अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोठय़ा झालेल्या हिलरी डवेला एक कल्पना सुचली आणि त्या कल्पनेला वास्तवात आणण्यासाठी तिला आठ वर्षे संघर्ष करावा लागला. त्यानंतर तिच्या कंपनीचा टर्न ओव्हर ८५ दशलक्ष पौंड एवढय़ापर्यंत पोहोचला! आज ‘पॉल-एक्स’ ही इंग्लंडमधील अग्रगण्य लॉजिस्टिक्स कंपनी मानली जाते. ती एक बिझनेस वुमन आहेच, परंतु त्याहीपेक्षा ती आज लोकप्रिय आहे तिच्या बीबीसीवरील ‘ड्रॅगन डेन’ या कार्यक्रमामुळे. त्या हिलरीविषयी..
अव्याहतपणे सुरू असलेल्या आपल्या विचारचक्रात एखादा विचार अगदी लख्खकन मन:पटलावर चमकून जावा आणि त्या विचाराचा धांडोळा घेता घेता संपूर्ण जीवनच पालटून जावं असंच काहीसं घडलं हिलरी डवे हिच्याबाबत! एका परिवहन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीत मार्केटिंग सल्लागार म्हणून काम करीत असताना आपल्या सहकाऱ्याचे बोलणे तिच्या कानावर पडले आणि त्याच क्षणी तिच्या मनात आपण स्वत:च हा व्यवसाय अधिक कार्यक्षमतेने करू शकतो असा विचार आला आणि यातूनच पुढे इंग्लंडमधील अग्रगण्य ठरलेल्या ‘पॉल-एक्स’ या महाकाय लॉजिस्टिक्स कंपनीच्या निर्मितीची संकल्पना हिलरीच्या मनात आकार घेऊ लागली.  
आज ‘पॉल-एक्स’ ही लॉजिस्टिक्स कंपनी इंग्लंडमधली ‘सप्लाय चेन’ क्षेत्रात महत्त्वाची मानली जाते. १९९६ साली स्थापन झालेल्या या कंपनीने इंग्लंडमधील जवळजवळ प्रत्येक पोस्टल कोडपर्यंत पोहोचण्याचा विक्रम केला आहे. ७५०० ट्रक्स, ५००० दशलक्ष क्वेअर फूटांचे वेअर हाऊसेस, इंग्लंड व युरोपात इतरत्र शंभरांहून अधिक डेपो, असा अवाढव्य पसारा असलेली ही कंपनी इंग्लंडमधील लॅन्कशायर इथे साधारण कुटुंबात जन्मलेल्या आणि स्वकर्तृत्वाने यशोशिखरावर पोहोचलेल्या हिलरी डवे हिची आहे. तरीही तिच्या व्यवसायापेक्षाही अधिक ती ओळखली जाते ते म्हणजे तिच्या बीबीसीवरील ‘ड्रॅगन डेन’ या कार्यक्रमामुळे!
हिलरीचा जन्म १९५७ साली झाला. तिच्या वडिलांची ‘सेन्ट्रल हीटिंग’ कंपनी होती. बोल्टनमधील शाळेत शिकत असतानाच तिच्या वडिलांना व्यवसायात खूप मोठा आíथक फटका बसला आणि त्यांच्यावर दिवाळखोरीची वेळ आली. आíथक परिस्थिती एवढी हलाखीची होत गेली की हिलरीला आपले शिक्षण वयाच्या सोळाव्या वर्षी सोडून द्यावे लागले. जरा खटपट केल्यावर  ‘वुमेन्स रॉयल फोर्स’मध्ये तिला नोकरी मिळाली. नंतर काही काळाने ती लंडन येथील ‘टीएनटी’ ट्रान्सपोर्ट कंपनीत नोकरी करू लागली. याच कंपनीत सेल्स मॅनेजरपदापर्यंत हिलरीने मजल मारली. तिच्या लंडन येथील वास्तव्यात तिला भेटलेल्या फिलीप नावाच्या तरुणाशी ती विवाहबद्ध झाली.
‘‘मेल्वित (मुलगा)च्या जन्मानंतर त्याच्यासोबत अधिकाधिक काळ राहता यावे म्हणून मी ही नोकरी सोडली आणि परिवहन क्षेत्रात मार्केटिंग सल्लागार म्हणून काम करू लागले,’’ असे हिलरी सांगते. याच दरम्यान स्थापन झालेल्या तिच्या ‘पॉल-एक्स’ या सुप्रसिद्ध कंपनीबद्दल हिलरी सांगते, ‘‘एक दिवस आमच्याच व्यवसायातील दोन व्यक्तींचे बोलणे मी ऐकले. एक कन्साइनमेंट पोहोचवताना छोटय़ाशा अंतरासाठी कंपनी १२-१३ दिवस का लावते, यावर एक माणूस दुसऱ्याला विचारीत होता. त्यावर दुसऱ्या व्यक्तीचे उत्तर होते की लॉरी ऑर्डर्सने पूर्ण लोड होईपर्यंत ती पाठवली जात नाही. हा एक क्षण असा होता की अशा अडचणी न येऊ देणारी एक लॉजिस्टिक्स कंपनी आपण स्वत:च सुरू का करू नये? या विचारातून ‘पॉल-एक्स’चा जन्म झाला! एखादे काम ज्या पद्धतीने केले जाते त्यापेक्षा अधिक सोपा मार्ग ते करण्यासाठी असतोच यावर माझा विश्वास आहे आणि हेच मला आपल्या कंपनीबाबत करून दाखवायचे होते.’’
