डॉ. सुवर्णा दिवेकर

drsuvarnadivekar@gmail.com

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
Bhandara District Jail, Female Guard, Assaulted, Detainee, crime news,
धक्कादायक! कारागृहातील बंदीवानाचा महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला
mouthwash
श्वासाच्या दुर्गंधीपासून सुटका हवीये? मग घरी बनवलेल्या माउथवॉशने करा गुळण्या, तुमचा श्वास नेहमी राहील ताजा

नेहा म्हणाली, ‘‘डॅडच्या तोडीचा तिला कोणी भेटलाच नाही किंवा माझ्या जबाबदारीमुळे तिनं तसा विचारही केला नसेल. संसार उमलतो न उमलतो, तो संपलासुद्धा! माझ्या वयाच्या या तरुण टप्प्यावर मी ममाकडे वेगळ्या अँगलने पाहते. सर, गेली दोन वर्ष मी तुमच्या हाताखाली काम करते आहे. तुमचाही एकटेपणा मला जाणवतोय.  तुम्ही दोघे अद्याप पन्नाशीच्या जवळपास आहात. बराच मोठा रस्ता पार करायचा आहे. तुम्ही एकमेकांच्या सोबतीनं पार कराल का? इट्स माय विश. निर्णय तुमचाच..’’

गाडीचा ब्रेक लागला, तशी पेंगुळलेल्या नेहाला पटकन जाग आली. पर्समधून पाण्याची बाटली काढून ती चार घोट पाणी प्यायली. चेहऱ्यावर, यू-डी-कोलिनचा स्प्रे उडवत गाडीची काच खाली केली. ‘जाधवगड फोर्ट’ लिहिलेला मोठा बोर्ड दिसला. पाठोपाठ तुतारीचे नाद आणि स्वागत करायला मावळ्यांच्या वेशातले सेवक आणि नऊवार लुगडी, नथी आणि खोपा घातलेल्या सेविका, हातात ओवाळणीची तबकं घेऊन पुढे आल्या..

पाठोपाठ एकेक करीत चार गाडय़ा आल्याच. पहिल्या गाडीला गुलाबाचा हार घातलेला होता. नेहानंच ‘ममा’ नको म्हणत होती तरी मॅरेज रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जातांना फुलांचा भरगच्च हार करून घेतला. ममाचा संकोच मोडून काढून, आवर्जून निमंत्रित केलेली ब्यूटिशिअनही बोलावली. पहिली गाडी थांबली. पुन्हा एकदा स्वागताची तुतारी वाजली. ‘जाधवगड फोर्ट’ ही पुण्याजवळची जागा लग्नानंतरच्या सेलिब्रेशनसाठी नेहानंच निवडली होती. थोडी दूरची, पण वेगळी, किल्ल्यावरच्या वास्तव्याची थीम असलेली निसर्गरम्य जागा होती. मागचा संपूर्ण आठवडा नेहा तिच्या ममाच्या लग्नाच्या तयारीत होती. शिवाय व्हेन्यू, मेन्यू, सेलीब्रेशन, असं सगळं ‘सरप्राइज’ द्यायचं होतं. आधी बेत सांगितले असते तर नकारांचीच शक्यता होती. गाडीतून उतरणारी ममा म्हणजे, डॉ. उज्ज्वला आणि अ‍ॅड्. अशोक साठे, ही दम्पती अतिशय ग्रेसफुल दिसत होती. गाडीतून उतरताना, फोटो काढताना दोघेही अवघडलेले होते. पाठोपाठ नेहाचे मिरजेचे आजी-आजोबा, सदानंद काका, सुनंदा काकू आणि ममाचे आई-वडील, शेखर मामा-मामी, आणि दोघींच्या अगदी जवळचे मित्र आणि मैत्रिणी गाडय़ांतून उतरले. लॉनवरती खुर्च्या मांडलेल्या होत्या. सोलकढीचे वेलकम ड्रिंकचे ग्लास फिरू लागले. कांदा भजी, भाजलेली कणसं, वाटल्या डाळीचे द्रोण, असे ‘खासे’ स्नॅक्स आणले गेले. रविशंकरजींच्या सतारीचे सूर अवकाशात स्वरावले.. तसं वातावरण हळूहळू सैलावलं.. अवघडलेपणातून बाहेर पडलं.

लाल अनारकली ड्रेस घातलेली तरुण नेहा, कर्तेपणाच्या मोठेपणातून थोटी सुटी झाली आणि पुन्हा एकदा ममाची लाडकी मुलगी झाली. ममाचं आणि सरांचं तिनं जमवलेलं लग्न रजिस्टर पद्धतीनं पार पडलं. ती बऱ्यापैकी निश्चिंत झाली, ‘ममा, सर, कॉन्ग्रॅट्स’ म्हणून तिनं दोघांचं अभिनंदन केलं आणि पाहुण्यांच्यात मिसळून गेली. ‘जाधवगड’चं सुंदर लंच, नंतर भेटवस्तूंची देवाण (‘घेवाण’ नव्हतीच) नेहानंच प्रत्येकाची आवड जाणून, ‘गुडी बॅग्ज’ तयार केल्या होत्या. तिचा समजूतदारपणा, आवाका आणि धोरण पाहून उज्ज्वला नव्यानं चकित होत होती. रुसकी, काहीशी लाडावलेली, आपली एकुलती लेक नेहा आणि आताची..! शब्दांत सापडत नव्हती आणि मनात मावतही नव्हती.

डॉ. उज्ज्वला साठय़ांच्या प्रभातरोडवरच्या फ्लॅटवरती आली, तेव्हा रात्र उजाडत होती. अ‍ॅड्. साठय़ांनीच ‘लॅच की’ने फ्लॅटचं दार उघडलं. डॉ. उज्ज्वला यापूर्वी या वास्तूत आली होती, तेव्हा तिथे दगडी बंगला होता आणि तिची रुग्ण अभयाही होती, अ‍ॅड्. साठय़ांची, अ‍ॅडव्होकेट आजारी पत्नी! तिच्या आईच्या जवळच्या मैत्रिणीची मुलगी असल्याने डॉक्टर उज्ज्वला ‘होम व्हिजिट’ करीत होती. आजार मनाचा आणि शरीराचाही होता. ‘हिस्टेक्टॉमी’ करायचा निर्णय झाला पण चाचण्या करायच्या आधीच अभया गेली. तशी अचानकच म्हणायची! ‘कंट्रोल्ड डायबिटिस’ होता. सायलेंट हार्ट अ‍ॅटॅकचे मृत्यूदाखल्यावरचे शेरे, अ‍ॅड्. साठय़ांनी पाहिले. अवघं ‘हरलेपण’ कवेत घेऊन, जगण्याचा उपचार पार पाडू लागले.

कालांतराने बंगला पाडला. फ्लॅट बांधले गेले. तळमजल्यावर ‘साठे अ‍ॅण्ड साठे’ अ‍ॅडव्होकेट्सचा बोर्ड लागला, अभया साठे नामरूपात आणि स्मृतीरुपात बोर्डवर राहिली..

..डॉ. उज्ज्वलाला या सर्व गोष्टी आठवल्या. त्या घटनेलाही दशक उलटून गेलं होतं. ती काही साठय़ांची नेहमीची डॉक्टर नव्हती. तिच्या आईच्या आग्रहासाठी अभयाला मोजक्या वेळा पाहून गेली, एवढंच. तिची या रुग्णामध्ये ‘गुंतवणूक’ नव्हती. अभयच्या मृत्यूनंतर साठय़ांनी तिच्या आईमार्फत ‘होम व्हिजिट’ चेक पाठवला. तिनं तो नाकारला. सुलाखे डॉक्टर आणि जोशी वकिलांचा विषय तिथेच संपला, पण नियतीनं तो संपलेला विषय नव्याने कालपटलावर उघडला..

डॉ. उज्ज्वला आणि अशोक अवघडून सोफ्यावर बसले. ‘‘मॅडम, फ्रेश होऊन येणार? शॅल वुई हॅव अ कॉफी टूगेदर?’’ अशोकजींनीच कोंडी फोडली..

‘‘नो मॅडम.. नो डॉक्टर.. उज्ज्वला हिअर.. कॉल मी उज्ज्वला प्लीज..’’

‘‘ओ.के, ओ.. के. वेळ लागेल थोडा पण..’’ उज्ज्वला आतल्या खोलीत गेली. डिझायनर साडी, दागिने, मेकअप, उतरवू लागली आणि समोरच्या आरशात तिच्या गोऱ्यापान कंठात रुळलेलं हिऱ्याचं नाजूक मंगळसूत्र प्रतिबिंबित झालं.. डॉ. आनंदनं केलेल्या पहिल्या सर्जरीच्या पैशांतून तिच्यासाठी आणलेलं पाचूचं मंगळसूत्र उज्ज्वला समोर चमकून गेलं. पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत तर तिच्या गळ्यातच होतं.. दोन्ही रत्नंच.. रंग वेगळे पण काळ्या मण्यांचा रंग मात्र एकच, पती-पत्नीच्या नात्याचा!  उज्ज्वलानं कपडे बदलून सलवार-कमीज घातला. साधीशी पोनीटेल बांधली.. बाहेर येत अशोकना म्हणाली, ‘‘आपण आमच्या औंधच्या घरी जाऊ या का? नेहा दमली असेलच, पण आणखीही अनेक वादळं असतील तिच्या मनात.. आई दुरावली तर काय?, आपला चिमुकल्या मनाचा कौल मानून लावलेलं ममाचं लग्न योग्य असेल ना? या विचारांची वादळं.. पुढच्या महिन्यात यू. एस.ला ‘इंटरनॅशनल लॉ’ शिकायला जाण्याची उत्सुकता आणि सगळं ‘आपलं’ सोडून जाण्यातली उदासीही.. आपण तिथेच राहू या का रात्री?’’

‘‘व्हाय नॉट, त्यापेक्षा आपण असं करू या.. आपण तिघेही लाँग ड्राइव्हला जाऊ या.. थेट लोणावळ्यापर्यंत.. आणि पहाटेच्या चहाला पुण्यात परत.. औंधच्या घरी.. गप्पा मारू या.. भेंडय़ा लावू या.. आईस्क्रीम खाऊ या,’’ अशोकनं पूर्ण कार्यक्रमच सांगितला.

रात्रीच्या वातावरणाला रातराणीचा सुगंध आला. ‘‘अभयानं किती रातराणीची झाडं लावलीत पाहिली ना? झाडाफुलांची खूपच आवड होती तिला.’’ अशोकनी टेरेस गार्डनचं दार उघडत म्हटलं. फुलापानांच्या असंख्य आकारा-प्रकारांच्या कुंडय़ा.. गॅलरीला वेटोळलेल्या वेली.. ‘‘आठवडय़ात दोनदा माळी येतो. अभया असल्यापासूनच आणि स्वयंपाकाच्या ताईपण अभया असल्यापासूनच येतात. अभया प्रत्यक्ष न्यायालयात उभी राहत नव्हती पण माझे ऑफिसवर्क, पक्षकारांच्या भेटीगाठी, तिच हाताळायची.’’

‘‘आय नो! नेहा सांगायची मला.’’

‘‘नेहानं बारावी नंतर ‘लॉ’ करायचा निर्णय घेतला. खरं तर आम्ही दोघेही डॉक्टर्स.

डॉ. आनंद सर्जन आणि मी स्त्रीरोगतज्ज्ञ. औंधला रुग्णालय आणि त्याच्या वरच्या मजल्यावर राहतं घर.. सगळं सुरुवातीपासून आम्ही दोघांनी उभं केलं. नोकरी करून थोडे पैसे जमवले. थोडे मिरजेच्या वकील सासऱ्यांनी दिले. बाकीचे बॅकेचं कर्ज.. मनात कुठे तरी डॉक्टर होणारी लेक आणि डॉक्टर असलेला जावई, असं चित्र होतं.. पण काही चित्रं पुसावीच लागली..’’

वातावरण बदलावं, म्हणून अशोक म्हणाले, ‘‘लेट अस गो. आणि हो, चार दिवस राहा तिथे. पुढच्या सोमवारी तिची यू. एस.ची फ्लाइट आहे. तिची तयारी.. तिला हवं नको पाहा.. इतक्यात भेटणार नाही ती.’’

‘‘खरंच आहे. पुण्याच्या कॉलेजमध्ये नेहा ‘लॉ’ला रँकमध्ये आली. तिच्या आजोबांनी असिस्टंटशिपसाठी तुमचं नाव सुचवलं. तुम्ही होकार देत दोन वर्ष तिला मार्गदर्शन केलं आणि इथेच न थांबता, इंटरनॅशनल लॉ शिकायला

यू. एस.ला जायला उद्युक्त करून, सर्वतोपरी मदतही केलीत. एखाद्या वडिलांसारखीच.’’

‘‘मग, झालो ना बाबा नेहाचा.’’ अशोक हसत हसत म्हणाले.

डॉ. उज्ज्वला आणि अशोक औंधला आले. हॉस्पिटलमध्ये शांतता होती. रात्रपाळीचा स्टाफ आपापली डय़ुटी करीत होता. सिस्टर शांता पुढे आल्या. ‘‘मॅडम, आता आठवडाभर हॉस्पिटलची जबाबदारी आमची. तुम्ही आम्हा सर्वानाच छान ट्रेनिंग दिलंय.. शिवाय डॉ. अनुया दररोज व्हिजिट करणार आहेतच.. सो रिलॅक्स.. अ‍ॅण्ड एन्जॉय.’’

डॉ. उज्ज्वलानं डॉ. आनंद गेल्यानंतर सर्जरी वॉर्ड बंद केला. छोटय़ा नेहाची जबाबदारी आणि तिचा स्त्रीरोग विभाग, एवढय़ा जबाबदाऱ्या तिच्या तरुण खांदय़ावर पडल्या. हॉस्पिटल विकून, एखाद्या हॉस्पिटलमध्ये जॉब करायची तिच्या वडिलांची इच्छा तिनं मानली नाही तशीच मिरजेला कायम वास्तव्य करण्याची सासऱ्यांची सूचनाही.. त्या दोघा पती-पत्नींनी उभ्या केलेल्या दुनियेतच ती नेहाला घेऊन राहिली. व्यवसाय.. नेहा.. आणि ती!

छोटय़ा नेहाला ‘डॅड’ म्हणजे फोटोतला रुबाबदार माणूस, एवढीच ओळख उरली. मिरजेहून परत मुंबईला परत येताना ‘पेठ नाक्यापाशी त्यांची कार आणि ट्रकची धडक होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.’ एवढी ऐकीव माहिती होती. नेमकं काय झालं, काय हरपलं? हेही तिला समजलं नाही. पण जसजशी मोठी होत गेली तसतशी ममाचं काय ‘हरपलं?’ हे तिला समजू लागलं. नेहावर माया करणारी, व्यवसायात जीव ओतणारी ‘ममा’ एरवी अलिप्त, हरपल्यासारखी, आनंद हरवलेली आणि अवेळी पोक्त झालेली दिसते.. तिचं सुंदर रूपही कोमेजलेलं, निगा न राखलेलं..

..‘‘सर, आज संध्याकाळी हॉटेल मॅरिअटमध्ये डिनरला याल माझ्याबरोबर?’’

‘‘शुअर.. पण व्हॉट फॉर?’’

‘‘मला यू. एस.ला लॉसाठी अ‍ॅडमिशन मिळाली म्हणून.. माझ्यातर्फे सर..’’ लाघवी नेहाला ‘नाही’ म्हणणं शक्य नव्हतं. गेली दोन वर्ष ती त्यांच्या ऑफिसमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करीत होती. ती सर्व गोष्टी उत्तम प्रकाराने आत्मसात करीत होती. ऑफिसमधल्या इतर सगळ्यांशी मर्यादा सांभाळून, आपुलकीनं वागत होती. तिच्या वाढदिवसाला तिनं सर्वाना तिच्या औंधच्या घरी पार्टीही दिली. तिची आईसुद्धा डॉक्टरकी विसरून, आनंदात सामील झाली. आईनं तर केकसुद्धा स्वत: बेक केला होता..

..हॉटेल मॅरियटची टेरेस.. चांदण्याच्या छताखाली, वाऱ्याच्या सान्निध्यात मन प्रसन्न झालं होतं. नेहा म्हणाली, ‘‘सर, ममा येतच नव्हती. मीच जबरदस्तीनं आणलं.’’ त्यावर उज्ज्वला म्हणाली, ‘‘नाही.. तसं नाही..

डॉ. आनंद गेल्यानंतर मी अशा ठिकाणी गेले नाही आणि जातही नाही..’’

‘‘मीसुद्धा.. अभया आणि मी दोन वेळा इथे आलो. त्यानंतर आज नेहामुळे..’’ अशोक म्हणाले.

‘‘मग नेहामुळे तुम्ही दोघे एक गोष्ट स्वीकाराल का? आग्रह नाही.. बालहट्ट नाही.. आणि इमोशनल ब्लॅकमेलिंग तर नाहीच.. ट्रस्ट मी! दोघेही एकमेकांना ओळखता, माझ्या संदर्भात काही वेळा भेटलाही आहात. सर, माझ्या ममानं दुसरं लग्न का केलं नाही? माहीत नाही. कदाचित डॅडच्या तोडीचा कोणी तिला भेटलाच नाही किंवा माझ्या जबाबदारीमुळे तिनं तसा विचारही केला नसेल. संसार उमलतो न उमलतो, तो संपलासुद्धा! माझ्या वयाच्या या तरुण टप्प्यावर मी ममाकडे वेगळ्या अँगलने पाहते. सर, गेली दोन वर्ष मी तुमच्या हाताखाली काम करते आहे. तुमचाही एकटेपणा मला जाणवतोय. तुम्ही दोघे अद्याप पन्नाशीच्या जवळपास आहात. बराच मोठा रस्ता पार करायचा आहे. तुम्ही एकमेकांच्या सोबतीनं पार कराल का? इट्स माय विश. निर्णय तुमचाच.. नो हरी.. टेक युअर टाइम..’’

..मुंबई विमानतळाजवळच्या हॉटेलमध्ये तिघे जण बसले होते. ‘‘हे बाय-बाय डिनर बरं का नेहा,’’ अशोक म्हणाले. डॉक्टर उज्ज्वला आणि अशोक थोडेफार मोकळे झाले होते. नेहा निघाली म्हणून उज्ज्वलाला काय बोलू आणि कुठे थांबू, कळत नव्हतं. हरपलेलं बरंच काही तिला नेहामुळं मिळालं होतं.

‘‘ममा, सर, इट्स टाइम टू मूव्ह..’’ नेहा म्हणाली.

‘‘बेटा, विल यू कॉल मी डॅड?’’ नेहा हसली.

‘‘नो सर.. इट विल बी टू ड्रॅमॅटिक.. रादर फिल्मी.. माझे डॅड माझ्या मनात आहेत. त्यांना तिथंच राहू दे.. आणि सर, तुम्हीसुद्धा एवढय़ा मोठय़ा मुलीला अपत्य मानू शकाल? लेट अस रिमेन अ‍ॅज अ थ्री गुड सोल्स.. ओके?’’

आपली अल्लड मुलगी एवढी प्रगल्भ कशी, कधी झाली? याचा विचार करणाऱ्या उज्ज्वलाला नेहा बिलगली.. ‘‘ममा, बिग हग. सर, बिग हग.. नाऊ बाय बाय. टेक केअर..’’

नेहा पाठमोरी झाली. ट्रॉलीवर बॅग्ज रचू लागली. तिला निरोप देणाऱ्या ममा, सर आणि खुद्द तिचंही अंत:करण एकाच वेळी जड आणि हलकंही झालं..!