटकाव्यापासून ते वसंत दत्तात्रय गुर्जरांच्या ‘गांधी मला भेटला’ या कवितेवरच्या भाष्यापर्यंतचे लेख मी समाविष्ट केले आहेत. पण आधुनिक कविता हा मुख्यत: माझ्या अभ्यासाचा गाभा आहे. डोळ्यांच्या समस्येमुळे माझे वाचन मला अद्ययावत ठेवता येत नाही. अलीकडे मी अतिशय निवडक वाचतो. त्यामुळे आजच्या वाङ्मयाबद्दल कोणी मत विचारले तर मी ते देत नाही. कविता ही मानसिक आस्वादाची गरज आहे. कलास्वाद घेणे ही गरज प्रत्येक व्यक्तीमध्ये असतेच. काहींमध्ये ती अधिक विकसित होते. माझी गरज कविता आहे. मन:शांती हा त्याचा एक भाग आहे.

जीवनाचं परिपूर्ण दर्शनशास्त्र आणि कला या दोन्हींमुळे, दोन्हींच्या संस्कारातून साकारते. म्हणून ज्ञानशाखांच्या अभ्यासातून तुम्हाला पूर्ण जगणं कळत नाही. नुसत्या कलांमुळे तुम्हाला जीवन कळत नाही. शास्त्र आणि कला या दोन्हींच्या आस्वादातून, अभ्यासातून, जीवनाचा अर्थ माणसाला कळतो. कला ज्ञान देत नाही, पण ज्ञानासारखंच असं काही तरी देते, की जे जीवनाच्या पूर्ण आकलनासाठी आवश्यक असते.

तरुणपणी स्वप्नरंजनपर वाङ्मयाचे एक आकर्षण होते. ते फार कलात्मक वाङ्मय असते, असे नाही. इंग्रजीत त्याला ‘पॉप्युलर लिटरेचर’ असे आपण म्हणतो. ऐतिहासिक कादंबऱ्या, रोमान्स यामध्ये ना. सी. फडके,

वि. स. खांडेकर ही मंडळी मोडतात. कवितेतही असे कवी जे स्वप्नाळू आहेत आणि भावकवितेच्या नावाखाली जे स्वप्नांचीच कविता लिहितात. साधारणत: प्रेमकवितांमध्ये हे प्रामुख्याने आपल्याला आढळते. पण जसजसे आपण जगतो, आपले जीवन प्रगल्भ होत जाते, तसतसे या प्रकारच्या वाचनाचे आकर्षण कमी होते. म्हणून सामान्यपणे वयाच्या विशीपर्यंत मी या प्रकारचे वाङ्मय वाचले.

माझ्या घरात वाङ्मयीनच वातावरण होते. वडील वाङ्मयाचे अभ्यासक होते, ते स्वत: लिहीत असत. त्यांचे सगळे मित्र, कवी, लेखक असेच होते. त्यांच्या माझ्या घरी बैठका होत, वाङ्मयीन चर्चा होत. या सगळ्यांचा माझ्यावर लहानपणापासून संस्कार आहे. त्यामुळे अगदी लहान वयात म्हणजे विशीत गंगाधर गाडगीळ यांचे लिखाण मी वाचले. मग फडके, खांडेकर, यांचे आकर्षण कमी होत गेले. या काळातली जी नवकथा आहे, तिच्यामुळे आम्ही प्रभावित झालो. हा नवकथेचा काळच वाङ्मयीन समज प्रगल्भ बनवायला कारणीभूत ठरला.

पुढे जी. ए. कुलकर्णीसारखा लेखक वाचनात आला आणि ती प्रगल्भता अधिक वाढली. मर्ढेकर, पु. शि. रेगे यांची कविता आदींच्या लिखाणाचे संस्कार माझ्या अभिरुचीवर झाले. मात्र आज जे वाङ्मय निर्माण होते आहे, ते मला या तोडीचे वाटत नाही. मी नेहमी मला प्रश्न विचारतो, माझी अभिरुची पक्की होत गेली आहे काय, की मी नव्याचा विचारच करू शकत नाही. म्हणून माझ्या मनात संभ्रम निर्माण होतो, की आजचे वाङ्मय दर्जेदार नाही, की माझीच अभिरुची स्थिरावली आहे.

आज जे सामान्यपणे लिहिले जाते, त्यातील एखाद दुसराच लेखक मला आवडतो. उदाहरणार्थ, महेश एलकुंचवार, मिलिंद बोकील, कृष्णात खोत यांचे ललित गद्य भावते, प्रभावित करते. अशा लेखकांचे प्रमाण खूप कमी आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी वडिलांच्या वाचनामुळे मर्ढेकरांचे पहिले पुस्तक वाचनात आले. वडिलांची अनेक पुस्तके मी चाळत असे, वाचत असे. मर्ढेकरांचा काव्यसंग्रह त्यांनी कुठेतरी आडबाजूला ठेवला होता. त्या पुस्तकावर नग्न पुरुषाचे चित्र होते. ते चित्र पाहून मी भयंकर घाबरलो होतो. हे काही तरी वेगळे आहे, असे मला वाटत होते. पण वडिलांचे वाचन अद्ययावत असल्याने मर्ढेकर मी महाविद्यालयात असतानाच वाचले. म. भि. चिटणीस यांच्यासारखे गुरूही त्याला कारणीभूत आहेत. वर्गामध्ये अभ्यासक्रमात नसतानाही त्यांच्या कवितेचा परिचय करून दिला आणि मग मी बी.ए.ला मर्ढेकर गंभीरपणे वाचले.

वयाच्या या टप्प्यावर वाचन आणि लिखाण अजूनही कायम आहे, हीच माझ्यासाठी सर्वात आनंदाची बाब.

rasalsn@gmail.com

suhas.sardeshmukh@expressindia.com

शब्दांकन : सुहास सरदेशमुख