 एवढा सगळा व्यवसाय उभारायचा म्हणजे पशाची व्यवस्था करणे, हे सर्वात मोठे काम. हिलरीने बँकेकडे यासाठी ११२ हजार पौंडांचे कर्ज मागितले तेव्हा ते नामंजूर करण्यात आले. म्हणून हिलरीने आपले राहते घर विकले. त्यातून मिळालेल्या पशातून तुटपुंज्या भांडवलावर हिलरीची ‘पॉल-एक्स्प्रेस’ कंपनी १९९६ साली स्थापन झाली. दर आकारून अधिकतम वेगाने (दुसऱ्याच दिवशी) ‘डिलिव्हरी’ देणारी सेवा आपण सुरू करायची हे हिलरीने मनात नक्की केले आणि ती त्या अनुषंगाने प्रयत्नाला लागली. तिला माहिती असणाऱ्या अनेक ‘हॉलियर्स’ (कुली)शी तिने संपर्क साधला आणि त्यांचे निरनिराळे गट पोस्टल कोडनुसार तयार केले. कल्पनेत एखादा व्यवसाय साकारणे आणि तो प्रत्यक्ष उभा करणे यात असलेले महदंतर हिलरीच्या लगेच लक्षात आले. कंपनीच्या स्थापनेनंतरच्या अगदी सुरुवातीच्या कठीण काळाबद्दल हिलरी सांगते, ‘‘ मी एका स्वस्त अशा घरात भाडय़ाने राहू लागले. ते दिवस फारच कठीण होते. माझ्या मुलाला मी अ‍ॅल्युमिनियम फॉईलने गुंडाळत असे त्याला ऊब मिळावी म्हणून!’’
पण दिवस सदैव सारखेच राहत नाहीत. चांगलेही आणि वाईटही! पालटतातच. हिलरीचेही पालटले. आपल्या कल्पनेतील व्यवसायाचे आणि त्यातून होऊ शकणाऱ्या फायद्याचे गणित विविध लॉजिस्टिक्स व्यवसायासंबंधी लोकांना पटवून देण्यासाठी आणि व्यवसायासाठी ऑफिसची जागा शोधण्यासाठी तिने देशभर प्रवास केला. कुशल व्यवस्थापनामुळे हळूहळू हिलरीची कंपनी आकार घेऊ लागली. आठ वर्षे संघर्ष केल्यानंतर तिच्या कंपनीचा टर्न ओव्हर ८५ दशलक्ष पौंड एवढय़ापर्यंत पोहोचला! आज ‘पॉल-एक्स’चे मुख्यालय हब लसरशायर येथे २००० चौरस फूट जागेच्या इमारतीत आहे. जिथे ३०० हून अधिक लॉरीज् दर २४ तासाला येऊन थडकतात.
२००८ साली हिलरीने टेलिव्हिजनच्या दुनियेत पाऊल टाकले ते ‘चॅनल फोर’च्या सिक्रेट मिलिअनेअर या कार्यक्रमाद्वारे! या कार्यक्रमाद्वारे तिने सुमारे ३५०००० पौंड्सपेक्षाही अधिक रक्कम विविध संस्थांना दान केली. २०१० साली ती जेव्हा ‘चॅनेल फाइव्ह’च्या ‘द बिझनेस इन्स्पेक्टर’ कार्यक्रमात आली तेव्हा आपल्या व्यवसायकौशल्यांच्या माध्यमातून तिने अनेक उभरत्या छोटय़ा उद्योजकांना त्यांचे व्यवसाय उभारण्यास मदत केली. तसेच ज्यांचे व्यवसाय अगदीच डबघाईला आले होते त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या व्यवसायांचे रुपडेच पालटवून टाकले. २०११ मध्ये बीबीसी २ च्या ‘ड्रॅगन डेन’ या कार्यक्रमाच्या पॅनलवर आली तेव्हा तिचा हा कार्यक्रमही तुफान यशस्वी ठरला. २०१२ साली तिने बीबीसी २ साठी ‘हिलरी डवेज वुमेन अ‍ॅट टॉप’ तसेच २०१२ साली आलेला चॅनेल फोर साठीचा ‘द इंटर्न’ असे अनेक यशस्वी कार्यक्रम केले आणि अजूनही करते आहे.
हिलरीला आतापर्यंत ‘कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ सारखे सरकारी मानमरातब आणि त्याबरोबरच अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. तिचे ‘बोल्ड २ ब्रास : माय स्टोरी’ हे पुस्तकही लोकप्रिय आहे. आपल्या चुकांची प्रांजळ कबुली देण्याचा मनमोकळेपणा हिलरीकडे आहे. ‘‘ एवढा मोठा व्याप सांभाळताना माझे माझ्या मुलाकडे जरा दुर्लक्षच झाले. तो व्यसनांच्या आहारी गेला, पण मी त्याला व्यसनातून बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि आज तो त्यातून मुक्त झाला आहे.’’
‘‘कधी कधी एखाद्या कामात आपल्याला मनाजोगते यश मिळतेच असे नाही, पण म्हणून आपण तिथेच थांबून राहू नये, कारण अपयश हा कधीच पर्याय असू शकत नाही.’’ असे हिलरीने तिच्या पुस्तकात लिहिले आहे. तिच्या अशा आशावादी दृष्टिकोनाचेच फलित तिच्या व्यवसायाच्या उत्तुंग होण्यामागे आहे.    

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Rural Health Services pregnant woman from Nandurbar lost her life due to lack of timely medical care
ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप